मोजकेच, पण जिवाचे!
मुक्ता बर्वे।
पण मला माझ्या लहानपणापासूनच सांगायला आवडेल,मला लहानपणी खूप मित्र, खूप मैत्रिणी असे नव्हतेच...
मोजके मित्र-मैत्रिणी आणि नेमकी मैत्री. इतकी सोपी होती मैत्री माझ्यासाठी!
त्या काळात मी सगळ्य़ांची मैत्रीण वगैरे होते, असंही नाहीच.
कारण मैत्री सरसकट सगळ्य़ांशी नाहीच होत ना.!
मैत्री खूप ठरवून होते.!
मैत्रीचं नात्यागोत्यांसारखं नसतं. मावशी-काका, मावशीची मुलगी, काकाचा मुलगा ही सारी नाती ही कुटुंबातून येतात. तिथे माणसांपेक्षा, व्यक्तिपेक्षा नातं महत्त्वाचं..!
पण,
या 'बाय डिफॉल्ट' नात्यांपेक्षा मैत्री नेहमीच जवळची वाटते...
कारण मैत्री आपण 'च्युस' करतो, म्हणूनच माझ्या आयुष्यात भरगच्च मित्र-मैत्रिणी नाहीत.
'फ्रिक्वेन्सी'पेक्षा 'इन्टेन्सिटी' जास्त महत्त्वाची वाटते मला.!
आजही शाळा-कॉलेजांतले माझे मित्र-मैत्रिणी माझ्या संपर्कात आहेत; म्हणजे मी त्यांच्याशी रोज बोलते, ते माझ्याशी रोज बोलतात असं अजिबातच नाहीये.
एकमेकांशी बोलून काही दिवस, काही महिने, काही वर्षे झालेली असतात, पण ते बोलणं थांबलं म्हणून तिथे मैत्री थांबत नाही.
ती नेहमीच मागच्या पानावरून पुढे सरकते..
मागचं बोलणं जिथे 'उरलं', तिथून पुढे सुरुवात होते.
आणि हे मैत्रीतच होऊ शकतं; कारण आजवर मी जी मैत्री जगले, ती अगदीच निरपेक्ष होती. अँण्ड आय मीन इट.! मी 'निरपेक्ष' हा शब्द नेमका त्याच अर्थासाठी वापरलाय. वय हा मुद्दाही इथे गौण असतो. ती त्या सगळ्य़ाच्या पलीकडे जाते. माझ्या आईच्या वयाची नीना कुलकर्णी म्हणजे माझी नीनाताई माझी खूप घट्ट मैत्रीण आहे. गिरीश जोशी आणि मी; आम्हीही खूप चांगले मित्र आहोत. तसंच सई ताम्हणकरही मैत्रीण आहे माझी.. म्हणजे मला काय म्हणायचंय की, मैत्री हे एक 'पॅकेज' आहे. ते नेहमी गोड असेल असं नाही. ते कैकदा कडूही असू शकतं. पण म्हणून ते पॅकेज नाकारावं असंही काही नाहीये.
माझे मित्र-मैत्रिणी माझ्यावर टीका करतात. पण मला ते आवडतं. कारण कोडकौतुक करणारे खूप जण असतातचं, पण अशा चुका दाखवणारे आपल्या जवळचे असतात. आणि मी करते चुका.! आपल्याला क्रिटिसाइज करणं इथे अपेक्षितचं असतं. मी म्हणते, अगदी मोकळ्य़ा मनानं क्रिटिसाइज करा. त्यात कसला आलाय स्वार्थ-परर्मश..? तिथे फक्त मोकळं 'जगणं' असतं, तेही खरंखुरं.!
आयुष्यात सोबत असलेले सगळेच मित्र-मैत्रिणी टिकतात, थांबतात असं नाहीये. जे आपल्यात नसतात, आपल्यासारखे नसतात किंवा आपण ज्यांच्यासारखे नसतो ते प्रवासात गळून पडतात. ठिके. आपणही त्यांना नीट जोखलं तर ते मित्र होऊ शकतात की नाही, ते उमगतं. झालं तर ठीक, नाहीतर पुन्हा ओके म्हणायचं.!
मी गेली कित्येक वर्षे माझ्या घरापासून एकटी मुंबईसारख्या शहरात राहतेय. अनेकदा कुणाच्या तरी 'असण्या'ची गरज असतेच, पण मित्र-मैत्रिणी खूप असतात. माझी खूप जवळची मैत्रीण रसिका जोशी. आज नाहीये ती.. पण ती किंवा सुप्रिया मतकरी, या माझ्या मैत्रिणींनी खूप पॉझिटिव्ह जगणं शिकवलं मला! जे छान असतं ते अँड करायला शिकले. बर्या-वाईट गोष्टी कळतात हळूहळू... जसजशी मैत्री 'मॅच्युअर्ड' होते, तसंतसं आपलं आपल्या घरी प्रत्येक गोष्टी सांगणं बंद होतं. कारण आपली कणकणी ते अगदी महत्त्वाच्या मीटिंगपर्यंत सगळ्य़ा गोष्टी मैत्रिणींना माहीत असतात. पण ते सारं खूप म्हणजे खूप सहज घडतं, काही जणांना. त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री जोखायची असते. काहीतरी ठोकताळे मांडून त्या मैत्रीची परीक्षा घ्यायची असते. म्हणजे मैत्री पारखण्यासाठी त्यांना उत्कठांवर्धक क्षण लागतात. एक्स्ट्रीम सुखाचे क्षण किंवा एक्स्ट्रीम दु:खाचे क्षण आपल्या आयुष्यात असतातच. मग त्या क्षणी घ्या मित्रांना पारखून. हे का असतं.?
खरंतर मैत्री म्हणजे निचरा होण्याची जागा. त्या जागेवर आपण खरेखरे कसे आहोत हे कळतं. काही बोलायला नसेल तरी चालेल, पण फक्त 'हाय, हॅलो' म्हणायला फोन केलाय! ऑफिसमध्ये राडा झालाय त्याने चिडचिड झालीये, तर ती ऐकवायला फोन केलाय. घरचे कोणत्यातरी 'क्ष' गोष्टीच्या विरोधात आहेत, त्याचा त्रास होतोय ते ऐकवायला भेटलोय.. असं कोणत्याही टप्प्यावर असतातच ना.? मैत्रीत 'असण्या'ला महत्त्व असतं. समजा, त्या वेळेला आपले मित्र-मैत्रिणी नसले तरी त्यांची वाट पाहायची. कारण त्या नात्यात खूप साहजिकता असते. तिथे आपल्याला आपली भूमिका कळते. कधी प्रसंगानुसार 'पंचिंग बॅग' व्हायचं, तर कधी पालकत्व घ्यायचं. मुळात आपले आपल्या वयाचे मित्र-मैत्रिणी हे प्रसंगांमध्ये आधार असतात.
No comments:
Post a Comment