Monday, December 12, 2011

म-हाटी गडी झालाय बिहारी 'सिंघम्'! Bihari Singham

 म-हाटी गडी झालाय बिहारी 'सिंघम्'! Bihari Singham

तुम्ही ‘ सिंघम ’ पाहिलाय ना!... त्यातली ती नायिका आपल्या आजोबांसोबत सिनेमाला जाते , तो सीन आठवतोय ?... त्या गावातला कुणी गुंड तिची छेड काढतो , आजोबांनाही धक्काबुक्की करतो , ते तडक आपल्या गावात येऊन हा सगळा प्रकार सांगतात , बाजीराव सिंघम तो ऐकतो आणि नंतर हा ‘ सिक्स पॅक ’ चा म-हाटी गडी त्या गुंडाची जी काय धुलाई करतो , ती एकदम लाजवाब , पैसा वसूल!... हा प्रसंग पडद्यावर पाहताना , ‘ असा सिंघम आपल्या गावातही हवा ’, असं आपल्याला मनापासून वाटत असतं. योगायोगाची आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे असाच एक वैदर्भीय ‘ सिंघम ’ गेल्या दहा महिन्यांपासून बिहारमधल्या पाटण्यात ‘ दबंग ’ गिरी करतोय... त्याचं नाव आहे , शिवदीप वामन लांडे. गुंड , गुन्हेगार , ‘ मिक्सर ’ आणि ‘ फिक्सरां ’ चा कर्दनकाळ ठरलेल्या या मराठी गड्यावर पाटण्यातले आबालवृद्ध सॉल्लिड फिदा झालेत.

तसं तर , महाराष्ट्र आणि बिहारचे संबंध सध्या फारसे बरे नाहीत. त्यांच्यात ‘ मनसे ’ दुरावा निर्माण झालाय. पण अशावेळी अकोला जिल्ह्यात जन्मलेल्या , ३४ वर्षीय शिवदीप लांडेनं पाटणावासियांची मनं जिंकून घेतली आहेत. ‘ सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ’, हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आदर्श मानणारा शिवदीप सज्जनांच्या मदतीसाठी सदैव तय्यार असतो. त्यानं आपला मोबाइल नंबर सर्वांसाठी जाहीर केलाय आणि पाटण्यातल्या महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी तो ‘ सेव्ह ’ करून ठेवलाय. बाजीराव सिंघमला जसं संपूर्ण गाव ‘ मानतं ’ आणि चुलबूल पांडेला जसे सगळे टरकून असतात , तसंच काहीसं या शिवदीप लांडेबाबतही आहे.

अकोला जिल्ह्यात गरीब शेतकरी कुटुंबात शिवदीपचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत , जिद्दीच्या जोरावर त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. २००६ मध्ये तो आयपीएससाठी निवडला गेला आणि त्याला बिहार कॅडर मिळाला. त्याचं ट्रेनिंग तिथल्या नक्षली भागात झालं. त्यानंतर त्याच्या शौर्यकथा हळूहळू सर्वत्र पसरू लागल्या आणि खुद्द मुख्यमंत्री नितीशकुमारही त्याच्या पराक्रमानं प्रभावित झाले. दहा महिन्यांपूर्वी त्यांनी त्याची नियुक्ती पाटण्याच्या अधीक्षकपदी केली. ट्राफिक आणि गुन्हे शाखेचा अतिरिक्त कार्यभारही त्याच्याकडे सोपवण्यात आला आणि तिथल्या गुन्हेगारांची ‘ टरकली ’. कुठेही काहीही गुन्हा घडला , तर मला कळवा , असं आवाहन त्यानं केलं आणि त्याला जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मध्यंतरी , शहराच्या मध्यवर्ती भागात तीन दारुड्यांनी एका तरुणीची छेड काढली , तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मुलीनं थेट शिवदीपला फोन लावला आणि पुढच्या काही मिनिटांतच त्यानं घटनास्थळी जाऊन तिची सुटका केली. अर्थात , ते दारुडे तिथून पसार झाले , पण आठवड्याभरात ‘ टीम शिवदीप ’ नं त्यांचा शोधून काढलं. तेव्हापासून शिवदीपला कुणी ‘ दबंग ’ म्हणतं , कुणी ‘ सिंघम ’, तर काहीजणींसाठी तो ‘ रॉकस्टार ’ होऊन गेलाय. तरुणांना बिघडवणा-या सायबर कॅफेवर , जुगाराच्या अड्ड्यांवर त्यानं निर्बंध आणले आणि पालक मंडळीही खुश झाली.

जनतेचा पोलिसांवरचा विश्वास वाढलाय. मला फोन केल्यावर गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळेल , याची खात्री त्यांना वाटतेय. ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे , अशी प्रांजळ प्रतिक्रिया शिवदीप पांडेनं दिली. महाराष्ट्रात पोलिसांच्या कामात राजकारणी हस्तक्षेप करतात , तसं चित्र बिहारमध्ये नसल्याचंही त्यानं नमूद केलं.

शिवदीपच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच , बिहारच्या पोलीस महासंचालकांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्याची बदली पोलीस मुख्यालयात केली आहे. ही बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर आता तरुण वर्ग या बदलीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. येत्या १५ तारखेला त्यांनी ‘ बंद ’ ची हाकही दिली आहे. अर्थात , शिवदीपनं आपल्याला दिलेली नवीन जबाबदारी आनंदानं स्वीकारलेय , पण पाटणावासियांना हा शूर शिपाई आपल्याच गावात हवाय.

शिवदीप लांडे आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतो आहेच , पण आपल्या वेतनातील ६० टक्के रक्कम अकोल्यातील एका सामाजिक संस्थेला देऊन तो समाजऋण फेडण्याचाही प्रयत्न करतोय. ही संस्था , अनाथ आणि गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करते , तसंच सामुदायिक विवाह सोहळ्यांचंही आयोजन करते.

शिवदीपचं हे कार्य पोलीस खात्यातील नवोदितांसाठी आणि पोलीस होऊ इच्छिणा-यांसाठी नक्कीच आदर्श आहे. अशा शिवदीप लांडेची आज महाराष्ट्रालाही खरोखरच गरज आहे. पण इथले राजकारणी त्याला साथ देतील का , हा प्रश्नच आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive