Sunday, August 26, 2012

ज्याच्या हाती रिमोट, तो..

घरातल्या टीव्हीसमोर बसून दर अर्ध्या मिनिटाला रिमोटचं बटण दाबत चॅनेल पाहणं हा आता भारतातल्या अनेकांचा छंद झाला आहे. कोणताच कार्यक्रम पूर्ण पाहायची गरज बहुधा कुणाला वाटत नसावी. ज्या क्षणी समोरच्या पडद्यावर डोळे फाडून बघण्यासारखं काही असेल, तिथं काही वेळ रेंगाळायचं आणि नंतर पुन्हा आपलं बटण दाबणं सुरू ठेवायचं. दोन महिन्यांपूर्वी वयाच्या ९६ व्या वर्षी युजेन पॉली या रिमोट कंट्रोलचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाचं निधन झालं. आपण तयार केलेल्या या छोटेखानी वस्तूचा वापर कसा आणि कशासाठी केला जातो, हे त्याला मृत्यूपूर्वीच कळलं, हे बरं झालं.
टीव्हीच्या पडद्यावर जे काही सुरू आहे, ते निरिच्छपणे पाहात राहणाऱ्यांना त्या संकटातून वाचवल्याबद्दल त्याचे सर्वानी आभारच मानले पाहिजेत. ऐंशीच्या दशकात भारतात जेव्हा टीव्ही घरोघर पोहोचला, तेव्हा एकच वाहिनी होती. त्यावर जे जे म्हणून दिसेल, ते पापण्याही न मिटता पाहण्याची सवय सगळ्यांनाच लागली होती. महाराष्ट्रात दिसणाऱ्या मराठी वाहिनीवर शेतकऱ्यांना द्यायच्या सल्ल्यापासून ते गुजराथी भाषेतला कार्यक्रम आणि चित्रपटातील गाण्यांपासून विश्वातील अनोख्या घटनांच्या सफरीपर्यंत सगळं काही एकाच वाहिनीवर पाहायला मिळायचं. तसं एकत्रित पॅकेजच होतं ते. तोपर्यंत भारतीय चित्रपटांनी ऑरो कलरमधून ईस्टमन कलरमध्ये प्रवेश केला होता आणि ३५ मिलीमीटरमधून तो ७० मिलीमीटपर्यंत विस्फारला होता. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याने प्रेक्षक कित्येक आठवडे चित्रपटगृहाकडे जात राहायचे. ‘आराधना’सारख्या चित्रपटानं तेव्हा वर्षभर एकाच चित्रगृहात टिकून राहण्याचं भाग्य संपादन केलं होतं. असं असलं तरी टीव्ही मात्र रंगीत झाला नव्हता. कृष्णधवल रंगामध्ये रंगीत चित्रपटातली गाणी पाहण्यासाठी लोक घराघरात गर्दी करून असायचे. आठवडय़ातून एकदाच रात्री ९ वाजता लागणारा हा ‘छायागीत’ नावाचा कार्यक्रम म्हणजे त्या काळातल्या रसिकांसाठी पर्वणी असे. रंगीत चित्रपट पाहून आल्यानंतर त्यातली गाणी काळ्या पांढऱ्या टीव्हीवर का पाहायची, असा प्रश्न तेव्हा कुणाला का पडत नव्हता?
अगदी नव्वदच्या दशकापर्यंत भारतातल्या टीव्ही उत्पादकांना ही बाजारपेठ केवढी प्रचंड असेल, याचा अंदाज आलेला नव्हता. म्हणजे जास्तीतजास्त आठ वाहिन्या दिसू शकतील, असाच टीव्ही तोपर्यंत तयार व्हायचा. प्रत्येक वेळी उठून त्याच्यापर्यंत जायचं आणि बटन दाबून पुढच्या वाहिनीकडे जायचं, असा उद्योग आळसामुळे फार वेळा घडत नसे. लांब बसून सतत वाहिन्या बदलण्याची रिमोट कंट्रोलची सोय हे त्या काळातलं स्वप्न होतं.
युजेन पॉलीला माणसाच्या शरीरात दडलेल्या या आळसाचा बरोब्बर अंदाज असला पाहिजे. त्यानं वयाच्या चाळिशीत म्हणजे १९५५ मध्ये पहिल्यांदा असा रिमोट कंट्रोल तयार केला. टीव्हीसमोर काही अंतरावर बसून वाहिनी बदलणं किंवा आवाज कमी-जास्त करणं त्याच्या मदतीने शक्य होत असे. त्यासाठीच्या तंत्रज्ञानात तो रिमोट वापरणाऱ्याला रस असण्याची गरज नव्हती. त्याला त्याचा उपयोग महत्त्वाचा होता. अमेरिका आणि भारत यांच्यामधील तंत्रज्ञानाची दरी ही अशी तीस-पस्तीस वर्षांची होती. शोध लागले, त्यांचं उपयुक्ततेत रूपांतर झालं, त्यातून नवं उत्पादनच निर्माण झालं आणि शेवटी त्या तंत्रज्ञानाची म्हणून एक प्रचंड बाजारपेठ तयार झाली. ही साखळी ज्या प्रचंड वेगानं निर्माण होत होती, तो वेग भारताला तेव्हा झेपणारा नव्हता. तेव्हा भारतात घरोघरी दूरध्वनीही पोचला नव्हता.  लोक पोस्ट आणि तार खात्यावर विश्वास ठेवत होते. त्याचं खरं कारण भारत हा तेव्हा जगाच्या दृष्टीनं प्रचंड लोकसंख्या असणारा असा भिकारी देश होता. याच प्रचंड लोकसंख्येकडं जेव्हा बाजारपेठ म्हणून पाहायला सुरुवात झाली, तेव्हा इथलं चित्रही झपाटय़ानं बदलायला लागलं. ‘आठ चॅनेलवाला’ टीव्ही जाऊन तिथं बत्तीस चॅनेलवाला टीव्ही खपायला लागला. ‘जुनं द्या आणि सवलतीत नवं घ्या’ या टिपिकल भारतीय बाजारपेठीय शैलीत हा जुना आठ चॅनलवाला टीव्हीपण घ्यायला कुणी तयार होईना. कोणतीही वस्तू पूर्ण मोडेपर्यंत वापरण्याच्या भारतीय जीवनशैलीमध्ये असे जुन्या तंत्रज्ञानाचे टीव्ही कुणी घेईनासं झाल्यामुळे फेकून देण्याची वेळ आली. एकाच वेळी किमान दोनशे वाहिन्या आपल्या दोनच डोळ्यांमध्ये घुसू शकतील, हे लक्षात यायच्या आतच त्याहून जास्त चॅनलवाला टीव्ही बाजारात उपलब्ध व्हायला लागला. हा बदल अगदी गेल्या दोन दशकांमधला, म्हणजे जागतिकीकरणानंतरचा.
रिमोट कंट्रोल हातात असणं ही एक जादुई गोष्ट आहे, हे लक्षात आल्यावर बसल्या जागेवरून कुणीच उठेनासं झालं. ज्याच्या हाती रिमोट त्याच्याच आवडीचे कार्यक्रम पाहावे लागण्यानं घरात भांडणंही व्हायला लागली. कुणाला बातम्या पाहायच्या असायच्या, तर कुणाला चित्रपट. क्रिकेटच्या हंगामात तर एकच एक वाहिनी पाहण्याची सक्ती. टीव्ही असणाऱ्या प्रत्येक घरात हीच भांडणं रोजच्या रोज. रिमोटमुळे जगणं किती सुकर झालं याची जाणीव नसलेल्यांना आळस म्हणजे काय असतं, हेही माहीत असण्याचं कारण नाही. रिमोट हे भारतीय घरांमधलं वर्चस्व सिद्ध करण्याचं नवं खेळणं झालं आहे, हेही बऱ्याच जणांच्या लक्षात आलं नाही. रेडिओच्या काळात घरातल्या कर्त्यां माणसाची आवड कुटुंबात महत्त्वाची मानली जायची. सगळं घर त्याच्या मर्जीनुसार चालायचं. त्याच्या आवडीनिवडी अगदी स्वयंपाकापासून ते पडद्यांच्या रंगांपर्यंत सारं काही हा पैसे आणणारा पुरुष ठरवायचा. रिमोट हे एका अर्थानं त्याचंच प्रतीक. वर्तनशैलीच्या अभ्यासकांना आव्हान देणारं. (महाराष्ट्रात युतीचं सरकार आल्यावर शिवसेनाप्रमुखांनीही आपण रिमोट कंट्रोल असल्याचं सांगताना आपलं अधिकारपदच अधोरेखित केलं होतं!)
‘बिहेव्हिअरल इकॉनॉमिक्स’च्या अभ्यासकांनीही रिमोट वापरणाऱ्यांच्या शैलीचं विश्लेषण केलंय. त्यांच्या मते बहुतेक वेळा रिमोटवर सतत वाहिन्या बदलत राहणं ही एक निर्थक कृती असते. प्रत्येकाला आपल्या नजरेतून काही सुटू नये, असं वाटत असतं. त्यासाठी तो सतत रिमोटचा वापर करत राहतो. दर काही सेकंदांनी तो दुसऱ्या वाहिनीवर जातो आणि असं सतत सुरू ठेवतो, कारण त्याला आवडणारी कोणतीच गोष्ट सोडायची इच्छा नसते. आपण सारे आपल्या मनातल्या अशा प्राधान्यक्रमाला फार महत्त्व देत असतो, असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे, हे नक्की माहीत नसतं. एवढय़ा प्रचंड संख्येनं असलेल्या वाहिन्यांमध्ये कुठे ना कुठे त्या क्षणी आपल्याला हवं असणारं काहीतरी दिसेल, अशा आशेनं आपण एक ते दोनशे असं परत परत करत राहतो. शेवटी असंही लक्षात येतं, की पाहण्यासारखं काहीच नाहीये किंवा जे पाहायला हवं होतं, ते या रिमोटच्या वापरानं डोळ्यातून सुटून गेलंय. युजेन पॉलीला आपल्या या संशोधनानं मानसिक आरोग्याचेही प्रश्न निर्माण होऊ शकतील, असं वाटलं असण्याची शक्यता नाही. त्यानं केवळ सोय पाहिली. आजारी माणसाला, वृद्धांना, अपघातग्रस्तांना आणि घरात एकाकी असलेल्या लहान मुलांना या रिमोटचा उपयोग होईल, असं त्याला वाटलं असावं. ज्या शोधांचा सामान्यांच्या आयुष्यात काही विधायक बदल घडण्यास उपयोग होईल, असे अनेक शोध गेल्या शतकभरात लागले. त्यांची उत्पादने झाली आणि त्यांच्या विक्रीतून अर्थव्यवस्थाही बळकट झाली. औद्योगिकीकरणाच्या प्रारंभानंतरचं चित्र हे असं होतं. पण रिमोट हे काही औद्योगिकीकरणाला चालना देणारं यंत्र नव्हे. त्यानं सगळ्यांचं जगणं बदलवलं. आणखी दहावीस वर्षांनी तर जगण्याची प्रत्येक कृती रिमोटशी जोडलेली असेल. आताही ऑफिसमध्ये बसून घराच्या दरवाजाला कुलूप घालण्याचं किंवा मोटारीतून बाहेर आल्यावर केवळ रिमोटनं सगळे दरवाजे लावण्याचं तंत्रज्ञान आपण सहजपणे स्वीकारलं आहे.
चोवीस तास अनाकलनीय आणि अनपेक्षित गोष्टी दाखवणाऱ्या टीव्हीला जाहिरातीचं सर्वात महत्त्वाचं साधन मानलं जातं. इच्छा असो वा नसो, जाहिरात डोळ्यासमोरून सेकंदभर तरी तरळून जातेच. एकच जाहिरात दिवसातून शेकडो वेळा दाखवण्याची गरज या रिमोटमुळे निर्माण झाली आहे. एकतर फक्त भारतातल्याच वाहिन्यांवर जाहिराती दाखवताना त्यांचा आवाज कमालीचा वाढवला जातो. एखादी मालिका पाहात असताना, क्षणभराच्या विश्रांतीची सूचना मिळताच भोंगा वाजल्याप्रमाणे टीव्हीचा आवाज मोठा होतो. डोकं दुखावं अशी स्थिती होते आणि अशा वेळी रिमोट हातापाशी नसेल, तर मग तो आवाज अख्खं घर डोक्यावर घेतो. रिमोट हाताशी असला की लगेच टीव्हीचा गळा दाबता येतो आणि त्या जाहिराती चालू असेपर्यंत इतर वाहिन्यांकडे वळता येतं. (आता वाहिन्यांनीही एकाच वेळी सगळीकडे जाहिराती दाखवण्याचं तंत्र अवलंबल्यानं अनेक प्रेक्षकांची पंचाईत होते. पण त्याकडे कुणीच या भोंग्याच्या आवाजातल्या जाहिराती निदान ऐकत तरी नाहीत.) उत्पादक कंपन्या आणि जाहिराती तयार करणाऱ्या संस्था यांच्या हे कसं लक्षात येत नाही? लाखो, करोडो रुपये खर्च करून केलेली जाहिरात केवळ भल्या मोठय़ा आवाजानं कुणी ऐकत वा पाहात नसेल, तर मग त्या पैशांचा काय उपयोग? युजेन पॉलीनं रीमोट कंट्रोलचा शोध लावल्यानं भारतातल्या टीव्ही प्रेक्षकांना हवा तेव्हा त्याचा गळा तरी घोटता येतो.. थँक्स युजेन!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive