Sunday, August 26, 2012

फेसबुक असंही!

फेसबुकचं हे जग जेवढं खोटं, तेवढंच मोठंही. सगळंच उघडंवाघडं. खऱ्या जगात जगण्याची हिंमत नसणाऱ्यांसाठी फारच छान आणि कल्पनेत रममाण होणाऱ्यांसाठी कल्पनेतल्याच दु:खात आणि क्लेशात पीडित होण्याचा आनंद देणारं. हे सारं खरं वाटून जगतो आपण. सगळं खरं जगणं या कल्पनेशी जुळवून घेतोय आपण.मेलवर रोज एकदोन तरी मैत्रीची आर्जवं येतात.
कोण कुठला, ना गावचा, ना ओळखीचा. याला किंवा तिला कशाला हवीये माझी मैत्री. त्यांना कुठं माहिताय, मी कोण कुठचा, कोणाचा कोण आणि कशाचा काय? ही सगळी आर्जवं तपासायची असं ठरवलं, तरी वेळ मिळत नाही. एकदाच हिय्या करून सगळय़ांना होकार भरून टाकायचा. मग ते सगळे रोज काही काही लिहितात. कोण कुठच्या गावाला गेला, तिथं त्यानं त्याचीच काढलेली छायाचित्रं, कुणाच्या वाढदिवसाला शेकडय़ांनी दिलेल्या शुभेच्छा. त्या अमक्याचं काय चाललंय आणि तमका कसा जगतोय वगैरे बरंच काही, रोजच्या रोज या मैत्रीच्या नावाखाली हे सारं येऊन पडत असतं. बरेचजण ते अगदी ‘परवचा’ म्हटल्याप्रमाणे वाचत असावेत. एक दिवस पाढे म्हटले नाहीत, तर केवढा मार पडायचा.. (तरीही परीक्षेत एकोणतीसच्या पाढय़ाला फजिती व्हायची ती व्हायचीच.) पाढे म्हणण्यापेक्षा फेसबुक पाहणं केव्हाही मजेशीर!
आपल्याबद्दल कुणाला काय वाटतंय, याची अनावर ओढ असल्यासारखं, अधाशी होऊन फेसबुक उघडण्याची हौस असणारे या जगात सध्या फार म्हणजे फारच लोक आहेत. कसा काय वेळ असतो, कोण जाणे! न दिसणाऱ्या, कधीही न भेटणाऱ्या आणि भेटले तरी काय बोलायचं असा प्रश्न पडणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यानं काय होतं? कॉलेजातले रोजच्या रोज भेटणारे, नको त्या हज्जार गोष्टी सांगितलेले मित्र, बऱ्याच वर्षांनी भेटले की होणारा आनंद किती आणि कसा असतो, याचा अनुभव घेणारे काही कमी नाहीत. तरीही काल्पनिक विश्वात रममाण होऊन आपलं सारं जगणं त्याच्या पायी वाहणाऱ्यांसाठी तो एक मानसिक खेळ असतो. प्रत्यक्षात तसं कुणीच नसतं आणि खूप सगळेच असतातही. एकदा का फेसबुकवर तुम्ही काही लिहिलं, की ते आवडलंच नाही, असं क्वचित होतं. कुणालातरी ते आवडतं. आवडत नसल्याचं मात्र कळतच नाही (हे एक बरंय..) फेसबुकवर असतो, तेव्हा एका काल्पनिक समूहात राहतो आपण. श्याम मनोहरांच्या ‘खूप लोक आहेत’ या कादंबरीची आठवण व्हावी अशा वातावरणात.
फेसबुकवर जायचा अवकाश. लगेचच कुणीतरी चिकटतं. गप्पा मारण्यासाठी. गप्पा कसल्या. कसायस, कुठेयस, काय करतोयस असल्या चांभार चौकशा करणारे प्रश्न आणि तशीच काही उत्तरं. वेळ बरा जातो म्हणतात. ही उत्तरं देता देता सगळी ‘पोस्ट’ही वाचायची. लक्ष दोन्हीतही नाही. एखाद्याला खरंच दम लागत असेल हे करताना. काय वाट्टेल ते असतं. कुणी कालच लंडनहून आला, तर त्याचा किंवा आजच जन्मलेल्या छोटय़ा बाळाचा फोटो. मग आपण त्याला ‘लाईक’ करायचं. खूप जणांनी असं लाईक केलं की मग आनंदून जायचं. लोकप्रिय असल्याचं समाधान मानायचं.
अनोळख्याला लग्नाचे अल्बम दाखवल्यावर त्याची जी अवस्था होते, तसंच काहीसं इथंही फेसबुकवर. कुणीतरी पोटतिडकीनं देशाच्या सद्य:स्थितीवर चिडचिडून लिहितो, तेही लाईकच करायचं. म्हणायचं. ‘हो, हे अगदी बरोब्बर आहे. काहीतरी केलं पाहिजे नक्की.’ असं लिहिता लिहिता, ‘चॅट’ करणाऱ्या मित्राला ‘संध्याकाळी काय करणारेस?’ असा प्रश्नही विचारायचा. आपल्याला काय करायचंय, तो काय करणारेय याच्याशी. पण असंच. चाळा. लहान लहान मुलंसुद्धा असं दिवसदिवस चॅटिंग करतात किंवा लाईक करत बसतात. अशा मुलांना त्यांचं हे काल्पनिक विश्व किती निरुपद्रवी वाटत असेल नाही. घरात बसायचं. कुणा अज्ञाताशी अजाण विषयांवर गप्पा मारायच्या. हाती काय लागलं, याचा जराही विचार करायचा नाही आणि तरीही खट्टू व्हायचं किंवा अतिआनंदी.
अशा जगात कुणी एकमेकांना हिणवणं, शिव्या घालणं, वाईटसाईट बोलणं, चारित्र्यहनन करणं हे गैरच. पण ५ ते १० या वयोगटांतल्या जगातल्या ५४ टक्के मुलांना अशी हीन वागणूक मिळाल्याचं मायक्रोसॉफ्टच्या एका पाहणीत आढळून आलंय. भयंकरच. अज्ञात व्यक्तीकडून मिळणाऱ्या या वागणुकीनं अशा मुलांच्या भावविश्वाचं काय होत असेल कोण जाणे. अशा छळवणुकीत भारत तर जगात तिसऱ्या क्रमांकावर. ५४ टक्के मुलं अशा छळाला सामोरी जातात असं या पाहणीत सापडलेलं. एकच बरंय. चीन याही क्षेत्रात आपल्या पुढं आहे. तिथं ८० टक्के मुलं असा छळ सहन करतात. कल्पनेतल्या व्यक्तीकडून अशा शिव्या खाण्यात कुणाला काय रस असणार. घरात, शाळेत, क्लासमध्ये होणाऱ्या छळात ही आणखी भर. कल्पनेतली. कदाचित आणखी त्रासदायक. एवढय़ाशा मुलांना असं छळण्याची ही विकृती समाजात का निर्माण होते? आपल्याला मिळालं नाही, म्हणून की दुसऱ्यालाही मिळतंय म्हणून? आपण एकमेकांच्या दु:खाचे वाटेकरी का होत नाही. दुसऱ्याचा आनंद आपण तेवढय़ाच आत्मीयतेनं का भोगू शकत नाही? असूया, द्वेष, मत्सर, इतक्या लोकांमध्ये का शिरत असेल?
फेसबुकचं हे जग जेवढं खोटं, तेवढंच मोठंही. सगळंच उघडंवाघडं. खऱ्या जगात जगण्याची हिंमत नसणाऱ्यांसाठी फारच छान आणि कल्पनेत रममाण होणाऱ्यांसाठी कल्पनेतल्याच दु:खात आणि क्लेशात पीडित होण्याचा आनंद देणारं. हे सारं खरं वाटून जगतो आपण. सगळं खरं जगणं या कल्पनेशी जुळवून घेतोय आपण. आपला वास्तवातला संवाद तुटलाय म्हणून किंवा त्याकडे पाठ फिरवायची म्हणून. घरातले सगळे आपापल्या व्यापात एकमेकांशी बोलायला तयार नाहीत आणि इथं, फेसबुकवर एकाच वेळी हजारोंना बोलण्याची हौस. हे बोलणं घरातल्यापेक्षा वेगळं आणि बेगडीही. जरासं अंतर राखून. खोटं खोटं बोलत राहण्यानं आपण आपल्यालाच तर फसवत नाही? असं करत राहण्यानं, कुणाशी हृदयातलं संगीत ‘शेअर’ करायलाही घाबरू आपण. जगण्यातला खरेपणा, त्यातला रसरशीत अनुभव, त्याच ताकदीनं व्यक्त करण्याची ओढ, या फेसबुकमुळे नाहीशीच व्हायची. बापरे, काय व्हायचं या साहित्यविश्वाचं.. फेसबुकवरचा हा बेगडीपणाआपलं जगणंही तसंच करत नाहीये ना? तपासायला हवं एकदा. दुसऱ्याच्या कवितांची उसनवारी करून आपल्या भावना शोधण्याच्या या प्रवृत्तीनं भारतीय मुलांचं जगणं बदलतंय, याची काळजी आहे का कुणाला! शाळेत जे शिकवतात, त्याचं पुढं आयुष्यात काय करायचं असा प्रश्न पडतो आणि हे फेसबुकवर जे वाचायचं, तेच खरं मानून चालायचं, तर क्षणोक्षणी हिरमोडीची शक्यता. बहुतेकजण आपण किती आनंदात आहोत, असं सांगणार आणि त्यामुळे आपल्या नैराश्यात भरच पडणार (एका पाहणीत असं आढळलंय, की असं सारखं चांगलं चांगलं वाचून मनाला फार त्रास होतो. त्यामुळे फेसबुकवर तीनशेपेक्षा जास्त मित्र असूच नयेत म्हणे..)
फेसबुक नव्हतं, तेव्हा काय करत होतो आपण? तेव्हाचे आपले मित्र खरेखुरे, प्रत्यक्षातले होते. ते भेटायचे, तेव्हा त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचो आपण. त्यांचं ऐकायचो, त्यात सहभागी व्हायचो. टिंगलटवाळी करायचो किंवा गुद्दागुद्दी. काही व्यक्त करण्यासाठी मित्राला भेटायची अधीरता असायची. आपल्या आयुष्यात दुसऱ्याला अशी खुशाल लुडबुड करू देण्यास आपली हरकत नसायची तेव्हा. सगळा मामला दोघांमधला किंवा मित्रांच्या टोळक्यातला. तेवढंच त्याचं अवकाश. पत्रबित्रं लिहायचो नाही आपण. खरंतर कागदाला पेन लावायलाच विसरलो होतो. अर्थात परीक्षेपुरता हा संबंध टिकवून ठेवला होता. फेसबुक आल्यानं आपण लिहायला लागलो. स्वत:ला व्यक्त करायला लागलो. एकाच वेळी किमान पाच हजारांना एखादा निरोप देणं शक्य व्हायला लागलं. (आपल्या देशातली भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि आखाती देशातील हुकूमशाहीविरुद्धच्या आंदोलनाचं श्रेय फेसबुकला जातं म्हणे! भारतातली चळवळ पुन्हा लॅपटॉपवर येऊन थांबली आहे, एवढं नक्की!) कसं सांगायचं, काय सांगायचं, किती सांगायचं आणि केव्हा सांगायचं, याचे आडाखे बांधायला लागलो आपण. उगाच वाहवत जाऊन काही बरळण्यापेक्षा जेवढय़ास तेवढं लिहिणं बरं, असं कळायला लागलं आपोआप. अनोळखी इसमाबरोबर एसटीतून किंवा रेल्वेतून प्रवास करताना जेवढं बोलतो, तेवढंच आणि तसंच. पण तरीही लिहायला शिकलो हे खरं. दुसऱ्याची खरीखोटी दु:खं समजून घ्यायची, ती आपलीच मानायची आणि त्याबद्दल क्लेश करून घ्यायचे असं जगणं आता नव्यानं कळायला लागलं फेसबुकमुळे. कल्पनेतल्या ‘कम्युनिटी’त राहायचं आणि त्यात हरवून जायचं शिकवलं त्यानं.
काय करतो, काय करायचंय, हे तपासायलाच विसरतो आपण. सततच्या अशा संपर्कामुळे एका मोठय़ा जगात राहात असल्याचा भास होतो. हा आभास आपल्याला जगण्याची ताकद देतोय असं वाटतं. प्रत्यक्षातल्या जगण्यात हाच भास आपल्याला कोंडून टाकतो. त्यातला फोलपणा उघडून दाखवतो. कल्पनेतल्या या जगण्यातला आनंद किती क्षणिक असतो, हे कळतं तेव्हा. फेसबुकवर नसणं म्हणजे सामाजिक पाप मानणारं हे जगही काल्पनिक! दोनवेळ जेवण मिळण्याची मारामार होते, अचानक नोकरी जाते, घरातला कुणी मरतो, तेव्हा बसणारे धक्के या कल्पनेत कसे विरणार?
लहानपणी कुणी जरासं ओरडलं की भोकाड पसरायची सोय मात्र फेसबुकनं काढून घेतली. हे प्रगल्भ झाल्याचं लक्षण की काही गडबड? जगातल्या अशा लहान मुलांमध्ये फेसबुकवरून होणारा छळ सहन करण्याची क्षमता कशी येणार आणि त्यांच्या जगण्यात अस्सल रस कधी मिसळणार?

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive