डिस्टन्स ला मुन्न. मुन्न .
व्हाईट्टू, व्हाईट्ट बॅकग्राऊण्ड.
नाईट्ट.. नाईट्ट नाईट्ट . कलरू ब्लॅक्क व्हाय धीस कोलावरी. कोलावरी डी..
- ऐकलंय का तुम्ही हे गाणं..? ऐकलंच असेल.! ( नसेल तर कसं म्हणायचं तुम्हाला तरुण.?)
गेले दहा-पंधरा दिवस या गाण्याने टोटल तरुणाईला सध्या पुरतं पागल करून टाकलंय. जिथं तिथं हेच गाणं वाजतं. कुणाही 'तरुण' माणसाला फोन करा पाचपैकी तीन लोकांची कॉलर ट्यून हीच. सगळेच म्हणतात 'व्हाय दिस कोलावरी कोलावरी डी.. ' फेसबुकाच्या स्टेटसपासून ते मोबाइल्सच्या हेडफोन्सपर्यंत हेच गाणं वाजत असतं ढाणढाण.! हे गाणं पहिल्यांदा यू ट्यूबवर पडलं तेव्हा सात दिवसांत त्या गाण्याला ३0 लाख हिट्स मिळाल्या होत्या. जो तो तेच गाणं शोधत होता. आजचीही परिस्थिती तीच आहे. कॉलेज, ऑफिस सगळीकडेच तरुण या एका गाण्यापाठी वेडे झालेत. नीट ऐका, तुम्हालाही वाटेल, आहे काय आहे. एकदम 'नशिलं'.नशा चढल्यासारखं डुलायलाच लागतो जो तो.! 'साऊथ' सिनेमातलं हे गाणं, पण उत्तर भारतच कशाला, चीन-जपान-अमेरिकेतलं तारुण्य सध्या एकच प्रश्न विचारत गातंय, 'व्हाय धीस कोलावरी.?'
अर्थ बिर्थ काही कळत नाही. पण या गाण्यात एक वेगळीच गंमत आहे. झिंग आहे झिंग.!!
ती झिंग डोक्यावर चढून बसली की आपल्याही नकळत जो तो गायलाच लागतो. 'कोलावरी-कोलावरी डी' !
कोलावरी म्हणजे काय..?
कोलावरी हा तमिळ शब्द आहे. इंग्रजीत याचा अर्थ 'मॅडनेस टू किल.' आपल्या भाषेत सांगायचं तर, पुरतं पागलपण. पक्का येडेपणा. आणि डोक्यात उसळलेली त्या 'येडे'पणाची आग. या गाण्यातला तोच 'येडे'पणा आज जगभरातल्या तारुण्याला 'आपलाच' वाटतोय. तमिळ उच्चारांतलं इंग्रजी जो तो गातोय. आणि झुलतोय.!
पण आहे काय अशी जादू या 'कोलावरीत'.!
रजनीकांतचे फॅन्स त्याला रजनीकांतची जादू म्हणू शकतील.! रजनीकांत काय वाट्टेल ते करू शकतो. पण खरं सांगायचं तर ही जादू रजनीकांतची नाही त्याच्या जावयाची.!
धनुष. त्याचं नाव. त्यानं हे गाणं 'थ्री' नावाच्या एका तमिळ सिनेमासाठी लिहिलं. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. मज्जा म्हणून त्यानं हे गाणं लिहिलं. पण ते शब्द ऐकून बोलता बोलता या गाण्याला असलं 'पागल' करवणारं म्युझिक दिलं ते अनिरुद्ध रविचंदरने. या गाण्याचं वैशिष्ट्य काय तर हे सारं गाणं धनुषने इंग्रजीत लिहिलंय. पण कशा इंग्रजीत तर तमिळ लोक ज्या टोनमध्ये 'तमिळलेलं'इंग्रजी बोलतात त्या इंग्रजीत. पण या संपूर्ण गाण्यात एकच तमिळ शब्द आहे. तो कोणता तर 'कोलावरी'. आज हा कोलावरी शब्द तमाम तरुण जनतेच्या ओठावर राज्य करतोय. कोणी म्हणेल काय हे गाणं.?
कोलावरी काय.? व्हाईटू-व्हाईटू. एमटू एमटू काय.?
अर्थ काय याचा.!
खरं सांगायचं तर अर्थ काही नाही.
या संपूर्ण गाण्याचा काळ एका ओळीत सामावलेला आहे. तोही साधा सरळ, सोपा.. जे तमाम तरुण आयुष्यात होतं तेच होतं या गाण्यातही.
एका प्रियकर, एक प्रेयसी.!
सॉलीड्ड विरह बिरह होतो त्याला. फ्रस्ट्रेशन येतं. सारखी तीच दिसते. आणि मग तो तशाच अवस्थेत काळीज चिरून तो विचारत सुटतो.' व्हाय धीस कोलावरी.?' म्हणजे, का.का माझा जीव घ्यायला टपलीहेस.?
भंजाळलेल्या अवस्थेतला एक जीवघेणा प्रश्न, इतकाच काय तो या गाण्याचा 'मथितार्थ' ! पण खरी गंमत गाण्याच्या रिदममध्ये आहे. त्याशिवाय तमिळ आणि इंग्रजीचं फ्युजन या गाण्यात भरमसाट वापरलंय. फार साध्यासोप्या शब्दांत सांगायचं तर कॉम्प्युटर हँग झाला असं म्हणतो आपण. पण काही जण तो 'हँगला' असं म्हणतात. हे 'हँगला' म्हणण्यात जी इंग्रजीला मराठी फोडणी देण्याची गंमत आहे ना, तीच या गाण्याची गंमत आहे.
'ब्रोकन इंग्लिश विथ अवर ओन मदर टंग' असा एक ट्रेण्ड या गाण्याच्या निमित्तानं हिट होताना दिसतोय. म्हणजे आम्हाला जसं इंग्रजी येईल, जिथं बोलताना आमच्या भाषेतला शब्द येईल तिथं तो अचूक वापरायचा. तो एक शब्द वापरला. आणि आज हे तमिळ+ इंग्रजी गाणं टँग्लिश बनून सगळ्यांच्या तोंडावर चढून बसलंय.
हे सारं झालं गाण्याच्या लिरिक्सविषयी. पण संगीताचं काय.? ते तर अफलातून आहे. तुम्हाला अगदी अलीकडे आलेलं 'ढिंका चिका' गाणं आवडत असेलच. हल्ली अशा फक्कड शब्दांची, उच्चारांची आणि त्या रिदमची गाणी हिट होतात. कारण आता गाण्याच्या बोलांपेक्षा बीट्स जास्त अपील होतात तरुण मुलांना. एकेकाळी 'रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ.' या गाण्याच्या शब्दांवरून वाद झाले होते पण तरी आजही तो रिदम, ते बीट्स तरुणांना आवडतात. ते रिदमच या गाण्यांची जान आहे. 'रूप सुहाना लगता है. चांद पुराना लगता है. तेरे आगे ओ जानम' किंवा 'आपडी पोडे पोडे पोडे' हे गाणं. (शब्दांचा अर्थ कळणं सोडाच पण ते उच्चारता आले तरी हुश्श) या गाण्याचा रिदम ऐकला की, एकदम नाचावसंच वाटतं. 'कुची कुची रक्मा पास आयेना.' किंवा अगदी अलीकडचं 'मुन्नी बदनाम हुई' पण तितकंच हिट झालं. त्यातले शब्द तर काहीही होते. 'आयटम ये आम हुयी डार्लिंग तेरे लिये ' असं म्हणणारी मुन्नी जगभरातल्या तरुण मुलांना नाच नाच नाचवून गेली. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधलं 'सेनोरिटा'ही तसंच आहे. शब्द कळत नाहीतच. पण बीट्स, रिदम सारंच एक नंबरी आहे. त्याच बीट्सवर मराठी सेनोरिटाही यू-ट्यूबवर हिट झालं. 'कोंबडी पळाली' किंवा अलीकडे येऊन गेलेल्या 'अगडबम' सिनेमातलं 'बाबो' गाणं पाहिलं तर मराठीतही आता हा ट्रेण्ड येऊ लागला आहे. पण या सार्यात आघाडीवर आहे ते साऊथ इंडियन म्युझिक. आणि त्याचा बादशहा इलिया राजा आणि ए. आर. रहमान. संगीत देण्याचा ट्रेण्ड पाहिला तर गंमत वाटू शकते. साधं, सोपं, सरळं आणि थेट डोक्याला हात घालणारं हे म्युझिक आहे. शब्दांच्या टोन्सशी म्युझिकली केलेला खेळ आहे. स्लो बीट्स आणि तोडके मोडके शब्द इतकंच काय ते भांडवल. पण त्या भांडवलाने मारलेली मजल काही लाखांच्या घरातली!
आजची लाईफस्टाईल, रिलेशनशिप्सचा होणारा विचार आणि त्यानुसार बदलणार्या भावना या सार्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे कोलावरी गाणं ! लाईफ मे किसी भी बात पे जादा सिरीयस नही होने का . बीत गई सो बात गई. हा अँटीट्यूड घेऊनच येतं हे गाणं.!
हे असं वाटणं पागल, बावळट आणि बेदरकार आहे असं मत असूही शकेल काही जणांचं.! .पण जगणं असंच शिंगावर घेऊन जगायचं, भरभरून आणि जे नाही त्याला 'जा उडत' म्हणायचं, असा दृष्टिकोन घेऊन जगणार्या तारुण्याचं हे नवं तत्त्वज्ञान आहे. आणि एक प्रश्नही. स्वतसह इतरांना.
'व्हाय धीस कोलावरी. कोलावरी डी.?'
No comments:
Post a Comment