सैफ-करीनाच्या शाही लग्नसोहळ्याच्या शेकडो फोटोंपैकी सगळ्यात चवीनं बघितला गेलेला फोटो कोणता असेल ?... अर्थातच, या दोघांच्या चुंबनाचा फोटो ' सुपरहिट ' आणि ' सुपरहॉट ' ठरलाय. पण, आपलं चुंबन जगजाहीर झाल्यानं छोटे नवाब भलतेच खवळलेत आणि त्यांच्या रागाचा बळी ठरलाय, एक बिच्चारा वॉचमन... फोटोग्राफरला गच्चीत जायची परवानगी दिल्यानं त्याच्या नोकरीवरच गदा आलेय.
अनेक बॉलिवूड तारे-तारकांच्या लग्नांप्रमाणे सैफ-करीनाचं शुभमंगल हाही प्रसारमाध्यमांसाठी एक मोठा ' इव्हेंट ' च होता. या लग्नसोहळ्याची प्रत्येक खबर, तिथला प्रत्येक फोटो आपल्या वाचकांपर्यंत-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फोटोग्राफर-कॅमेरामन अक्षरशः झटत होते. करीनाचा संगीत सोहळा, सैफ-करीनानं खास मित्रांना दिलेली पार्टी, प्रत्यक्ष लग्न आणि नंतर दिल्लीत रंगलेला दावत-ए-वालिमा अशी ' मेजवानी ' च माध्यमांसाठी होती. त्याचा मीडियानं पुरेपूर आस्वाद घेतला. या प्रत्येक सोहळ्याचे कितीतरी फोटो वर्तमानपत्रांत, चॅनल्सवर आणि साइट्सवर झळकले. ते सिनेप्रमींनी आवर्जून पाहिलेही. पण त्यातलाच एक फोटो आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाय.
सैफ-करीनानं लग्नाच्या आदल्या रात्री आपल्या जवळच्या मित्रांना वांद्र्यातील आपल्या नवीन घरी पार्टी दिली होती. स्वाभाविकच घराला फोटोग्राफरनं घेराव घातला होता. पण घराच्या खिडक्यांवर पडदे टाकलेले असल्यानं आतलं काहीच दिसत नव्हतं. बॉलिवूडमधील मंडळी पार्टीला पोहोचू लागल्यानंतर खचाखच ' फ्लॅश ' उडू लागले. पण तेवढंच पुरेसं नव्हतं. काहीतरी एक्स्लुसिव्ह मिळवण्यासाठी उत्साही मंडळींची धडपड सुरू झाली आणि एक फोटोग्राफर समोरच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन पोहोचला.
तिथून ' रुफटॉप ' वर चाललेली पार्टी स्पष्ट दिसत असल्यानं या फोटोग्राफरच्या कॅमे-यात अनेक क्षण बंदिस्त झाले आणि त्यातच एक ' नाजूक ' क्षणही होता. करीना पार्टीत पोहोचताच, सैफनं तिचं चुंबन घेतलं होतं. हे दृश्य त्यानं अचूक टिपलं आणि ते दुस-या दिवशी सर्वत्र झळकलं. पण, अत्यंत खासगी गोष्ट जाहीर झाल्यानं सैफ अली खानचा पारा चढला. छोट्या नवाबांचा राग तर आपल्याला ठाऊक आहेच. (ताजमधील एनआरआय उद्योगपतीचं त्यानं नाक फोडलं होतं.) त्यानं प्रमुख सुरक्षारक्षकाविरोधात आणि इमारतीच्या सेक्रेटरीविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे सेक्रेटरीनं आधी वॉचमनची चांगलीच खरडपट्टी काढली आणि नंतर त्याला नोकरीवरूनच काढून टाकलं. आता तो फोटोग्राफरविरोधातही तक्रार करणार असल्याचं समजतं.
No comments:
Post a Comment