Thursday, August 23, 2012

स्पर्धा परीक्षा: आठ विनिंग स्टेप्स


कार्य कुठलेही असो, त्याची चांगली सुरुवात होणे महत्त्वाचे असते. सुरुवात चांगली झाली म्हणजे तुम्ही विजयी झालाच समजा. कार्याचे यश कार्याच्या सुरुवातीवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे त्याचा शेवटही चांगलाच होत असतो. शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणारे तसेच स्पर्धा-परीक्षांची तयारी करणार्‍यांचीही सुरुवात चांगली झाली तर भविष्‍यात त्यांना कोणीही थांबवू शकत नाही.

अभ्यास अथवा एखाद्या कामात यश मिळण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत. त्यांना आपण 'आठ विनिंग स्टेप्स' म्हणू शकतो. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांसाठीही या स्टेप्स मार्गदर्शक ठरू शकतात.

1) स्टार्ट अर्ली : चांगली सुरुवातीमध्येच कार्य यशाकडे वाटचाल करत असते तसेच कार्याचा शेवटही गोड होत असतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच तयारी सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग तसेच विविध क्षेत्रातील परीक्षा देताना अडचणी निर्माण होत नाही. विशेष म्हणजे इंग्रजीकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण घेत असतांना टीव्हीवरील बातम्या पाहाणे, वृत्तपत्र वाचणे फायदेशीर ठरते. जगासोबत आपण स्वत: अपडेट राहिल्याने नवीन संदर्भ कळतात. देश- विदेशातील घडणार्‍या घटनांचा होणारा परिणाम तसेच प्रभाव अभ्यासणेही महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमधून उमेदवारांचे सर्वकष ज्ञान तपासले जात असते. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा 'शॉर्टकट' न वापरता मन:पूर्वक अभ्यास केला पाहिजे. अभ्यासांत स्वत:ला गुंतवूण घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयात असल्यापासूनच स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून पाहायला हवे.

2) बॅक टू द बेसिक्स: आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, त्या विषयाची विविध प्रकाशनांची आठवी ते बारावी पर्यंतची सर्व पुस्तके चाळली पाहिजे. प्रत्येक विषयाची मूलभूत माहिती ही त्या विषयाचा पाया असते. त्यामुळे प्रत्येक विषयाची प्राथमिक माहितीही असणे आवश्यक असते. स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा इयत्ता दहावी पर्यंतचा असतो.

3) बुद्धिमत्ता, वाचन आणि सामान्यज्ञान: स्पर्धा परीक्षेतील एक अविभाज्य घटक म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीकडे पाहिले जाते. बुद्धिमत्ता चाचणीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घन संख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो. वाचनातूनच आजूबाजूच्या घटनांचा वेध घेता येतो, विचार प्रगल्भ होतात. वाचनाची आवड असावी कारण अभ्यासक्रम व्यापक असून अध्ययन (जनरल स्टडीज) सारख्या विषयात तर 'सिलॅबस' कुठून सुरू होतो, व कुठे संपतो याचा अंदाज लावणेही कठीण. तो वामनाच्या तीन पावलांसारखा ब्रह्मांड व्यापू शकतो. (आणि पेपर सोडवताना ब्रह्मांडाचा अंदाजही येतो)

4) मॅथ इज मॅजिक: गणित हा कठीण वाटणारा विषय पण स्पर्धा परीक्षेत कलाटणी मिळवून देणारा विषय आहे, पण त्याचा पाया शालेय जीवनातूनच मजबूत झाला पाहिजे कारण स्पर्धा परीक्षेत गणिताचा स्तर हा दहावी पर्यंतचा असतो. यामधे काळ, काम, वेग, नाते संबंध, दिशा, तर्कशुद्ध युक्तिवाद आदी बाबींवर प्रश्न विचारले जातात. पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.

गणित हा विषय कठीण असल्याची तक्रार बहुतेक विद्यार्थी करत असतात. परंतु तसे मुळीच नाही. गणिताचा अभ्यास करतांना पायर्‍या लक्षात ठेवल्या पाहिजे. कमीत कमी वेळात उत्तरे देण्याची चपळता अंगी असणे गरजेचे आहे. परीक्षेला सामोरे जाताना एक गणित ४० सेकॅंडाच्या आत सोडवायचे असते. वेदिक मॅथचा बराच फायदा होतो.

5) इंग्लीश इज इसेन्शियल: इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे महत्वाचे आहे. आपण चुकलो वा अडखळलो तरी चालेल पण इंग्रजी लिहिण्याची व बोलण्याची सवय केलीच पाहिजे. तर याची सुरवात कशी करावी? इंग्रजी व्याकरणाकड़े लक्ष दिले पाहिजे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचली पाहिजे. त्यानंतर हळूहळू लहान-मोठ्या पुस्तकांकडे मोर्चा वळवला पाहिजे. इंग्रजी चॅनेल्सवरील विविध विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद व चर्चा ऐकल्याने आपले शब्दोच्चार, बोलण्याची शैली इत्यादी सुधारण्यास मदत होईल.

6) टाईम इज लिमिटेड: आज पैक्षा पेक्षा वेळेला महत्त्व आहे. त्यामुळे आपणही वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे. वेळेचा सद्उपयोग करण्याची सवय आपण स्वत:पासूनच लावली पाहिजे.

आपण किती झोपतो, किती वाजता उठतो, किती वेळ जागरण करतो, किती वेळ टाईमपास करतो, या गोष्‍टीही महत्त्वाच्या असतात. वेळेचे योग्य नियोजन हवे. कुठला विषय अधिक व कुठला कमी महत्त्वाचा, कुठला सोपा व कुठला कठीण, हे समजून घेतले पाहिजे. प्रशासकीय सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते.

7) हॅंडरायटिंग इज इंप्रेशन: सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना समजला जातो. लेखी सादरीकरणातून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी सुंदर हस्ताक्षर महत्त्वाचे असते. हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी लहानपणापासून सराव करणे गरजेचे असते. आपल्याला स्पर्धेत टिकायचे असेल तर आपले नुसते ज्ञान चौफेर असून भागणार नाही, तर त्याचे सादरीकरणही चांगले हवे. सुंदर हस्ताक्षर ही पहिली, तर मुद्देसूद लेखनशैली ही दुसरी पायरी आहे.

8) करियर सेंटर्ड डेव्हलपमेंट: स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून करियर सापेक्ष विकास करणे फार महत्वाचे आहे. ते जमले म्हणजे यश हमकास आहे. करियर डेव्हलपमेंटच्या दृष्टीकोनातून तीन महत्वाच्या बाबी आहेत: अ) करियरशी निगडित अभ्यास आणि ज्ञान (नॉलेज) ब) करियरसाठी आवश्यक गुणकौशल्ये (स्किल्स), क) करियरला पूरक अशा वृत्तीतील बदल (ऍटिट्यूड). त्याप्रमाणे बदल केले पाहिजे. आपण निवडत असलेल्या पदाचे विशिष्ट गुण-कौशल्ये असतात व ते आपल्यात असणे अनिवार्य आहे. उदा. पोलिस बनण्यासाठी तल्लख बुद्धिमत्ता, डीटेक्टिव माईंड, तंदरुस्तप़णा व चपळ शरीर असावे लागते. सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रगतीसाठी 'लॉजिक'. करियर एक कार्यक्षेत्र आहे व जशी कार्यक्षेत्र बदलतात तशी जीवनपद्धती व वर्तणूक बदलावी लागते. नवी गुण-कौशल्ये आत्मसात करावी लागतात व आपल्यातील काही दोष प्रयत्नपूर्वक घालवावे लागतात.

'मोर यू स्वेट इन द प्रॅक्टिस, लेस यू विल ब्लीड इन द बॅटल फील्ड' अर्थात जितकी मेहनत आणि पूर्वतयारी आधी कराल तितका कमी त्रास तुम्हाला भविष्यात होईल. आठ विनिंग स्टेप्सचा उपयोग केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

( ट्रेनर अँड सायकोलॉजिकल काउन्सलर, वेलनेस फाउंडेशन, भुसावळ)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive