Wednesday, December 7, 2011

How to find job on social network sites? नोकरी कशी शोधायची?

 नोकरी कशी शोधायची?


सोशल मीडियाचा वापर नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आणि नोकरी मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अगदी जाता जाता बनवलेले "फेसबुक'वरचे तुमचे प्रोफाईलही कदाचित तुमची नोकरीची संधी ठरवू शकते. त्यामुळे नोकरीचा शोध घेताना अशा साइटस्‌वरील आपली प्रोफाईल्सही "अप टू डेट' ठेवली पाहिजेत. कोणत्या सोशल नेटवर्कचा कसा वापर करायचा नोकरीसाठी...?

"कॉलेज संपले, आता
नोकरी शोधली पाहिजे...''
"मला माझ्या नोकरीत
आता बदल हवाय...''
"मी या नोकरीला वैतागलोय.
नोकरी बदलायची आहे...''

नोकरी शोधण्याची एक नाही तर अशी अनेक कारणे. नोकरी आणि तीही योग्य नोकरी शोधणे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. जागा 5 आणि अर्ज 500 ही सध्याची परिस्थिती. "एम्प्लॉयमेंट मार्केट' दिवसागणिक आणखीच अवघड होत जाणार आहे आणि त्यासाठीच तुम्हाला तुमच्या अंगातील सर्व कला या सर्वांच्या आधी जॉब शोधण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. नवीन जागा भरायची आहे तर त्या जागेसाठीचा सर्वांत पहिला अर्ज माझा असला पाहिजे आणि आपण कसे या पदासाठी योग्य आहोत, हे संस्थेला सर्वांच्या आधी पटवून देता आले पाहिजे. ही गरज सुरू होतेय आणि इथेच सोशल मीडिया आपल्या मदतीला धावून येतो आहे.

या आहेत काही सोशल मीडिया टिप्स, ज्या तुम्हाला तुमचा नवीन आणि "ड्रीम' जॉब देऊ शकतात :

'लिंक्‍डइन' : "लिंक्‍डईन' ही वेबसाईटच मुळी आहे प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी. "लिंक्‍डइन'मध्ये आपण आपला प्रोफाईल बनवून त्यामध्ये आपल्या व्यवसायासंबंधीची माहिती देऊ शकता. नीट बनवला तर हा प्रोफाईल तुमचा ऑनलाईन बायोडेटाच बनून जातो. पण बरेच जण "लिंक्‍डइन'चा वापर पूर्णपणे करीत नाहीत. "लिंक्‍डइन'मध्ये आपला प्रोफाईल 100 टक्के पूर्ण आहे याची खात्री करा आणि किमान एक तरी "रेक्‍मेंडेशन' आपल्या नावे असू द्या. आपल्या सध्याच्या मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी "लिंक्‍डइन'वर कनेक्‍टेड राहा.

"लिंक्‍डइन'मध्ये "जॉब' असा एक विभाग आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या स्किलसेट्‌सना योग्य होईल, अशी नोकरी शोधू शकता. जरी योग्य नोकरी नाही मिळाली तरी योग्य माणसे जरूर मिळतील, जी तुम्हाला नोकरी शोधण्यात मदत करू शकतील. अशी माणसे ओळखा आणि त्यांच्याशी जरूर कनेक्‍ट व्हा. उदा. एखाद्या संस्थेचा रिक्रूटमेंट हेड अथवा ह्युमन रिसोर्स विभागामधील मंडळी.

ट्‌विटर : ट्‌विटरचा उपयोग फक्त काही तरी वाद घालायला किंवा मी सध्या काय करतोय हे सांगण्यापुरता नाही, तर ट्‌विटर वापरून तुम्ही तुमची नवीन नोकरी शोधू शकता. ट्‌विटरवर अनेक लोकांना फॉलो करण्याआधी आपला स्वतःचा प्रोफाईल नीट अपडेट करा. एक योग्य फोटो (अवतार) निवडा आणि मगच लोकांना फॉलो करणे चालू करा. फक्त आपल्याबद्दलच नव्हे, तर आपल्या कार्यक्षेत्राबद्दलही ट्‌विट करत चला. ट्‌विटरमध्ये फक्त जॉब नाही, तर व्यक्तींना शोधा. आजकाल अनेक संस्था आणि रिक्रूटमेंट एजन्सीज ट्‌विटरवर आहेत. ते नवीन जॉब ट्‌विटरवर अपडेट करीत असतात. त्यामुळे हा जॉब ट्‌विट केल्या क्षणीच आपल्याला समजू शकतो. उदा. KPITCummins (@kpitcareers), ADP (@adpcareers).

फेसबुक : फेसबुकचा तसा थेट नोकरी मिळवण्यात वापर कमी आहे; पण फेसबुकमध्ये तुम्ही अनेक लोकांशी अगदी कमी वेळात संपर्क साधू शकता आणि संवाद साधू शकता. त्यामुळे "लिंक्‍डइन' आणि ट्‌विटरमार्फत ज्या व्यक्ती तुम्ही शोधल्या आहेत त्यांच्याशी परिचय वाढवण्यासाठी तुम्ही फेसबुकमध्ये त्यांचे मित्र बनू शकता आणि हो, आपला फेसबुक प्रोफाईल अतिशय व्यवस्थितपणे बनवा. तुमच्या आवडी-निवडी, छंद, आवडते खाद्यपदार्थ, पुस्तके, लेखक इत्यादी वैयक्तिक स्वरूपाची माहिती, ज्यामुळे व्यक्तिमत्त्व समजते. अनेक रिक्रूटर्स एखाद्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याचा फेसबुक प्रोफाईल नक्की पाहतात. असे होऊ देऊ नका, की तुम्ही मुलाखतीमध्ये माझा वाचन हा छंद आहे असे सांगाल आणि फेसबुक प्रोफाईलमध्ये वाचन बिलकूल आवडत नाही, असं लिहिलंय. तुम्हाला त्वरित खोटारडा ठरवून बाद केले जाईल. त्यामुळे फेसबुक प्रोफाईलकडेही व्यवस्थित लक्ष असू द्या.

यू ट्यूब : सचिन तेंडुलकरची वन-डेमधील डबल सेंच्युरी पुन्हा पाहायची आहे? पाहिजे तेव्हा पाहता येईल. यू ट्यूबवर अनेक चाहत्यांनी तो व्हिडिओ अपलोड केला आहे ना. पाहिजे तेव्हा सचिनची सेंच्युरी पाहा. तसेच पाहिजे तेव्हा रिक्रूटर्सना आपली माहिती काही क्षणांत मिळवता आली आणि तीही आपल्याच मुखातून तर...? दर वेळी प्रत्यक्ष भेट होईलच असे नाही. यासाठी आपला "व्हिडिओ रेझ्युमी' बनवून तो यू ट्यूबवर अपलोड करून ठेवा. सध्या "व्हिडिओ रेझ्युमी'चा सर्वांत मोठा फायदा म्हणजे, अगदी फारच कमी लोकांचा स्वत:चा "व्हिडिओ रेझ्युमी' आहे. अनेकांच्यातून वेगळे असे काही आपले असलेले केव्हाही चांगलेच ना. एक चांगला "व्हिडिओ रेझ्युमी' हा छोटा, आपल्याबद्दल माहिती देणारा, आपण संस्थेस कसा फायदा पोचवून देऊ शकू हे सांगणारा असावा.

वरील सोशल मीडियासोबतच आपण गूगल ऍलर्टस्‌, फ्रीलान्सिंग, ट्‌विटर सर्च, स्वतःचा ब्लॉग इत्यादी वापरूनही जॉब शोधू शकता. हे सर्व पर्याय जर एकत्रितपणे व्यवस्थित नियोजन करून वापरले तर फक्त आपल्या नजीकच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील रोजगारसंधी आपणास उपलब्ध होतील; गरज आहे ती फक्त "सोशल' होण्याची.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive