साहित्य - २ बेबीकॉर्न, २0 ग्रॅम गाजर, १५ ग्रॅम ब्रोकोली, २0 ग्रॅम मशरूम, एक वाटी पालक चिरलेली, २0 ग्रॅम फ्लॉवर (किंवा कोणतीही सीझनल भाजी वापरली तरी हरकत नाही) मीठ, एक टे. स्पून राईस (यलो) वाईन, एक टी स्पून पांढरी मिरी पूड, टोमॅटो सॉस दोन टे. स्पून.
कृती - पालक सोडून सर्व भाज्या शिजवाव्या. नंतर त्यात पालक, मीठ, मिरी पूड घालावे. राईस (यलो) वाईन व टोमॅटो सॉस घालून मिक्स करून बाऊलमध्ये गरमागरम सर्व्ह करावे.
२) व्हेज फ्राईड राईस
साहित्य- २५0 ग्रॅम बासमती तांदूळ, ५0 ग्रॅम गाजर, ५0 ग्रॅम फरसबीन, ५0 ग्रॅम हिरवे वाटाणे, एक हिरवी सिमला मिरची, दोन टी स्पून मिरे पूड, एक टे. स्पू. सोया सॉस, बारीक चिरलेली कांद्याची पात वरून टाकायला, तेल, मीठ.
कृती - गाजरचे चौकोनी तुकडे करावेत. फरस बीन व सिमला मिरचीचे पातळ काप करावे. सर्व भाज्या धुवून-शिजवून त्यातील पाणी निथळून बाजूला ठेवावा. तांदळात मीठ टाकून शिजवून थंड करून ठेवावा. कढईत तेल घालून त्यात भात घालून सर्व भाज्या- मीठ, मिरेपूड, सोयासॉस घालून नीट टॉस करून मिक्स करावे. कांदा पात मिक्स करून थोडी कांदा पात वाढताना वरून टाकून सर्व्ह करावे. तांदूळ शिजवताना भाज्यांचे पाणी वापरल्यास छान वेगळी चव येते.
३) व्हेज स्प्रिंग रोल
साहित्य- पारीसाठी एक वाटी कॉर्न फ्लोअर, अर्धा वाटी मैदा, मीठ चवीनुसार.
सारणासाठी - गाजर, सिमला मिरची, कोबी, पातीचे कांदे, तेल, सोया सॉस, मिरे पूड, टोमॅटो सॉस, मीठ, कॉर्न फ्लोअर, तेल.
कृती - कांदे-गाजर-सिमला मिरची-कोबी, सर्व भाज्या लांब पातळ चिरावी. पॅनमध्ये तेल घालून त्यात कांदा-गाजर घालून थोडे परतावे. सिमला मिरची-चिरलेला कोबी दोन मिनिट टाकून परतावा. त्यात सोयासॉस, मिरेपूड, मीठ घालून मिक्स करून गॅस बंद करून गार करायला ठेवावे. १ टे. स्पू. कॉर्न फ्लोअर अर्धा कप पाण्यात मिक्स करावे. पारीसाठी कॉर्न फ्लोअर, मैदा, मीठ मिक्स करून पाण्याने धिरड्याचे पीठाप्रमाणे पातळसर मिक्स करावे. नॉन स्टिक तव्यावर थोडे तेल टाकून पारीचे मिश्रण पसरावे. पातळ धिरडी तयार करून ठेवावी. धिरड्यांवर भाजीचे मिक्स मधोमध पसरावे. धिरड्यांची गोल गुंडाळी करून कॉर्न फ्लोअरची तयार पेस्ट लावून पारी चिकटवून टाकावे. असे सगळे धिरड्यांचे रोल करून ठेवावे. ऐन वेळेवर तेलात खरपूस बदामी रंगावर तळावेत. तेलातून काढून कागदावर ठेवावेत. तिरके कापून सॉसबरोबर खायला द्यावेत.
४) स्वीट अँड सॉर पोटॅटो
साहित्य- ५00 ग्रॅम बटाटे, दोन कांद्याची पात, तेल, मीठ, चिली सॉस, सोया सॉस, टोमॅटो केचअप, साखर, व्हिनेगर, कॉर्न फ्लोअर, लसूण पाकळ्या, दोन सुक्या लाल मिरच्या, तेल, पाणी.
कृती - बटाटे सोलून मध्यम काप करावे. कांद्याची पात बारीक चिरावी. तेलात बटाटे परतवून घ्यावे. पाणी टाकून झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यावे. एका कढईत थोडे तेल टाकून चिरलेला लसूण, सुक्या लाल मिरच्या घालून परतवून त्यात सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, मीठ, व्हिनेगर, साखर घालून शिजलेले बटाटे टाकावेत. सारखे ढवळत राहावे. पाण्यात दोन टे. स्पू. कॉर्न फ्लोअर मिक्स करून भाजीत टाकावे. दोन मिनिट उकडू द्यावेत. दाटसर झाल्यावर गॅस बंद करावे. ही भाजी फ्राईड राईस बरोबर चांगली लागते.
५) पनीर लॉली पॉन
साहित्य- १00 ग्रॅम पनीर, हिरव्या मिरच्या, आले, लसूण पेस्ट, २ बटाटे, सोया सॉस, मीठ, मिरे पूड, कॉर्न फ्लोअर, तेल, मैदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आईस्क्रीम काड्या किंवा बेबीकॉर्न.
कृती- पनीर किसून मळून घ्यावे. बटाटे उकडून मॅश करावेत. मळलेल्या पनीरमध्ये बटाटे, मीठ, लसूण पेस्ट, १ टे. स्पून सोयासॉस १ टी स्पून मिरे पूड, २ टे. स्पून, कॉर्न फ्लोअर, कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावेत. मिश्रणाचे समान भाग करावे. प्रत्येक भाग गोल वळवून आईस्क्रीमच्या काडीला किंवा बेबी कॉर्नच्या जाड बुडाला हा गोळा लावून थोडं दापावं. कढईत तेल गरम करून तयार लॉली पॉप, मैद्यात घोळवून गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर कुरकुरीत तळावेत. तेलातून काढून कागदावर ठेवावेत. टोमॅटो सॉस किंवा शेजवॉन सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत.
६) चायनीज स्टाईल कुरकुरीत भेंडी
साहित्य - २५0 ग्रॅम कोवळी भेंडी, पाच-सहा सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ, २ टे. स्पून सोया सॉस, तेल, १ टे. स्पून, कॉर्न फ्लोअर, २ टे. स्पून टोमॅटो सॉस.
कृती - भेंडी धुवून पुसून तिरके लांबट काप करावे. लाल मिरच्यांची भरड पूड करावी. भेंड्यांना सोया सॉस, मीठ, कॉर्न फ्लोअर लावून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावी. कढईत थोडे तेल गरम करून त्यात चिरलेला लसूण, मिरचीची भरड पूड परतावी. तळलेल्या भेंड्या घालून टोमॅटो सॉस व सोया सॉस घालावे. सॉस आटेपर्यंंंत परतवून गॅस बंद करावे.
७) चिली पनीर
साहित्य- २00 ग्रॅम पनीर, १ कांदा, ५-६ लसूण पाकळ्या, सिमला मिरची-२, ५-६ हिरव्या मिरच्या, मीठ, सोया सॉस, कॉर्न फ्लोअर, तेल.
कृती - पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. १ टे. स्पून कॉर्न फ्लोअरमध्ये पनीरचे तुकडे घोळवून गरम तेलात मध्यम आचेवर तांबूस होईपर्यंंंत तळावेत. काढून कागदावर ठेवावेत. २ टे. स्पून कॉर्न फ्लोअर अर्धा कप पाण्यात मिसळून ठेवावेत. सिमला मिरच्या, हिरव्या मिरच्या, कांदे-लांबट कापावे. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण घालून परतून कांदा, सिमला मिरची, हिरव्या मिरच्या टाकून दोन मिनिटे परतावी. तळलेले पनीरचे तुकडे मीठ, सोया सॉस घालून नीट मिसळावे. कॉर्न फ्लोअरचे पाणी घालून दाटसर होईपर्यंंंत ढवळावे. गरमागरम सर्व्ह करावे.
- राजश्री शिंदोरे
No comments:
Post a Comment