पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच!
पंढरीचा पांडुरंग हा प्रत्येकाला आपला वाटत आला आहे. मग याच मातीतले संस्कार पचवणारे बौद्धधर्मीय त्याला अपवाद कसे असणार. पंढरपूर हे बौद्ध तीर्थक्षेत्र असल्याचे दावे ऐतिहासिक संदर्भ आणि खुद्द संतकवींच्या रचना यांच्या आधारे नेहमीच केले जात आहेत. .............................. गेली अडीच हजार वर्षे भगवान बुद्ध आपणा भारतीयांचा मार्गदर्शक राहीला आहे. त्याच्या प्रभावापासून त्याच्या कडव्या विरोधकांनाही कधी मुक्त होता आले नाही. बुद्धाची तात्त्विक उसनवारी करीतच त्यांना आपला प्रपंच प्रतिष्ठित करावा लागला. इतकंच नव्हे तर भगवान विष्णूच्या दशावतारांचा इमलाही त्यांना बौद्ध सिद्धांताच्या पायावरच उभारावा लागला. त्यांनी बुद्धाला विष्णुचा अवतार मानले आणि त्यांनीच बुद्धाला शिव्याशापही दिले. इतिहासात इतिहासात बुद्धासंतांवर शस्त्र-शास्त्रांच्या माध्यमातून अनेकदा आक्रमणं झाली. पण ती सर्व आक्रमण पचवून बुद्ध जगभर पसरला. भारताला गौरवांकित केले. बुद्धाच्या हयातीतच महाराष्ट्रात बुद्ध धर्माचे आगमन झाले होते. त्यानंतर पंधरा-सोळाशे वर्षे तो इथे बहरत होता. त्याच्या तात्कालीन वैभवाच्या शिल्पखुणा महाराष्ट्रातील प्रत्येक पर्वतराजी उरीपोटी बाळगून आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासात महाराष्ट्राची कामगिरी अत्यंत भूषणास्पद आहे. सांप्रत भारतात जवळपास १२०० बौद्धलेणी आहेत. त्यातील ७०० पेक्षा जास्त लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. काही लेण्यांवर बौद्धेतर कब्जा करुन बसले आहेत तर काही बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे त्याचे एक उदाहरण आहे. इसवी सनाच्या आठव्या शतकातील पुराणींनी बुद्धाला विष्णूच्या दशावतारात स्थान दिले. महाबलीपूरम येथील एका शिलालेखात बुद्ध विष्णूचा नववा अवतार असल्याचे लिहिलेले आहे. हा शिलालेख आठव्या शतकातील आहे. वेरुळ येथील दशावतरांची लेणीही आटव्याच शतकातील आहे. आर. सी हाजरा विष्णूच्या दशावतारांची निश्चितक्रम परंपरा (मत्स्य ते कल्कि) आठव्या शतकापासूनच सुरू झाल्याचे सांगतात. आठव्या शतकातील राष्ट्रकूट - चालुक्य राजवटीतील एका शिलालेखात त्याचा मराठीत अर्थ होतो. ' टेकडीवरचा पांडुरंग ' असा उल्लेख आहे. यावरुन पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग म्हणून आठव्या शतकापासून ओळखिला जात असावा असे वाटते. परंतु या पांडुरंगाला अत्यंत लोकप्रिय केले ते मात्र मध्ययुगीन मराठी संतकवींनी. त्याला कारणही तसेच बलवत्तर होते ! भारताचा मध्ययुगीन इतिहास हा परकीय आक्रमकांचे भयानक हल्ले, कत्तली, त्याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक विनाशाचा इतिहास आहे, हे काही अंशी खरे आहे. तरी त्यामुळेच आक्रमकांच्या मुळे का होईना, सनातन्यांनी चालविलेल्या कर्म छळाला शह बसला होता. म्हणूनच भारतीय इतिहासातील सध्यकाळ मूलतः पतन काळ होता, असे म्हणता येत नाही. कारण याच मध्ययुगात संतकवींनी उभी केलेली भक्ती चळवळ ही एक युगांतकारी घटना होती. महाराष्ट्रात या चळवळींचे नेतृत्त्व ज्ञानेश्वर - ज्ञाती बहिष्कृत ब्राम्हण (१२२९-७२), नामदेव- शिंपी (१२७०-१३५०), एकनाथ- ब्राम्हण (१५३३-९८), तुकाराम वाणी (१५२९-७२), नरहरी - सोनार, सावता - माळी, गोरोबा - कुंभार, सेना - न्हावी, चोखोबा - महार, शेख महंमद -मुसलमान, तुकाराम शिष्या बहिणाबाई - ब्राम्हण आणि कान्होपात्रा - नर्तकी इत्यादींनी केले. काही अपवाद वगळता हे सर्वच संतकवी बहुजन समाजातील होते. वरील सर्वांनाच सनातनी अत्याचारांच्या अनुभवातून जावे लागले होते. चातुर्वर्ण्य ब्रम्हाने वा कृष्णाने निर्माण केले असेल पण म्हणून का स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना गुराढोरांसारखे वागवायचे ? आम्हालाही माणसांसारखे वागवा असा संतांचा आग्रह होता आणि तो त्यांनी चातुर्वर्ण्याच्या चौकटीत राहूनच व्यक्त केला ! तरीही ब्रम्हवृंदांचे वर्चस्व असलेली धर्मसत्ता पाझरली नाही. शेवटी माणुसकीला पारखी झालेली बहुजन जनता पांडुरंगाला शरण गेली. त्यांची समतेची आणि ममतेची भूक करुणासागर पांडुरंगाने भागविली. तेव्हापासून संतांचा - भक्तांचा मेळा पांडुरंगाभोवती गोळा होऊ लागला. या करुणाकराची करुणा भाकताना भक्तांनी भगवंतांला कधी ' माऊली ', कधी ' बा ' तर कधी 'राया ' म्हणून पुकार केला. भगवंताचा आणि भक्तांचा हा सोयर संबंध आता एका विशाल संप्रदायात परिणाम झाला आहे. भगवंताचे दारी पंढरीची वारी करण्यासाठी भगवंत आणि भक्त वारकरी पंढरपूरी मोठ्या श्रद्धेने येत असतात. शेकडो वर्षांपासून चालू झालेला हा जनाचा प्रवाह आज बहुजनांची वहिवाट झाली आहे. आज पंढरीची वारी करणारे वारकरी पांडुरंगाला विश्वरुप मानत असो वा शिव रुप मानत असोत वा विष्णू शिवाचे एकात्म रुप मानत असोत. पण संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज मात्र पंढरीच्या पांडुरंगाला बुद्धरुपच मानत होते. एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात. लोक देखोनी उन्मत्त वारानी आसक्त । न बोले बुद्धरुप ठेवीले जयनी हात ।। संत तया दारी तिष्ठताती निरंतरी । पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा । बौद्ध अवतार घेऊन विटे समाचरण ठेवून ।। धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी । या लागे बौद्धरुपे पंढरी नांदसी ।। संतशिरोमणी तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात बौद्ध अवतार माझिया अदृष्टा । मौन्य सुखे निष्ठा धरियेली ।। वरील अभंगावरुन संतश्रेष्ठ विठ्ठलालाच बुद्धरुप मानत होते हे स्पष्ट होते. संत साहित्यावर बौद्ध मताचा प्रभाव का आहे, याचे उत्तर या अभंगात आहे. मराठी संत कवींच्या उदयापूर्वीच महाराष्ट्रात बौद्धधर्माचा - हास झाला होता तरी बुद्धसंत मात्र बहुजन मानसात तग धरुन होते म्हणूनच संत साहित्यातून ते अभिव्यक्त झाले. मा. शं. मोरे आपल्या महाराष्ट्रातील ' बुद्धधम्माच् या मंदिराच्या सभामंडपातील दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मुर्ती असले, वारकरी संप्रदायात प्रवेश करताना जी शपथ घेतली जाते ती बुद्धाचे पंचशील असणे. वारकरी संप्रदायातील लोकांनी निदान पंढरपूरपुरतं तरी जातिबंधनं, श्रेष्ठ - कनिष्ठता न पाळणे. कारण, जातिभेद नष्ट करणे ही बुद्धाची शिकवण आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेस करणे कारण त्यादिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खुंना पहिले प्रवचन देऊन धर्मचक्र प्रवर्तन केले होते. बुधवारच्या दिवशी पंढरपूर न सोडणे, विठ्ठल पितांबरधारी असणे कारण बुद्धाने स्वतःसाठी व भिक्खुंसाठी पिवळे व वस्त्र धारण करण्याचा नियम केला होता. याच ग्रंथात मोरे यांनी वासुदेव गोविंद आपटे यांच्या ग्रंथातील मजकूर उद्धृत केला आहे. त्यात ' विठोबाची मूर्ती खडकावर खोदलेल्या बुद्धमुर्ती, याच्या स्वप्नातील सदृश्य व विठोबा - रखूमाई यांची पृथक पृथक मंदिरे असणे, गोपाळकाल्याच्यावेळी जातीभेदाला फाटा देणे या गोष्टी सांप्रदायिक पद्धतीला सोडून आहेत. यावरुन हे क्षेत्र मूळचे बौद्ध असावे. बौद्ध धर्माच्या -हासानंतर बामण धर्माने त्या मूळच्या बौद्ध धर्माच्या आपल्या धर्मात समावेश करुन घेतला परिस्थितीजन्य पुरावा पहाता आजचे विठ्ठल मंदिर हा बौद्धांचा विहार होता त्याचे हिंदूकरण करण्यात आले हा त्यांचा निष्कर्ष अगदी योग्य आहे. डॉ. आ. ह. साळुखे (सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध) यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ' श्री विठ्ठल महासमन्वय ' या ग्रंथातील काही वाक्य उद्धृत केली आहेत. डॉ. ढेरे लिहितात ' मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार शब्दात प्रकट झालेली आहे तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही प्रकट झाली आहे. महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जाऊ लागल्यावर दिर्घ काळपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर नवग्रहांची अथवा दशावतरांची चित्रे छापीत असत. या दशावताराच्या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे (एखाद्याचे अथवा रुक्मिणीसहीत) चित्र छापलेले दिसते. आणि त्याबाबतीत आपल्याला कसलीही शंक उरू नये, म्हणून त्या चित्रावर बुद्ध वा बौद्ध असे नावही छापलेले आठवते.... दशावतारातील बुद्धाच्याजागी विठ्ठल असल्याची दोन तरी शिल्पे मला माहीत आहेत. एक तासगाव (जिल्हा सांगली) येथे विंचूरकरांनी बांधलेल्या दक्षिणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपूरावर आहे आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारातील एका ओवरीत आहे. जानोबा-तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरविला. त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणा-या असंख्य भिक्षुंच्या निवासभूमीत झाला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली पत्नी रमाबाईची पंढरीला जाण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही. पण बौद्धाची स्वीकारापूर्वीचे त्यांच्या मनात पंढरीच्या विठ्ठल बुद्धरुपच असल्याचे पक्के झाले होते. आपल्या एका भाषणात त्यांनी ' पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वस्तुतः बुद्धाची आहे. आणि या विषयावर मला एक प्रबंध लिहायचा आहे. तो पूर्ण झाल्यावर पुणे येथील भारत संशोधन मंडळाच्या पुढे मी तो वाचणार आहे. विठ्ठलाचे पांडुरंग हे नाव पुंडलिक या शब्दापासून बनलेले आहे. पुंडलिक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात. म्हणजे पांडुरंग दुसरा कोणी नसून बुद्धच होय. ' मार्च १९५५मध्ये त्यांनी या विषयावर प्रबंध लिहायला सुरुवातही केली होती. परंतु पुढे हा प्रबंध अपुराच राहीला अशी नोंद त्यांचे चरीत्रकार धनंजय कीर यांनी केली आहे. संत शिरोमणी एकनाथ - तुकाराम यांनी विठ्ठलाला बुद्धरुप मानले आहे. विद्वानांनी विचारवंतांनी त्याला पूरक असे संशोधन केले आहे. त्याचा निष्कर्ष पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच आहे याची खात्री पटविणार आहे. -विशू काकडे |
No comments:
Post a Comment