Saturday, October 20, 2012

अर्धवट तोडलेला लंगर - Marathi Movie Langar Review


langar2.jpg
अर्धवट तोडलेला लंगर


मराठी सिनेमा बनवायचा असेल , तर पैसे हवेत . सिनेमाचं बजेट चांगलं असेल तर चांगले कलाकार घेता येतील . कथा , पटकथा असं जे काही असतं , ते दिग्दर्शक ठरवेल सगळं . त्याकडे फार लक्ष द्यायचं नाही . इकडे पैसे टाकले .. की तिकडे सिनेमा तयार होतो तोही अवघ्या काही दिवसांत ! पण , हल्ली सिनेमा करायचा , तर एक अलिखित अट घालावी लागते . आपला सिनेमा प्रबोधनपरच हवा . म्हणजे हे प्रबोधन सिनेमातून खरंच होतं की नाही , त्यासाठी पुरेशी खबरदारी घेतलीय की नाही , याला महत्त्व नाही . पण , सिनेमाच्या प्रमोशनला हा प्रबोधनाचा फील देता आला पाहिजे .

सध्या मराठीत असा माहोल आहे . प्रत्येक सिनेमावाल्याकडे हल्ली समाजप्रबोधनाची ढाल असते . वास्तविक खरंच असा ' मेसेज ' द्यावा वाटत असेल , तर प्रबोधनाच्या नावाचा वेगळा लंगर तोडायची गरज नसते . अन्यथा सिनेमाली एंटरटेन्मेंट व्हॅल्यू नामशेष होऊन त्याचा डॉक्युड्रामा होतो . ' लंगर ' पाहण्यापूर्वी ' वाघ्या - मुरळी ' प्रथेबाबत हा सिनेमा काही सांगू पाहातोय , असं वाटतं . विषयही मुरळ्यांभोवती फिरतो . पण , हा सिनेमा विषयाच्या गरजेनुसार बनवता दिग्दर्शकाने तो कलाकार , तंत्रज्ञांच्या गरजेनुसार , त्यांना असलेल्या वेळेनुसार बनवला आहे . त्यामुळे होणारी विषयाची आणि मांडणीची घाई पदोपदी दिसते .

ही गोष्ट आहे मालन या मुरळीच्या बंडाची . तिने समाजाला घालून दिलेल्या धड्याची . मालन ही पाटील कुटुंबातली थोरली . खंडोबाच्या नवसाची . नवस फेडण्यासाठी मालनला मुरळी करण्याचा निर्णय होतो . तिचा सख्खा मामा , जगनवर ही जबाबदारी येते . नवसाचा पोर असल्याने जगनचाही वाघ्या झालेला . दहाव्या वर्षी मालनची मुरळी होते . तिचा जगन मामाच तिला आपल्या घरी आणतो , अशी सिनेमाची प्राथमिक गोष्ट . त्यानंतर मालनच्या रुपाने मुरळींच्या आयुष्याची फरफट दिग्दर्शकाला दाखवायची आहे . याद्वारे ' वाघ्या - मुरळी ' च्या सामाजिक वेदना मांडायच्या आहेत .

मुळात मुरळींची होरपळ दाखवण्यासाठी लागणारं पोषक कथानक सिनेमात नाही . मालनची मुरळी झाल्यानंतर ती जाते तीच मुळात मामाच्या घरी . बरं , मामाही कंसासारखा कपटी , नतद्रष्ट नाही . मामाचा मालनवर विशेष जीव . तो तिला मुलीप्रमाणे वाढवतो . त्यामुळे मुरळींची उपेक्षा तिच्या वाट्याला येत नाही . त्यामुळे मालनलाही मुरळी झाल्याचं शल्य नाही . नाही म्हणायला , मालनच्या मैत्रिणींचा घात होतो . पण , तो नावापुरता . वास्तविक , मालनचं जीवन , तिचा संघर्ष , तिचा बंड असं जे काही दिग्दर्शकाला दाखवायचं आहे . पण , दुर्दैवाने हाच मुख्य भाग वगळता सिनेमाच्या पटकथेत सारे आले आहे . साहजिकच ते सर्व अर्थहीन ठरतं . कलाकार निवडताना तारतम्य पाळण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे . लहानपणी सावळी दिसणारी मालन मोठी झाल्यावर अचानक गोरीपान होते . हे कमी म्हणून छायांकन , संकलन आदीतही घाई आहे . सर्वांत जास्त उबग येतो तो गीत आणि संगीताचा . वास्तविक वाघ्या - मुरळीची , खंडोबाची अशी वेगवेगळ्या चालींची असंख्य गाणी बाजारात कॅसेट , सीडी रुपात असताना , सिनेमात एकाच ठेक्याचं एकच गाणं सतत कानावर आदळत राहतं .

पटकथाच बाळबोध असल्याने गांभीर्याने काम करणाऱ्या कलाकारांचाही शेवटी कळसूत्री खेळ बनतो . त्यातही रवी काळेने वठवलेला जगनमामा लक्षात राहतो . त्याच्या संयत अभिनयाने जगन झळाळून उठतो . सोबत किशोरी शहाणे - वीज , विनय आपटे , पंकज विष्णू यांनी समजुतीने भूमिका केल्यात . मालन झालेल्या मनवाचीही दखल घ्यावी लागते . पण , तिच्या भूमिकेला अपेक्षित आलेख नसल्याने फारसा वाव नाही .

सिनेमा बनवण्यापूर्वी विषयाची पूर्वतयारी करावी लागते . त्यासाठी सिनेमा या माध्यमाची पुरेशी ओळख हवी . सिनेमाचा आवाका समजून घ्यायला हवा . केवळ प्रामाणिकपणे काम करून चालत नाही . समोर दिसतं ते सरसकट शूट केलं आणि काटछाट करून ते अडीच तासात दाखवलं की सिनेमा होत नाही . पण , लक्षात कोण घेतो ?

निर्मितीः श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स . कथा , दिग्दर्शकः संदीप नवरे , छायांकनः सूर्या मिश्रा , संगीतः मंदार खरे , गीतः प्रवीण दवणे , कलाकारः मनवा नाईक , किशोरी शहाणे - वीज , रवी काळे , विनय आपटे , मिलिंद शिंदे , पंकज विष्णू , भरत गणेशपुरे .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive