Saturday, October 6, 2012

How to Meditate?

मेडीटेशन करण्याची पद्धती:



शांत, निवांत खोली निवडावी. (सहाय्यक तंत्र)

मंद प्रकाश योजना असल्यास उत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य. (सहाय्यक तंत्र)



सुखासन वा स्वस्तिकासना सारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत. पद्ममुद्रे प्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी), व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो म्हणून खबरदारी घ्यावी.



शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे त्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.



सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.



आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना (Witnessing the mind) अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.



साक्षीभावना सुद्धा कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.



आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्या सारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.



सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.
सातत्य्याने मेडीटेशन केल्यास मन प्रसन्न होते, मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. चित्तवृत्ती प्रसन्न राहिल्याने कामाचे दडपण कमी होते, कामाचा उरक चांगला होतो व सातत्य राहते. याचे सुपरिणाम यशात बदललेले पाहावयास मिळतात.
इंन्ट्यूशन सारख्या सूचकतेने कठीण प्रश्न सोडविण्यास मदत होते हे २०११ सालात संशोधनांते सिद्ध झाले आहे. त्याचा उपयोग करून घ्यावा 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive