लॉर्डस्, क्रिकेट संस्कृति जपणारे पवित्र मैदान
(२१जुलै १८८४साली इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना लॉर्डस् मैदानावर खेळवला गेला.१२७ वर्षांनी याच मैदानावर भारत इंग्लंड दरम्यान १००वा कसोटी सामना खेळवला जात आहे आणि आयसीसी ने कारभार हाती घेतल्यापासूनचा हा २०००वा कसोटी सामना आहे हा कमाल योगायोग समजला जाईल)
काही जागाच अशा असतात की जिथे गेल्यावर मंदिरात गेल्याचा भास होतो.सर्व टेस्ट प्लेयींग देशांचा दौरा आणि जगातील जवळपास १०० मैदाने पालथी घातल्यावर मनोमन भारावून जाण्याचा प्रसंग फक्त तीनदा आला.ऑस्ट्रेलियातील ऍडलेड गावी सर डॉन ब्रॅडमन यांचे घर आणि त्यांच्या नावे उभारलेले म्युझियम बघताना, दुसर्यांदा बार्बाडोस येथील युनिव्हर्सीटी ऑफ ३ डब्ल्यूज् वरील सर फ्रँ क वॉरेल यांचे थडगे आणि त्या समोरील वॉक ऑफ फेम बघताना आणि तिसरी जागा म्हणजे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लॉर्डस् मैदान.१९८२ साली इंग्लंडला खेळायला गेलो असताना इंग्लंड आणि बलाढ्य वेस्ट इंडिज सामना बघताना खरोखरच भारावून गेलो होतो.तो दिवस आणि आजचा दिवस आहे वारीला जाणार्या वारकर्याप्रमाणे मी लॉर्डस्ची वारी मनोभावे करत आलो आहे.आज २१जुलै २०११रोजी लॉर्डस् मैदानावर होणार्या भारत वि इंग्लंड सामन्याला वेगळे महत्त्व आहे.भारत वि इंग्लंड दरम्यान होणारा हा १००वा कसोटी सामना आहे तर आयसीसीने क्रिकेट कारभार हाती घेतल्यापासूनचा हा २०००वा कसोटी सामना आहे.जगात खूप चांगली क्रिकेट मैदाने असली तरी लॉर्डस्ची शान वेगळी आहे यात शंका नाही.गेली १८१४साली लंडनच्या सेंट जोन्स वुडस् भागात लॉर्डस् मैदान वसवण्यात आले याचाच अर्थ असा की १९७वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासाचे हे मैदान साक्षीदार ठरले आहे.क्रिकेटची संस्कृती जपणार्या या पवित्र वास्तूचा इतिहास काय आहे हे समजून घेऊयात.
इतिहासाच्या पानात नजर टाकली तर समजते की १७८७ साली मेरलीबोन क्रिकेट क्लबची स्थापना झाली.लंडन शहराचा विकास होत गेला आणि क्रिकेट सामने बघायला प्रेक्षक गर्दी करू लागले तशी मोठ्या सुनियोजित मैदानाची गरज क्लबला भासू लागली.त्याकाळातील क्लब सदस्यांनी क्रिकेट प्रेमी श्रीमंत व्यक्ती थॉमस लॉर्ड यांना मार्ग काढण्याकरता विनंती केली.महत्त्वाकांक्षी लॉर्डस् यांनी लंडनच्या मध्य वस्तीतील मेरलीबोन भागातील डोरसेट फिल्ड्स् जागा दीर्घ करारावर भाड्याने घेतली.३१मे १७८७ रोजी मिडलसेक्स विरुद्ध इसेक्स सामना भरवला गेला आणि मेरलीबोन क्रिकेट क्लबची सुरुवात झाली.इतकेच नाही तर त्या दिवशीपासून मेरलीबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट खेळण्याचे नियम घातले.तेव्हा पासून ते आजपर्यंत क्रिकेटच्या नियमांचे कर्ताधर्ता मेरलीबोन क्रिकेट क्लब आहे.भाडे तत्त्वावर मिळालेल्या मैदानावर २५ वर्ष क्लब चालवल्यावर क्लबच्या मालकीचे स्वत:चे मैदान उभारण्याचा विचार थॉमस लॉर्ड यांच्या मनात डोकावला.१८११साली सेंट जोन्स वुडस् भागात जागा घेऊन आधुनिक मैदानाची उभारणी केली गेली आणि १८१४साली बदकांच्या तळ्याच्या जागी मेरलीबोन क्रिकेट क्लबचे मैदान उभे राहिले.१८२५साली थॉमस लॉर्ड यांनी मैदान ५०००पाऊंडाला विकून टाकले तरी आजही मैदानाचे नांव लॉर्डस् कायम राहिले आहे असा पगडा थॉमस लॉर्ड यांच्या कर्तृत्वाचा राहिला आहे.
काळानुसार बदलत गेलेल्या या मैदानाने १८६४ साली पहिले गवत कापण्याचे मशीन घेतले जेव्हा पहिल्या पगारी ग्राऊंडस्मनची नेमणूक क्लबने केली.तसेच १८८९ साली लॉर्डस् मैदानावरील जगविख्यात नव्या पॅव्हेलियन इमारतीचे काम २०हजार पाऊंड कर्ज घेऊन चालू केले गेले.तेव्हा पासून ते आजपर्यंत ही इमारत जगातील एक सर्वांत ओळखली जाणारी खेळ वास्तू बनली आहे.अगदी आत्ताच्या काळापर्यंत मेरलीबोन क्रिकेट क्लबमध्ये महिलांना सदस्य बनता येत नव्हते.कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी चहापानाच्या वेळेला इंग्लंडच्या राणीला फक्त पॅव्हेलीयनमधून येता यायचे.नंतर मात्र काळानुरूप हा नियम बदलून महिलांना सदस्य करून घेण्यात आले.मेरलीबोन क्रिकेट क्लबचे सदस्य व्हायचे असले तर बरेच नियम आणि अटी आहेत त्या बरोबर (फक्त) १८ वर्षांचे वेटींग लीस्ट आहे.
पत्रकार कक्ष म्हणजेच मिडिया सेंटर हे लॉर्डस्ची शान आहे.संपूर्ण ऍल्युमीनीयमपासून बनवलेल्या या मिडिया सेंटरची उभारणी शिप यार्डवर झाली.जमीनीपासून ४५ फूट उंचीवर हे मिडिया सेंटर वसवले गेले आहे.या जागेवरून सामना ज्या प्रकारे स्पष्ट दिसतो त्याला खरोबखरच तोड नाही.
===========================================================
आम्ही नशीबवान होतो: सौरव गांगुली- राहुल द्रविड
क्रिकेट खेळणार्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर किमान एकदा तरी सामना खेळायचा.आमचे सुदैव असे की आमच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात लॉर्डस् मैदानावर झाली.''आम्ही खरच नशीबवान होतो''.१९जूनचा १९९६ चा तो दिवस अजून स्पष्ट आठवतो जेव्हा कप्तान अझरुद्दीनने सामन्याच्या आदल्या दिवशी आम्हांला तुम्ही उद्या खेळत आहात असे सांगितले.कसोटी पदार्पणाच्या ते सुद्धा लॉर्डस् मैदानावर म्हणल्यावर सामन्याच्या विचारांनी चांगली झोपही लागली नाही.माईक आथरटनच्या नेतृत्वाखाली खेळणारी इंग्लंडची टीम तगडी होती.पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ लवकर बाद करण्यात गोलंदाजांना यश आले असताना ग्रॅहम थॉर्प आणि माईक रसेलच्या भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला.इंग्लंडचा डाव ३४४ धावात संपला.विक्रम राठोड बाद झाल्यावर सौरव फलंदाजीला गेला.पदार्पणाच्या दडपणाचा कोणताही लवलेश त्याच्या चेहर्यावर नव्हता.सौरवने सचिन सोबत भागीदारी करून डावाला चांगली सुरुवात केली.निम्मा संघ बाद झाल्यावर राहुल द्रविड मैदानात आला.राहुल द्रविड समोर सौरवने शतक केले तर त्याच्या शतकाला फक्त ५ धावा कमी पडल्या.
सौरव सांगतो, ''माझे शतक जवळ आले असताना कोलकात्यात दिवे गेले.माझ्या घरच्यांना प्रचंड दडपण आले.माझे काका लंडनला राहतात त्यांनी घरच्यांना फोनवरून जणू धावते समालोचन ऐकवले.माझे शतक पूर्ण झाल्यावर घरात एकच जल्लोष झाला.माझ्या आणि राहुलच्या कारकिर्दीला सुंदर सुरुवात झाली''.
राहुल द्रविडला अजून एका सामन्याची आठवण ताजी आहे.''असाच अजून एक सामना भारतीय संघाकरता संस्मरणीय ठरला होता तो म्हणजे १३ जुलै २००२ चा नॅटवॅस्ट ट्रॉफीचा शेवटचा सामना.इंग्लंडने उभारलेल्या ३२५ धावांचा मोठा स्कोअरचा पाठलाग भारतीय संघाने ज्या जिगरीने केला तो सामना विसरता येणार नाही.सामना जिंकल्यावर लॉर्डस्च्या बाल्कनीत झालेला दंगा आणि सौरवने फिरवलेला शर्ट मनात कायमचा कोरला गेला आहे'', द्रविडने सांगितले.''अशा लॉर्डस् मैदानावर भारत इंग्लंड दरम्यानचा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे.मालिकेची सुरुवात भारलेल्या वातावरणाने होणार आहे ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे'', शेवटी द्रविड म्हणाला.
