एका शहराचा दोन हजार वर्षाचा इतिहास
सातवाहनकालापासून ठाणे परिसराची अंधुकशी सुरुवात होते. कलियन (कल्याण), ठाणे ते सेमुली (चौल) पर्यंतच्या बंदरातून एतद्देशीय व आंतरराष्ट्रीय व्यापार-उदिमाला वेग येऊन आर्थिक संपन्नता आली. पुढे सातवाहनांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. इंद्र-संकर्षण वगैरे दैवतांची पूजा होऊ लागली. कोरीव लेणी, बौद्ध स्तूप,शिल्पांची निर्मिती असा हा काळ होता. पुढे शिलाहार राजवंशाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी दक्षिण व मध्यभारतातून विविध व्यवसायाचे लोक आणून त्यांना आश्रय दिला. गावं वसवली. कालांतराने त्यातूनच नगरं अस्तित्वात आली. कोकणात उत्तम राज्यव्यवस्था सुरू झाल्याने राजधानीच्या शहराची निवड होणं गरजेचं होतं. इसवी सन 9 पासून 13व्या शतकापर्यंत 'श्री स्थानक' अर्थात सध्याचं ठाणे हे उत्तर कोकणच्या राजधानीचं केंद्र झाले. शिलाहारांच्या शिवोपासनेचं प्रतिबिंब त्यांनी बांधलेल्या मंदिरातून आणि तलावातून स्पष्टपणे दिसून येतं.
16 एप्रिल 1856 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी या देशातील पहिली रेल्वेगाडी सुरू झाली आणि ख-या अर्थाने भारताच्या औद्योगिकीकरणालाच सुरुवात झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रेल्वे आल्याचा आनंद लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला होता. त्यावेळच्या शाहिरांनीही या नव्या युगाला कवनातून दाद दिली होती. 'हिंदुस्थानी आगीची गाडी,तिला बांधला मार्ग लोखंडी, मनाचाही वेग मोडी.. मग कैची हत्ती घोडी, पाहूनि झाली, माणसे वेडी, पाऊण तासात, ठाण्यास धाडी..' असं गाणं आबालवृद्धांनी गायल्याचं डॉ. दळवींनी नमूद केलं आहे. १९व्या शतकात प्रारंभ झालेल्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-औद्योगिक घडामोडींचं ठाणे शहर साक्षीदार आहे. प्रगती आणि विकास यांची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या या शहराचा 'असे घडले ठाणे' पुस्तकात अत्यंत ओघवत्या भाषेत आढावा घेतला आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यानंतर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मोठं परिवर्तन घडून आलं. शहरांची महानगरं झाली. स्वातंत्र्योत्तर काळात झालेला असंतुलित आर्थिक विकास,औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, नागरीकरण, दळणवळण तसंच माहिती तंत्रज्ञानाची वाढ, प्रसारमाध्यमांचं वर्चस्व यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्याचंही परिवर्तन झालं आहे. प्रगतीच्या टप्प्यांवर समस्या आणि न सुटणारे प्रश्नही निर्माण झाले. अर्थात त्यामुळेही इतिहासाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा, अपरिहार्य ठरतो. लेखकानेच म्हटल्याप्रमाणे स्थानिक परंपरांचं संवर्धन झालं नाही तर या भागातील स्थानिक संस्कृतीही अडचणीत येऊ लागली आहे. त्याचसाठी ठाणे व ठाणे जिल्ह्याची सांस्कृतिक पूर्वपीठिका पाहणं आवश्यक ठरतं. कदाचित यासाठी प्राचीन युगातील प्राकृतिक ठाणे, श्रीस्थानक, सांस्कृतिक वारसा, सामाजिक जडणघडण आणि तेव्हाची आर्थिक सुबत्ता यावर डॉ. दळवी यांनी प्रकाशझोत टाकला असावा.
प्राकृतिक ठाण्याचा अभ्यास करताना तत्कालीन बेट, बंदरं, खाडी, नदी-तलाव, जुनी गावं, डोंगर-घाट, वन्यजीव, समाजरचना, भौगोलिक स्थान, मंदिरं, शैली यांची माहिती दिली आहे. तेव्हाचे व्यवसाय, शेती, मासेमारी, कोळी-आगरी समाज, ब्राण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ख्रिस्ती, प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक, पारशी, मुस्लिम, ज्यू, जैन धर्मीयांच्या वसाहती,तेव्हाचं चलन, नाणी, व्यापार वगैरेंची माहिती देताना प्राचीन ठाण्याच्या आर्थिक समृद्धीची तसंच संपन्न लोकजीवनाची कल्पना करता येते. ठाण्याच्या इतिहासावर अनेक पुस्तकं तसंच लेख लिहिण्यात आले आहेत. मात्र अजूनही ठाण्याचा शास्त्रशुद्ध इतिहास लिहिला गेला नाही, अशी खंत डॉ. दळवी यांनी आपल्या मनोगतात मांडली आहे. ज्यांना ठाण्याबद्दल आवड आणि जिव्हाळा आहे, ज्यांच्या मनात 'माझे ठाणे' ही भावना आहे अशा व्यक्तींना ठाण्याचा इतिहास माहीत व्हावा तसंच आपल्या समृद्ध वारशाचं ज्ञान व्हावं यासाठी या पुस्तकाचं प्रयोजन असल्याचं डॉ. दळवी सांगतात. त्यांचे स्नेही आणि इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांचं या ग्रंथासाठी फार मोठं योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. दोन हजार वर्षाचा इतिहास छोटय़ाशा पुस्तकात संकलित करण्याची अवघड जबाबदारी डॉ. दळवी यांनी साध्य केली आहे. मध्ययुगातील या शहराची माहिती देताना बिंब आणि इतर राजवंश, त्यांचे सामाजिक तसेच धार्मिक योगदान, मुस्लिम राजे, कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचं आगमन, त्यांची ठाण्यावरील राजवट, मराठय़ांनी जिंकलेलं ठाणे तसंच त्यावेळचा परिसर यांचा सविस्तर परिचय करून देण्यात आला आहे. शिलालेख, पुरातन वारसा असणा-या मूर्ती, राहणीमान, बखरी, किल्ले यांचीही माहिती आहे. 1782 मधील ठाणे किल्ल्याचं म्हणजेच सध्याच्या सेंट्रल जेलचं चित्रही या पुस्तकात आहे.
आधुनिक युगाचा आढावा घेताना डॉ. दळवी यांनी 'तेव्हा आणि आता' हे चित्रदर्शन घडवलं आहे. ब्रिटिश सत्तेची सुरुवात कशी झाली आणि त्याचा ठाणे शहराशी कसा संबंध येत गेला याची रंजक माहिती यात आहे. त्यावेळचे वाडे-वास्तू-इमारती-देवळं-मशिदी-चर्च, त्र्यंबकजी डेंगळे यांनी ठाणे किल्ल्यातून केलेलं पलायन, ब्रिटिश सत्तेचा प्रारंभिक प्रतिकार,क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा लढा, जिलतील पहिलं आयकर विरोधी आंदोलन, रेल्वेचं आगमन, वृत्तपत्रांचा प्रारंभ, जिल्ह्यातील शतकोत्तर ग्रंथालयं, ठाणे नगरपालिकेची स्थापना, पहिली 50 वर्ष, नंतरच्या महानगरपालिकेवर टाकलेला दृष्टिक्षेप, स्वातंत्र्याचं आंदोलन, लढे, शैक्षणिक विकास, सामाजिक तसंच सांस्कृतिक वाटचाल यांच्यासह 'काल आणि आज' या विषयावर विचारमंथन केलं आहे. सर्वाधिक आकर्षणाचा भाग हा परिशिष्टांचा आहे. त्यात सोपाऱ्याचा स्तूप, नाणेघाट, लोनाडचे शिलालेख, एकासार येथील वीरगळ आणि नौकायुद्ध, मराठी भाषेची सुरुवात, पर्यावरण संवर्धन, साष्टीची नाणी यांची माहिती अतिशय सुंदर आहे.
डॉ. दळवी यांनी या ग्रंथासाठी अभ्यासलेल्या संदर्भाची सूची, नकाशेही जिज्ञासूंसाठी महत्त्वाचे आहेत. काळानुसार बदलत गेलेली शहररचना, रस्ते, स्थापत्यकला, रेल्वेस्थानकापासून कौपिनेश्वर मंदिरापर्यंतचं नूतनीकरण, शाळा, टाऊन हॉल, न्यायालय, पोस्ट ऑफिस, कळवा पूल, चर्च, तलावांचे सुशोभीकरण, ठाण्यातील लोकप्रतिनिधी, सांस्कृतिक चळवळी,साहित्यिक, अभिनेते, खेळाडू, समाजसेवक, येऊरचे आदिवासी, त्यांची चित्र-काष्ठशिल्पकला यांची सचित्र माहिती वाचकांचं औत्सुक्य वाढवते. सध्याच्या विविध संस्थांची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराच्या जडणघडणीत मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा परिचयही करून दिला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शहरात राहायचं असेल तर आपलं मन प्रसन्न पाहिजे. म्हणूनच ठाण्यातील नागरिकांनी जुन्या ठाण्याचा आणि नव्या ठाण्याचा समन्वय साधून आधुनिकतेकडे वळलं पाहिजे, असं आवाहनही लेखकाने केलं आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचे आशीर्वाद या पुस्तकाला लाभले आहेत. हे पुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य वाचकांनाही उपयुक्त असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. भरपूर रंगीत तसंच कृष्णधवल फोटो, गुळगुळीत कागद, उत्तम मांडणी, सजावट, ठळक अक्षरं, चांगली छपाई यामुळे हे अडीचशे पानी पुस्तक सर्वासाठीच उपयुक्त तसंच स्थानिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहता, अबालवृद्धांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा लेखकाने व्यक्त केली आहे.
असे घडले ठाणे
No comments:
Post a Comment