खसखस म्हणजे 'पॅपॅव्हर सॉम्निफेरम' असं शास्त्रीय नाव असलेल्या अफूच्या बिया. खसखशीची माहिती ख्रिस्तपूर्व २७00 पासून मानवाला होती, याचे पुरावे उपलब्ध आहेत. अफूची बोंडं हिरवी असताना तिच्यामधून जो रस किंवा चीक बाहेर पडतो त्यापासून मादकद्रव्ये तयार करतात. पण पिकलेल्या कोरड्या झालेल्या अफूच्या बोंडातल्या बियांमध्ये म्हणजे खसखशीमध्ये मादक रसायनांचं प्रमाण नगण्य असतं. खसखशीमध्ये निळी, काळी आणि पांढरी असे तीन प्रकार असतात. भारतीय खसखस पांढरी असते, तर युरोपियन खसखस काळी किंवा निळी असते. एका संदर्भानुसार सर्वात उत्तम खसखस हॉलंडमधे उत्पादित होते आणि तिचा रंग निळसर करडा असतो. खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून मग वाटली जाते किंवा कढईत कोरडीच भाजून मग तिची पूड केली जाते किंवा पाण्याबरोबर वाटून पेस्ट बनविली जाते.
भारतीय खसखशीमध्ये पाच टे आद्र्रता, २0 टे प्रथिने, पाच टे तंतू, ५0 टे स्निग्ध पदार्थ आणि ३0 टे काबरेहायड्रेटस् असतात. याशिवाय काही प्रमाणात ब व ई जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशियम, तांबे, पोटॅशियम आणि जस्तही तिच्यामध्ये असतात.
खसखशीमधल्या इ-जीवनसत्त्वाच्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे एकूण आरोग्य उत्तम स्थितीत रहाण्यासाठी तिचा चांगला उपयोग होतो. खसखशीमधला स्वाद हा तिच्यामधल्या विशिष्ट रसायनामुळे येतो. तिच्यातील स्निग्ध पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या मोनोअसंपृक्त मेदाम्लांचा उपयोग हृदयविकार दूर ठेवण्यासाठी होतो. खसखशीच्या दाण्यावरचं आवरण कठीण असतं. कारण त्यात भरपूर प्रमाणात तंतू असतो. या तंतूचा उपयोग मलोत्सर्जनासाठी होतो. हा तंतू कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होणारी रसायने आणि त्याच्यामध्ये बंध निर्माण करतो आणि त्यामुळे विघातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. खसखशीतील कॅल्शियम, मॅग्नेशियम व जस्त यामुळे हाडांच्या आरोग्यास आणि शरीरातील विविध अवयवांची कार्ये सुरळीत होण्यास मदत होते. चेतासंस्थेमधील समस्यांवर खसखशीचा चांगला उपयोग होतो, असं आढळलं आहे. श्वसनसंस्था तसेच पचनसंस्था यांच्या समस्यांवरही ती उपयुक्त आहे. निद्रानाशाची समस्या खसखशीच्या सेवनाने काही प्रमाणात दूर होऊ शकते. तिच्यातील व जीवनसत्त्वाचे अनेक प्रकार आरोग्य उत्तम स्थितीत ठेवण्यास मदत करतात आणि तांबे, पोटॅशियम, मँगनीज यामुळेही विविध प्रकारे शरीरातील सर्व अवयवांचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. खसखशीमध्ये भरपूर उष्मांक असतात. त्यामुळे तिचा वापर प्रमाणातच व्हायला हवा.
खसखशीच्या बियांपासून तेल काढलं जातं. या तेलात भरपूर प्रमाणात इ-जीवनसत्व असतं. विशेषत गॅमा टोकोफेरॉल असतं. इतर तेलांशी तुलना करता खसखशीच्या तेलामध्ये बर्यापैकी प्रमाणात फायटोस्टेरॉल्स असतात. या सगळ्यांच्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीराला चांगला फायदा होतो. साधारणपणे या तेलामधे १४ टे संपृक्त मेदाम्ले, २0 टे मोनोअसंपृक्त व ६६ टे पॉलिअसंपृक्त मेदाम्ले असतात. या तेलात भरपूर प्रमाणात असलेल्या ओमेगा ६ मेदाम्लांमुळे हृदयविकाराला प्रतिबंध होतो. इ- जीवनसत्त्व या तेलात भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, डोळे, केस यासाठीही त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. स्वयंपाकात या तेलाचा उपयोग प्रामुख्याने सॅलड ड्रेसिंगसाठी करतात. स्त्रियांमधील जननक्षमतेच्या समस्यांवर या तेलाचा उपयोग होऊ शकतो. निद्रानाशावरही या तेलाचा उपयोग होऊ शकतो.
आयोडाइज्ड खसखशीच्या तेलाचा अनेक प्रकारे उपयोग होतो. ज्या ठिकाणी आयोडाइज्ड मीठ उपलब्ध नाही अशा ठिकाणी असं तेल आयोडिनची कमतरता भरून काढण्यासाठी वापरलं जातं. इंजेक्शनद्वारे किंवा तोंडाद्वारे हे देता येतं. खसखशीचं तेल मुद्दाम वापरण्यात येतं. कारण त्यामुळे अँलर्जी येत नाही. क्ष किरणांद्वारे अवयवांचे फोटो काढले जातात. त्यासाठी किंवा अँन्जिओग्राफीद्वारा एखाद्या अवयवामध्ये निर्माण झालेल्या समस्यांची उकल करण्यासाठी रेडिओकॉन्ट्रास्ट एजंट म्हणून आयोडिन असलेल्या म्हणजेच आयोडाइज्ड खसखशीच्या तेलाचा उपयोग होतो. ट्युर्मसवरच्या ट्रीटमेंटसाठी खसखशीच्या तेलाचा उपयोग जुन्या काळापासून केला जातो. यकृताच्या कर्करोगावर दिल्या जाणार्या केमोथेरपी आणि रेडिओथेरपीमध्येही या तेलाचा उपयोग होतो. सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगात, तसंच रंगाच्या कारखान्यांमध्ये आणि वार्निशसाठी खसखशीचं तेल वापरलं जातं. त्वचा मृदू रहाण्यासाठी खसखशीचं तेल मसाजसाठी वापरलं जातं. पोटाच्या तक्रारींवरही वापरलं जातं. अनेक प्रकारची औषधं बनविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. खसखशीचा काढा निद्रानाशावर तसेच वेदनांवर औषध म्हणून दिला जातो. प्रसूत स्त्रियांच्या बाबतीत दूध वाढण्यासाठी खसखशीचा उपयोग होतो, असाही मतप्रवाह आहे. खसखस वाटून त्याचं पोटीस दुखर्या भागावर लावल्यास वेदना कमी होतात. तसेच खसखस वाटून अंगाला लावल्यास त्वचा मृदू रहाते, असं काही संदर्भानुसार कळतं. भारतात सर्व ठिकाणी तसेच जगात सगळीकडे खसखस विविध प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते; पण तिचे आणि तिच्या तेलाचे औषधी उपयोग पाहिले की कमाल वाटते.
- डॉ. वर्षा जोशी
No comments:
Post a Comment