Thursday, August 23, 2012

मुलांसाठी वेळ दिल्याचे समाधान - Satisfaction to giving time to children

मी विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये बिझी असले, तरीही मुलांच्या संगोपनासाठी वेळ काढते. त्यांना वेळ देता यावा म्हणून प्रसंगी मी मालिकाही नाकारली आहे. मुलांना सांभाळण्यात मला आई-बाबा व सासू-सारऱ्यांची मोठी मदत झाली आहे.

मुलांच्या अपेक्षा खरं तर खूप छोट्या असतात. माझी मुलगी सनाया आता "सीनियर केजी'ला आहे, पण तिची बस शाळेतून येते त्या वेळी आमच्या घराजवळ मी त्या बसपाशी तिला आणायला गेले की तिला इतका आनंद होतो, की बस्स! अशा छोट्या छोट्या गोष्टी मी आवर्जून सांभाळते. तिला अजून माझ्या कामाबाबत फारसं काही कळत नाही, पण आता झी मराठीवर माझी "उंच माझा झोका' ही मालिका सुरू आहे. त्या मालिकेत मी सारखं अण्णा म्हणत असते, ते काही तिला कळलं नाही. तिने मला विचारलं, ""मम्मा, अण्णा म्हणजे कोण गं?'' मी तिला सांगितलं, ""अण्णा म्हणजे आशिष.'' मुलांच्या बाबतीत मी आणि आशिष कायम आवश्‍यक तेवढा वेळ देतोच. माझा मुलगा ईशान आता आठ वर्षांचा आहे. त्याच्या शाळेत जेव्हा पेरेंट्‌स मीटिंग असतात तेव्हा आम्ही दोघंही जातो.

ईशानच्या जन्मानंतर मी नाटक आणि दौरे पूर्ण बंद केले, त्याचबरोबर महिन्यात केवळ पंधरा दिवसच शूटिंग करायचं, असा निश्‍चय केला आणि तो अमलात आणला. सध्याही तो नियम मी पाळतेय. मुलाच्या जन्मानंतर त्यांचं बोलणं, त्यांची वाढ, त्यांच्या बाललीला मला मिस करायच्या नव्हत्या, त्यामुळे कटाक्षाने मी कोणत्याही महिन्यात शूटिंगसाठी पंधरा दिवसांच्या वर वेळ द्यावा लागणार नाही याकडे लक्ष दिलं. हे मी पाळल्याने मला त्याच्याबरोबरचा काळ चांगल्या प्रकारे अनुभवता आला. तो खूप लहान असताना तर मी कामही अगदी कमी केलं होतं. माझ्या मुलांना कामामुळे मी वेळ देऊ शकले नाही, असं मला कधीही वाटत नाही. एकदा एका मालिकेचा प्रस्ताव आला होता. त्या मालिकेच्या निर्मात्यांना मी सांगितलं, की माझ्या मुलांच्या शाळेच्या मीटिंगच्या वेळी मला शूटिंग करता येणार नाही. मी आठ दिवस तशी आधी कल्पना देईन, पण त्यांनी सांगितलं, की "नाही, असं ऍडजस्ट करता येणार नाही.' मग ती मालिका मी स्वीकारली नाही.

ईशानने माझ्या सगळ्या मालिका बघितल्या आहेत. तो अगदी लहान असताना मी एका मालिकेतील भूमिका करताना रडत असल्याचा प्रसंग होता, ते बघून तो खूप रडू लागला. तेवढ्यात मी घरी आले. टीव्हीत आई होती आणि आता लगेच कशी घरी आली, याचं त्याला आश्‍चर्य वाटलं; पण मी समजावून सांगितलं. ईशान थोडा मोठा झाल्यावर मला एकदा म्हणाला, ""मम्मी, तू सारखी कामाला काय जातेस? तू नको ना जाऊस!'' मग मी त्याला सांगितलं, ""तू संध्याकाळी मित्रांबरोबर खेळायला जातोस की नाही? ते तुला आवडतं. मग हेही तसंच आहे. मी काम केलं की मला छान वाटतं, त्यामुळे मी कामाला जाते.'' त्याला मी दिलेलं उदाहरण पटलं. मी कॉन्व्हेंटमधूनच शिकलेली असल्याने ईशान आणि सनाया या दोघांच्या शिक्षणासाठी आम्ही इंग्लिश मीडियमच निवडलं. ईशानच्या शाळेत मी कधी गेले तर तेथे काही पालक मला भेटायला आवर्जून येतात. त्या वेळी ईशान मला हळूच विचारतो, ""मम्मा, हे तुझे फॅन आहेत ना?'' आपली आई सेलिब्रिटी आहे, याची त्याला जाणीव आहे.

सध्या तो माझी "उंच माझा झोका' ही मालिका मनापासून बघतो आहे. नुकतीच मी दौऱ्यावर असताना ईशान एपिसोड बघत होता. त्या एपिसोडमध्ये मी रमाला समजावते, तिला रडताना शांत करते हे तो अगदी टक लावून बघत होता. एपिसोड संपल्यानंतर मला फोन करून त्याने सांगितलं, ""मम्मी, हा भाग खूपच इमोशनल होता.'' मी दुसऱ्या दिवशी घरी परत आल्यावर मला घट्ट मिठी मारून पुन्हा माझ्या भूमिकेचं तो कौतुक करत होता.

माझी आई नोकरी करत असे, पण ती आमच्यासाठी वेळ काढत असे. तोच कित्ता मी गिरवत आहे. मी माझ्या मुलांसाठी योग्य तेवढा वेळ काढते. मला निर्धास्तपणे काम करता येतं, त्याचं श्रेय माझ्या आई-बाबांना आणि सासू-सासरे या चौघांनाही आहे. हे चौघंही जण माझ्या दोन्ही मुलांसाठी नेहमी वेळ काढत असतात. त्यांची मला खूप साथ आहे आणि मदत होते.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive