अवघ्या ४ महिन्यात शंभर कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या कर्तृत्ववान मुलाची आई काय करीत असेल ? ती उदबत्ती वळण्याचे काम करते. विश्वास बसत नाही ना ! त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे आपला टर्नओव्हर अब्जावधीच्या घरात आहे याची कल्पना सुध्दा मायलेकाला नाही....काही उद्योगपतींनी कोळश्याच्या धंद्यातील काळा पैसा पांढरा करण्यासाठी अशा किती तरी तरुणांना कोट्यधीश बनविले आहे. ते फक्त कागदावर.
मध्य भारतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या कोळशाचा व्यवहार होत आहे. कोळसा खाणींसाठी ब्लॉक घेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात येत आहे किंवा तसेच पडून आहे. त्यामुळे सीबीआय , आयकर , विक्रीकर विभाग आदी विविध यंत्रणांचा ससेमिरा आता कोळसा खाण मालक व व्यापाऱ्यांच्या मागे लागला आहे. मुंबईतील विक्रीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोळसा व्यापाऱ्यांविरुद्ध पाश आवळला असून नागपूर , विदर्भातील उद्योगपती व व्यापाऱ्यावर छापे टाकून कर चोरी प्रकरणाची तपासणी सुरू केली आहे.
कामठी रोडवर सिद्धार्थ गौतम विहार येथे अरुणा कोल ट्रेडिंग कंपनी आहे. कंपनीची गेल्या दीड महिन्यातील उलाढाल २६ कोटी रुपये असून फेब्रुवारीपासून ती शंभर कोटी रुपयांवर गेली आहे. या कंपनीचा मालक नरेश तुपसुंदर आहे. विविध विभागांच्या तपास यंत्रणांनी गुरुवारी या पत्त्यावर भेट दिली असता झोपडीवजा घराच्या परिसरात नरेशची आई अरुणा उदबत्ती वळत होत्या. हे दृश्य बघून अधिकारी अचंबित झाले. चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही , असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. हे संपूर्ण बोगस प्रकरण असल्याचे तोपर्यंत अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने ते लगेच सावरले.
मुलगा काय करतो , या प्रश्नावर तो खाजगी कंपनीत नोकरीवर असून कामावर गेला असल्याचे अरुणा यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच , गेल्या अनेक वर्षांपासून आपण उदबत्ती तयार करून उदरनिर्वाह चालवतो , असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तर ऐकून अधिकाऱ्यांना सर्व प्रकार लक्षात आला.
शंभर कोटीची उलाढाल करणाऱ्या नरेश तुपसुंदर याच्या मागे कुणाचा वरदस्त आहे , कोणी-कोणी या कंपनीतून लाभ उठवले , याचे कोडे तपास अधिकाऱ्यांना पडले आहे. त्याच्या कंपनीची नोंदणी कुणी केली , रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे मिळाले , या दिशेनेही तपास सुरू झाला आहे.
एका बड्या उद्योगपतीकडे काही वर्षांपूर्वीपर्यंत नोकरी करणारे दुर्गाप्रसाद सारडा यांच्याकडील नोकर अजय यादव व रवी यादव यांच्या नावे असलेल्या अनुक्रमे अजय ट्रेडलिंक व एस.एन. कोल अॅण्ड कोक या कंपन्यांची उलाढाल तब्बल २६६ कोटी रुपयांची असल्याचे अलीकडेच उघडकीस आले. या पार्श्वभूमीवर नरेशचा बोलवता धनी शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
..........................
चोरीचा कोळसा ओपन मार्केटमध्ये आणण्यासाठी हा सर्व डाव असल्याचा अंदाज असून त्या दिशेने तपासाची चक्रे फिरत आहेत.
नितीन तोटेवार - नागपूर
No comments:
Post a Comment