विद्यार्थ्यांच्या ‘नजरबाणांपासून’ बचावासाठी शिक्षिकांना ओवरकोट?
शाळेत शिकविणा - या बाई कधी वर्गात डॉक्टरांचा अॅप्रन किंवा ओवरकोट घालून आल्या तर ... कल्पना विचित्र वाटेल ना ! पण विचित्र वाटणारी ही कल्पना भविष्यात प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे . विद्यार्थ्यांच्या ' टुकूर , टुकूर ' व वाईट नजरांपासून वाचण्यासाठी केरळमधील खासगी शाळांनी त्यांच्या शिक्षिकांना हा उपाय सुचवला आहे .
केरळातील काही महिला शिक्षिकांनी आपल्या शाळेच्या व्यवस्थापनाकडे विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रारी केल्या होत्या . ' शिकवत असताना काही वात्रट मुले आपल्या पेहेरावाकडे टकमक , टकमक पाहत असतात तसेच मोबाईलवर आपले फोटो काढतात . नंतर हे फोटो सोशल नेटवर्कींग साइटवर टाकतात . इतकेच नव्हे तर , शौचालयांच्या भींतींवर शिक्षिकांची चित्रे काढून त्यावर अश्लील कॉमेंट केल्या जातात , अशाही तक्रारी महिला शिक्षिकांनी केल्या होत्या . विद्यार्थ्यांच्या या चावटपणामुळे शिकवताना खूपच अवघडल्यासारखे वाटत असल्याचा मुद्दाही त्यांनी व्यवस्थापनाकडे उपस्थित केला होता .
शिक्षिकांच्या या तक्रारीची गंभीर दखल शाळांच्या व्यवस्थापनाने घेतली . कॅम्पसमध्ये मोबाइल बंदीचा फारसा उपयोग होत नसल्याने शिक्षिकांनीच स्वसंरक्षणासाठी काहीतरी उपाय करावेत , असे व्यवस्थापनाने सुचवले आहे . त्यानुसार शिक्षिकांनी शिकवण्यासाठी वर्गावर जाताना आपल्या साडीवर किंवा चुडीदार ड्रेसवरून अॅप्रन किंवा ओवरकोट घालावा , असा सल्ला दिला आहे . अद्याप याबाबत कुठल्याही शाळेने अधिकृतरित्या आदेश दिले नसले तरी या संपूर्ण घडामोडींची जोरदार चर्चा केरळात सुरू आहे .
No comments:
Post a Comment