============================================================
स्मृती आणि परंपरा
*लॉर्डस् मैदानावर गेल्यावर क्रिकेट मंदिरात गेल्याचा आभास निर्माण होतो कारण इथे क्रिकेट परंपरांना मानाचे स्थान आहे.पॅव्हेलियनच्या मुख्य इमारतीत खेळाडू आणि मेरलीबोन क्रिकेट क्लबचे सदस्य फक्त जाऊ शकतात.खेळाडूंना क्रिकेटचे कपडे अंगावर असणे गरजेचे असते तसेच सर्व मेंबर्सना एमसीसीचा पिवळा-लाल टाय आणि जॅकेट सक्तीचे आहे.चपला घालून कोणी या इमारतीत वावरू शकत नाही.नियमाला अपवाद अर्थातच कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी सामना बघायला येणार्या इंग्लंडच्या राणीला असतो.
*पॅव्हेलियनच्या बाजूला संपूर्ण आकाराचा साईट स्क्रीन नाहीये कारण त्या स्टँडमध्ये मेंबर्स बसतात.गोलंदाजाच्या हातामागे हालचाल न करता शिस्त पाळत हे मेंबर्स क्रिकेटचा आनंद लुटतात.पॅव्हेलियनच्या बाजूचा साईट स्क्रीन अर्ध्या आकाराचा आहे.
*प्रत्येक सामन्याचा प्रत्येक दिवसाचा खेळ चालू होण्या अगोदर खेळाडूंना पूर्वसूचना द्यायला लॉर्डस्च्या लॉंगरूममध्ये असलेली मोठी पितळी घंटा वाजवली जाते.सामन्याला हजर असलेल्या महान माजी खेळाडूला घंटा वाजवायला आदराने बोलावले जाते जो मान समजला जातो.
*लॉर्डस् पॅव्हेलियनच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला मैदानाला उतार आहे.डोळ्याला तो सहज दिसत नसला तरी चांगला ८ फूट उतार मैदानाला आहे.मधल्या काळात हा उतार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जो फार यशस्वी झाला नाही.
*२०१२ साली लॉर्डस् मैदानावर लंडन ऑलिंपिक्स मधील तिरंदाजी स्पर्धा खेळवली जाणार आहे.
*१९९८सालापर्यंत मेरलीबोन क्रिकेट क्लबने महिलांना सदस्य करून घेतले नव्हते.आता माजी खेळाडूंसह ७४ महिला क्लबच्या सदस्य आहेत.
============================================================
*१९८३साली भारताने लॉर्डस् मैदानावर बलाढ्य वेस्ट इंडियन संघाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला.
*भारतीय संघाने लॉर्डस् मैदानावर खेळलेल्या तीन सलग कसोटी सामन्यात दिलीप वेंगसकरांनी शतक झळकावण्याची कमाल केली.
*२००२साली सौरव गांगुलीच्या कप्तानीखाली भारतीय संघाने नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ३२५ धावांचा पाठलाग करून सामना जिंकला.विजयाचा आनंद सौरवने शर्ट काढून फिरवला जो क्षण सर्वांच्या मनात कोरला गेला आहे.
=========================================================
कथा 'ऍशेसची'
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार्या कसोटी मालिकेला 'ऍशेस' म्हणले जाते.जेमतेम ४ इंच उंचीच्या या ट्रॉफीला हाती घेण्याकरता दोनही बाजूचे खेळाडू जिवाचे रान करतात.काय कथा आहे या ट्रॉफीची.१८८२साली ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकायला इंग्लंडला फक्त ८८ धावांची गरज होती.सगळ्यांना वाटले की सामना इंग्लंड संघाच्या खिशात आहे.झाले भलतेच इंग्लंडचा डाव गडगडला आणि ऑस्ट्रेेलियाने सामना जिंकला.त्या भयानक पराभवाचे पडसाद वर्तमानपत्रातून उमटले ज्यात इंग्लिश क्रिकेट मेल्याचे मथळे देण्यात आले आणि जळलेल्या अवशेषाची राख ऑस्ट्रेलियाला पाठवली जावी असे उपहासात्मक बोलले गेले.पुढच्या दौर्याकरता इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला असता काही महिलांनी टेराकोटाची राख एका छोट्या कपमध्ये भरून इंग्लिश कप्तानाला सादर केल्या.तेव्हापासून तो कप म्हणजे लढतीची ऍशेस ट्रॉफी बनली.लॉर्डस्च्या म्युझियममध्ये तीच मूळ ऍशेस ट्रॉफी जतन करून ठेवली आहे. ============================================================
No comments:
Post a Comment