Saturday, October 20, 2012

सिनेमॅटोग्राफर महेश लिमये - Mahesh Limaye Cinematographar

सिनेमॅटोग्राफी आणि माझं नातं हे शब्दात सांगण्यापलीकडचं आहे. सिनेमॅटोग्राफीचं वेड मला कॉलेजपासूनच होतं. याच वेडाने मला आज या स्थानावर पोहोचवलंय. कधी-कधी मनात विचार येतो की मी सिनेमॅटोग्राफर नसतो तर काय केलं असतं ? अनेक मुलाखतींमध्येही मला हा प्रश्न विचारला जातो. अशावेळी मला उत्तर मिळतं , मी सिनेमॅटोग्राफर नसतो तर मी चित्रकार झालो असतो. मी ऑइल पेटिंग खूप छान काढतो. कॉलेजमध्ये असताना मला माझे प्रोफेसर्स सांगायचे की , चित्रकलेच्या क्षेत्रातच करिअर कर. तू खूप मोठा चित्रकार होशील. पण , सिनेमॅटोग्राफीचं भूत डोक्यात शिरलं होतं , त्यामुळे तिकडेच वळलो.

मी कोणत्याही क्षेत्रात गेलो असतो तरी मला माझ्या घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळणार याची खात्री होती. आई-वडिलांबरोबरच मला माझ्या बायकोचाही तितकाच पाठिंबा आहे. घरातून मला पहिल्यापासूनच पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी माझे निर्णय घ्यायला शिकलो. माझ्या घरचं वातावरण खूप आध्यात्मिक आहे. त्यामुळे नकळतच ते संस्कार माझ्यावरही झाले. माझ्यातही आध्यात्मिकतेचा तो अंश आहे. मी खूप भावनिक आहे. पण , मला कशाचंही टेन्शन नसतं , कसलाही स्ट्रेस नसतो. मी कधी कोणावर चिडण्याचा तर प्रश्नच येत नाही. हॅपी गो लकी माणूस आहे मी. मला लोकांमध्ये मिसळायला आवडतं. आणि सुदैवाने मी ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे मला खूप लोक भेटतात , खूप ओळखी होतात.

निरीक्षण करण्याच्या माझ्या वृत्तीचा मला काम करताना फायदाच होतो. मी सिनेमॅटोग्राफर असलो तरी दिग्दर्शकाला मी नेहमी निरखत असतो. विशिष्ट अँगलने तो कसं काम करतो किंवा त्याचा त्यामागे विचार काय असेल याचा मी विचार करतो. त्यामुळे मला आता दिग्दर्शकाची विचारपद्धती जवळून ओळखता येते. भविष्यात कधी दिग्दर्शन करण्याचा विचार केला तर मी नक्कीच एखादी लव्ह स्टोरी दिग्दर्शित करेन. मला ' शोले ' आणि ' जिंदगी ना मिलेगी दोबारा ' या सिनेमांची सिनेमॅटोग्राफी करायला आवडली असती. जेव्हा मी कामात गुंतलेला असतो तेव्हा मला दुसरं काहीच दिसत नाही. कोण माझ्याबद्दल काय विचार करतंय याचा मी विचार करत नाही. मला फक्त काम करायचं असतं. याचमुळे मला कामात शंभर टक्के देता येतं. आणि हेच महत्त्वाचं असतं तुमच्या कामात. जेव्हा तुम्ही स्वतः समाधानी असाल तेव्हा समोरच्याला आनंद देऊ शकता
तुमचा ,

महेश लिमये

सिनेमॅटोग्राफी करत नसतो तर मी काय झालो असतो हा प्रश्न मला खूपदा विचारला जातो. त्याचं उत्तर फार सोपं आहे. कारण , मी ऑइल पेंटिंग चांगलं करायचो. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर झालो नसतो तर मी नक्कीच चित्रकार झालो असतो. 


 ============

सिनेइंडस्ट्रीत वावरताना त्याच्या कॅमेरासमोर बडी स्टार्समंडळी सहज वावरत असतात , हे के‍वळ महेश लिमयेच्या कामामुळेच. सिनेमा झाल्यावर कलाकार त्याचा प्रेमात पडल्याचे अनेक किस्से असतीलच. पण , एखादा सीन शुट करुन झाल्यावर महेशच्या मनात घर केलेलेही अनेक कलाकार आहेत.

अठरा वर्षं सिनेमॅटॉग्राफर म्हणून काम करताना अनेक कलाकारांना जवळून बघण्याचा योग आला. आत्तापर्यंत मी फक्त मोठ्या पडद्यावर त्या कलाकारांना बघत होतो. आता मात्र प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यांना अनुभवतोय. एखादं पुस्तक वाचताना त्यातल्या एखाद्या वाक्याच्या आपण प्रेमात पडतो तसंच काहीसं माझं झालंय. काम करताना मी काही कलाकारांच्या प्रेमात पडलो. त्यांच्याबरोबर काम करण्याची मजा , त्यांची जादू कळत गेली. आदर वाढत गेला. असं ब‍ऱ्याचजणांच्या बाबतीत झालंय. पण , काही अगदी ठळकपणे आठवतात.

' उत्तरायण ' सिनेमाचं शुट होतं. शिवाजी साटम म्हणजे सिनेमातला रघु , नीना कुलकर्णीला म्हणजे दुर्गीला खूप वर्षांनी परत प्रपोज करतो असा सीन होता. रघु दुर्गीला प्रपोज करण्यासाठी कविता वाचतो. या सीनसाठी मला संधीप्रकाश हवा होता. नशीबाने साथ दिली आणि मला हव्या त्या वेळी संधीप्रकाश मिळालाच. रघुची कविता वाचून झाल्यावर ती काही बोलायच्या आतच तो तिथून निघून जातो. ती त्याला शोधण्यासाठी इकडेतिकडे बघते. बँकग्राउंडला लावलेला रोमँटिक ट्रॅक ते रोमँटिक वातावरण जिवंत ठेवतो. रघु तिथे नाही हे बघून दुर्गीच्या डोळ्यात पाणी येतं. या सीनच्या वेळी शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांनी जे काही केलंय त्याला तोड नाही. त्यांच्या प्रेमातच पडलो मी.

असाच एक किस्सा ' कॉर्पोरेट ' चा. के के मेननच्या क्लायमॅक्स सीनला त्याने सांगितलं , मला पिनड्रॉप सायलेन्स हवा. सेटवर इतक्या माणसांत त्याची ही मागणी पूर्ण करणं कठीण होतं. पण ती केल्यावर मात्र केकेनं पहिल्याच टेकमध्ये अप्रतिम शॉट दिला. नंतर मी वेगवेगळ्या अँगल्समधून टेक्स घेतले. पण , पहिलाच टेक बेस्ट झाला होता. त्या पिनड्रॉप सायलेन्सचं त्याने सोनं केलं होतं. तेव्हाचं त्याचं डेडीकेशन , एकाग्रता , कामावरची निष्ठा बघून मला खरंच आदर वाटला.

तुमचा ,
महेश लिमये 


=============

Mahesh Limaye, Nitin Desai, Prachiti Mhatre
Mahesh Limaye, Nitin Desai, Prachiti Mhatre

डोंबिवली ते बॉलिवुड


सलमान- करीनासारख्या स्टार्सना चमकवणा-या कॅमे-यामागे आहे एक मराठी चेहरा. तो आपल्या सिनेमात असावा म्हणून बॉलिवुड त्याच्यामागे धावत असतं. ' दबंग ', ' हिरोइन ' अशा खूप सिनेमांतून सिनेसृष्टी गाजवणारा हा सिनेमॅटोग्राफर आहे महेश लिमये. त्याच्या करिअरचा प्रवास , स्टार्सबरोबरच्या आठवणी वाचा आजपासून...

मी मूळचा डोंबिवलीकर. त्यामुळे ट्रेनचा प्रवास काय असतो हे मला चांगलंच माहितीय. रोजच्या त्या ट्रेनच्या धक्क्यांचा अनुभव मीही घेतला आहे. ट्रेनच्या या प्रवासाबरोबरच माझा करिअरचा प्रवासही सुरू झाला. जे जे स्कूल ऑफ आर्टसमध्ये असल्यामुळे रोजचा डोंबिवली ते सीएसटी प्रवास करायचो. हा काळ अजूनही लक्षात आहे. पहिली दोन वर्ष फाऊंडेशन , नंतर अप्लाइड आर्टस केलं. शेवटच्या वर्षी स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं. काही काळानंतर पावलं जेव्हा करिअरच्या दिशेने वळू लागली तेव्हा ' प्रवास ' या शब्दाचा अर्थ पदोपदी अनुभवला. मला चांगलं आठवतंय , शूट संपलं की दादरवरुन शेवटची ट्रेन पकडायला धावायचो. ती चुकली की स्टेशनवरच घालवलेल्या कित्येक रात्री अजूनही आठवतात.

१९९४ पासून मी जाहिरात क्षेत्रात राजा सय्यद या सिनेमॅटोग्राफरला असिस्ट करू लागलो. ७ वर्ष त्यांच्याकडे काम केलं. मलाही स्वतंत्रपणे काम करायचं होतं. शिकून , अनुभव गाठीशी घेऊनच पुढे पाऊल टाकायचं होतं. २००५ मध्ये ' सी यू अॅट ९ ' या सिनेमाने माझ्या स्वतंत्र कामाचा श्रीगणेशा झाला. या फिल्मला चांगला प्रतिसाद मिळाला. या क्षेत्रात करिअर करताना मी मराठी आहे याचा न्यूनगंड कधी वाटला नाही. तुमचं काम जर चोख असेल तर तुम्ही डगमगण्याचं काहीही कारण नाही. हा आत्मविश्वास मी माझ्यात जपला आहे. यात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. कारण स्वतःच्या क्रेडिटवरच दुसरं काम मिळतं. जाहिरात हे क्षेत्रच मुळात खूप शिकण्यासारखं आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या सिनेमॅटोग्राफीमध्ये जे जे बारकावे दिसले असतील ते जाहिरात क्षेत्रात काम केल्यामुळेच.

Mahesh Limaye
Mahesh Limaye
काहीतरी बनून दाखवण्याची जिद्द नेहमीच होती. त्यामुळे कशाची भीती वाटली नाही. मला कामाचं टेंशन कधीच नसतं. सिनेमॅटोग्राफी करण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे. कॉलेजमध्ये असताना आठ-दहा तास एकेका पेंटिंगसाठी लागायचे. तो संयम मला आता उपयोगी पडतो. आत्तापर्यंत खूप मोठमोठ्या कलाकारांबरोबर मी काम केलं आहे. संयम बाळगून काम करणं , स्ट्रेस , टेन्शन बाजूला ठेवून काम करणं हे यातूनच मी शिकलो. ज्या कलाकाराबरोबर मी काम करणार असेन त्याचा फेस स्टडी करतो. त्यांचे वेगवेगळ्या अँगलमधले फोटोज बघतो. त्यानंतरच माझी स्टाइल ठरवतो. अनेक परदेशी सिनेमॅटोग्राफर्ससोबत मी काम केलं आहे. त्यांचं तंत्रज्ञान , काम करण्याची पद्धत मी माझ्या सिनेमांमध्ये आणली आहे. या क्षेत्रात तुलनेत मराठी लोक कमी आहेत. पण माझ्या प्रवासात , मी मराठी आहे म्हणून कधीच डावललो गेलो नाही. तुमचं नाणं खणखणीत असलं की बास्स...मोठ्या बॅनर्सची कामं आपसूकच तुमच्यापर्यंत येतात.

मराठी आहे म्हणून बॉलिवुडमध्ये मी कधीच डावललो गेलो नाही. मेहनत करणाऱ्याला इथे न्याय मिळतोच...

तुमचा ,

महेश लिमये

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive