Sunday, September 4, 2011

गणपती...एक सांस्कृतिक प्रवास



लोकप्रिय देवतांमध्ये गणपतीचं स्थान सगळ्यात वरचं आहे. विविध रूपांत भक्तांना भुरळ घालणाऱ्या गणपतीच्या सांस्कृतिक प्रवासाचा घेतलेला वेध.
.........

आज गणपती ही चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची अधिष्ठात्री देवता आहे. गणेशपूजन केल्याशिवाय कुठल्याही कार्याची सुरुवात होत नाही; अगदी आधुनिक जीवनसरणी अनुसरणारेदेखील लॅपटॉपवर आधी गणेशप्रतिमा झळकवतात. एवढी गणपती ही देवता आज सर्वसामान्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. मात्र काळाचं थोडं उत्खनन केलं, तर या देवतेचा इथपर्यंत झालेला धार्मिक- सांस्कृतिक प्रवास, हा एका मोठ्या सामाजिक अभिसरणाचा भाग असल्याचं उघड होतं. आणि हे अभिसरण समाज बदलतो, तसं दैवतांचं स्वरूप कसं बदलतं, हेच दर्शवणारं आहे. किंबहुना एखाद्या समाजाचा घडता इतिहास हा एखाद्या दैवताचाही इतिहास कसा असतो, ते गणपती या देवतेच्या विकसनप्रक्रियेतून सिध्द होतं.

सर्वसाधारणपणे कुठल्याही दैवताच्या विकसन प्रक्रियेकडे समाजाचं लक्ष नसतं. देवता मग ती शंकर-विष्णू असो, विठोबा असो अथवा खंडोबा. लहानपणापासून थोर मंडळी जे सांगतात, तेच भाविकपणे-भाबडेपणे स्वीकारण्याचं काम समाज करत असतो. परंतु इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, मानववंशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, लोकसाहित्यज्ञ ही मंडळी देव असो वा माणूस वा एखादा समाज, त्याचा सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक असा आडवा-उभा छेद घेत असतात. या विच्छेदनानंतर त्यांच्या हाताला गवसलेलं सत्य काही भन्नाटच असतं. क्वचितकधी सर्वसामान्यांच्या बुद्धीला, भावनेला न झेपणारं. आज सर्व हिंदुधर्मीयांचं महत्त्वाचं दैवत असलेल्या गणपतीची पुरातत्त्वीय, दैवतशास्त्रीय किंवा ऐतिहासिक छाननीही अशीच आहे. एखादं गूढ उकलत जावं, तसा गणपतीचा हा प्रवास आकळत जातो. आणि तो जसा आकळत जातो, गणपतीच्या विविध प्रतिमा या उत्खननातून हाती लागतात. मग कधी तो गणनायक असतो, कधी तंत्रमार्गी असतो, कधी तो विघ्नकर्ता असतो, तर कधी आजचा सुखकर्ता-दु:खहर्ता.

प्रसिद्ध दिवंगत विचारवंत स. रा. गाडगीळ यांनी आपल्या 'लोकायत' पुस्तकात या संपूर्ण विकसन प्रक्रियेचा सविस्तर लेखाजोखा मांडलेला आहे. गणपती या देवतेचा वैदिक काळातील गणदेवता म्हणून सुरू झालेला प्रवास आजच्या 'इष्टदेवता' रूपापर्यंत कसा येऊन पोचला, त्याचा अतिशय मार्मिक वेध गाडगीळांनी घेतला आहे. पण 'गणदेवता' आणि 'इष्टदेवता' या दरम्यान गणपती देवतेचं रुप 'विघ्नहर्ता' ऐवजी 'विघ्नकर्ता' कसं होतं, ते पाहणं अधिक औत्सुक्याचं ठरेल. मात्र गणदेवता असो वा इष्टदेवता-विघ्नदेवता... गणपती दैवताच्या एकूणच विकसनाचा माग घेतला की, त्या-त्या काळातील बुद्धिवंत मातीचा गणपती किंवा गणपतीची माती कशी करू शकतात, ते उमगतं. गणपती या देवतेला या संपूर्ण प्रक्रियेतून जावं लागलं आहे.

वास्तविक वैदिककाळात गणप्रधान समाज असल्यामुळे आणि वैदिक ऋषी स्वत: त्या गणपप्रधान समाजात राहात असल्यामुळे त्यांनी गणसमाजाचा नायक असलेल्या गणपतीला हरकत घेतलेली नाही. किंबहुना ऋग्वेदात 'गणानाम् त्वां गणपती हवामहे...' अशा शब्दात गणपतीची स्तुती केली आहे. मात्र वेदकालीन गणपती गजशीर्ष नव्हता, असं स.रा.गाडगीळ म्हणतात. 'लोकायत' पुस्तकात ते म्हणतात-'वैदिक ऋषींनी अगदी मुक्तकंठाने गणांचे महात्म्य वर्णिले आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून गणपती हा विघ्नकर्ताही नाही आणि विघ्नहर्ताही. किंबहुना त्यांना गजमुखी गणपतीच अज्ञात आहे.'

म्हणजेच आज लोकप्रिय असलेला हस्तिमुख गणपती तेव्हा अस्तित्त्वात नव्हता. तेव्हा गणांचा नायक तो गणपती याच अर्थाने 'गणपती' ही संज्ञा वापरली जायची. गणनायकाला हस्तिमुख मागाहून चिकटलेलं दिसतं. मूळच्या गण 'नायकाला' हत्तीचं तोंड कुठे चिकटलं त्याचा शोध मानववंशशास्त्रज्ञांनी कुललक्षण-कुलचिन्हाचा (टोटेमिझम) सिध्दान्त वापरुन स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मतानुसार, ज्या गणसमाजाचं टोटेम म्हणजे गणचिन्ह हत्ती होता, असा गणसमाज कालांतराने नावारुपाला आला आणि साहजिकच त्या गणसमाजाचं चिन्ह असलेला हत्ती देवतारूप म्हणून समोर आला.

परंतु शेवटी गणसमूह म्हणजे लोकसमूहच. मग लोकसमूह किंवा त्या समूहाच्या देवतेची प्रगती तत्कालीन उच्चवणीर्यांना कशी सहन होणार? त्यातूनच वेदोत्तर काळात लिहिल्या गेलेल्या मानवगृह्यसूत्र, याज्ञवल्क्यस्मृती, मनुस्मृती यांसारख्या स्मृतींनी गणपती देवतेची निंदा करायला सुरुवात केली. स्मृतिकारांनी गणपतीला थेट 'विघ्नकर्ता' ठरवून टाकलं. याज्ञवल्क्याने तर, रुद्राने गणपतीची योजनाच संकटांच्या निर्मितीसाठी केली असल्याचं म्हटलं आहे. याज्ञवल्क्य स्मृतीत गणपतीसाठी 'विनायक' हे संबोधन वापरलेलं आढळतं. आज हे संबोधन चांगल्या अर्थाने वापरलं जातं. परंतु याज्ञवल्क्य स्मृतीत मात्र ते वाईट अर्थानेच वापरलेलं होतं आणि त्यासाठी याज्ञवल्क्याने 'विनायक: कर्मविघ्नसिध्यर्थ विनियोजित:' असं म्हटलं आहे. याच पद्धतीने मनुस्मृतीनेही गणपतीची निंदा केलेली आहे. आणि या निंदेचं कारण म्हणजे तेव्हा 'लोकायत' म्हणजे तत्कालीन बहुजन समाजात गणपती देवतेला प्राप्त झालेलं वलय.

मात्र स्मृतिकारांनी गणपतीला 'विघ्नकर्ता' ठरवलं, तरी इसवीसनोत्तर पाचव्या शतकात म्हणजे गुप्तकाळात गणपती या देवतेचा पुन्हा उत्कर्षकाळ सुरू झाला. कारण गुप्तकाळात सर्व पुराणग्रंथांना नवा उजाळा मिळाल्याचं स.रा. गाडगीळ म्हणतात. या काळात गणपती या देवतेला एकदम महत्त्व प्रापप्त झालेलं दिसतं. एवढंच नव्हे, तर स्कंदपुराण, गणेशपुराण, गणेश उपनिषद, असे गणपतीची स्तुती करणारे ग्रंथ निर्माण झाले. याचदरम्यान गणपतीच्या जन्मासंबंधी-निर्मितीसंबंधीच्या अनेक पुराणकथा निर्माण झाल्या.

गणपतीच्या या वेगवेगळ्या अवस्थांतरांची स.रा. गाडगीळ तीन टप्प्यात विभागणी करतात. पहिला टप्पा वैदकालीन गणगौरव रूपातील गणपतीचा, दुसरा टप्पा स्मृतिकालीन गणपतीचा, तर तिसरा टप्पा नव्याने महत्ता प्राप्त झालेल्या गणपतीचा. तसंच गणेशदेवतेचा हा प्रवास म्हणजे गणसमाजाच्या विकासक्रमाचे तीन टप्पे असल्याचंही सांगतात.

गणपतीची ही तीन अवस्थांतरं एकूणच उच्च वणिर्यांच्या मानसिकेतवर प्रकाश टाकणारी आहेत. म्हणजे सर्वप्रथम बहुजनसमाजातील एखादा नावारूपाला येत असेल, तर त्याची निंदा करायची. त्या निंदेचा काही परिणाम झाला नाही, तर त्याचा गुणगौरव करुन त्याला आपल्या टोळक्यात घ्यायचं आणि संपवून टाकायचं. म्हणूनच मूळचा गणसमाजातील लोकदेवतास्वरूप असलेला गणपती आता एकप्रकारे उच्चवणीर्य वेदकालीन देव झाला आहे आणि सर्व कला-विद्यांच्या महत्तम स्थानी येऊन बसला आहे.

परंतु यापलीकडेही गणेश या देवतेची पुरातत्त्वज्ञ अजून एक विकासावस्था दाखवतात. कारण पुराणकथा या पुरातत्त्वज्ञांच्या दृष्टिकोनातून भाकडकथाच. त्यांच्या मते पुराणकथांनी एखाद्या देवतेची प्रभावळ निर्माण करता येते, तिची विकासावस्था दाखवता येत नाही. याच दृष्टिकोनातून प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर ढवळीकर यांनी गणपती या देवतेची पुरातत्त्वीय मांडणी केली आहे. पाचव्या शतकाच्या आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व काळात गणेशोपासना नव्हती, असं एक मत आहे. पण ढवळीकर यांनी ते खोडून काढलंय. ते म्हणतात-,'गुप्तकाळापूर्वीचं प्रसिद्ध राजकुल म्हणजे कुशाणांचं. त्यांचं राज्य अफगाणिस्तानपर्यंत पसरलेलं होतं. पुरातत्त्वीय उत्खननात कुषाणकालीन आणि कुषाणपूर्व असे दोन्ही प्रकारचे गणपतीमूर्तीचे पुरावे सापडलेले आहेत. याचा अर्थ आर्यांच्या एखाद्या प्रबळ जमातीचं हे दैवत वायव्येकडून प्रथम उत्तर भारतात आणि नंतर उर्वरित भारतात संक्रमित होत गेलेलं असावं.'

चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याच्या ग्रंथाचीही ढवळीकर दाखला देतात आणि म्हणतात की, ह्यूएन त्संग काही महिने अफगाणिस्तानमधील तत्कालीन कपिशा नगरीत राहिला होता. त्याने लिहिलेल्या निरीक्षणांत, हत्तीच्या स्वरूपात नांदणारा 'पिलुसार' नावाचा देव कपिशावासीयांचा देव असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

गणेश या देवतेचा असा हा सांस्कृतिक प्रवास एकूणच देवतांच्या स्वरूपावर लखलखीत प्रकाश टाकणारा आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive