Saturday, April 28, 2012

हत्तीचं वजन - Weight of Elephant

Weight of Elephant

शास्त्रज्ञ आर्किमीडिजची पत्नी जेली हिला एकदा आर्किमीडिजची खूप काळजी वाटू लागली. तिनं त्याला विचारलं, 'आपण  एवढे चिंताक्रांत का आहात? तुमचं खाण्या-पिण्यात, कपडय़ालत्त्यात, अगदी कशा-कशात लक्ष नाही. सदोदित विचारात दंग असता. एवढा कसला विचार करताय?'

'अगऽऽ! तसंच विलक्षण घडलंय. काय करावं तेच सुचत नाहीए. राजेसाहेबांकडे काही व्यापारी हत्ती घेऊन आले आहेत. राजेसाहेबांना ते हत्ती खूप आवडले आहेत. त्यांना ते खरेदी करायचे आहेत.'
'मग त्यात अडचण ती कसली? राजेसाहेबांना काय कमी? पैसे द्यायचे आणि हत्ती घ्यायचे.'
'अगऽऽ! तेवढं सोपं नाही ते. व्यापारी म्हणताहेत, आम्ही वजनावर हत्ती विकायला तयार आहोत. हत्तीचं वजन करा आणि त्यानुसार हत्ती विकत घ्या.'
'अग्गो बाईऽऽ! हत्तीचं वजन करायला गेलं तर त्याच्या प्रचंड भारामुळे कोणताही वजनाचा काटा तुटून जाईल.'
'अगंऽऽ! तसंच झालं. हत्तीचं वजन करायला गेलं की, त्याच्या प्रचंड वजनामुळे तराजू तुटायला लागले. राजाला हत्ती विकत घ्यायचे आहेत खरे; पण हत्तीचं वजन करता येत नाहीए. त्यामुळे हत्ती विकत घेता येत नाहीत. हत्तीचं वजन करता येईल असा भक्कम तराजू तयार करायला त्यांनी मला सांगितलं आहे आणि असा तराजू कसा तयार करायचा हेच मला सुचत नाहीए.'
'विचार करा म्हणजे नक्कीच सुचेल तुम्हाला. धीर सोडू नका.' जेनीनं आर्किमीडिजला धीर दिला. त्यानंतर एक-दोन दिवसांनीच एक घटना घडली. म्हटली तर अगदी साधी; पण 'साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे' असं म्हणतात, तेच खरं! त्याचं असं झालं- जेनी मोठय़ानं ओरडून आर्किमीडिजला म्हणाली, 'अहोऽऽ! लवकर या. पाण्याच्या हौदात भांडं पडलं आहे आणि त्यात माझ्या हातातील नाणी आणि गळ्यातला मौल्यवान हार पडला आहे. भांडं बुडण्याच्या बेतात आहे. भांडं बुडालं तर नाणी-हार सगळंच हौदाच्या तळाशी जाईल.'
आर्किमीडिज हौदाजवळ आला. त्यानं पाहिलं- भांडं अर्धवट बुडून पाण्यावर तरंगत होतं. त्यानं प्रथम वाकून काळजीपूर्वक भांडय़ातला हार काढला. भांडं किंचित पाण्याच्या वर येऊन तरंगू लागलं. त्यानं अलगद भांडय़ातील नाणी काढली. भांडं आता अधिक वर येऊन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागलं. आर्किमीडिजच्या विचाराला चालना मिळाली. नाणी आणि हार सुखरूप मिळाल्यामुळे जेनीला आनंद झाला; पण आर्किमीडिजच्या चेहऱ्यावर अवर्णनीय स्वरूपाचा आनंद ओसंडून वाहत होता.
त्यानंतर काही दिवसांनीच 'आर्किमीडिजनं हत्तीचं वजन करण्याकरिता मजबूत तराजू तयार केला आहे', अशी वार्ता सर्वत्र पसरली. जो तो हातातलं काम सोडून तळ्याच्या दिशेने धावू लागला. बघता बघता तळ्याच्या काठावर मोठ्ठी गर्दी जमा झाली. आर्किमीडिज काही माणसांच्या मदतीने एक उभट आकाराची मजबूत नाव घेऊन तेथे आला.
राजा त्याला म्हणाला, 'आर्किमीडिज! कोठे आहे तुझा तराजू?'
आर्किमीडिजने नावेकडे अंगुलीनिर्देश करीत म्हटलं, 'महाराज! हा बघा माझा तराजू! याच्या मदतीनंच मी हत्तीचं वजन करणार आहे.'
तेवढय़ात आर्किमीडिजच्या सहकाऱ्यांनी तळ्याच्या काठावर मोठय़ा आकाराच्या दगडांचा ढीग जमा केला. जवळच एक साधा, मोठय़ा आकाराचा तराजू उभा केला. नंतर त्यानं मदतनीसांच्या साह्य़ानं नाव तळ्याच्या पाण्यात उतरविली. नावेपर्यंत फलाट टाकून हत्तीला नावेत उतरवलं. हत्तीच्या वजनामुळे नाव पाण्यात काही प्रमाणात बुडून तरंगू लागली. तिच्या पाण्यावरील पृष्ठभागावर आर्किमीडिजने खूण केली. नंतर हत्तीला काठावर परत आणण्यात आले आणि त्या नावेत काठावरील दगड भरायला सुरुवात झाली. नाव पुन्हा त्या खुणेपर्यंत बुडून तरंगू लागली. त्या वेळी त्याने दगड भरण्याची क्रिया थांबवली. याचा अर्थ नावेतील दगडांचे वजन त्या हत्तीच्या वजनाएवढे होते! आर्किमीडिजने दगडांचे वजन साध्या तराजूच्या साहाय्याने केले आणि त्यावरून हत्तीचे वजन काढले.
किनाऱ्यावर जमलेल्या लोकांनी आर्किमीडिजचा जयजयकार केला. राजाने आर्किमीडिजचा सन्मान केला आणि त्याला मोठे बक्षीस दिले.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive