Thursday, August 23, 2012

गालातल्या गालात Goshta

गालातल्या गालात
इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजूला उठवून विचारलं, "काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले?''
राजू खडबडून जागा होत, "देवाशप्पथ सांगतो सर! मी नाही फोडले.''
पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला तेव्हा जोशी बाई सोडून सगळे हसले. जोशी बाई मात्र गंभीरपणे बोलल्या, "कोण राजू ना? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच फोडले असेल.''
-----------------
झाडांचा सर्व्हे
तुम्ही जिथे राहता तिथे आसपास झाडे आहेत का? किंवा तुमच्या घराजवळ बाग आहे का? तिथे नक्की झाडे असतील. आपण त्या झाडांचा सर्व्हे करू या. परिसरात फिरायचे आणि कोणकोणती झाडे आहेत त्यांची नावे एका कागदावर लिहायची. मग त्याच प्रकारची किती झाडे आहेत, त्याची संख्या पुढे लिहायची. आता जमा झालेल्या माहितीच्या आधारे आलेख काढायचा. त्या आलेखावर प्रश्‍न तयार करायचे. जमेल ना? मी तयार केलेला एक आलेख तुम्हाला दाखवते. तसा तुम्ही तुमचा वेगळा तयार करा. जेवढी झाडे तेवढे चौकोन रंगवायचे. या आलेखावर तुम्ही प्रश्‍न तयार करा. त्याची उत्तरे शोधा, म्हणजे तुम्हाला माहितीचे संकलन करता आले, ती मांडता आली आणि तिचे विश्‍लेषणही करता आले.

---------------
समुद्रातला चाबूक आणि स्पगेती
दोस्तांनो,
तुम्ही सर्कशीतल्या रिंगमास्टरकडे "चाबूक' बघितला असेल ना? अगदी तंतोतंत तसेच "समुद्र चाबूक' पॅसिफिक महासागराच्या नैऋत्येला कोरल्सच्या जवळ समुद्रतळाशी अखंड हलत असतात. पण ते तुटत मात्र नाहीत. कारण या काठीसारख्या चाबकामध्ये चुन्यासारख्या पदार्थाचा लवचिक, पण शिंगासारखा कडक गज (सळई) असतो. त्याला "गॉरगोनीन' म्हणतात.
हा चाबूक मोठा झाला की त्याचं वरचं नाजूक टोक तुटतं आणि खाली पडतं. तिथेच ते चिकटतं व पुन्हा वाढतं. त्यामुळे त्यांची तिथे वसाहत तयार होते.
तुम्ही नुडल्स आणि स्पगेती नेहमीच आवडीनं खात असाल ना? पण समुद्रातले "स्पगेती किडे' दुसऱ्यांना खातात. अर्थात त्यांनाही खाणारे समुद्रात इतर प्राणी असतातच. गाळात, दगडाच्या सापटीत ते लपून बसतात. पण त्यांच्या तोंडाजवळच्या लांब दोऱ्यासारख्या "टेन्टॅकल्स'मध्ये एक फट असते. त्यातून अन्न शरीरात जातं. एक "टेन्टॅकल' जरी तुटलं तरी पुन्हा दुसरं वाढतं.

-------------------
कशी ओळखाल दिशा?
नकाशाचे प्रमाण म्हणजे नक्की काय, हे आपण याआधी बघितले. पण प्रमाणाबरोबरच नकाशामध्ये दिशाही तितकीच महत्त्वाची असते. आता बघा ना, कधी कधी पत्ता सांगताना आपण "इकडे' असं म्हणून चुकीची दिशा सांगतो. काही जण तर कुठलीही दिशा सांगायची असो, हात समोर किंवा बाजूला करतात. डोंगरदऱ्यांमध्ये ट्रेक करायचा असेल तर मात्र दिशेचं आपल्याला चांगलं भान असावं लागतं.

आपण एखादा नकाशा वाचतो, तेव्हा त्यात दिशा समजून घ्यावी लागते. नकाशामध्ये आठ दिशा मानल्या जातात. उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्‍चिम या चार मुख्य व त्यांच्यामध्ये असलेल्या ईशान्य, नैर्ऋत्य, आग्नेय व वायव्य अशा खालील आकृतींत दाखवल्याप्रमाणे आठ दिशा आहेत. नकाशा काढताना उत्तर दिशा वरच्या बाजूला लिहिलेली असते. त्यावरून इतर दिशा ठरवायच्या असतात. अर्थात दिशा जागेनुसार ठरते. त्यामुळे दिशा कायम सापेक्ष असते. पुण्याच्या दक्षिणेला असलेलं सातारा शहर कोल्हापूरच्या मात्र उत्तरेला आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive