आपल्याकडे स्वयंपाकघरात न वापरल्या जाणार्या; पण परदेशात वापरल्या जाणार्या तेलांचा विचार करताना द्राक्षाच्या बियांपासून तयार केल्या जाणार्या तेलाची माहिती घेऊ. द्राक्षाच्या बियांची चर्चा होणारच आहे, तर द्राक्षाच्या गुणधर्मांंचाही आधी विचार करूया. कारण वाळवलेली द्राक्षे म्हणजे बेदाणे आणि मनुका या सुक्या मेव्यात वापरल्या जाणार्या गोष्टी औषधी गुणधर्म असलेल्या आहेत आणि बेदाणे तर लाडू, साखर भात, नारळीभात, बिर्याणी अशा अनेक पदार्थांंंत वापरले जातात. पंचखाद्यासारख्या नैवेद्याच्या पदार्थांंतही ते घालण्याची पद्धत आहे.
'व्हिटिस विनिफेरा' हे शास्त्रीय नाव असलेल्या द्राक्षाच्या पांढरी, लाल, हिरवी, काळी अशा अनेक जाती आहेत. बिया नसलेल्या द्राक्षांमध्ये थॉम्प्सन सीडलेस, रशियन सीडलेस आणि ब्लॅक मोनुक्का अशा तीन मूळ जाती आहेत. यापासून आता डझनभर नवीन जाती तयार केल्या गेल्या आहेत. बेदाण्याला साधारणपणे इंग्रजीत रेझिब्स म्हणतात, तर मनुकांना करंटस् असं म्हटलं जातं. थॉम्प्सन सीडलेस द्राक्षे वाळवली की त्यांना 'सुल्तानाज्' असं म्हटलं जात असे. पण आता वाळवलेल्या पांढर्या आणि रंग बदलून वाळवलेल्या लाल द्राक्षांनाही सुल्तानाज् असं म्हटलं जातं.
द्राक्षांमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत. द्राक्षांच्या सालामध्ये असलेल्या रीज्व्हेरॅट्रॉल या पॉलिफेनॉलमध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. याचा उपयोग हृदयविकार, कर्करोग, चेतासंस्थांचे रोग, व्हायरल इन्फेक्शन्स आणि अल्झायर्मस डिसीज यांना प्रतिबंध करण्यासाठी होतो. वृद्धत्वामुळे होणार्या हृदयरोगाचा तसेच स्नायूंच्या कमजोरीचाही प्रतिबंध त्यामुळे होऊ शकतो. रीजव्हेरॅट्रॉलच्या अल्झायर्मससाठी होऊ शकणार्या उपयोगामुळे तो सध्याच्या संशोधनाचा एक प्रमुख विषय बनला आहे. या पॉलिफेनॉलमुळे विघातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास व रक्ताच्या गाठी न होण्यासही उपयोग होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास तसेच अर्धांंंग, हृदयरोग यांना प्रतिबंध होण्यास मदत होते. द्राक्षाची साल व बिया यामध्ये हे आरोग्याला अत्यंत उपयुक्त असे रसायन विपुल प्रमाणात असते. जांभळ्या द्राक्षांमध्ये अँन्थोसायनिन हे पॉलिफेनॉल प्रामुख्याने असते. याचा उपयोग मानवी आरोग्यासाठी काय होऊ शकतो, हाही सध्याच्या संशोधनाचा विषय आहे. रेड वाईन बनवताना द्राक्षे सालासकट आंबवलेली असतात. त्यामुळे रेड वाईनमध्ये सालामधले उच्च गुणधर्म येतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात तिचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह असते. व्हाईट वाईन बनविताना द्राक्षे साल काढून मग आंबवली जातात. त्यामुळे सालामधले गुणधर्म त्यामध्ये येत नाहीत. हल्लीच्या संशोधनानुसार मस्कॅडिन द्राक्षांच्या सालींमध्ये एलॅजिक अँसिड हे फेनॉलिक संयुग असते, ज्याचा फायदा आरोग्यासाठी होतो, असे आढळले आहे.
द्राक्षांमध्ये जरी आरोग्याला पोषक असे गुणधर्म असले, तरी त्यामध्ये साखर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे द्राक्षे प्रमाणातच खायला हवीत. द्राक्षांपासून जॅम, जेली, ज्यूस, व्हिनेगर, वाईन, बेदाणे, मनुका इत्यादी तयार केले जातात. द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात क आणि के जीवनसत्त्व, पोटॅशिअम, फॉस्फरस वगैरे असतात. द्राक्षांमधले हे गुणधर्म काही प्रमाणात, वाळवलेल्या द्राक्षांमध्ये म्हणजेच बेदाणे, मनुका यामध्येही असतात. मनुकांचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
द्राक्षांच्या बियांपासून जो अर्क काढला जातो त्यामध्ये भरपूर प्रमाणात इ-जीवनसत्त्व, फ्लेवनॉइडस्, लिनोलिक अँसिड वगैरे आरोग्याला पोषक अशी रसायने असतात. अर्थातच त्यामुळे त्यामध्ये भरपूर अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. या अर्काला इंग्रजीत 'ग्रेप सीड एक्स्ट्रॅक्ट' असं म्हणतात आणि त्याचा उपयोग कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, उच्च रक्तदाब व हृदयविकार नियंत्रित करण्यासाठी, कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी होतो. त्याचा उपयोग एच.आय.व्ही.च्या विरुद्धही होऊ शकतो. या अर्कावर झालेल्या संशोधनानुसार त्याचा उपयोग जखमा भरून येण्यासाठी, दातांच्या दुखण्यासाठी, ओस्टिओपोरॅसिसवर उपचार म्हणून, त्वचेच्या कर्करोगावर उपचार म्हणून तसेच अतिनील किरणांमुळे त्वचेची हानी होऊ नये म्हणून होऊ शकतो. हा अर्क स्तनांच्या कर्करोगावर तसेच रजोनवृत्ती झालेल्या स्त्रियांमधील हार्मोन्सबद्दलच्या समस्यांवर उपयोगी ठरू शकेल की नाही, यावर सध्या संशोधन चालू आहे.
द्राक्षाच्या बियांपासून तेल काढले जाते ज्याला 'ग्रेपसीड ऑईल' असं इंग्रजीत म्हटलं जातं. या तेलात ११ टे संपृक्त, १६-१७ टे मोनोअसंपृक्त आणि ७२ ते ७३ टे पॉलिअसंपृक्त मेदाम्ले असतात. ओमेगा ६ मेदाम्लांचे प्रमाण या तेलात भरपूर असतं. या तेलाचा स्मोक पॉइंट २१६ डिग्री से. म्हणजे उच्च असतो. त्यामुळे हे तेल तळणे, परतणे अशा स्वयंपाकातल्या प्रक्रियांसाठी सुरक्षितपणे वापरता येतं. सॅलड ड्रेसिंग्स्, मेयोनीज, मसालामि२िँं१्रूँं१त तेल यासाठीही हे वापरता येतं. द्राक्षे आणि बियांच्या अर्काप्रमाणे या तेलातही भरपूर इ जीवनसत्त्व आणि रसायने असतात, ज्यामध्ये अँन्टिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे विघातक कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतोच; पण प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी, संधिवातामधली सूज, वेदना कमी करण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो.
हे तेल त्वचा आणि केस यासाठी उत्तम समजलं जातं. त्वचा मृदू राहण्यासाठी, आद्र्रता कायम राहण्यासाठी बनवल्या जाणार्या मॉइश्चरायझरमध्ये याचा उपयोग होतो. अँरोमाथेरपीत कॅरियर ऑईल म्हणून याचा उपयोग होतो. मुरुमे, त्वचेवरची खाज, अकाली वार्धक्याच्या खुणा, सुरकुत्या, गरोदरपणामुळे पोटावर, स्तनांवर येणारे स्ट्रेच मार्क्स यावर याचा उपयोग होतो. अतिनील किरणांमुळे त्वचेला हानी होऊ नये याचा उपयोग होऊ शकतो. या सर्व कारणांसाठी सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगामध्ये या तेलाचा खूप वापर होतो. ज्यांना द्राक्षांची अँलर्जी नाही अशांना ग्रेपसिड ऑईल आणि बियांपासून काढलेला अर्क या दोन्हीचा वापर सुरक्षितपणे करता येतो; पण कधीकधी अर्क जास्त प्रमाणात घेतला गेला तर मळमळणे, डोकेदुखी, चक्कर येणे, पोटदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे असा कोणताही उपाय आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा हे उत्तम.
- डॉ. वर्षा जोशी
No comments:
Post a Comment