Friday, December 9, 2011

Article: बेभान मन सावराल कसं - How to control uncontrollable mind?

नको त्या वयात लक्ष विचलित होईल, असे अनुभव येतात.त्यानंतर मन बिथरतं. नक्की काय करावं सुचत नाही. मनाची घालमेल वाढत जाते. अभ्यास मागे पडत जातो.

तरुण वय तसं कन्फुझिंगच असतं नाही. एकीकडे अभ्यास असतो, करिअर कुठलं करायचं याची घालमेल असते. दुसरीकडे त्याच काळात आपण कुणाच्यातरी प्रेमात पडत असतो. कुणाबद्दल तरी कमालीचं आकर्षण वाटत असतं..'सेक्स'बद्दलचं जागृत झालेलं आकर्षण आणि 'तसलं' काहीतरी करून बघण्याची ओढही याच काळात असते..
हे सगळं एकाच वेळी एकाच व्यक्तीच्या आयुष्यात घडत असेल, तर ती व्यक्ती गोंधळून जाणार नाही का?
नक्कीच जाईल.
मला येणार्‍या विविध पत्रांमध्ये हाच गोंधळ दिसतो आहे.
प्रेमात पडावं तर अभ्यासावरचं लक्ष उडतं.
आणि नाही पडलं तरीही अभ्यासावरचं लक्ष उडतंच!
हे असं का होतं हे सगळ्यात आधी समजून घेऊयात.
मुळात आपलं भावनिक विश्‍व किंवा आपल्या नात्यांच्या विश्‍वातली गुंतागुंत आणि आपला अभ्यास या दोन गोष्टी याच्या पुढच्या काळात आपल्याला निरनिराळ्या ठेवता यायला पाहिजेत.
मी जे काही सांगते आहे ते तसं अवघड आहे, याची मला कल्पना आहे; पण तसं केलं नाही तर आपल्या नात्यांमधल्या गुंतागुंतीचा थेट आपल्या अभ्यासावर, मार्कांवर आणि पुढे जाऊन नात्यांवर परिणाम होतो.
आता मला आलेल्या काही पत्रांचच बघूयात.
एक मित्र लिहितो, 'अडनेडी वयात, पिवळी पुस्तकं हातात पडली. आपण जे काही वाचतोय, बघतोय ते निटसं समजण्याचंही वय नव्हतं. पण वाचताना भारी वाटायचं. तसंल काहीतरी प्रत्यक्ष बघायला मिळावं अशी ओढ वाटायची. आणि एकदा संयम सुटला. बहिणीच्या मैत्रिणीशी नको ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. घरच्यांनी झापलं. मारलं. माझं अभ्यासावरचं लक्ष उडालं. आज मी बरी नोकरी करतो. पण त्यावेळी तसं काहीतरी केलं नसतं तर आज जरा अधिक शिकलो असतो. चांगली नोकरी करू, मिळवू शकलो असतो.'
अजून एक मैत्रीण लिहिते,'मला एक टीव्ही शो खूप आवडायचा. त्यातल्या हिरोच्या तर मी प्रेमातच होते. सतत त्याचा विचार मनात यायचा. रात्रीही झोपेत मी त्याच्या मिठीत आहे असली स्वप्नं पडायची. हा मनाचा चाळा इतका वाढला की, मला त्या सिरियलशिवाय आणि त्यातल्या त्या हिरोशिवाय दुसरा कसलाच विचार मनात यायचा नाही. अभ्यासावरचं लक्ष उडालं. नापास व्हायला लागले. हुशार मुलीला हे काय झालं, असं सगळ्यांना वाटतंय. पण मी तरी काय सांगू काय होतंय ते ! अभ्यास होत नाही एवढं खरं !'
ही दोन पत्र उदाहरणाखातर घेतलेली आहेत. पण अशा आशयाची अनेक पत्र मला आली आहेत.
या सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे भावनांवर ताबा नाही. भावनांचं व्यवस्थापन करायला पाहिजे हे ध्यानातच येत नाही. मुळात आपलं शरीर आणि आपलं मन या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. ऐन तारुण्यात शरीराची मागणी आणि मनाची मागणी निराळी असते. पुन्हा हे वय सरणार आहे आणि पदरात पडणारं शिक्षणच आपल्याला भविष्यात उपयोगी पडणार आहे, हा विचार मनात डोकावतच नाही. त्यामुळे मनात उद्भवणार्‍या भावनांच्या तरंगांवर आपण आपल्याही नकळत स्वार होतो आणि मग सगळाच ताळमेळ गमावून बसतो.
मनाचे कप्पे पाडा, असं काही माझं म्हणणं नाही. पण आपल्या अभ्यासावर, खाण्यापिण्यावर, इतर नातेसंबंधांवर परिणाम व्हावा किंवा करून घ्यावा इतकं ते महत्त्वाचं नसतं हेही समजून घेतलं पाहिजे.
याचसाठी काही मूलभूत मुद्यांचा विचार करायला पाहिजे, असं वाटतं.

स्व ओळख
स्वतला ओळखणं कितीही अवघड वाटलं, तरीही आपल्याला आपल्या क्षमतांची, आपल्यातील गुण-दोषांची जाण असायला हवी. त्याचप्रमाणे आपलं भवितव्य नेमकं कशात आहे, हे समजून घेण्याचं शहाणपणही पाहिजे. स्वतच्या भाव-भावना, आपल्या मनातले विचार किंबहुना आपली एकंदरीतच विचारपद्धती समजून घेतली पाहिजे. आपण आपल्या भावनांशी प्रामाणिक असलो, तर आपली स्वप्रतिमाही नेहमी स्वच्छ, उजळ राहते. मग मनाची घालमेल झाली तरीही त्यातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्‍वास आपल्याला आपोआप मिळतो.

स्व- व्यवस्थापन
स्व-व्यवस्थापन म्हणजेच स्वत:च्या विचारांवर, भाव भावनांवर जाणीवपूर्वक ठेवलेलं नियंत्रण ! आपल्या मनात सदैव विचारचक्र सुरूच असते. त्या प्रत्येक विचाराशी काही भावनाही जोडल्या असतात. एखादा कडवट प्रसंग घडला, तर त्यामागील दुखाची, वेदनेची वा अपमानाची भावना आपल्या मनात घर करून राहते. मग त्यानंतर कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरीही आपण त्याकडे नकारात्मक नजरेतूनच बघतो. त्या विचारांच्या पाठोपाठच आपण मनाने धावत सुटतो. मला येणार्‍या पत्रांमधल्या मित्र-मैत्रिणींबाबत काही अंशी असंच काहीतरी झालेलं आहे. याकरिताच आपल्या भावनांवर, विचारांवर जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवलं पाहिजे. भावनांना कुठे वा कधी मोकळीक द्यायची, यावर विचारपूर्वक निर्णय घेता आला पाहिजे. बर्‍याचदा भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय अयशस्वी ठरतात. म्हणूनच आपल्या भावनांचं व्यवस्थापन करता येणं अत्यंत गरजेचं आहे.

संवाद कौशल्य व सामाजिक भान
समाजात वावरताना, चारचौघात मिसळताना भावनिक बुद्धिमत्तेची अत्यंत गरज भासते. आपल्याकडे जर भावनिक बुद्धिमत्ता नसेल तर आपल्याला स्वतला लोकांशी जोडता येणं कठीण होईल. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी असते. समाज म्हणून वावरताना, लोकांशी संवाद साधताना या परिस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिक पातळीवर आपलेपणाने, प्रेमाने साधलेला संवाद इतर व्यक्तींना चटकन आपलासा करतो. त्याचबरोबर अशा संवादाच्या वेळी व्यावहारिक दृष्टिकोनदेखील बाळगला पाहिजे तसेच सामाजिक संकेतांचं भानही असणं अत्यावश्यक आहे. वैयक्तिक आयुष्यातदेखील हा सामाजिक संकेत लागू पडतोच. भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेण्यापेक्षा सामाजिक भान बाळगून, तारतम्याने निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.

नातेसंबंधांचे व्यवस्थापन
आपण एकट्याने जगू शकत नाही. आजूबाजूला चार माणसं लागतातच. अशा वेळी 'मी कोणाचा तरी आहे किंवा कोणासाठी तरी मी आहे' ही भावना दृढावते. या भावनेतूनच मग नातेसंबंध तयार होतात. हे नातेसंबंध टिकवणे, जोपासणे हा कौशल्याचाच भाग आहे. त्याचप्रमाणे जोडलेल्या असंख्य नात्याचं व्यवस्थापन करता येणं कला आहे. किंवा आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक आहे.
ज्यावेळी अभ्यास आणि मनात येणारे नको नको ते विचार अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते अशावेळी भावनांचे व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं होऊन बसतं. ते तसं झालं नाही तर मग मनाची होणारी ओढाताण स्वस्थ बसू देत नाही. निराशा बळावते. आणि आपण आपला 'फोकस' हरवून बसतो.

-
अदिती नाईक


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive