Saturday, September 24, 2011

Fwd: अण्णा आणि असांज



पराग पाटील
ज्युलियन असांज यांच्या विकिलीक्सच्या माहिती गळतीविषयी साऱ्यांनाच ठाऊक आहे. अमेरिकन वकिलातींच्या त्यांनी जाहीर केलेल्या गोपनीय केबल्समुळे आता भारतीय राजकीय परिक्षेत्रातही भूकंप होऊ लागले आहेत. मात्र ज्युलियन असांज आणि अण्णा हजारे यांच्या सरकारं हादरवण्याच्या कार्यपद्धतीत विलक्षण साम्य आहे. जागतिक पातळीवरील राजकीय आणि नैतिक भ्रष्टाचारातून निर्माण होणाऱ्या अन्यायासाठी दोघांनीही माहितीचं शस्त्र वापरायचा प्रयत्न चालवला आहे. दोघांच्याही मार्गाविषयी सत्तापरिघातील लोकांना शंका आणि तिरस्कार आहे. दोघेही जनमताच्या दबावावर विश्वास ठेवून आहेत. दोघांचेही त्यांच्या परीने सत्याचे प्रयोग सुरू आहेत.

विकिलीक्सकडून गोपनीय कागदपत्रांची पोलखोल होते तेव्हा बदललेल्या काळाची गंमत वाटते. कोण कुठचा ज्युलियन असांज, पण अमेरिकेच्या बलशाली प्रशासनापासून ते भारतातल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यापर्यंत साऱ्यांना केवळ एका वेबसाइटच्या जीवावर गदागदा हलवतो. श्रीमंत भारतीयांच्या स्विस बँकेतल्या काळ्या पैशाचं विवरण सांगतो आणि त्याच्या या भांडाफोड कागदपत्रांमुळे तो न्यूजमेकर ठरतो.
'एक सॅण्डल के लिए मायावती लगाती है विमान का चक्कर' ही बातमी चॅनेल्सवरून झळकू लागते आणि निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अचानक पक्षांच्या स्ट्रॅटेज्या बदलू लागतात. पायाखालची वाळू सरकली म्हणून मायावती ''असांजचं डोकं फिरलंय,'' असं जाहीरपणे सांगतात. त्याने इथे भारतात येऊन बोलावं, असं सुनावतात. मायावतींना वाटतं की, त्यावर युरोपात बसून असांज काहीच बोलणार नाही, तर पठ्ठय़ा लगेच खुसखुशीत पलटवारही करतो.. ''मायावतींनी मला भारतात घेऊन जायला पेशल विमान पाठवावे, मी त्यांच्यासाठी उत्तम विलायती जोडे घेऊन येईन.''
त्यावर मात्र मायावतींची बोलती बंद. हा विलायती अहेर महागात पडणार याची त्यांना चांगलीच कल्पना असावी. आधीच त्यांना निकटवर्तीयांकडूनच 'भ्रष्टाचारी' आणि 'तानाशाह' असे शालजोडीतले मिळाले आहेत. कुठे चुप्पी साधावी हे भारतातल्या राजकारण्यांना फार चांगलं कळतं आणि गुमान बसून राहिलं की पब्लिकच्या मेमरीतून गोष्टी निघून जातात, असा त्यांना रास्त अनुभव आहे.
विकिलीक्सने कागदपत्रांच्या सुरू केलेल्या गळतीची बातमी आली की, गो. रा. खैरनार आठवतात. ते ट्रक भरून कागदपत्रांचे पुरावे आणणार होते. तेव्हाचे आम्ही होतकरू पत्रकार भारावलेले असायचो. ते ट्रकभर पुरावे डोळ्यांसमोर असायचे. ट्रक भरून असलेले कागद वाचायला किती वेळ लागेल, त्याचं विश्लेषण करणार कोण, अशा गोष्टी डोक्यात नव्हत्या. ट्रक भरून आलेल्या प्रत्येक कागदाचा बाण त्या त्या राजकीय नेत्याला घायाळ करतोय असं व्हिज्युअलायझेशन करायला आवडायचं. हिंदी सिनेमातल्या क्लायमॅक्सप्रमाणे भ्रष्ट राजकीय नेता बेडय़ा ठोकून गजाआड जातोय अशी दिवास्वप्नं पडायची. (आता तिहार तुरुंग म्हणजे राजकीय नेत्यांचं प्रतीक्षा नगर झालंय.)

विकिलीक्स हे अमेरिकन सरकारला गोत्यात आणत होतं, तोपर्यंत आपल्याकडे या वेबसाइटचं कौतुक करण्याकडे लोकांचा कल होता. मात्र आता विकिलीक्सच्या माहिती गळतीचा रोख भारतीय परिक्षेत्रात आल्यावर मात्र साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे.

अशी गोपनीय कागदपत्रे हाती लागणे याला पत्रकार स्कूप मिळणं असं म्हणतात. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची अशी कागदपत्रे हाती लागून एखाद्या मुख्यमंत्र्याला, मंत्र्याला पायउतार व्हावं लागलं की, ती करिअरची इतिकर्तव्यता झाली असं मानणारे पत्रकार होते.. आहेत.
थोरा-मोठय़ांच्या भ्रष्टाचाराची अत्यंत गोपनीय कागदपत्रे पत्रकार कसे शोधून काढतात याविषयी सर्वसामान्यांना अप्रूप असतं. काही मराठी पत्रकार त्या काळात गाजलेली बरीचशी प्रकरणं आपणच कशी काढली होती आणि त्या इंग्रजी पत्रकाराकडे क्रॉसचेक करायला दिली आणि मग त्याने स्वत:च्याच बाय-लाइनने ती बातमी कशी छापली याचे रसभरीत किस्से जड जिभेने सांगायचे. खरं तर पत्रकार स्वत: असं काही शोधून वगैरे काढत नसतात. पत्रकारांकडे त्या कागदपत्रांच्या पताका फडकावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध असतं. सरकारी आस्थापनांमधलाच कुणी तरी सदसद्विवेकबुद्धी जागृत असलेला किंवा भ्रष्टाचाराच्या मलिद्यात योग्य वाटा न मिळाल्याने दुखावलेला एखादा क्लार्क किंवा पी.ए. किंवा तत्सम अधिकारी टेबलावरून पेपर जाताना मोठीच रिस्क घेऊन त्याच्या फोटोकॉपी (झेरॉक्स) घेऊन ठेवतो आणि योग्य वेळी एखाद्या विश्वासू पत्रकाराच्या हाती जाईल याची व्यवस्था करतो. त्या पत्रकाराने फक्त आपली विश्वसनीयता टिकवून ठेवायची असते. ऋषीच्या कुळाप्रमाणे या कागदपत्रांचं मूळ न शोधता त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन बातमी गाजवावी आणि भ्रष्ट यंत्रणेला छेद द्यावा, ही अपेक्षा असते. या सगळ्या प्रकरणात खूप आदर्शवाद असतो अशातला भाग नाही. कुठे तरी कुणी तरी आपला स्कोअर सेटल करत असतो. बऱ्याचदा ही कागदपत्रं प्रकाशित होतही नाही. केवळ आस्थापनातील उच्चपदस्थांना धमकावण्यासाठी मर्यादित स्वरूपात ती लीक केली जातात. शेअर वाढवून मिळाला, की मग ती कागदपत्रं दडपलीही जातात.
पण विकिलीक्सचं तसं नाही. विकिलीक्सवर कागदपत्रं आहे त्या विशाल स्वरूपात जशीच्या तशी उपलब्ध आहेत. या सगळ्या कागदपत्रांचं विश्लेषण कुणी करो वा न करो, सर्वसामान्य माणूस ती बघून स्वत:च विश्लेषण मात्र करू शकतो. बरं विकिलीक्सचे संपादक ज्युलियन असांज या कागदपत्रांमधून निर्माण होणाऱ्या विश्लेषणाची जबाबदारी घेत नाही. ती ज्याने त्याने करावी. मात्र कागदपत्रांच्या ट्रान्स्परन्सीसाठी मात्र त्यांनी शेकडो मिरर साइटही विकसित केलेल्या आहेत. एकदा प्रकाशित झाली, की ती कुणीही दडपू शकणार नाहीत.
विकिलीक्सचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याकडे कागदपत्रं लीक करणारे हजारेक पत्रकार मोबदला न घेता त्यांच्यासाठी काम करतात. त्यांनी अ‍ॅनानिमस इलेक्ट्रॉनिक ड्रॉप बॉक्स तयार केलाय. अनेक सरकारी आस्थापनांमधले विवेकबुद्धी शाबूत असलेले लोक आता त्यांच्या हाती असलेले कागद विकिलिक्सवर अपलोड करू शकतात.
विकिलीक्स हे अमेरिकन सरकारला गोत्यात आणत होतं, तोपर्यंत आपल्याकडे या वेबसाइटचं कौतुक करण्याकडे लोकांचा कल होता. मात्र आता विकिलीक्सच्या माहिती गळतीचा रोख भारतीय परिक्षेत्रात आल्यावर मात्र साऱ्यांचेच धाबे दणाणले आहे. विकिलीक्समुळे वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत, असा विश्लेषणांचा रोख निर्माण होऊ लागला आहे.
सरकारी कारभारातली पारदर्शकता जरी आवश्यक असली तरी प्रत्येक कागद लोकांसमोर यायलाच हवा असं नाही, असं बुद्धिवादीही म्हणू लागले आहेत. लोकांची मानसिकता अजून विकसित व्हायची आहे.

विकिलीक्सचा देशी अवतार
विकिलीक्सचा तडाखा काय आहे हे भारताच्या आणि भ्रष्ट भारताला सुधारण्याची इच्छा असलेल्या लोकांच्या ध्यानी यायला वेळ लागला नाही. त्यामुळे विकिलीक्सच्या पावलावर पाऊल टाकण्याची इच्छा झाली नसती तर नवलच होतं. त्यानुसार इंडियन लिक्स नावाची साइट लाँच झाली. ही साइट लाँच करताना ज्युलियन असांजला झालेल्या अटकेच्या निषेधार्थ ही साइट लाँच झाल्याचं सांगण्यात आलं. या साइटच्या माध्यमातून भारतीयांनी पुढे येऊन अशी भ्रष्टाचारसंबंधी कागदपत्रं जगासमोर आणण्याचं आवाहन करण्यात आलं. पण या साइटवर १२ एप्रिल रोजी अपलोड केलेली फाइल शेवटची असल्याचं निदर्शनास येतं. या माध्यमातून अलिबागपासून अहमदाबादपर्यंत अनेक घटनांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र यामध्ये खंड पडल्याने त्याच्या उपयुक्ततेविषयी शंका घेण्यासही सहज वाव आहे. मात्र विकिलीक्सपासून प्रेरणा घेऊन भारतामध्येही अशी क्रांती घडवण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत याचं कौतुकही नक्कीच वाटावं.

याचं समर्थन करताना विकिलीक्स आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल यांच्यातल्या वादाचं उदाहरण पुढे केलं जातं. विकिलीक्सच्या केबलगळतीमधून मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांची नावं पुढे आल्याने काही नकारात्मक गोष्टी विकसित झाल्या असल्याचा दावा केला जात आहे. त्यांची नावं खोडून विकिलीक्सने या केबल्स जाहीर करायला हव्या होत्या, असं काही लोकांचं म्हणणं पडलं; पण विकिलीक्सचे पाठीराखे म्हणतात, इतक्या मोठय़ा संख्येने असलेल्या या पानांमधल्या प्रत्येक शब्दाचा नेमका काय परिणाम होईल हे जोखून त्याप्रमाणे काळजी घेणं सर्वस्वी अशक्य आहे.
म्हणजे विकिलीक्सच्या हाती जे काही येतंय ते चव्हाटय़ावर आणण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. मात्र त्यातून नेमकं काय साधलं जाईल याची जबाबदारी मात्र ज्युलियन असांज घ्यायला तयार नाहीत.
असांज यांचं म्हणणं आहे की, आम्ही व्हिसलब्लोअर आहोत- इशाऱ्याची शिट्टी फुंकणारे. माहितीच्या स्वातंत्र्याच्या मार्गातले आम्ही शिलेदार आहोत. आम्ही केवळ पत्रकारितेचं साधन आहोत. हे ना-नफा तत्त्वावर चालणारं माध्यमाचं संघटन आहे. जगभरातल्या स्वतंत्र स्रोतांना आपल्या हाती असलेली माहिती अनामिक राहून तरीही निर्भयपणे लीक करण्याचं सुरक्षित व्यासपीठ आम्ही इथे उपलब्ध करून दिलंय. नैतिक, राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांना जागा करून देतो. त्यामुळे दडपल्या गेलेल्या अन्यायाला वाट मोकळी करून मिळेल.
ज्युलियन असांज यांच्या या पवित्र्यामुळे विकिलीक्सवर अमेरिकेच्या वकिलातींनी पाठवलेल्या अडीच लाख केबल्स प्रकाशित झाल्या. त्याचे पडसाद जगभर वेगवेगळ्या स्वरूपांत उमटले. इराक आणि अफगाण युद्धातल्या लष्करी नोंदीही विकिलीक्सवर झळकल्या. बँक ऑफ अमेरिकाची कागदपत्रे, ग्वाण्टानामो तुरुंगातील ७७९ कैद्यांचे डोसियर्सही विकिलीक्सवर प्रकाशित झाले.
अमेरिकन सरकारसाठी हे सगळं नामुष्कीचं होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ज्युलियन असांज यांना चाप लावायचा प्रयत्न केला. त्यातून झालेली वादावादी आणि अमेरिकेचं तोंडघशी पडणं हे आपल्याला माहीत आहे.
मात्र हे सारं नंतर अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या वेळी काँग्रेस सरकारने केलेल्या वर्तणुकीशी खूप मिळतंजुळतं आहे, ही खरी गंमत आहे.
विकिलीक्सच्या पोलखोल घटनांच्या मागोमागच असांज यांच्यावरील बलात्काराचे आरोप निर्माण झाले. ही वेबसाइट बंद पाडण्याचे प्रयत्न झाले, पण मिरर साइटच्या रूपात ते शक्य झालं नाही. अनेक कंपन्यांना विकिलीक्सशी संबंध तोडायला सांगण्यात आलं, पण अनेक कंपन्यांनी ते मानलं नाही. अ‍ॅमेझॉनने विकिलीक्सला फ्री सव्‍‌र्हर दिला. पेपाल, व्हिसा, मास्टरकार्ड यांनी विकिलीक्सच्या डोनेशनसाठी व्यवस्था सुरू ठेवली.
अण्णांच्या उपोषणादरम्यान केंद्र सरकारने अशाच प्रकारे अण्णा आणि संबंधित लोकांना नामोहरम करण्याचा उद्योग आरंभला. त्यामुळे लोक सरकारविषयी अधिक नकारात्मक झाले. असांज यांना जागतिक लोकप्रियतेचा जसा फायदा मिळाला तसाच अण्णा टीमला मिळाला.

अण्णा आणि असांज यांची तुलना करण्याचं कारण एवढंच की, जागतिक पातळीवरील राजकीय आणि नैतिक भ्रष्टाचारातून निर्माण होणाऱ्या अन्यायासाठी दोघांनीही माहितीचं शस्त्र वापरायचा प्रयत्न चालवला आहे. दोघांच्याही मार्गाविषयी सत्तापरिघातील लोकांना शंका आणि तिरस्कार आहे.

अण्णा आणि असांज यांची तुलना करण्याचं कारण एवढंच की, जागतिक पातळीवरील राजकीय आणि नैतिक भ्रष्टाचारातून निर्माण होणाऱ्या अन्यायासाठी दोघांनीही माहितीचं शस्त्र वापरायचा प्रयत्न चालवला आहे. दोघांच्याही मार्गाविषयी सत्तापरिघातील लोकांना शंका आणि तिरस्कार आहे. दोघेही जनमताच्या दबावावर विश्वास ठेवून आहेत. दोघांचेही त्यांच्या परीने सत्याचे प्रयोग सुरू आहेत.
फक्त तुलनेत अण्णांचा मार्ग अधिक लोकाभिमुख आहे. ज्युलियन असांज कोरडेपणाने माहितीचा पडदा फाडून फेकून देतात.
अण्णांच्या आंदोलनातल्या फेसबुक आणि तत्सम सोशल नेटवर्किंगच्या सहभागाविषयी लोक आस्थेने बोलतात. इंटरनेटच्या माध्यमाचं लोकांच्या जाणिवा जागृत करण्याचं मोल मान्य करतात. मात्र विकिलीक्सने जो माहितीचा चव्हाटा तयार केलाय त्याचे काटे मात्र स्वीकारायची लोकांची तयारी नाही.
माहितीचं इतकं नागवेपण, सरसकट इतका पारदर्शी कारभार पचवण्याइतकी आपली सार्वजनिक मानसिकता परिपक्व झाली आहे का, हा खरा प्रश्न आहे.
आजही मीडियाला अनेक घडलेल्या बातम्यासुद्धा काळ-वेळ बघून स्वरूप बदलून छापाव्या लागतात. जातीय दंगलीत उद्ध्वस्त झालेली प्रार्थनास्थळं, बलात्कारितेची नावं, माहिती अधिकारातील कार्यकर्त्यांची ओळख या गोष्टींचं भान राखावं लागतं. स्रोत उघड होऊ न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. त्याच्या गोपनीयतेचे अधिकारही मिळतात.
दरम्यान सरकारी वा खासगी आस्थापनांतील प्रत्येक लिखित गोष्टी एखाद्या वेबसाइटच्या चव्हाटय़ावर झळकू लागल्या तर त्यातून निर्माण होणाऱ्या ब्रह्मराक्षसांची जबाबदारी कुणी घ्यायची?
parag.patil@expressindia.com



No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive