Wednesday, December 7, 2011

Condtion of Area Kalwa, Thane - बकाल कळवा

औद्योगिक कंपन्यांच्या टाळेबंदीमुळे उध्वस्त झालेला कामगारवर्ग , धोकादायक इमारती , अनधिकृत बांधकामांची बजबजपुरी , रेल्वेकडून साध्यासुध्या सुविधांसाठी होणारी रखडपट्टी अशा समस्यांचा विळखा कळव्याला पडला आहे . मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे महापालिकेतील सुमारे ४ लाख लोकसंख्येच्या कळव्याची ही दयनीय अवस्था पाहून या शहरात प्रशासन अस्तित्वात की नाही , असा प्रश्न पडतो .

ठाण्यातील औद्योगिक प्रगतीचे वारे कळव्यातही शिरले आणि काही बड्या कंपन्या कळवा परिसरात स्थापन झाल्या . मफतलाल , हिंदाल्को आणि मुकुंद अशा मोठ्या कंपन्या सुरू झाल्याने कळव्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला . पण कालांतराने या कंपन्या एकापाठोपाठ एक बंद झाल्या आणि या भागातील कामगारांचा रोजगार हिरावला गेला . मफतलाल कंपनीच्या कामगारांना हक्काची देणीदेखील मिळाली नसल्याने आपल्या हक्कासाठी ते अजून संघर्ष करत आहेत . राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर आश्वासनांचा पाऊस पाडला असला , तरी सुमारे ७०० कामगारांना अजून एक पैदेखील मिळालेली नाही .

कळव्यातील अतिक्रमणं हीदेखील मोठी समस्या आहे . वन विभागाची जागा केव्हाच भू - माफियाने हडपली असून , मफतलाल कंपनीची जागासुध्दा झोपडपट्ट्यांनी व्यापलीय . खासगी , तसेच सरकारी जागेवर झालेल्या अतिक्रमणांमध्ये हजारो लोकांचा रहिवास आहे . त्यामुळे कारवाई केली तर हजारो लोक बेघर होतील अशा दुहेरी कात्रीत प्रशासन सापडले आहे . अतिक्रमणं होत असताना पालिका आणि वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे . त्यावर उपाय म्हणून कळव्यातही क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे . पण अद्याप राज्य सरकारने या मागणीकडे फारसे लक्ष दिलेले नाही . त्याचा परिणाम हजारो रहिवाशांना भोगावा लागतोय .

या परिसरात बकाल वस्त्या आहेत , रहिवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जाही चांगला नाही . मात्र त्यांच्याकडून मिळणारा कर अगदीच अल्प असल्याने त्याचा भुर्दंड अधिकृत घरांमध्ये राहणाऱ्यांकडून वसूल केला जातोय . अनधिकृत बांधकामांबरोबरच धोकादायक इमारतींचा प्रश्नही कळव्यात गंभीर आहे . गेल्या वर्षी धोकादायक इमारत कोसळून कळव्यात ४ जणांचा बळी गेला होता . अशा अनेक धोकादायक इमारती कळव्यात आहेत .

कळवा येथे रेल्वेची कारशेड आहे . तेथून लोकल सुटत नसल्या तरी रात्री थांबलेल्या लोकल पहाटे सुटतात , तेव्हा जागा मिळवण्यासाठी कळवावासियांमध्ये चढाओढ असते . ठाणे किंवा कळवा येथून सकाळी मुंबईकडे जाताना लोकल कल्याणपासूनच दुथडी भरून येतात , त्यात पायही ठेवायला जागा नसते . त्यामुळे कारशेडमधून लोकल पकडण्याचा द्राविडी प्राणायाम प्रवासी करतात .

महापालिका आणि रेल्वे यांच्यातल्या वादात खारेगांव रेल्वे ओव्हर ब्रीज अडकलाय . दररोज हजारो प्रवासी व वाहनचालक या रेल्वे फाटकात अडकतात . त्यांचा वेळ व इंधन वाया जाते , काही वेळा अपघात होऊन निष्पापांचा बळीही जातो . त्यावर तोडगा मात्र निघत नाही . रेल्वे ओव्हर ब्रीज झाला , तर या सर्व समस्या सुटतील .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive