Saturday, October 6, 2012

आइसक्रीम रोमान्स

' Exclusive preview for international travellers' अशी जाहिरात २००९मध्ये दिल्लीच्या साकेत भागातील एका मॉलमधील आइसक्रीम आऊटलेटमध्ये झळकली आणि त्याने भारतीयांनी आपल्याच भूमीत हीन वागणूक मिळत असल्याची ओरड केली. देशभरातील विशेषतः उच्चभ्रू वर्तुळाला पारतंत्र्यात असल्याची जाणीव झाली. ब्लॉग, वेबसाइटवर पडसाद उमटू लागले. खरे तर या वर्तुळातील प्रत्येक बिंदूने कधी ना कधी परदेशात या आइसक्रीमची चव चाखली होती. पण आमच्या शहरात दाखल होताना पहिल्याच दिवशी या ब्रँडने परदेशी नागरिकांना पायघड्या घालाव्यात ही 'चव' त्यांना काही रूचली नाही. पुढे या परदेशस्थ कंपनीने साय-साखरेत घोटवून दिलगिरी व्यक्त केली आणि सर्वांनी मोठ्या चवीने माफ करीत, 'हॅगेन डाझ'चे कप अखेर हाती घेतले.

युरोपात पूर्वापारपासून जम बसवलेल्या आइसक्रीम मार्केटने गेल्या तीन दशकांत भारतातही पंख विस्तारले आहेत. अनेक ब्रँडेड डेझर्ट भारतात का दाखल होतात, त्याचे विश्लेषण आकडेच करू शकतात. केवळ विविध कंपन्यांच्या नावांच्या वेष्टनात गुंडाळलेल्या आइसक्रीमची विक्री सध्या ६० कोटी डॉलरपर्यंत पोहोचली आहे आणि येत्या दोन वर्षांत ती ९० कोटी डॉलरचा आकडा पार करील. म्हणूनच अनेक मोठ्या शहरांत आता युरोप-अमेरिकेतील बडे ब्रँड दाखल होत आहेत. अमेरिकेतील 'हॅगेन डाझ'ने अवघ्या चार वर्षांतच दिल्ली-मुंबईसारख्या शहरांतील आइसक्रीमप्रेमींना वेगळी चव दाखवली. जगातील रूचकर, पौष्टिक आणि महाग आइसक्रीम म्हणून ओळखले जाते. एका स्कूप व कपसाठी ३०-८० रु. मोजणाऱ्या आणि मेन्यूकार्डवरील आकडे जोखून ऑर्डर करणारे 'हॅगेन डाझ'च्या प्राइस टॅगने अजूनही गार पडतात. पण चवीसाठी कधी तरी अशी उधळपट्टी करण्याची तयारी असलेलेच त्याची चव जाणतात.

थेट फ्रान्सहून आणले जाणारे हे आइसक्रीम. विमानतळावर उतरल्यापासून कायम उणे २६ अंश सेल्सिअस तापमानात ते ठेवले जाते. क्रीम, चॉकलेट, नट्सचा अगदी ब्रिटन, अमेरिका, कॅनडात मिळणारा दर्जा मुंबईतही टिकवण्यासाठी हे तापमान राखणे आवश्यक. त्यासाठी वापरले जाणारे शीतगृहही परदेशातून आयात केलेले. म्हणूनच 'हॅगेन डाझ'ची चव अजूनही दिल्ली-मुंबईसारख्या मोजक्या शहरांतच मर्यादित आहे. पण त्याचा दर्जा कुठेही समानच आहे. 'हॅगेन डाझ'च्या अनेक आइसक्रीममध्ये वापरले जाणारे डार्क चॉकलेट बेल्जिअममध्ये तयार होते. व्हॅनिला मादागास्करहून येतो. तर मॅकादामिआ (कॉफीसारखे नट्स) जगातील सर्वोत्तम ठिकाणांहून आयात होतात. परिणामी 'हॅगेन डाझ'च्या प्रत्येक आइसक्रीमची चव जिभेवर रेंगाळते.

सुमारे २५ प्रकारांत हे आइसक्रीम मिळते. व्हॅनिला, चॉकलेट आणि कॉफी फ्लेवरमधील आइसक्रीम ही तर 'हॅगेन डाझ'चे वैशिष्ट. त्यातही बेल्जिअन चॉकलेट, चोक-चोक चिप, मँगो, तिरामिसू, कॅपेचिनो कॅरिमल ट्रफल, स्ट्रॉबेरीज अँड क्रीम ही मुंबईत विशेष चवीने खाल्ली जाणारी आइसक्रीम आहेत. कॅपेचिनो कॅरेमल ट्रफलचा करड्या रंगाचा गोळा, पिवळाधम्मक मँगो सोरबेट, फिक्या गुलाबी गोळ्यावरील लालबुंद स्ट्रॉबेरीचे तुकडे पखरलेले स्ट्रॉबेरीज अँड क्रीम आणि चॉकलेटचा अर्क सामावलेले बेल्जिअन चॉकलेट खाण्यात तर खरी मजा आहे. कुकीजची चव आवडणाऱ्यांसाठी कूकीज अँड क्रीम म्हणजे तर पर्वणीच ठरावी. लिचीची खरीखुरी चव अनुभवायची तर डल्सी द लिची तयार आहे. याशिवाय पांढराशूभ्र व्हॅनिलाचा गोळा जणू या आइसक्रीमच्या शुद्धतेचीच प्रचिती देत असतो. हे सुख अनुभवायचे तर तशी किंमतही मोजावी लागणारच. म्हणूनच 'हॅगेन डाझ'चे एक स्कूप आहे १८० रु. याशिवाय मोजक्या फ्लेव्हरमध्ये सिग्नेचर क्रीएशन्स तयार आहेत. पण त्यासाठी २०० ते १८०० रु. मोजावे लागतील. पिंटमधील कोणताही फ्लेव्हर २०० रु.ना मिळतो.

आइसक्रीम विरघळ्यापूर्वी म्हणजे घाईघाईने खाल्ले पाहिजे ही संकल्पनाच 'हॅगेन डाझ'मध्ये बाद ठरते. लवकर विरघळणार नाही आणि आइसक्रीमप्रेमींना कणाकणाने त्याची चव चाखता येईल, या हेतूनेच हे आइसक्रीम ठेवले जाते. म्हणूनच स्कूप किंवा कपमधील 'हॅगेन डाझ'वर इतर आइसक्रीमप्रमाणे पटापट तुटून पडण्याची गरज नाही. त्याची नजाकत व सुंदरता पाहात, त्याची निर्मिती करणाऱ्यांच्या अदाकारीला दाद देत, हळुवार अंतरंग उलगडत, अधिकाधिक क्षण त्याच्या सहवासात घालवून तृप्त होणे हीच हे आइसक्रीम खाण्याची रित आहे. म्हणूनच 'हॅगेन डाझ' म्हणजे 'आइसक्रीम रोमान्स' आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive