Thursday, August 23, 2012

हट्टावरचा "तह' - websites for childrens

अनेकदा आपल्याला त्रासदायक वाटणारे प्रश्‍न चुटकीसारखे सुटतात. त्या प्रश्‍नांकडे आपण दुसऱ्या बाजूने पाहत नाही. मुलांना बागेत घेऊन गेल्यावर त्यांच्या मागण्यांवर असाच रामबाण उपाय शोधता येतो. मुलांनाही खेळण्याचा आणि आपल्याला चिडचिड न झाल्याचा आनंद.

मुलांना शनिवार, रविवारी बागेत न्यायचं हे ठरलेलंच. अर्थात बागेत न्यायचं म्हणजे येणाऱ्या संकटांना सामोरं जायचं. खेळणीवाल्यापुढं उभं राहून त्या खेळण्याशिवाय जीवनच कसं व्यर्थ आहे, हे प्रत्येक मूल आपल्या पालकांना पटवत असतं. हट्ट करून पालकांना जेरीस आणणारी मुलं, हे दृश्‍य प्रत्येक बागेपुढं दिसतंच. माझी मुलंही अशीच होती. आपल्याकडचे पैसे आणि वस्तूंवर होणारा खर्च यांची गणितं समजण्याचं ते वय नव्हतं. मग कशाला ना कशाला नकार द्यावाच लागायचा. मग रडारड, रस्त्यात बसणे, डोकी आपटणे, अंग टाकून देणे हे घडायचं. या सगळ्या प्रकारात बागेत जाण्यातील मजाच हरवायची. नको ते बागेत जाणं, असं होऊन जायचं. पण नेलं नाही तरी मुलं खट्टू व्हायची, मग यावर उपाय शोधायचाच असं ठरवलं.

दोन्ही मुलं आणि माझी मीटिंग झाली. कोणत्या कारणांवरून चिडचीड होते ते व त्यावरचे उपाय शोधले आणि बागेत जाणं नक्की केलं. बागेत जाताना घालायचे तीन चार कपडे निश्‍चित केले. त्यापैकी एक ड्रेस मुलांनी निवडायचा असं ठरलं. बागेत गेल्यावर आम्ही कोणत्याही तीन गोष्टी मागणार त्याला तू नाही म्हणायचं नाहीस, अशी मला आज्ञा करण्यात आली. मला ती मानावीच लागली.

कागदोपत्री तरी सगळं नीट ठरलं. त्याची अंमलबजावणी कशी होणार याची मला उत्सुकता होती. ठरल्याप्रमाणं बागेत जायचा दिवस उजाडला. मुलांपुढं कपडे ठेवले. दोघांनी कोणतीही कटकट न करता त्यांना आवडणारे कपडे घातले. सर्व सामोपचारानं चालू होतं. मला जरा आश्‍चर्यच वाटलं. बागेत गेल्यावर खेळून झालं. आम्ही दुकानापाशी आलो. आज कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट नव्हता, तर कोणत्या तीन गोष्टी निवडायच्या यावर विचार चालू होता.

दोघांना आइस्क्रीम हवंच होतं. एकानं साबणाचे फुगे घेतले. मुलीला बंदुकीनं फुगे फोडायचे होते, ""मी तीन फोडते, तू तीन फोड,'' असं दादाला सांगण्यात आलं. मुलगा घोड्यावर बसला. मुलीनं चक्रात बसणं पसंत केलं. अजून काही मागणी येते का, असं वाटत असतानाच मुलं शांतपणे स्कूटरकडं जायलाही लागली! जाताना पुढच्या वेळी कोणत्या तीन गोष्टी घ्यायच्या ते ठरवत होती. तहाच्या अटी ठरवताना "तह मोडला तर बाग बंद,' या बाण्याचा एवढा परिणाम होईल असे मला वाटलं नव्हतं. मला गहन वाटणारा प्रश्‍न मुलांनी चुटकीसरशी सोडवला. त्यातून मुलांना निवडीचं स्वातंत्र्य मिळालं, हट्ट न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. दोघांमध्ये सुसंवाद झाला. सहकारानं काम झालं. घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहता आलं. एवढ्या छोट्याशा घटनेतून मला मात्र खूपच शिकायला मिळालं.

सुट्टीत पालकांसाठी थोडा अभ्यास मुलांना एखादी लायब्ररी दाखवा. तिचे वर्गणीदार व्हा आणि नियमितपणे मुलांच्या आणि तुमच्या पुस्तकांची देवघेव करा.
मुलांना अधूनमधून पुस्तकांच्या दुकानात नेऊन त्यांच्या आवडीचे पुस्तक निवडू द्या आणि विकत घ्या.
शक्‍य तर मुलांसाठी एखादे इंग्रजी मासिक लावा. चंदामामा (मराठीत चांदोबा), ज्युनिअर चंदामामा, चंपक, ट्विंकल, छोट्या मुलांसाठी मॅजिक स्पॉट असे अनेक पर्याय आहेत. चंदामामाची बहुभाषिक वेबसाइट (http://www.chandamama.com) जरूर पाहा.
मुलांबरोबर आपणही पाहाव्यात अशा आणखी काही वेबसाइट्‌स
http://kids.britannica.com/
http://kids.nationalgeographic.com/kids/
http://kids.discovery.com/
http://www.billnye.com/

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive