Wednesday, October 3, 2012

आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra sharad upadhye

आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये

या महिन्याच्या ' गेस्टरूम ' चे पाहुणे आहेत ' राशीचक्र ' कार शरद उपाध्ये. त्यांची ही पहिली अक्षरभेट...


' निर्वाणी ,' ' निमोर्ही ' आणि ' दिगंबर ' या तिन्ही आखाड्यांचे कुंभमेळ्यातील अखेरचे शाही स्नान शांततेत. पोलिस आणि नाशिककरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला...

... साधुशाहीत हस्तक्षेप करण्याची हिंमत कोणात ?...

... रामानंदी , मध्यगोडेश्वर , निम्बार्क आणि विष्णू संप्रदाय या चतु:संप्रदायाच्या 470 खालशांनी एप्रिल महिन्यात उज्जैनला होणाऱ्या कुंभमेळ्यात , ' नाशिकला झालेल्या अन्यायाचा समाचार घेऊ ' अशी धमकी दिली आहे...

... गेल्या काही आठवड्यांत प्रसिद्ध झालेल्या आणि विविध वाहिन्यांवरून प्रसारित झालेल्या या बातम्यांवरून आध्यात्माचे स्वरूप कसे बदलत चालले आहे , हे कळते. साधुसंतांना अभिप्रेत असलेला आध्यात्म हा विषय अंत:करणात उचंबळणाऱ्या भक्तीप्रेमाचा. अवर्णनीय उच्च प्रतीची मन:शांती देणारा. मानवी योनीला अभिप्रेत असलेल्या अखेरच्या गन्तव्यस्थानाला थेट घेऊन जाणाऱ्या राजमार्गाप्रमाणे सरळ. संशय , निराशा , दु:खं आणि विकल्पांच्या धुक्याने भरलेल्या जीवनमार्गावरील अंधाराचा नाश करण्यासाठी , खचलेल्या जीवांना उमेद देण्यासाठी संतरूपी सूर्यनारायण उदित होतात , भक्तीमार्गाचा , प्रबोधाचा प्रकाश उजळवून मार्गदर्शन करतात आणि मग ते जीव दुर्लभ नरजन्माचे सार्थक करून घेतात.

तहानभूक विसरून एकमेकांना प्रेमाने आलिंगन देत , एकमेकांच्या पायावर डोके टेकीत , विठ्ठलनामाचा घोष करीत अनवाणी पायांनी शेकडो मैल उन्हातान्हातून चालत लाखो वारकरी वर्षानुवषेर् पंढरीला जातात. त्यांना बंदोबस्तासाठी एकही पोलिस लागत नाही ; कारण ते विठ्ठलनामाच्या प्रेमाशिवाय दुसरे काही जाणतच नाहीत. आणि प्रेम असते तिथे अहंकार कसा असेल ? पण मान-अपमान , पहिले स्नान-दुसरे स्नान , निर्वाणी आखाडा , दिगंबर आखाडा हा द्वैतभावच यांच्या आध्यात्माचे बेगडी उथळ , ठिसूळ स्वरूप दाखवतो. वारकरी आणि ' वार ' करी यात हाच फरक आहे. फलज्योतिषशास्त्राप्रमाणे आध्यात्म हासुद्धा आता मनोरंजनाचा विषय होणार , अशी चिन्हे आहेत.

ज्योतिषांचेसुद्धा आखाडे आहेत. मधून मधून ज्योतिष परिषदा भरवून ते कुस्त्यांची जंगी दंगल करीत असतात. सायन आखाडा , निरयन आखाडा , अष्टोत्तरी आखाडा , विंशोत्तरी आखाडा , पारंपरिक आखाडा , कृष्णमूतीर् आखाडा... आणि गंमत म्हणजे , या आखाड्यांत खरी दमछाक होते ती ' पहिवानां ' ची नव्हे , तर प्रश्नर्कत्यांची.

गणपती उत्सव मंडळांचेही आखाडे आहेत. मानाचा गणपती , मंडईचा गणपती , व्यायामशाळेचा गणपती. यांच्या गणपतीला पारंपरिक सहसावर्तन , अभिषेक , मंगल आरत्या अशा जुनाट उपासना चालत नाहीत , सिनेमे , नाटके , ऑकेर्स्ट्रा लागतात. सनईपेक्षा ढोलताशे आणि धांगडधिंगा लागतो. हाडांचा खुळखुळा होईल , असे भयंकर नाचावे लागते. ते , नॉर्मल असताना शक्य नाही , म्हणून धुंद व्हावे लागते. रात्रीसुद्धा प्रवचन , कीर्तन , प्रबोधन , व्याख्यान असल्या जुनाट गोष्टींचा ते निषेध करतात.

परवाच परळला एका गणेश मंडळाची जाहिरात पाहिली...

आजचे कार्यक्रम : दुपारी 3 ते 6 : चित्रपट- ' चमेली की शादी. ' सायंकाळी 7 वा. : मेंदू चक्रावून टाकणारे रहस्यमय नाटक- ' हे बाळ कुणाचे ?' रात्री 10 वा. : व्याख्यान : विषय- गुंडगिरी , एक जटील समस्या. वक्ते- छगन कणकवलीकर.

गणेश विसर्जन सोहळ्यांतील एकेकाची धुंद अवस्था तर डोळ्याचे पारणे फेडते. सरळ चालताना त्रास होतो म्हणून आपण आनंदाने बेभान होऊन नाचताना झिंगतो आहोत असा आविर्भाव आणणे सोयीस्कर असते. पुन्हा त्या भयानक नृत्यप्रकारामुळे तहान लागते म्हणून खिशात एक चपटी बाटली असणे आवश्यक असते. ते पाणी थोडेसे लालवट का असते ते जाणकरानांच समजते... साधूच्या खुणा साधू जाणती...

आता नवरात्र मंडळांचे आखाडेही उघडू लागले आहेत. गेल्या नवरात्र उत्सवात लोखंडवाला कॉम्प्लेक्समधल्या सोसायटीत अतिविशाल महिला- ढगाला लागली कळ , पाणी थेंब थेंब गळं... , अखियोंसे गोली मारे , लडकी कमाल की... , ऐका दाजीबा , ऐका दाजीबा... , अशा , महादेवीला आवडणाऱ्या गाण्यांवर अशा काही धुंद नाचल्या की , आजही त्यांना अंथरुणावरून उठायला डॉक्टरांची परवानगी नाही.

सप्टेंबर महिन्यातच पितृपंधरवडा असल्याने ब्रह्मावृंदाचे आखाडेही कार्यरत होऊ लागले आहेत. ' छपरा बिल्डिंग ' आणि ' वाड्यावरच्या ' ब्रह्मावृंदांचा स्मशानकृत्य करणारा आखाडा , वैदिक धर्मकृत्ये करणाऱ्या ब्राह्माणांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विचारात आहे. पितृपक्षातल्या धर्मकृत्याचा अधिकार फक्त श्राद्धाच्या ब्राह्माणांना असावा , असे त्यांचे म्हणणे आहे. त्या काळात व विशेषत: सर्व-पितरी अमावस्येला मिळणाऱ्या शिध्यावरही ' श्राद्ध ब्राह्माण आखाड्याचा ' संपूर्ण अधिकार असावा , ही मागणी जोर धरते आहे.

असे हे आखाड्यांचे आध्यात्म मूळ धरू लागले असताना पारंपरिक धामिर्क विधींतही खूप सुधारणा होऊ लागल्या आहेत. वटसावित्री पूजेसाठी बाहेर कुठे तरी जाऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत दमून जाण्यापेक्षा वडाची एक फांदी घरी आणून ती डालडाच्या डब्यात माती घालून त्यात रोवावी व त्या डब्यालाच प्रदक्षिणा घालाव्यात , असे मत भावे महिला आखाड्याने मांडले असून , आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोऱ्हे महिला आखाडा , रांगणेकर महिला आखाडा , किल्लेदार महिला आखाड्यांनीही मतभेद बाजूला सारून या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला आहे. कारण काही वजनदार बायकांना ही प्रदक्षिणापद्धत सोयीस्कर ठरणार आहे.

बारशाच्या पद्धतीतही खूपच स्तुत्य सुधारणा होऊ लागल्या आहेत. अलीकडेच मिसेस गुप्त्यांच्या नातीचे बारसे झाले. वरवंटा खणात गुंडाळून त्याचा ' गोप्या ' किंवा ' गुंडाप्पा ' करण्याच्या आणि मग त्याला पाळण्याखालून घालून ' गोविंद घ्या , गोपाळ घ्या ' असे म्हणण्याच्या जुनाट आणि बुरसटलेल्या पद्धतीला फाटा देऊन गुप्तेबाई आणि त्यांच्या विहिणबाईंनी नातीला पाळण्याखालून-वरून फिरवत , ' माधुरी दीक्षित घ्या , कुणी ऐश्वर्या राय घ्या ,' असे म्हणत खूपच आनंद लुटला.

सत्यनारायणाच्या पूजेतही कौतुकास्पद सुधारणा आहे. श्रावणात लागूंनी सत्यनारायणाची पूजा केली. पूजा सांगायला दाभोळकर गुरुजी आले होते. लीलावतीची कथा ही अंधश्रद्धा कशी आहे , याचे फार सुंदर विवेचन त्यांनी केले. मेहूण म्हणून आलेल्या शाम आणि त्यांच्या पत्नीला ' निर्मूलन माहात्म्य ' हे पुस्तक भेट देऊन उभयतांची ओटी भरली गेली. पुष्पाताई आखाड्याने आपल्या यजमानांकरवी ही बातमी दूरचित्रवाणीवर सांगितली. त्यांचे यजमान आधीच खूप गंभीर दिसणारे आणि ' उदासीन आखाड्याचे ' सदस्य असल्याने बातमीची खूपच चर्चा झाली.

आणखी एक आधुनिक सत्यनारायण पूजा मी पाहिली. एका कोकणस्थ उद्योगपतीच्या जुहूमधील आलिशान बंगल्यात श्रावण रविवारी ही पूजा संपन्न झाली. गोगटे एकटेच पूजा करीत बसले होते. टेपरेकॉर्डर लावला होता. पूवीर् रेकॉर्ड केलेल्या पूजा-विधीप्रमाणेच भराभर उपचार चालले होते. दरवेळी कुठे भटजींना बोलवायचे आणि दक्षिणा देत बसायचे हे त्यांचे मत. पंधरा मिनिटांत पूजा झाली. कलशांतले पाणी कुठेतरी ओतून आले. तामणातले गहू बाजूला काढले. तामण उलटे करून झटकायला लागले , तेव्हा मला आश्चर्य वाटले. तामणाला चिकटलेल्या पाकळ्या पडल्या , पण पंचवीस सुपाऱ्या पडल्याच नाहीत.

गुरुत्वाकर्षणाविरुद्धचा हा चमत्कार पाहून मी थक्क झालो. गोगट्यांनी खुलासा केला , '' मी त्या सुपाऱ्या फेविकॉलनी पर्मनंट चिकटवून ठेवल्या आहेत. '' मी थक्क झालो. सुपाऱ्यांवर डार्क पेनने काही लिहिलेले होते. एका सुपारीवर लिहिले होते , चंबु. नंतर कळले चंबु म्हणजे चंद , बुध. दुसऱ्या सुपारीवर लिहिले होते मंगु. म्हणजे , मंगळ , गुरू. म्हणजे प्रत्येक ग्रहाला स्वतंत्र सुपारी नाही. दुसरा ग्रह सब टेनंट म्हणून त्याच सुपारीत राहात होता.

मी व गोगटे दांपत्य जेवलो. त्यांनी पूजेची आवराआवर केली आणि कपड्यांची बॅग भरू लागले. मी म्हटले , '' तुम्ही संध्याकाळी उत्तरपूजा करणार नाही ? आरती करून लोकांना तीर्थप्रसाद वगैरे घेण्यासाठी बोलावले नाही ?''

गोगटे म्हणाले , '' नाही. आम्ही दोघेही आता महाबळेश्वरला निघालो आहोत. सत्यनारायणाच्या पोथीतच लिहिले आहे , रात्र विलासात घालवावी. ''

माझ्या मनात विचार आला की , गोगट्यांच्या दोन ' राशी ' असाव्यात ; पूजा करताना ' कन्या ' आणि महाबळेश्वराला जाताना ' वृषभ '!! 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive