Thursday, October 4, 2012

सज्ञान मानवा, विज्ञान हे तुझे अज्ञान होऊ देऊ नको ! : शरद उपाध्ये Rashichakrakar Sharad Upadhye

आज विज्ञान ऐहिक उपभोगासाठी जुंपलेले दिसते. विज्ञानाच्या विद्यार्थ्याला देव , धर्म या गोष्टींना नाक मुरडण्यात सुधारकीपणा वाटतो. त्याला अंतराळाची ओढ वाटते ; पण अंतरंगात एक इंचही प्रवेश करून घेता येत नाही. कुठला निसर्ग आम्ही दावणीला बांधला आहे ? निसर्गाच्या एका फटक्यात लाखो माणसे मरताहेत. माणूस मन:शांतीला दुरावला आहे. सर्वत्र अपघात , विचित्र रोग निर्माण होत आहेत. कोठे-कोठे म्हणून विज्ञान पुरे पडणार आहे ? विज्ञान आईचे वात्सल्य , वडिलांचे प्रेम , मानसिक शांतता देऊ शकणार नाही. विज्ञान मानवी बुद्धीचा श्रेष्ठ पैलू आहे. अंतरीचा गाभा नव्हे...


' महाराष्ट्र टाइम्स ' च्या ' गेस्टरूम ' मध्ये मी एक महिना राहिलो. आज ही गेस्टरूम मला खाली करायची आहे. ममतेला वियोगाचा शाप असतोच. निरोप घेताना हास्यविनोद कमी होऊन जडावलेले अंत:करण आपोआप काहीतरी विधायक उपदेश , सल्ला किंवा सूचना देण्याचा प्रयत्न करतेच. मला महाभाग्याने गेस्टरूम त्या भादपद महिन्यात मिळाली की , ज्या महिन्यात संपूर्ण गणेशोत्सव आणि महालय असतो. अश्विनात नवरात्रौत्सव साजरा होत असताना मी ती सोडत आहे. विराट शक्तिशाली जनताजनार्दनरूपी नारायणाशी थोडेसे हितगुज करावेसे वाटते.

गणपती उत्सव आपण धूमधडाक्यात साजरा केला. खूप ढोल-ताशे बडवले , गुलाल उधळला , उंच-उंच मूतीर् आणल्या , दहा दिवस जल्लोष केला. काही ठिकाणी हॉस्पिटल्स , आजारी वृद्ध यांचा जराही विचार न करता धांगडधिंगा घातला. प्रचंड गदीर्च्या मिरवणुकांमुळे ट्रॅफिक जॅम होऊन एका अॅम्ब्युलन्सला जायला जागा न मिळाल्याने आतला रुग्ण दगावल्याची घटना घडली. गणरायाला निरोप देताना डोळे पाणावणे , धीरगंभीर वातावरण होणे असे घडलेच नाही. निरोपही काही ठिकाणी अश्लील हावभाव आणि नृत्य करून दिले गेले. या दहा दिवसांच्या अनावश्यक धांगडधिंग्याचा , जागरणाचा , खर्चाचा नक्की फायदा काय झाला ? देवधर्माच्या उत्सवांना असा भयंकर ध्वनीप्रदूषण करणारा धांगडधिंगा अभिप्रेत असतो काय ?

सकळ कार्या आधारू। तूचि कृपेचा सागरू।
करुणानिधी गौरीकुमरू। मतिप्रकाश करी मज।।
नेणतां होतो मतिहीन। म्हणोनि धरिले तुझे चरण।
चवदा विद्यांचे निधान। शरणागत वरप्रदा।।

अज्ञानतिमिराचा नाश करून ज्ञानाच्या ज्योती प्रज्वलित करून सबंध जीवन प्रकाशमान करणारे हे , विघ्नांचा नाश करणारे परमकृपाळू दैवत- त्याला विद्या आणि कला यांचे अधिष्ठान आहे , ते केवढ्या शुचिर्भूततेने , पवित्र आचरणाने , प्रेमाने आणि श्रद्धेने पूजले पाहिजे! पण तसे दिसले नाही.

गणेशोत्सव दहा दिवस , तर नवरात्र नऊ दिवस ; पण पितरांचा , पंधरवडा असतो. म्हणजे महालयकाळातील आपली धर्मकर्तव्ये किती महत्त्वाची असतात ते लक्षात येते. मृत्यूनंतरही आपल्या पितरांबद्दलची आपली कर्तव्ये , त्यांना वेदोक्त मंत्रांनी आवाहन केल्यावर ते कोणत्याही योनीत जन्म घेतलेला असला , तरी श्राद्धान्न भोजनासाठी कसे येतात , याचे बहारदार वर्णन श्रीगुरुचरित्रातील 36 व्या अध्यायात आहे. दुसरे नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्यावर इंग्रज सरकारने वॉरंट काढले असता आणि त्यांना पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असतानाही धोका पत्करून गोसाव्याचा वेष परिधान करून नानासाहेब श्राद्ध करण्यासाठी काशीला गेले होते. श्राद्धकर्म विधी हा कोणीही उठून आपल्या बुद्धिप्रमाणे करण्याचा सामान्य विधी नाही. तो अधिकारी ब्रह्मावृंदांनी शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा वेदोक्त विधी आहे. पिठापूरच्या सुमती या पतिव्रतेने तयार केलेले श्राद्धान्न प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी अतिथी वेषात येऊन स्वीकारले होते.

एकनाथ महाराजांच्या परमभक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीनारायणाने तर पैठणचे ब्राह्माण बहिष्कार घालून जेवायला येत नाहीत हे पाहून प्रत्यक्ष पितरांना नाथांच्या घरी पाठवले होते. म्हणजे कृतज्ञबुद्धीने पितरांचे प्रेमपूर्वक स्मरण महालयात केले पाहिजे.

आता नवरात्रीची धामधूम चालू आहे. गरबानृत्य , दांडिया रास यांनी तरुण-तरुणी धुंद होत आहेत. सिनेमांच्या गाण्यांवर फक्त स्वत:चा आनंद उपभोगणे चालू आहे. यात जगत्जननीविषयीची भक्ती , प्रेम , आदर , श्रद्धा यांचा मागमूसही नाही. महादेवीला कोणते पूजाप्रकार , धर्मविधी प्रिय आहेत , ते कशासाठी करायचे याचे काहीही मार्गदर्शन नाही. सर्वत्र रंगीबेरंगी विद्युत्रोषणाई आहे , तालासुरावर नाचणे आहे , रात्रीच्या पाटर््या आहेत , काही ठिकाणी उत्तररात्री अभक्ष्यभक्षण व अपेयपानही आहे.

देवदेवतांच्या नावावर उत्सव साजरे करून फक्त स्वत:चा आनंद लुटण्याचा केवढा हा खटाटोप!

खरेतर , सगळ्याच्या मुळाशी आदितत्त्व आहे , ते परमेश्वरी कृपेचं. ती कृपा जन्ममरणाची यातायात थांबविण्यासाठी व्हावी असे संतांनी उपदेशिले आहे.

सर्वांमाजी उत्तम खरा। नरदेह हा सुंदर हिरा।
पावोनि करी जो मातेरा। काय गव्हारा म्हणूं त्या।।

असा खेद संत व्यक्त करतात. स्वयं दत्तप्रभूंनी परमवंदनीय अनसूयामातेला प्रबोध केला आहे की...

माते दुर्लभ नरदेह पावलीस खरा।
याचा लोभमोहें न करी मातेरा।
जोडोनी परब्रह्मा सोयरा।
परात्परतीरा पाव वेगी।।
तुकाराम महाराज तर परखड शब्दांत विचारतात...
जन्मा यावे आणि मरावे। किती वेळा हे असे फिरावे।
स्मर सखया हरीच्या पाया। किती उगाच फिरशील वाया।।

84 लक्ष योनींमधून भ्रमण करून ' पापा दाहोनी पुण्य राहे , तैच हा पावे नरदेहे ' या न्यायाने महाभाग्याने मिळालेली ही नरयोनी फक्त आणि फक्त परमेश्वरप्राप्ती करून घेऊन जन्म-मरणापासून सुटण्यासाठी एक संधी दिली आहे. नामस्मरण करून जन्मजन्मीच्या संचिताचे गाठोडे रिकामे करून टाकण्यासाठी ही मनुष्ययोनीच फक्त उपयोगाची आहे , कारण ही कर्मस्वातंत्र असलेली दुर्लभ योनी आहे. फार मोठी पुण्याई पदरी असल्याशिवाय नामस्मरणाची आवड निर्माण होत नाही. श्रद्धानिष्ठा ठिसूळ असतात. योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कामनिक उपासनेचे प्रकार अवलंबिले जातात. परमेश्वराला खूश करण्यासाठी अज्ञानाने काहीबाही केले जाते. स्वार्थासाठी पूजाअर्चा केल्या जातात , नवस केले जातात आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीटेंब्येस्वामी महाराज तर सांगतात ,

ऐहिक भोग जे मिळती। ती भक्तिची फळे न होती।

यासाठी आध्यात्मविद्या जाणून घेतली पाहिजे. साधना कशी करावी , त्या काळात काय अनुभव येतात , परमार्थ मार्गावरचे पाथेय कोणते असते , परमात्मप्राप्ती होते म्हणजे काय होते , या सर्वांचे ज्ञान देणारा योग्य मार्गदर्शक लाभला पाहिजे. तान्ह्या बाळालासुद्धा , आक्रोश करून ते पांढरेफटक पडल्याशिवाय आई कामे बाजूला सारून उचलून घेत नाही. परमेश्वर दयाळू आहे , स्वस्त नाही.

आपण नुकत्याच साजऱ्या केलेल्या या साऱ्या उत्सवात प्रेमाची अशी व्याकुळता होती का ? आध्यात्मात बाह्य अवडंबराने अंतरींची खूण पटत नाही.

अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ। त्याचे गळां माळ असा नसो।
आत्मा-अनुभवीं चोखाळिल्या वाटा। त्याचे माथां जटा असो नसो।
परस्त्रीचे ठायी जो कां नपुंसक। त्याचे अंगा राख असो नसो।
परदव्या अंध निंदेसी जो मुका। तोचि संत देखा तुका म्हणे।।

खरे अध्यात्म हे असे शुद्ध असते. आत्मसाक्षात्कार म्हणजे होण्यासाठी धामिर्क साधना , उपासना अत्यंत भक्तिभावाने करायच्या असतात आणि ती एक अनामिक परमशांत अवस्था असते. मग हा धांगडधिंग्याचे कुठले अध्यात्म असते ?

नवरात्रसुद्धा श्रीदेवीसूक्त जाणीवपूर्वक म्हणत जागवले , तर भक्ताच्या मनात जगदंबेबद्दल केवढे अपार प्रेम उचंबळेल आणि त्याचा अंतरात्मा प्रेमाने आईचे गुण गाऊ लागेल...

'' हे जगत्जननी जगदंबे , माझ्या जन्मदात्या आईच्या ठिकाणी तू मातृरूपाने वास करतेस , म्हणून मोठ्या वात्सल्याने ती माझे पालन करते. माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तू वास करतेस , म्हणून माझे सगळे व्यवहार सुरळीत चालतात. निदारूपाने तू मला विश्रांती देतेस , म्हणूनच मी जिवंत , टवटवीत राहून कामे करू शकतो. क्षुधारूपाने तू वास करतेस , म्हणूनच मी अन्नग्रहण करून शक्ती मिळवू शकतो. हे आई , तू चैतन्यरूपाने वास्तव्य करतेस , म्हणूनच मी हालचाल करू शकतो , नाही तर लोकांनी मला स्मशानात नेऊन जाळून टाकले असते. माते , लक्ष्मीरूपाने तू माझ्या घरात निवास करतेस , म्हणून माझा चरितार्थ चालतो. पृथ्वीरूपाने तू आमची आधारदेवता झाली नसतीस , तर आम्ही सारे अधांतरी निराधार झालो असतो. आई , माझे कर्तृत्व काहीही नाही. सूर्य तेजस्वी असतो ; पण त्या तेजाला प्रकाशमान करणारे महातेज तू आहेस. तुझ्या कृपेवाचून काहीही घडणे संभवनीय नाही. तू साक्षात सौदामिनी आहेस. तेजाची तू अमोघ शक्ती आहेस. सारे सारे श्रम तू करतेस आणि श्रेय मात्र आम्हा मुलांना उपभोगायला देतेस. अखेर आमची आई आहेस ना! ''

अशी स्तुती करीत ' कंठी प्रेम दाटे , नयनी नीर लोटे , हृदयी प्रकटे ब्रह्मारूप ' अशा अवस्थेत नऊ रात्री जागवल्या , तर कृपा होण्यास काय विलंब लागणार आहे!

पण असे घडत नाही. श्रीमत् वेदव्यासांनी भागवताच्या निरनिराळ्या स्कंधात लिहिलेल्या आजच्या काळांतील स्वैरवर्तनाबद्दलचे भविष्य तंतोतंत अनुभवास यावे हा त्यांच्या त्रिकालज्ञानाचा केवढा मोठा पुरावा आहे! पृथ्वीतलावरचे पहिले विमान सिद्धपूरला कपिल मुनींच्या आश्रमात कसे झाले हे सांगणारा इतिहास आज भागवताच्या रूपाने उपलब्ध आहे. अणुशक्तिपासून परग्रहगमनापर्यंतचे रहस्य सामावलेल्या किती तरी पोथ्या असतील , की ज्या परकीयांच्या हातात पडल्या असतील. वरुण (नेपच्यून) , प्रजापती (हर्षल) आणि यमधर्म (प्लुटो) या ग्रहांच्या सुपाऱ्या तर वेदकाळापासून मांडल्या जात होत्या. भारतीय प्राचीन ऋषीमुनींनी वेद-विज्ञान-आध्यात्म वेगळे मानलेच नाही. वेदात विज्ञानच भरलेले आहे. कणाद ऋषी हा अणुअभ्यासासाठीच झटत होता. विज्ञानाच्या मदतीने मात्र आध्यात्मात प्रगती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

ज्ञानेश्वर महाराजांनी अणुविभाजनाने भिंत चालवली हे विज्ञान असले , तरी ते त्यांचे साध्य नव्हते. त्या वैज्ञानिक चमत्काराने त्यांना आध्यात्म साधायचे होते. आज विज्ञान ऐहिक उपभोगासाठी जुंपलेले दिसते. विज्ञानाच्या विद्यार्थ्याला देव , धर्म या गोष्टींना नाक मुरडण्यात सुधारकीपणा वाटतो. त्याला अंतराळाची ओढ वाटते ; पण अंतरंगात एक इंचही प्रवेश करून घेता येत नाही. कुठला निसर्ग आम्ही दावणीला बांधला आहे ? निसर्गाच्या एका फटक्यात लाखो माणसे मरताहेत. माणूस मन:शांतीला दुरावला आहे. सर्वत्र अपघात , विचित्र रोग निर्माण होत आहेत. कोठे-कोठे म्हणून विज्ञान पुरे पडणार आहे ? विज्ञान आईचे वात्सल्य , वडिलांचे प्रेम , मानसिक शांतता देऊ शकणार नाही. विज्ञान मानवी बुद्धीचा श्रेष्ठ पैलू आहे. अंतरीचा गाभा नव्हे. विज्ञान पूजेच्या सजावटीसारखे आहे म्हणून सजावट म्हणजे पूजा नव्हे. विज्ञान पुष्प आहे म्हणून पुष्प म्हणजे सुगंध नव्हे. सजावटीतून भक्ती प्रतीत व्हावी , शब्दांतून अर्थ प्रतीत व्हावा , पुष्पातून सौरभ अनुभवास यावा , तसे विज्ञानातून आध्यात्म प्रकट व्हायला हवे. विज्ञान विधायक हवे , विघातक , विध्वंसक नसावे. पुत्रसंतती व्हावी म्हणून सोळा सोमवार करणाऱ्या बायकांच्या आचरणाचा अभ्यास करून आणि तो धर्मविधी समजावून घेऊन त्यातले विज्ञान आकलन झाल्यावर पाश्चात्य डॉक्टर थक्क झाले होते. आपले बहुतेक वेदोक्त धर्मसंस्कार विज्ञानावर अधिष्ठित आहेत.

म्हणून विज्ञानाधारे उत्सव साजरे करावेत , विज्ञानाच्या उपभोगाने नव्हे. एखाद्या वेदशास्त्रपारंगत अधिकारी माणसाला अर्थ विचारला , तर तो सांगेल मानवी जीवन कृतार्थ करण्यासाठीच विज्ञानाधिष्ठित वेद आहेत. तुकोबाराय हेच सांगतात....

वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाचि साधला।
विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाव घ्यावे।।


- शरद उपाध्ये -Rashichakrakar Sharad Upadhye

Click here for More articles

Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar

आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhye

मंगलमूर्ते दयाळा...शरद उपाध्ये

मी वाचक- शरद उपाध्ये

'राशीचक्र'कार आता नाटककार व कथाकारही

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive