हृदयस्पर्शी काकस्पर्श
साधारणतः
स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे नेमकेपणाने सांगायचे तर गांधींची चळवळ सुरू
होती ते 1930चे दशक. त्यावेळी म्हणावी तशी सामाजिक प्रगती झालेली नव्हती.
कर्मकांड, सामाजिक ठेवण ही पूर्वीसारखीच होती. समाजाची घडी म्हणावी तशी
बदललेली नव्हती. अशा कोकणच्या पार्श्वभूमीवर एका ब्राह्मण कुटुंबात घडलेली
एक हृदयस्पर्शी कथा म्हणजे काकस्पर्श. अर्थात, ही कथा काल्पनिकच आहे पण
त्याला वास्तवाचे कांगोरे आहेत.दामले
कुटुंबातील हरिदादा यांच्यावर अचानक कुटुंबाची जबाबदारी येते आणि तो ती
आपल्या समर्थ खांद्यांवर पेलतो. बहिणीचे लग्न, आपल्या तीन मुलांचे संगोपन
आणि धाकटा भाऊ महादेव याचे एलएलबीचे शिक्षण व त्यानंतर त्याचे लग्न हे सारे
तो आपले इतिकर्तव्य समजून पार पाडतो. अगदी आनंदाने सारे काही करतो.
हरिदादा म्हणजे पुढारलेल्या मताचा पुरस्कर्ता. असे हे अगदी सुखी, हसतेखेळते
कुटुंब असते. दुर्गा ही नवी नवरी घरी आलेली असते. तिच्या सहवासासाठी
महादेव आसुसलेला असतो. पण रीतिरिवाजाप्रमाणे प्रथम ऋतुदर्शन होईपर्यंत या
दोघांना एकत्र येता येणार नव्हते. जोडय़ाने पूजाअर्चा होऊन दुर्गाला
झोपाळ्यावर बसवून जेव्हा तिची फळांनी ओटी भरली जाते व महादेव आणि
दुर्गाच्या मीलनाची वेळ येते त्याचवेळी महादेवाचे निधन होते आणि त्या
भरल्या घरावर दुःख ओढवते. जिला अजून समजही आलेली नसते, अशी दुर्गा बालविधवा
होते. महादेवाचे दशक्रियाविधी सुरू होतात. सूर्य डोक्यावर आला तरी
त्याच्या पिंडाला कावळा शिवत नाही. सर्वजण तिष्ठत असतात. अशावेळी हरिदादा
त्या पिंडाजवळ जातो आणि महादेवाला आवाहन करून तोंडातल्या तोंडात काहीतरी
पुटपुटतो. त्यासरशी कावळा पिंडाला शिवतो. काकस्पर्श होतो. ब्राह्मण जातीतील
रिवाजाप्रमाणे विधवेचे केशवपन करण्यासाठी न्हाव्याला बोलावले जाते. पण
तेवढय़ात हरिदादा तिथे पोहोचतो आणि न्हाव्याला हिसकावून लावतो. दुर्गेचे केस
शाबुत राहतात. तिला माहेरीही पाठवले जात नाही. ब्राह्मणवर्ग ह्या व अशा
काही प्रकारांमुळे चिडतो. कालांतराने हरिदादाच्या मुलाच्या मुंजेची वेळ जवळ
येते. पण पंचक्रोशीतील ब्राह्मणवर्गाने या दामले कुटुंबावर बहिष्कार
टाकलेला असतो. हरिदादा आपला परममित्र बळवंत याच्या मदतीने काशीच्या
आचार्यांकडे माफीनामा पाठवतो व तो मंजूर करून घेऊन येतो. हे सारे घडत
असताना हरिदादाची पत्नी पोटाच्या गोळ्याच्या आजाराने खाटेला खिळते. तिला
चिंता असते ती तिच्या पश्चात घराचे आणि दुर्गेचे काय होणार ते. त्यातच तिला
संशय असतो की आपल्या नवर्याचे मन दुर्गेत अडकले आहे. त्यातच तिचा जीव
जातो. असे इतरही काही प्रसंग घडतात. हरिदादा कुणाही पुरुषाची नजर दुर्गेवर
पडणार नाही, तिला इतर कुणाही पुरुषाचा स्पर्श होणार नाही, याची डोळ्यांत
तेल घालून खबरदारी घेत असतो. एखाद्या पहाडाप्रमाणे तो तिच्या पाठी खंबीर
उभा असतो. हे सर्व होत असताना दुर्गेची घुसमट होत असते. फलदर्शनाच्या
क्षणीच तिला पतीवियोग सहन करावा लागतो. त्यामुळे तिच्या काही इच्छा अतृप्त
असतात. ही अतृप्तता दिवसेंदिवस वाढत जाते. त्यामुळे अशी काही घटना घडते की
हरिदादा तिचे तोंडही पाहत नाही आणि तिच्याशी अवाक्षरही बोलत नाही. त्यामुळे
ती खचते. अंथरुण पकडते. जेवण-पाणी वर्ज्य करते. तिची समजूत घालण्याचे नाना
प्रयत्न होतात, पण ती कुणालाच बधत नाही. अखेरीस हरिदादाला काकस्पर्शाच्या
वेळी आपण महादेवाला कोणता शब्द दिला होता, ते नाईलाजाने सांगावे लागते.
त्याने महादेवाच्या आत्म्याला शब्द दिलेला असतो की तुझा जीव ज्या दुर्गेत
अडकला आहे, तिला मी कुणाही पुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही. पण त्याक्षणी
त्याला आपले वचन मोडावे लागते कारण दुर्गेचा जीव वाचवायचा असतो. तो
तिच्याशी लग्न करायला तयार होतो आणि आपल्या पत्नीचे मंगलसूत्र आणायला जातो.
तेवढय़ाच दुर्गाही या जगाचा निरोप घेते आणि हरिदादाचा शब्द अबाधित राखते.
असे हा विस्तृत कथासार.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा हा
महत्वाकांक्षी चित्रपट. त्यांच्यासाठी तो त्यांना माईलस्टोन वाटतोय.
त्यादृष्टीने तो त्यांनी साकारण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोकणाचे
निसर्गवैभव, जनरीत आणि एक अव्यक्त प्रेमकहाणी यांचा हा संगम आहे. उषा दातार
यांच्या कथेला गिरीश जोशी यांनी पटकथा आणि संवादाची झालर चढवली आहे. तरही
दाद द्यावी लागते की सचिन खेडेकर याच्या हरिदादा या व्यक्तिरेखेला. अख्खा
चित्रपट त्याने तोलून धरला आहे. स्वतःला पुरोगामी म्हणवणारा हरिदादाही
दुर्गेवर अव्यक्त प्रेम करत असतो. त्यासाठी त्याच्या हातून दुर्गेवर
अन्यायही होतो. सख्ख्या मित्राला दुखवावे लागते. त्यांची ही द्विधा
मनोभूमिका त्याने व्यवस्थित वठवली आहे. चित्रपट पाहताना वास्तव सोडून तो
भरकट जातोय असे वाटत नाही. शेवटी शेवटी अति फ्लॅशबॅकमुळे कुठेतरी लिंक
तुटते की काय असे भासते. पण तो भासच राहतो. तथापि, पूर्वार्धापेक्षा
चित्रपटाचा उत्तरार्ध पेलण्यास थोडासा अवघड जातो. तरीही विषयाची बांधणी,
चित्रीकरण, संवाद, गीते, ही सारीच भट्टी मस्त जमून आली आहे.
No comments:
Post a Comment