Saturday, June 30, 2012

विठ्ठल आणि गाणं अभिन्नच Vitthal and Song are integral



मी वारकरी घराण्यातलाच. त्यामुळे घरातच विठुरायाच्या भक्तीचं वातावरण होतं. विठ्ठलाच्या भक्तीचे संस्कार लहानपणीच मला मिळाले. त्यामुळे विठ्ठलाचं आणि माझं नातं अगदी खास असं आहे. मोठा होत जाताना हे नातं अधिक घट्ट झालं , जिव्हाळा अधिकच दृढ झाला. लहानपणापासून घरातच असलेल्या गाण्याचा विठ्ठलभक्ती हा स्थायीभाव होता. त्यामुळे विठ्ठलाची आराधना आणि गाण्याची साधना या माझ्यासाठी अभिन्न बाबी होत्या.
वयाच्या तेराव्या वर्षी माझा पहिला अल्बम प्रकाशित झाला , तो म्हणजे ' संतवाणी '. या अल्बमच्या माध्यमातून विठ्ठलानेच माझ्या करिअरच्या पहिल्या पायरीवरच एका परीने आशीर्वादाचा हातच माझ्या माथ्यावर ठेवला , असं मला तेव्हाही वाटलं होतं. विठ्ठलाचे अभंग असलेल्या या अल्बमचं पंढरपूरमध्ये विशेषत्वाने स्वागत झालं.
पुढे सारेमगसारख्या कार्यक्रमाने अगदी घराघरात प्रसिद्धी मिळवून दिली. सारेमगनंतर पुढली सलग तीन वर्षं मी माझ्या वाढदिवशी पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात संगीताचा कार्यक्रम केला. त्यासाठी मंदिर समितीने खास आमंत्रण दिलं होतं , हेही विठुमाऊलीने माझ्या डोक्यावर प्रेमाचं छत्र धरल्यासारखं वाटलं. पंढरीच्या विठुमाऊलीच्या गाभाऱ्यात जिथे वारकऱ्यांना दर्शनासाठीही जेमतेम काही सेकंद उभं राहायला मिळतं , आणि जिथे मोठमोठ्या दिग्गज कलाकारांनी गायन सादर केलंय , तिथे विठ्ठलाला भक्तिरसाने आळवण्याची संधी मिळाली , हे परमभाग्यच.
पंढरी , तिथलं मंदिर , चंद्रभागेचं ते वाळवंट हे सगळं लहानपणापासून माझ्यात भिनलेलं आहे. या भक्तीचा वारसा मला मिळालाय. मी शाळेत असताना वारीत काही अंतर चालत सहभागी व्हायचो. त्यावेळी हजारो , लाखो वारकऱ्यांच्या कंठातून एकमुखाने उमटणारा माऊलीचा जयघोष , पिंढरीच्या ओढीने वेगात पडणारी पावलं हे सगळं अनुभवायला मिळालं. या वारीत कोणी लहान-मोठा नसतो , गरीब-श्रीमंत नसतो. विठ्ठलभक्तीच्या समान धाग्याने एकत्र आलेले सगळे वारकरी एकमेकांशीही आपलेपणाच्या नात्याने जोडले जातात. प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व विसरून त्या भक्तीच्या प्रवाहात स्वतःला झोकून
देतो. त्या भक्तिसागरात सामावून जातो. एकतेचं , एकात्मतेचं , देवाशी आणि त्या देवाच्या अन्य भक्तांशी तादात्म्य पावण्याचं याखेरीज दुसरं उदाहरण नसावं...
वारीत मध्यमवयीन वा ज्येष्ठ भाविकांचं प्रमाण मोठं असलं , तरी तरुणांची संख्याही कमी नाही. अनेक जण आवर्जून थोड्या अंतरासाठी का होईना वारीत सहभागी होतात. आजच्या जगात बाहेर एवढी स्पर्धा असताना त्यातून वारीसाठी , विठ्ठल भक्तीसाठी थोडा का होईना वेळ काढणं हीच त्यांची भक्ती मानायला हवी. एरव्ही धकाधकीच्या या जीवनात विठ्ठलच त्यांच्याकडून ही सेवा करवून घेत असतो , असं या तरुणांचा प्रतिनिधी म्हणून मला आवर्जून सांगावंसं वाटतं. शिवाय , एरव्ही कॉलेज , अभ्यास , करिअर आदींमध्ये स्वतःला समर्पित करणारे तरुण- तरुणी आपल्या कामाशी , जबाबदाऱ्यांशी तादात्म्य पावून एका परीने विठ्ठलभक्तीच करत असतात , अशी माझी भावना आहे. दुसरीकडे पाहता , आज पंढरपूर , आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्री अनेक तरुण मृदुंग , भजन , संगीत शिकताहेत. या कलांच्या माध्यमातून भक्तिरसात रममाण होत आहेत. यातून कलाकारांची नवी पिढी घडतेय. या तरुणाईचे विठ्ठलाशी अतूट नाते आहे.
प्रत्येकाने एकदा तरी वारीत सहभागी व्हावं , असं मला अगदी मनापासून वाटतं कारण या आनंदवारीत मिळणारा सकारात्मकतेचा ठेवा जन्मभर पुरणारा , पुरून उरणारा असतो , हे नक्की. 

- मंगेश बोरगावकर  

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive