Wednesday, August 22, 2012

फेमस फाइव्ह, हार्डी बॉइज, नॅन्सी द्रुव...

सुट्टीत मुलांनी काय करायचं असा एक मोठा प्रश्‍न पालकांना पडलेला असतो. त्याचाच एक भाग म्हणजे मुलांनी काय वाचायला हवं? अनेक पालकांना हा प्रश्‍न पडलेला असतो. काही असले तरी मुलांना आवडेल ते वाचू द्याच !

इतके दिवस आपण इंग्रजीतून वाचायला, पाहायला, ऐकायला मिळतील अशा काही उत्तमोत्तम पुस्तकांची, फिल्म्सची माहिती घेतली. मात्र, मला वाटतं मुलांनी सगळं काही वाचावं. असभ्य, अश्‍लील आणि उपद्रवकारक साहित्याकडे मुलं आकर्षित होणार नाहीत याची थोडी काळजी इंटरनेटच्या जमान्यात तर नक्कीच घ्यायला हवी, पण ती साधारण देखरेख सोडली, तर बाकी मुलांना आवडेल ते सर्व वाचू द्यावं. चिकित्सा करत बसू नये.

मोठ्या माणसांना फारशी वरच्या दर्जाची न वाटणारी काही पुस्तकं, खरंतर पुस्तकमाला, रहस्यकथा मुलांना भयंकर आवडतात. अशी पुस्तकं भरपूर संख्येनं सर्वत्र मिळत असल्याने मुलं सारखी तीच पुस्तकं वाचतात अशी काही पालकांची तक्रारही असते. पण मुलांना ती पुस्तकं भरपूर प्रमाणात अवश्‍य वाचू द्या. (त्यातूनही ते चांगल्या गोष्टी शिकतात.)

फ्रॅंक व ज्यो ही "हार्डी बॉइज' सख्खे भाऊ आहेत. फेंटन हार्डी या अमेरिकन खासगी गुप्तहेराची ही दोन धाडसी मुलं. रहस्याचा मागोवा घेण्यात आणि गुन्हेगारांशी दोनहात करून त्यांना पकडून देण्यात ती वडिलांच्याही पुढेच आहेत. त्यांचे नवनवीन "कारनामे' गेली अनेक दशकं मुलं उत्सुकतेनं वाचताहेत. काळानुसार बाकीचे तपशील बदलले, तरी या मुलांचं वय मात्र त्यांच्या निर्मात्यांनी वाचकवर्गाचा विचार करून तेवढंच ठेवायचं ठरवलं आहे.

हार्डी बॉइझचे निर्माते स्ट्रेटमेयर यांनी खास मुलींसाठी रंगवलेली नॅन्सी द्रुव (nancy drew) सुद्धा लोकप्रियता टिकवून आहे. प्रसिद्ध वकील कार्सन द्रुव यांची ही लाडकी लेक. धाडसी, हुशार, संवेदनशील आणि अन्याय दूर करून पीडितांना मदत करणारी. ती वाचकांना आवडली नाही तरच नवल.

त्याच व्यक्तिरेखा आणि काही समान सूत्रं वापरून आजपर्यंत अनेक लेखकांनी त्याचं लेखन केलं आहे. वेगवान घडामोडी, चित्रविचित्र घटना, भरपूर संवाद, गुप्त संदेश आणि त्यांची उकल, शह-काटशह अशा घटकांनी भरलेल्या या कादंबऱ्या उत्कंठा वाढवतात.

थोड्या लहान वयाच्या मुलांसाठी एनिड ब्लायटन या प्रसिद्ध लेखिकेनं लिहिलेल्या साहस, रहस्यकथांनाही हे वर्णन लागू पडतं. "फेमस फाइव्ह' या तिच्या धाडसी मुलांच्या चमूचं आणि एक वैशिष्ट्य किंवा आकर्षण म्हणजे त्यातला पाचवा सदस्य गुन्हेगारांना ओळखून असणारा टिमथी कुत्रा. एनिड ब्लायटन या लेखिकेनं मुलांसाठी शेकडो छोटी-मोठी पुस्तकं लिहिली आहेत. त्यातली काही मुलांच्या घरी, शाळेत, किंवा आसपास खरोखर घडू शकतील अशा गोष्टींबद्दल आहेत, तर बरीचशी वेगळ्या कोटीतले जीव, बोलणारे पशू-पक्षी, खेळण्यांचं राज्य, अशा अद्‌भुत जगात नेणारी आहेत. टीकाकारांना त्यात दोष दिसत असतील, पण मुलांच्या भाव-भावनांना, कल्पनाशक्तीला ती भुरळ घालतात हे नक्की. त्यातली चित्रंही बहुधा खूप सुंदर असतात. सुट्टीत मुलांना या पुस्तकांचा खजिना जरूर उघडून द्या.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive