Monday, January 16, 2012

घरगुती चवीचं न्यू गणेश 'लंच होम' Homeful taste New Ganesh Lunch Home

घरगुती चवीचं न्यू गणेश 'लंच होम'

बाहेरचं खाण्याची आवड असलेल्यांना सतत ' घरचं जेवण ते घरचंच त्याला बाहेरची सर येत नाही ' असा डोस पाजला जातो . पण जर घरच्या चवीचं जेवण बाहेर मिळालं तर ? त्यासाठी जुन्या गंगापूर नाक्याजवळचं ' न्यू गणेश लंच होम ' गाठा . इथं जेवल्यावर कदाचित तुम्ही घरची चवही विसराल आणि म्हणाल ' असं जेवण घरीही मिळालं तर !'

नाशकातील ' पंचवटी ग्रुप ऑफ हॉटेल्स ' मध्ये प्रदीर्घ काळ काम केलेल्या मनिषा केळकर यांना खाण्याची प्रचंड आवड . त्यामुळे नोकरी करत असताना आई चालवत असलेल्या खानावळीत त्या मदतनीसाचे कामही करायच्या . मुळात मनिषा यांची आजी म्हणजे आईची आई स्वयंपाकातली सुगरण . विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा . हीच परंपरा पुढे मनिषा यांच्या आईने व आता मनिषा यांनी कायम ठेवली आहे . तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यावर मनिषा यांनी स्वत : ची खानावळ सुरू करण्याचं ठरवलं आणि जुन्या गंगापूर नाक्यावर न्यू गणेश लंच होम नावाने व्यवसायाचा श्रीगणेशा केला . त्यांची आई चालवत असलेल्या खानावळीचं नाव आहे गणेश लंच होम .

शंभर टक्के व्हेज खानावळ असणाऱ्या न्यू गणेश लंच होममध्ये अनलिमिटेड व लिमिटेड अशा दोन प्रकारात थाळी मिळते . अनलिमिटेडमध्ये चपाती , रस्सा भाजी , दोन सुक्या भाज्या , आमटी , कढी , भातासह चवीसाठी चटणी , कोशिंबीर , ठेचा व लोणचं असतं . तर लिमिटेडमध्ये तीन पोळ्या , रस्सा भाजी , सुकी भाजी , आमटी , कढी , भाताचा समावेश असतो . सोबत चटणी , कोशिंबीर असतेच . या थाळीचं वैशिष्ट्य म्हणजे चवीला पुणेरी पण मेन्यु अस्सल नाशिकचा .

घरगुती प्रकारचं जेवण असल्याने थाळी समोर आल्यावर विशेष काही वाटत नाही . पण एकेका पदार्थाची चव घेत गेल्यावर त्यातला आस्वाद कळतो . दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्याने त्या - त्या भाजीप्रमाणे मसालाही वेगवेगळा असतो . इथल्या थाळीचं वैशिट्य म्हणजे जेवण गरमागरम असतं . यात भाज्या , आमटी व पोळीचा समावेश असतो . आपण जेवायला बसलेलो असतो आणि पोळ्या करणाऱ्या मावशी समोरच्या खिडकीतून दिसत असतात . घरगुती मसाल्यांचा वापर करून बनविलेल्या भाज्यांचा व याचि देही याचि डोळा बनत असलेल्या गरमागरम पोळ्यांचा स्वाद पोटातली भूक दुप्पट वाढवतो . त्यामुळे एखाद दुसरी पोळी जास्त जाते . त्याचबरोबर जेवणासोबत चवीसाठी असलेल्या कोशिंबिर , ठेचा , चटणी व लोणच्याची चव अतिशय हटके आहे . किंबहुना अशा वेगळ्या टेस्टचा हा मेन्यु इथेच चाखायला मिळत असेल . कारण हिरव्या मिरच्या , लसूण व शेंगदाण्याचा कुट वापरून बनविलेला ठेचा तिखट असतो , पण त्याने तोंडात आगडोंब उसळत नाही . कारण त्यातल्या मिरच्या न बाधणाऱ्या असतात . त्याचबरोबर लाल मिरची , शेंगदाणे , धणे , साखर व मीठ वापरून बनवलेली सोलापूरी चटणीही मस्त आहे . ही चटणी खाताना साखर व धण्याचं मिश्रण झक्कास लागतं . विशेष म्हणजे ही चटणी उपवासालाही चालते . गाजराच्या कचेडीचा ( आपल्या भाषेत कोशिंबीर ) स्वादही मजेशीर आहे . यात असलेला ओल्या खोबऱ्यामुळे कचेडीची चव अधिक घट्ट होते . त्याचबरोबर लिंबू , मिरची व कैरीचं लोणचंही असतं . मुख्य म्हणजे लोणच्याचे सर्व प्रकार इथेच बनवले जातात .

इथल्या थाळीचा यूएसपी म्हणजे कढी . आंबट गोड चवीची कढी ' ऑस्सम ' आहे . जेवताना आपण गरमागरम कढीच्या किती वाट्या रिचवतो हे आपल्यालाही कळत नाही . त्याचबरोबर इथली अळूची पातळ भाजीही स्पेशल आहे . या भाजीला दिलेली काजुची फोडणी , त्यात असलेले खोबऱ्याचे तुकडे या भाजीला कोकणी टच दिला जातो . त्यामुळे एरवी खात असलेल्या अळुच्या भाजीत आणि इथल्या भाजीतला फरक तात्काळ लक्षात येतो . ही खानावळ अस्सल महाराष्ट्रीय असली तरी इथे छोले भटुरे , राजम्यासारखे पदार्थही मिळतात . तसंच दक्षिण भारतातील रस्सम व सांबरही त्याच पद्धतीचं आहे . त्याचबरोबर आजोळ कोकणातलं असल्याने मनिषाताई सोलकढी व टोमॅटोचा सारही उत्तम बनवतात . त्याचबरोबर आंबट गोड चवीची हटके उसळही इथे मिळते .

केळकर ग्राहक हेच दैवत मानत असल्याने स्वच्छतेवर त्यांचं पूर्ण लक्ष असतं . तसेच ' इथे काम करणाऱ्या सहा महिला माझी उर्जा आहेत ,' असंही मनिषाताई आवर्जून सांगतात . काहीही झालं तरी क्वालिटीत नो कॉम्प्रमाइज हा मनिषाताईंचा फंडा त्यांच्या यशाचं गमक आहे .

Homeful taste New Ganesh Lunch Home

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive