Wednesday, December 7, 2011

Social Networking - अजब ताकद वापर मात्र योग्य हवा

'सोशल नेटवर्किंग' Social Networking

गावागावांमधले वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या अनेक प्रश्‍नांशी संबंधित असलेले दबावगट उभे करणं, त्यांना दिशा देण्यासाठी या 'सोशल नेटवर्किंग'वाल्या वेबसाइट्‌समध्ये संबंधित तज्ज्ञांना सहभागी करून घेणं असे अनेक उपक्रम हाती घेणं शक्‍य आहे.

'सोशल नेटवर्किंग' हा प्रकार आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आला, तेव्हा बऱ्याच जणांना त्याच्याविषयी फारशी कल्पना नव्हती. हळूहळू लोक विशेषतः तरुण मंडळी या "सोशल नेटवर्किंग'चा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागल्यावर त्याविषयीचं सर्वसामान्यांचंही कुतूहल वाढलं. माध्यमांमधूनही त्याविषयी लिहिलं जायला लागलं. सुरवातीला "काही लोकांनी इंटरनेटवर येऊन केलेला टाईमपास' अशा नजरेनंच या सगळ्याकडं बघितलं जायचं. कॉलेजात मुलं-मुली कट्ट्यावर बसून गप्पा मारतात तशा आता इंटरनेटवर आपापल्या ठिकाणाहूनच गप्पा मारतात असं त्याचं स्वरूप होतं; पण जसजसं "सोशल नेटवर्किंग'विषयी जास्त बोललं आणि लिहिलं जायला लागलं, तसतसा त्याच्या वापराविषयी वेगळ्या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला. शशी थरूर यांच्यासारख्या महत्त्वाच्या माणसानं "सोशल नेटवर्किंग'ची संकल्पना अगदी जनसामान्यांमध्ये रुजवली. "ट्‌विटर'सारख्या वेबसाईटचं नाव अगदी गृहिणीपर्यंत पोचलं. हाच प्रकार इतर देशांमध्येही घडून फक्त ट्‌विटर या सोशल नेटवर्किंगची सुविधा पुरवणाऱ्या वेबसाइटच्या सभासदांमध्ये सन 2009ला तब्बल 1382 टक्के एवढी प्रचंड वाढ झाली. जोडीला फेसबुक, ऑर्कुट, मायस्पेस वगैरे "सोशल नेटवर्किंग'च्या सुविधा पुरवणाऱ्या वेबसाइट्‌स होत्याच. अतिशय वेगानं वाढणाऱ्या या सोशल नेटवर्किंगच्या लोकप्रियतेकडे बघितलं तर इथून पुढे त्यांच्यामध्ये काय बदल व्हायची शक्‍यता आहे?

"सोशल नेटवर्किंग' या शब्दामध्येच खरं म्हणजे त्यामागची संकल्पना दडली आहे. जसं माणसं पूर्वी प्रत्यक्षात एकत्र जमून कुठल्याही विषयावर बोलायची तसंच आता प्रत्यक्षात न भेटता इंटरनेटचा एक माध्यम म्हणून वापर करून त्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल का, हा यामागचा प्रयत्न होता. यातून माणसांचं एक जाळंच निर्माण होईल, अशी यामागची संकल्पना होती. त्या माणसांच्या जाळ्याला मानवी चेहरा असावा, तसंच त्यांच्या एकत्र येण्याला काही तरी अर्थ असावा अशा सुप्त इच्छा त्या मागे होत्या. पण प्रत्यक्षात सोशल नेटवर्किंग जेव्हा सुरवातीला सुरू झालं तेव्हा जे घडलं ते वेगळंच होतं. या "सोशल नेटवर्किंग'च्या माध्यमाचा वापर त्यातून खास काही साध्य करण्यासाठी न करता नुसताच वेळ घालवण्यासाठी व्हायला लागला. म्हणजेच एखादा माणूस कुठे सहलीला जाऊन आला, की तिथले फोटो तो आपल्या "सोशल नेटवर्किंग'च्या अकाऊंटवर टाकायला लागला. कुणी एखादा सिनेमा पाहिला की त्याविषयी 1-2 ओळींमध्ये त्याविषयी लिहायला लागला. असं करत करत "सोशल नेटवर्किंग'ची लोकांच्या मनातली प्रतिमा ही ज्या कुणाकडे भरपूर वेळ असेल त्यानं इंटरनेटवर तो घालवण्याचा एक मार्ग अशी झाली. आता ही बदलायची दाट शक्‍यता आहे. याचं कारण म्हणजे सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌स जगभरात इतके लोक वापरतात, की यातून वेगवेगळ्या चळवळी चालवणं, समान आवडीनिवडी असलेल्या लोकांनी त्यात भरीव काहीतरी करणं, निरनिराळे प्रश्‍न हाती घेणं यांसारख्या गोष्टींसाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकेल, असं मत पसरायला लागलं आहे. त्यातून "सोशल नेटवर्किंग'चा वापर नुसताच वेळ फुटकळ गोष्टींमध्ये न घालवता खरंच काही तरी चांगलं करण्यासाठी होऊ शकेल का हे चाचपणं सुरू आहे. आपल्यापुरतं बोलायचं तर गावागावांमधले वाहतूक, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या अनेक प्रश्‍नांशी संबंधित असलेले दबावगट उभे करणे, त्यांना दिशा देण्यासाठी या "सोशल नेटवर्किंग'वाल्या वेबसाइट्‌समध्ये संबंधित तज्ज्ञांना सहभागी करून घेणं असे अनेक उपक्रम हाती घेणं शक्‍य आहे.

ग्राहकसेवेशी संबंधित असलेला आपला खर्च कमी करून नफा वाढवायच्या प्रयत्नामध्ये असलेल्या कंपन्यांना "सोशल नेटवर्किंग'चं बदलतं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरणं शक्‍य झालं आहे. त्याचा वापर अनेक कंपन्या करायला लागल्या आहेत. उदाहरणार्थ "ट्‌विटर'सारख्या सोशल नेटवर्किंगची सुविधा पुरवणाऱ्या वेबसाइटवर समजा एखाद्या विमा कंपनीनं आपल्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या माणसांची छोटी फौज उभी केली तर प्रत्यक्षात कॉल सेंटर्स चालवणं वगैरेचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करणं या कंपन्यांना शक्‍य होईल. त्या दृष्टीनं अनेक कंपन्या या तंत्रज्ञानाची चाचपणी करत असल्याचे दृश्‍य दिसायला लागलं आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये यासंबंधीच्या आणखी घडामोडी आपल्यासमोर येतील.

"सोशल नेटवर्किंग'चं पुढचं पाऊल म्हणून "सोशल बिझिनेस'कडं बघितलं गेलं पाहिजे. एखाद्या ठिकाणच्या किंवा एका समुदायाच्या गरजा भागवणाऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी आणि त्यांना टिकवून ठेवण्यासाठी या माध्यमाचा वापर करतील, अशीही दाट चिन्हं आहेत. उदाहरणार्थ आपण ज्या दुकानातून नेहमी कपडे खरेदी करतो त्या दुकानानं "सोशल नेटवर्किंग'वर आपलं एक खातं उघडलं आणि त्यात आपल्या नेहमीच्या ग्राहकांना सतत वेगवेगळी माहिती पुरवली तर त्यातून त्या दुकानाची जवळपास फुकट जाहिरात होत राहते. आता सध्या कुठल्या कपड्यांवर भरीव सूट आहे वगैरे माहितीपासून ग्राहकांना सतत आपल्याविषयी आकर्षण वाटत राहावं म्हणून वेगवेगळ्या योजनांमध्ये तसंच गेम्समध्ये सहभागी करणं यांसारखे प्रकार "सोशल बिझिनेस'मध्ये व्हायची दाट शक्‍यता आहे.

सध्या एखादी गोष्ट आपल्याला इतरांबरोबर शेअर करायची असते तेव्हा आपण ईमेलचा वापर करतो. उदाहरणार्थ आपल्याला समजा इंटरनेटवरचा एखादा लेख आवडला तर आपण तो ईमेलनं आपल्या मित्रांना पाठवून देतो. इथून पुढे अशा कामांसाठी ईमेलचा वापर कमी होत जाऊन त्याऐवजी "सोशल नेटवर्किंग'चा वापर खूप जास्त प्रमाणात व्हायची चिन्हं आहेत. अनेक वेबसाईट्‌स तर त्यासाठीच्या सुविधा काही काळापासून पुरवतातसुद्धा. अशा वेबसाईट्‌सवर ट्विटर, फेसबुक इत्याही "सोशल नेटवर्किंग'वाल्या वेबसाईट्‌सचे लोगोच किंवा आयकन्स दिलेले असतात. त्यावर क्‍लिक करून आपण त्यांच्या "सोशल नेटवर्किंग'च्या जाळ्यात सहभागी झालो तर आपोआपच त्या वेबसाईटवर नवं काही आलं तर त्याची माहिती आपल्याला आणि आपल्यासारख्याच आवडीनिवडी असलेल्या इतर सगळ्यांना मिळत राहते. हा प्रकार आणखी खूप जास्त प्रमाणावर वाढेल यात शंकाच नाही. जवळपास प्रत्येक वेबसाईटला वेगवेगळ्या "सोशल नेटवर्किंग'वाल्या वेबसाईट्‌सशी यासाठी जोडलं जाणं भाग पडेल.

या सगळ्या गोष्टी करत असताना "सोशल नेटवर्किंग'चा वापर कंपन्या मोठ्या प्रमाणावर करायला लागतील. उदाहणार्थ समजा एक काम भारतातल्या त्या कंपनीच्या 2-3 कार्यालयांमधून विभागून होत असेल तर त्यासंबंधीच्या सतत बदलत राहणाऱ्या घडामोडींशिवाय त्यातून उद्‌भवणारे प्रश्‍न आणि त्यांना दिली जाणारी उत्तरं या सागळ्या गोष्टींसाठी "सोशल नेटवर्किंग'च्या तंत्रज्ञानाचा मोठा वापर होऊ शकेल. कारण जर सगळेच कर्मचारी या तंत्रज्ञानाचा वापर करत असतील तर त्यांना इतरांकडून सहजपणे झटपट माहिती मिळवणं आणि आपली माहिती त्यांच्यापर्यंत पुरवणं यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. फरक इतकाच, की खासगी माहिती सुरक्षित राहावी, कुणी या तंत्रज्ञानाचा चुकून किंवा कधीकधी जाणीवपूर्वकसुद्धा गैरवापर करू नये यासाठीच्या नियमावल्या, सुरक्षेशी संबंधित असलेलं तंत्रज्ञान या गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जाईल.

एका सर्वेक्षणानुसार 2008 साली अमेरिकेत साधारण 8 कोटी लोक "सोशल नेटवर्किंग'च्या तंत्रज्ञानाचा वापर करत होते. यात 18 वर्षे वयाहून जास्त असलेल्या लोकांचा आकडा साधारण 6 कोटींच्या आसपास होता. 2013 साली एकंदर 11 कोटी लोक "सोशल नेटवर्किंग'चा वापर करतील आणि त्यापैकी 9.5 कोटी लोकांचं वय 18 वर्षांहून जास्त असेल असा अंदाज आहे. म्हणजेच 5 वर्षांच्या काळात सर्वसाधारणपणे जास्त समज असलेल्या लोकांच्या "सोशल नेटवर्किंग'च्या वापरात फक्त अमेरिकेत जवळपास 50 टक्‍क्‍यांनी वाढ होईल, असं मानलं जातं. जगभरातले यासंबंधीचे आकडे फारसे वेगळे नसणार. यातूनच "सोशल नेटवर्किंग'च्या तंत्रज्ञानाची जबरदस्त वेगानं वाढणारी ताकद आपल्या लक्षात येईल. त्या ताकदीचा वापर योग्य मार्गांनी करून घेणं ही एक मोठीच जबाबदारी आहे. आपापल्या परीनं सगळ्यांनी त्याला हातभार लावला तर जसं इंटरनेटच्या येण्यानं एक मोठीच क्रांती अख्ख्या जगभरात बघायला मिळाली, तशीच पण कदाचित थोड्या कमी प्रमाणातली क्रांती पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला बघायला मिळेल; पण त्यासाठी सगळ्यांना आणि विशेष करून नव्या पिढीमधल्या युवाशक्तीला या माध्यमाची ओळख करून देताना त्याच्या वापरासंबंधीची जबाबदारी समजावून सांगणं हेही गरजेचं आहे. नुसत्याच निरर्थक गोष्टींसाठी आणि फुटकळ तसंच सवंग चर्चांसाठी हे माध्यम वापरण्यातून हाती काहीच लागत नाही, हा विचार नव्या पिढीमध्ये सातत्याने रुजवला पाहिजे. त्यांच्यामधला जोश आणि त्यांच्यातली शक्ती या माध्यमांचा वापर करून योग्य दिशेनं जाईल याची काळजी घेत राहणं भाग आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive