Wednesday, January 11, 2012

Heart attack become turning point - for Pune's Businessman Ajit Chaphalkar हार्ट अटॅक ठरला टर्नींग पॉईन्ट पुण्याचे उद्योजक अजित चाफळकर

Heart attack become turning point - for Pune's Businessman Ajit Chaphalkar

हार्ट अटॅक ठरला टर्नींग पॉईन्ट पुण्याचे उद्योजक अजित चाफळकर

एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येणे ही गोष्ट म्हणजे तशी दुर्दैवीच! हे एक संकटच! त्यातुन तरुण वयात, म्हणजे वयाच्या केवळ 41 व्या वर्षी मॅसिव्ह हार्ट अटॅक येणे ही तर फारच दुर्दैवी घटना! हे तर फार मोठे संकट. हार्ट अटॅकच्या संकटातुन वाचलेले लोक मग उरलेले आयुष्य घाबरत घाबरत, स्वतःला फुलासारखे जपत, पुन्हा हार्ट अटॅक येऊ नये म्हणुन स्वतःला सगळ्या प्रकारच्या टेन्शन्सपासुन दुर ठेवायचा प्रयत्न करत जगताना दिसतात. संकट ही एक संधी असते असे म्हणतात. तरुण वयात आलेल्या हार्ट अटॅकचे रुपांतर सुवर्ण संधीत केले. त्यानंतरच्या 21 वर्षात स्वतःची तब्येत तर ठणठणीत ठेवलीच, पण वर्षाला 20 कोटी रुपयांचा टर्न ओव्हर असलेली स्वतःची ठणठणीत कंपनी स्थापन केली. आता याच कंपनिचा टर्न ओव्हर येत्या 5 वर्षात पांचपट म्हणजे 100 कोटी रुपयांवर नेण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. ही सत्यकथा आहे पुण्यातील एका उद्योजकाची. त्यांचे नांव आहे अजित चा॑फळकर आणि त्यांच्या कंपनिचे नांव आहे बायो अनॅलिटीकल टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रा. ली. ( Bio Analytical Technologies )
अजितचा जन्म 1948 साली पुण्याला एका टिपीकल मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबात झाला. त्याच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची उद्योग, व्यवसाय किंवा बिझिनेसची पार्श्वभुमी नाही. त्याला एकुण पाच बहिणी, चार मोठ्या व एक लहान. भाऊ नाही. वडील स्टेट बँकेत नोकरी करत होते तर आई गृहिणी होती. पण आई त्या वेळच्या व्ह.फा. पर्यंत ( सातवी पर्यंत ) शीकलेली होती. त्याकाळी व्ह.फा. ला सुद्धा मान होता. त्यावेळी स्टेट बँकेच्या जोरदार विस्ताराला सुरवात झाली होती आणि ग्रामीण भागात ब्रँचेस काढायला सुरवात झाली होती. अजितचे वडील नवीन ब्रॅन्चेस उघडण्यात एक्सपर्ट होते. त्यांच्या वारंवार बदल्या व्हायच्या. त्यामुळे अजितचे चौथीपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्रातील विदर्भ सहित अनेक भागात आणि गावात झाले. अजित पाचवीत गेल्यावर त्याचे कुटुंब पुण्याला स्थायीक झाल्यामुळे त्याचे पाचवी ते अकरावी (त्यावेळचे मॅट्रीक) शीक्षण पुण्याच्या टिळकरोडवरील न्यु इंग्लीश स्कुल मधे झाले. वडीलांची इच्छा होती की त्याने इंजिनीयर व्हावे. म्हणुन त्याने आठवीत असताना टेक्नीकल साईडला प्रवेश घेतला. त्यामुळे त्याचे इंजिनीअरींग ड्रॉईंग पक्केझाले. 1964 साली मॅट्रीक झाल्यावर त्याने वाडिया कॉलेजमधे इंजिनीअरींगच्या डिप्लोमाला ऍडमीशन घेतली. त्याची मेकॅनीकल इंजिनीयर व्हायची इच्छा होती. परंतु वाडियामधे मेकॅनीकलला प्रवेश मीळणे कठीण होते म्हणुन त्याने गव्हर्नमेन्ट पॉलिटेकनीकला (GPP) ऍडमीशन घेतली. पण तेथे पण मेकॅनीकल हुकले पण मेटॅलर्जी मिळाले. 1967 साली डिप्लोमा मेटॅलर्जी (D. Met.) झाल्यावर पुण्यच्या इंजिनीयरींग कॉलेजमधे (COEP) बी. ई. मेटॅलर्जीला ऍडमीशन घेतली. डिप्लोमा मध्ये पहिला आल्यामुळे पुढे शिकण्याची थोडी जिद्द वाढली. या ठिकाणी अजितने खर्याय अर्थाने कॉलेज लाईफ ईन्जॉय करायला सुरवात केली. अभ्यासाबरोबरच भरपुर प्रमाणात एक्स्ट्रॉ करीक्युलर ऍक्टिव्हिटीस मधे भाग घ्यायला सुरवात केली. बोट क्लब असो, रिगाटा असो, नाटक असो, स्पोर्टस असो की क्रिकेट असो सगळीकडे भाग घ्यायला सुरवात केली. उत्तम शरीरयष्टी कमावली कारण त्यावेळी मिलीटरीत जायचे अट्रॅक्षन होते. पण ते जमले नाही. उत्तम धावपटु म्हणुन बक्षिसे पण पटकवली. तसेच विविध क्षेत्रातील मित्र जोडण्याचा छंद लागला. कॉलेजमधे जोडलेले मित्र आयुष्यात किती उपयोगी पडु शकतात हे पुढे अनुभवायला मिळाले.
कॉलेजमधे असतानाच उद्योग व्यवसायाचा किडा अजितच्या डोक्यात वळवळु लागला होता. त्याचे मुख्य कारण होते पॉलिटेकनीकमधील डॉ वाय. व्ही. देशमुख सर. ते मेटॅलीजी डिपार्टमेन्टचे एच.ओ.डी.होते. ते नेहमी मुलांना नोकरी करु नका, स्वतःची फाऊंड्री काढा, वर्कशॉप काढा, हीट ट्रीटमेन्टचा प्लॅन्ट सुरु करा असा सतत उपदेश करायचे. त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या सकस असावे असे विचारही जोपासले जात होते. त्यामुळे सुट्टीमध्ये नोकरी आणि शिकवणी हे उद्योग पण चालू होते.
पण अजितच्या करीअरची सुरवात मात्र नोकरीपासुनच झाली. 1970 साली बी.ई. मेटॅलर्जी झाल्यावर त्याला पुण्याच्या वल्कन लाव्हलमधे (आताचे अल्फा लाव्हल) ट्रेनी इंजिनीयर म्हणुन नोकरी मिळाली. आधी त्याच्याकडे कास्टींग, फोर्जींग असे फाऊंड्री मटेरियलच्या प्रोक्युअरमेन्टचे काम होते. पण त्याची इंजिनीअरींग ड्राईंगवरची हुकुमत व ती ड्राईंग अचुक वाचायची क्षमता बघुन त्याच्याकडे क्रिटीकल कॉम्पोनंट डेव्हलपमेन्टचे काम देण्यात आले. या ठिकाणी त्याला नॉन फेरस व स्पेशल स्टील सारख्या निरनिराळ्या 16 प्राकारच्या मेटल्सवर काम करायची संधी मिळाली. तसेच वेगवेगळ्या मशीन मधील components, assemblies & design पाहायला मिळाली. मग कंपनीतर्फे त्याची स्वीडनला रवानगी करण्यात आली व आयुष्यातील पहिली फॉरीन ट्रीप मिळाली. त्याकाळी आत्तासारख्या सहज फॉरीन ट्रीप्स मीळत नसत. स्वीडनच्या मुक्कामात त्याला परदेशी ग्राहकांबरोबर कसे वागायचे व फॉरीन मार्केटस कशी असतात याचा अनुभव आला. मुख्य म्हणजे परदेशी इंजीनीयर्स Technology कडे कसे बघतात, कसे विचार करतात, मशीन्स कशी design करतात, हे शिकायला मिळाले. पुण्याला परत आल्यावर त्याची प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट मधुन मार्केटींगमधे प्रॉडक्ट मॅनेजर म्हणुन बढती झाली. पण आत्तापर्यंत फक्त इंजिनीयर म्हणुन काम केलेल्या अजीतला कमर्शीयल नॉलेज काहीच नव्हते. या ठिकाणी त्याला दुसरे गुरु भेटले ते म्हणजे कंपनिचे एम.डी. व्ही.ए.दातार. त्यांनी अजीतला आय. आय..एम. अहमदाबादला पाच आठवड्यांचा एक management development कोर्स करायला पाठवले. याचा अजीतला पुढील आयुष्यात फार उपयोग झाला. दरम्यान 1973 साली अजीतचे लग्न झाले. पुण्याचे विख्यात संस्कृत पंडीत डॉ. चिं. ग. काशीकर यांची विद्या ही बी.ए. डी.एस.डब्लु. झालेली कन्या अजीतची पत्नी बनली. 1974 साली मोठ्या मुलिचा अनघाचा जन्म झाला तर 1980 साली धाकट्या मुलाचा अमोघचा जन्म झाला.
सगळे काही छान चालु होते. पण डोक्यात स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा जो किडा वळवळत होता तो काही स्वस्थ बसु देत नव्हता. १९७९ साली कंटाळा आला म्हणुन व्हल्कन लावाल सोडली व महिन्द्र स्पायसरमधे मुंबईला काही दीवस नोकरी केली.
अजितच्या करीअरचा पहिल्या 10 वर्षांचा टप्पा संपला व दुसर्याा टप्याला सुरवात झाली, जो पहिल्या टप्यापेक्षा फारच वेगळा असणार होता.
व्हल्कन मधल्या आपल्या दोन मित्रांच्या सहय्याने शेवटी एकदाचे अजितने उद्योग व्यवसायात पडण्याचे धाडस हे केलेच. घरुन पण फारसा विरोध झाला नाही. सावधगिरीच्या सूचना वारंवार मिळत होत्या. पण ते बरोबरच होते कारण ह्या मार्गाने सबंध कुटुंबातून कोणीच गेलेले नव्हते. न्युमॅटीक हॅमर्स व त्याला लागणारे ड्रील रॉडस व टुल बीटसच्या आणि स्पेअर्स उत्पादनाला सुरवात करायचे ठरले. याचे कारण अजितला आकर्षण होते ते कार्बाईड आणि स्टीलचे. त्यावेळी सँडवीक व विडिया या कटींग टुल्स बनविणार्या कंपन्यांनी जवळ जवळ कार्बाईड स्टीलवर कबजाच केला होता. या कंपन्या हे कार्बाईड बाहेर कुणाला मिळु देत नव्हत्या. पण काही छोट्या कंपन्यांकडुन हे कार्बाईड मिळु शकते हे अजितला कळुन चुकले होते. त्याने अवंती टुल्स या प्रायव्हेट लिमिटेड कंपनिची स्थापना केली. एकुण 3 डायरेक्टर्स होते पण मुख्य जबाबदारी अजीतचीच होती. जो अनुभव नवीन उद्योजकांना येतो तो अजितला पण आला. कोणी बँक फायनान्स द्यायला तयार होत नव्हती. पण सीकॉमने (SICOM) हा प्रोजेक्ट उचलून धरला. त्यांनी 25 लाखांचा फायनान्स मंजुर केला पण एक अट टाकली. पुण्याला प्लॅन्ट न टाकता दुसरीकडे (औद्योगिक दृष्ट्या मागासलेल्या भागात) कोठेतरी टाकावा अशी ती अट होती. त्यावेळी सातारला नुकतीच एम.आय.डी.सी. ची स्थापना झाली होती. त्यामुळे सातारला प्लॅन्ट टाकायचे ठरले. तीन डायरेक्टर्स व दहा लोकांच्या सहय्याने 1980 साली कंपनीची सुरवात झाली. पहिल्या वर्षीचा टर्न ओव्हर 20 लाखाच्या आसपास होता. 1983 साली कंपनिला “National Award For Entrepreneurship) हे राष्ट्रपतींच्या हस्ते ऍवॉर्ड पण मिळाले. त्या काळात एका अमेरिकन कंपनीने collaboration ची तयारी दाखवली होती. 1986 सालापर्यंत कंपंनी उत्तम चालु होती. कंपनीचा टर्न ओव्हर ७० लाखाच्या घरात गेला होता. आता कंपनीत पंन्नास माणसे होती. या कंपनीत काम करत असताना अजितचा अनेक सरकारी खात्यांशी संबंध आला, महाराष्ट्रात लघु उद्योग काढणे किती कठीण असते याचा वारंवार प्रत्यय येत होता. यासाठी 50 कायद्यांचे पालन कारावे लागते. 50 एजन्सीजकडुन परवाने मीळवावे लागतात. 150 इन्स्पेक्टर्सना तोंड द्यावे लागते. एक्साईज डिपार्टमेन्टचा फार वाईट अनुभव आला. इथपर्यंत कि तुम्ही उद्योजक आहात का क्रिमिनल म्हणजेच आरोपी आहात असे वाटावे. तरी सुध्धा सर्व काही आलबेल आहे असे वाटत होते. पण लवकरच हा फुगा फुटणार होता.
1986 साली कंपनीतील कामगारांनी संप केला. चार महिने हा संप आणि अनेक महिने गो स्लो चालु होता. त्यामुळे अजितने मोठ्या कष्टाने उभी केलेली ही कंपनी पत्याच्या बंगल्यासारखी तर कोसळलीच पण अजितचे पण कंबरडे मोडले. सगळ काही उलट पुलट होऊन गेलं. कंपनीकडे भरपुर ऑर्डर्स होत्या. पण त्या जास्त करुन गव्हर्नमेन्ट डिपार्टमेन्टसच्या होत्या. त्याला पेनल्टी क्लॉज होत्या. संपामुळे प्रॉडक्षन ठप्प झाले होते. वेळेवर ऑर्डर पुर्याे न केल्याबद्दल कंपनिला दंड होऊ लागले. कॅश फ्लो बोंबलला होता. कंपनीचे तीन फायनान्सर्स होते. सिकॉम व एम. एस.एफ.सी. ने प्लॅन्ट व मशीनरिला फायनान्स दिला होता. तर युनायटेड वेस्टर्न बँकेने खेळत्या भांडवलाची जबाबदारी स्विकारली होती. पण बँकेने हात आखडते घेतले. त्याचाही खूप त्रास झाला. तिन्ही फायनान्सर्सनी एकत्र येऊन या समस्येवर काहीतरी तोडगा काढावा असे अजितचे प्रयत्न सुरु होते. पण त्याला यश येत नव्हते. कंपनी वाचवण्याचे अजितचे शर्थिचे प्रयत्न चालु होते. पण कुठेच डाळ शीजत नव्हती. एकदा का हे दुष्ट चक्र सुरु झाले कि तुम्हाला माहित नसलेले कायदद्याचे पालक डोकं वर काढून नोटीसा बजावायला सुरवात करतात. कोणीही परिस्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. वर एक्साईज डिपार्टमेन्टने प्रचंड त्रास द्यायला सुरवात केली होते. 1986 ते 1889 अशी तीन वर्षे अजितचे कंपनी वाचवण्याचे अथक प्रयत्न आणि नोटिसांना उत्तरे देणे असे चक्र चालु होते. याचा काही उपयोग तर झाला नाहीच तर अजितची तब्येत बीघडली. त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅकला सामोरे जावे लागले. (मेडिकल भाषेत “Myocardial Infarction”)
1990 साली म्हणजे वयाच्या 41 व्या वर्षी अजितला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला व त्याची बायपास सर्जरी करावी लागली. ते सुध्धा तो कफल्लक झालेला असताना. खिषात पैसे नसताना. मुले लहान असताना. पण या कठीण परिस्थितीत त्याच्या मदतिला धाऊन आले ते त्याचे अनेक मित्र. डॉ. नितु मांडके व अजितची लहानपणापासुनची दोस्ती. दोघेही नाना क्लासचे विद्यार्थी. तसेच कॉलेजमधे असताना दोघांनी पळण्याच्या शर्यीत एकत्र भाग घेऊन मेडल्स मीळवलेली. रुबी हॉलमधे शस्रक्रिया झाली. मित्रांनी वर्गणी गोळा करुन पैसे उभे केले. डॉ. नितु मांडके, डॉ. हिरेमठ, डॉ. अरुण बहुलीकर, डॉ. बाबा साठे, डॉ. अशोक गोंधळेकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे अजित चे प्राण वाचले व त्याचा जणुकाही पुनर्जन्मच झाला. आपण अजुन जिवंत आहोत पण डॉ. नितु मांडके हार्ट अटॅकनेच आपल्या आधी निघुन गेले ही खंत अजुनही अजितच्या मनाला लागुन आहे.
एक वर्ष अजितला सक्तिची विश्रांती घ्यावी लागली. हा वेळ अजितला मिळाला आत्मपरीक्षण करण्याचा. आपले काय चुकले हे शोधुन काढण्याचा. त्याच वेळी अजितला त्याचा एक जवळचा मित्र भेटला. तो अजितला म्हणाला, ‘ अवंती टुल्स ही कंपनी वाचवुन तु काय प्रुव्ह करणार आहेस? आणि केणाला प्रुव्ह करणार आहेस? एक बिझिनेस कोसळला, एक पराभव झाला म्हणजे तु संपलास असे होत नाही. त्यामुळे तुझ्यातील कौशल्ये, तुझी क्षमता संपत नाही. शहाणा असशील तर अवंती टुल्स मधुन बाहेर पड!’ अजितने मित्राचा सल्ला ऐकला. फक्त 500 रुपये घेऊन व सुमारे 2 कोटी रुपयांची लायेबिलिटी, अनेक कोर्ट केसेस डोक्यावर घेऊन, न संपणारी अनेक प्रश्नचिन्हे घेऊन अजितने अवंती टुल्सला कायमचा रामराम ठोकला. पुढे काय काय वाढून ठेवलाय हे माहित नसताना !
अशा रीतीने अजितच्या करीअरमधील 10 वर्षांचा दुसरा टप्पा संपला आणि तिसर्या् टप्याला सुरवात झाली पण तो सुध्धा अगदी वेगळा ठरणार होता.
एक दार बंद झाले की दुसरे दार आपोआप उघडते असे म्हणतात. अजितच्या COEP मधील हरीष मेहताने मुंबई आणि पुण्याला ऑनवर्ड टेकनॉलॉजी नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी चालु केली होती. तेव्हां ती एक स्टार्ट अप कंपनी होती. त्याची गाठ एका मित्राने घालून दिली. त्याने अजितला सांगीतले की ही कंपनी तुझी स्वतःची आहे असे समजुनच तु चालव. त्यांच्याकडे काही प्रतिष्ठीत अमेरीकन कंपन्यांच्या सॉफ्टवेअरची एजन्सी होती. हरीषचे म्हणणे होते की आपण प्रथम लोकल मार्केटमधे स्ट्रॉंग होऊन मग फॉरीन मार्केटमधे शिरु. त्याचवेळी बंगलोरला इन्फोसीस नावाची एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन झाली होती. त्यांनी पहिल्यापासुनच फॉरीन मार्केटवर लक्ष केन्द्रीत केले होते. म्हणुन इन्फोसीस आजच्या एव्हडी मोठी कंपनी होऊ शकली. जर हरीषने हीच मनोवृत्ती स्विकारली असती तर पुण्यातच इन्फोसीस सारखी मोठी कंपनी उभी राहु शकली असती. केवळ बिझिनेस ऍटिट्युडमुळे किती फरक पडतो बघा! तरीही या ठिकाणी हरिष यांच्या एका गोष्टीला दाद दिली पाहिजे. ती अशी - जेव्हां समोरचा माणूस एका विचित्र परिस्थितीत आहे आणि त्याच्या यशस्वीतेबद्दल प्रश्नचिन्हे उभी आहेत असे असताना त्यांनी अजित वर विश्वास दाखवला. कदाचित त्याचे कारण अल्फा लावाल मध्ये असण्याची पुण्याई आणि मित्रांनी बोललेले चार चांगले शब्द असेही असेल. पण अशा ब्रेकची गरज होती आणि तो मिळाला हे महत्वाचे ! अजितने या कंपनीची सुत्रे स्विकारली खरी. पण त्याला कॉम्युटर, सॉफ्टवेअर यातील फारसे काही कळत नव्ह्ते. पुर्वीपासुनच त्याच्यात ड्रॉईन्ज अचुक वाचायचे कौशल्य होतेच. आता त्याच्यात अजुन एक कौशल्य निर्माण झाले होते. ते म्हणजे बॅलन्स शीट अचुक वाचायचे कौशल्य. तसेच माणसे जोडण्याचे कला. एवढ्या बळावर त्याने पुढची वाटचाल सुरु केली. त्यावेळी त्याने तीन लक्ष ठेवली होती. ती म्हणजे फॉरीन मार्केट्स, कॉम्युटर इंडस्ट्रीचा अभ्यास,आणि 10 कोटी टर्न ओव्हर. पुढे या कंपनीने कॅड-कॅम तसेच प्रोसेस इंजिनीअरींग सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात प्रवेश केला. अजित जॉईन झाला तेव्हा कंपनीत फक्त पन्नास माणसे होती. 1994 साली कंपनी पब्लीक झाली व त्यानंतर काही काळातच अजित कंपनीचा सी.ई.ओ.झाला. पाठोपाठ इतर अनेक किंबहुना कंपनी चालवण्याच्या सर्वच जबाबदार्या. अजित वर येवून पडल्या. 1997 पासुन एक्सपोर्टला सुरवात झाली. 1998 पासुन सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्टला सुरवात झाली. अणि यातुनच अजितच्या ‘सुटकेस’ आयुष्याला सुरवात झाली.
अजित पुर्वी स्वीडनला राहिलेला आणि Europe ची माहिती असल्यामुळे त्याला फॉरीन कस्टमर्सशी कसे डील करायचे हे ठाऊक होते. त्यांची मनोवृत्ती कशी असते, परदेशी बाजारपेठा कशा असतात याची चांगली कल्पना होती. अजितचा एक्सपोर्ट सुरु झाला आणि अजितच्या जग भ्रमंतिला सुरवात झाली. सुटकेस नेहमी भरलेली असायची. जपानपासुन अमेरिकेपर्यंत वार्यार सुरु झाल्या. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीत सॅन होजे ला ऑफीस काढले. त्यानंतर Detroit, Dallas. अजित गंमतिने या कालखंडाला ‘सुटकेस’ आयुष्याचा कालखंड म्हणतो. कारण त्याचे आयुष्य सुटकेसमधे व विमानातच जात होते. बघता बघता कंपनीचा पसारा वाढला. कंपनीत 500 माणसे काम करु लागली. टर्न ओव्हर भरपुर वाढला. कंपनीचे Business model सुद्धा कालमानानुसार बदलू लागले. कंपनिचा सी.ई.ओ. म्हणुन अजीतची पण भरपुर आर्थीक प्रगती झाली. पण एकच गोष्ट अजितला खटकत होती. जरी काही अंशी stock options मुळे थोडे बहुत मालकीचे समाधान असले तरीही तो त्या कंपनीचा मालक नव्हता. कंपनी Public Limited असल्यामुळे मालकी हक्काचे वाटेकरी कोणीतरी दुसरेच होते. शेवटी तो एक Intrapreneurial प्रवास होता. नोकरीचा आभास नव्हता कारण पुरेसे स्वातंत्र्य होते. पण तरीही काहीतरी कमी होते. आता परत एकदा विचार करण्याची वेळ आली होती. सर्वच गोष्टींचा जमा-खर्च मांडायची वेळ आली होती. तसेच अवंती टुल्सचे शुक्लकाष्ट अजुन संपलेले नव्हते.
अजितच्या करीअरची तीसरी 10 वर्षे अशा रितिने संपली व पुढील काळ सुरु झाला.
2001 मधे अजितने ऑनवर्डमधुन अलग व्हायचे ठरवले. सर्व सहकार्यां शी चांगले संबंध ठेऊन. त्याला दोन कारणे घडली. पहिले कारण म्हणजे त्याच्या मागे लागलेले अवंती टुल्सच्या लायेबिलिटिचे शुक्लकाष्ट त्याला एकदाचे कायमचे संपवायचे होते. मग त्यासाठी त्याने चक्क वकिलाचा काळा कोट चढवला. सगळ्या केसेस फाईट आऊट करायला सुरवात केली. यात त्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळुन आल्या. त्याच्या फायनान्सर्सनीच त्याच्या कंपनिचा कबाडा केल्याचे लक्षात आले. एक कोटी रुपये कींमतिची प्रोपर्टी केवळ 14 लाखात व अशा कंपनी ला वीकली की त्यांनी त्याचा एक छदाम पण दिला नाही. एक्साईस डिपार्टमेन्टचे बहुतेक खटले निकालात निघाले. एक्साईज इन्स्पेक्टर्सना हवा असलेला मलिदा खायला न घातल्यामुळे आकसापोटी हे खटले दाखल झाले होते. अजितच्या डोक्यावर लायेबिलिटी जवळ जवळ नव्हतीच! पण कायद्याने अडकवले होते. स्वतःचे पैसे गेलेच होते. त्याचा हिशोबच नाही. शिवाय कायदा उलटा फिरू शकतो याचा अनुभव आला. त्रास मात्र पुरेपूर होता. यामुळे भरपूर बदनामी पण वाट्याला आलेली होती. तरी पण त्याने कायदेशीर व सनदशीर मार्गाने यातुन सुटका करुन घेतली व आपले रेकॉर्ड स्वच्छ केले.
अजितचे वडील स्टेट बँकेचे शाखा उघडणारे एक्सपर्ट बनले होते. तसेच आपण पण स्टर्ट अप कंपन्यांचे एक्स्पर्ट बनलो आहोत हे अजितच्या लक्षात आले. कारण दोन स्टार्ट अप कंपन्यांचा अनुभव पाठिशी होता. त्याच बरोबर हेही लक्षात आले कि मागील वर्षांमध्ये दर २ ते ४ वर्षांच्या दरम्यान प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचे एक वेगळेच आव्हान समोर आलेले होते आणि ते आव्हान त्याने उत्तमरीत्या पेलले होते. मग आपणच एखादी स्टार्ट अप कंपनी का काढु नये असा विचार अजीतच्या मनात येऊ लागला. तसेच आपण Consulting मार्गाने इतरांनाही स्टार्ट अप साठी तशी मदत करू शकतो हे पण लक्षात आले होते.
आता सॉक्टवेअरच्या क्षेत्राची अजितला चांगली कल्पना आली होती. सॉफ्ट वेअरची डेव्हलपमेन्ट जास्त करुन सर्वीस सेक्टरसाठी- जसे की बँकींग, इन्शुरन्स वगैरे- होते हे अजितच्या लक्षात आले होते. अजुन अशी बरीच क्षेत्रे आहेत की ज्यामधे सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्टला वाव आहे. असे एक क्षेत्र त्याला खुणावत होतो. ते म्हणजे साटन्टिफीक डेव्हलपमेन्ट. हे क्षेत्र दृष्टीपथामध्ये यायला कारण होता तोही एक जुना मित्र श्रीराम भालेराव. मग त्याच्या बरोबर ठरले कि आपण एक नवीन कंपनी स्थापन करू की जी Scientific Community साठी सॉक्टवेअर लिहू शकेल. श्रीरामच्या कनेक्शन्स मधून एका prospective client ची गाठ पडली. त्याला आमचे Business Model काय आहे ते पटवणे हा नवीन प्रवासातला पहीला विजय होता.
शास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रासाठी सॉफ्टवेअर बनवणे ही गोष्ट काही सोपी नसते हे अजितच्या लक्षात आले. त्यासाठी जे काही शास्त्रीय संशोधन चालु आहे त्याची अद्ययावत माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी त्याने तीन क्षेत्रे नीवडली-बायो, लाईफ सायन्स व हेल्थ. Improve quality of Life लोकांच्या आयुष्याचा व आरोग्याचा दर्जा वाढवणे हे त्यामागचे मुख्य सुत्र ठरवले. दोन इंजीनीयर्स आणि दोन शास्त्रज्ञां च्या सहाय्याने 2004 साली बायो अनॅलिटीकल टेक्नॉलॉजीज प्रा. ली. ( Bio Analytical Technologies ) या कंपनिची स्थापना केली. विजय घाटे या कॉलेजमधील फिलिप्स स्कॉलरला बरोबर घेतले. फिलिप्स सारख्या नावाजलेल्या कंपनीचा दीर्घ काळ अनुभव असलेल्या हा मित्र सी.टी.ओ. ( चीफ टेक्नीकल ऑफीसर) झाला. . अजीत स्वतः कंपनिचा सी.ई.ओ. व सी.एफ.ओ. बनला. सोबतीला निर्वाण हा अतिशय विश्वासू साथीदार होताच. कंपनी संपुर्णपणे स्वतःच्या भांडवलावर उभी केली. एक पैसा पण कर्ज घेतले नाही. कारण कर्जाचा बोजा कंपनिला कसा मारक ठरु शकतो हे त्याने अनुभवले होते. 2004 साली कंपनिचा टर्न ओव्हर 40 लाख होता. तो आता 20 कोटींवर गेला आहे. चार माणसांपासुन सुरु झालेल्या कंपनीत आज 180 लोक काम करत आहेत. पुण्याला नव्या पेठेत सहा मजली भव्य ऑफीस आहे. यु.के मधे Manchester येथे ऑफीस आहे. अमेरिकेत प्रतिनिधी आहे. येत्या पांच वर्षात टर्न ओव्हर पाचपट करण्याची म्हणजे 100 कोटिंच्या वर नेण्याची महत्वाकांक्षी योजना आहे.
आज अजित 63 वर्षांचा तरुण आहे. हार्ट अटॅक येऊन एकवीस वर्षे होऊन गेली. पण तब्येत अजुन ठणठणीत आहे. आयुष्यात एव्हडे चढ उतार येवुन गेले. असे असताना तब्येत ठणठणीत ठेवणे कसे जमले असे मी विचारले. तेव्हा त्याने मराठितील सुप्रसिध्ध गझल लेखिका संगिता जोशी यांची खालील कविता कारणिभूत असल्याचे सांगीतले. ( ब्राम्हण व्यावसायीक पत्रिकेच्या जुन 2010 च्या अंकात संगीता जोशी यांचा परीचय प्रसीध्ध झाला आहे)
पुन्हा एकदा झुंजण्याचा इरादा
तुला जीवना जिंकण्याचा इरादा
असो जीव पंखात किंवा नसु दे
परी पिंजरे तोडण्याचा इरादा
फुले माळण्याची मनी ना मनिषा
श्चृतुला धडा शिकविण्याचा इरादा
उरी स्निग्घतेचा झरा आटलेला
आता कोरडे वागण्याचा इरादा.
निवली जरा राख माझी उद्या की
पुन्हा त्यतुनी जन्मण्याचा इरादा.
पराभवाने खचु नका. यशाने हुरळुन जाऊ नका. निरपेक्ष रहा. स्वतःकडे तटस्थपणे पहायला शिका. प्रतीकुल परिस्थितीत हाय खाऊ नका. त्याच्याशी मुकाबला करायला शिका. वरील कवितेत ही महत्वाची तत्वे सांगीतलेली आहेत, जी प्रत्येक उद्योजकाला उपयुक्त आहेत असे अजीतचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कविता हा त्याच्या जीवनाचा आधार बनली आहे. फक्त एकच सूत्र – “Don’t Quit”.
अजितच्या या जीवन प्रवासात त्याला घरच्यांची उत्तम साथ मिळाली. विशेषतः कठीण प्रसंगात त्याची पत्नी विद्या खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभी राहिली याचा तो कृतज्ञतापुर्वक उल्लेख करतो. किंबहुना प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाला जे भोगायला लागत होते, त्याची आयुष्यभराची खंत तो बाळगून आहे. त्याची मुलगी अनघा बी. कॉम. एम.बी.ए.( एच. आर.) झाली असुन त्याच्याच कंपनीत नोकरी करते. मुलिचे लग्न झाले असुन जावई एका मोठया अमेरिकन कंपनीत सॉफ्टवेअर ग्रुपचा प्रमुख आहे. मुलगा अमोघ केमीकल इंजिनीयर असुन अमेरिकेतुन एम. बी. ए. आणि एम. एस. फायनान्स करुन आला असुन त्याच्याच कंपनीत नवीन बिझिनेस development & strategies यावर काम करीत आहे. नुकतेच त्याचे पण लग्न झाले. अजितचा जॉईन्ट फॅमिलीवर विश्वास असुन तो सुभाषनगर कॉलनितील वडिलांनी बांधलेल्या जुन्या घरातच रहातो. त्याला सुन पण जॉईन्ट फॅमिलीवर विश्वास ठेवणारीच मिळाली आहे. कारण हल्लिच्या जमान्यात ही गोष्ट वीरळ झाली आहे.
हल्लिच्या मराठी व त्यातुनही ब्राम्हण तरुण तरुणिंना तुम्ही काय सांगाल असे मी अजित ला विचारले. तेव्हा त्याने सांगीतले की आता या लोकांनी बिझिनेसचा ध्यास घ्यायला हवा. पण प्रथम उद्योजक व व्यापारी यातील फरक समजाऊन घ्यायला हवा. प्रत्येक उद्योजक हा व्यापारी असतो पण प्रत्येक व्यापारी हा उद्योजक नसतो. महाराष्ट्र ही उद्योजकांची कर्मभुमी आहे, व्यापार्यां्ची नाही हे लक्षात ठेवावे. खरी आर्थीक उन्नती ही उद्योग व्यवसायामुळेच होते, नोकरीमुळे नाही हे लक्षात ठेवावे. आपल्यातील उणिवांवर कशी मात करता येईल हे शिकावे. पण दोन रिऍलिटीज नेहमी लक्षात ठेवाच्यात. एक व्यक्ती म्हणुन तुम्हाला मित्र व नातेवाईक असतात. ते तुम्हाला एक व्यक्ती म्हणुन मदत करायला तयार असतात. पण उद्योजकाला कोणी मित्र किंवा नातेवाईक नसतो. त्यामुळे उद्योजक म्हणुन कोणी तुमच्या मदतिला येईल अशी अपेक्षा ठेऊ नका. तसेच तुमचा बिझिनेसच्या चेक वर नेहमी दोघांची सही लागते. तरच तो चेक वटतो. त्यातील एक सही ही तुमची स्वतःची असते तर दुसरी सही ही तुमच्या ‘लेडी लक’ ची असते. ही दुसरी सही दिसत नसते. जर चेक वटला तर दुसरी सही होती. नाही वटला तर दुसरी सही नव्हती असे खुशाल समजावे. बर्यारच वेळा तुमचे ‘लेडी लक’ तुमच्या बिझिनेसच्या चेकवर सही करायला उत्सुक असते. पण तुम्हीच या चेकवर सही करायला उत्सुक नसता कारण उद्योग व्यवसायात येण्याचे धाडस तुमच्याने होत नसते. त्याचे उद्योजकांना असेही सांगणे आहे कि – यशाला फोर्मुला किंवा रेसिपी नसते. कारण प्रत्येक उद्योजक नेहमी “हे असे झाले आणि असे केले कि यश मिळणारच “ अशा अविर्भावात सुरवात करतो. पण तसे होत नाही. परंतु जो अशी रेसिपी किमान स्वतःसाठी करू शकेल आणि कायम करत राहील, तो महान उद्योजकापासून महान Businessman होणार हे नक्की. तसेच काळाबरोबर सुसंगत राहा, तरच जगाल. सर्वात महत्वाचे – उद्योजकाचे यश म्हणजे चांगला Balance Sheet and P&L Account असणे हेच असते. प्रत्येक वेळी – दर वर्षी. बाकी सगळे दुय्यम. तेव्हां तिथे कायम लक्ष द्या. अजितचे हे अनुभवाचे बोल आहेत.
कोण्या एके काळी ब्राम्हण मंडळी हातात पळी पंचपात्र घेऊन भिक्षुकी करायचे. याच ब्रांम्हणांनी, विषेशतः कोकणस्थ ब्राम्हणांनी पळी पंचपात्रे टाकुन तलवारी हातात घेतल्या. पेशवे बनुन लढाया जिंकल्या, राणांगणे गाजवली. दक्षिणेतील तंजावर पासुन उत्तरेकडील अटकच्या पलीकडे मराठी साम्राज्याचा विस्तार केला. ( हे अटक आता पाकिस्तानात रावळपिंडीजवळ आहे.). आता ब्राम्हणांनी हातात तराजु किंवा तागडी घेण्याची वेळ आली आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातुन आता मराठी ब्राम्हण मंडळिंनी स्वतःचे साम्राज्य जगभर उभे करावे अशी अजितची इच्छा आहे.
तरुण वयात आलेल्या मॅसिव्ह हार्ट अटॅकच्या गंभीर संकटाला यशस्वी तोंड देऊन अजितने जी अचंबीत करणारी प्रगती केली आहे त्याबद्दल माझा त्याला मानाचा मुजरा.

Heart attack become turning point - for Pune's Businessman Ajit Chaphalkar

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive