Sunday, August 12, 2012

बाजारपेठेची गणिते ‘विंडोज ८’वर बेतलेली! - Windows 8

सर्वच कंपन्यांची गणिते आर्थिक वर्षांनुसार चार तिमाहींमध्ये विभागलेली असतात. प्रत्येक तिमाहीमध्ये होणाऱ्या बारिकसारीक घडामोडींकडे सर्वच स्पर्धक कंपन्यांचे लक्ष असते. तंत्रज्ञानाचे क्षेत्र हे इतर क्षेत्रांपेक्षा खूप वेगळे आहे. कारण हे खूपच वेगवान असे क्षेत्र आहे. त्यामुळे एखादा लहानसा निर्णय चुकला तरी त्याचे पडसाद खूप मोठे असतात आणि त्यातून सावरे पर्यंत खूप वेळ निघून गेलेला असतो. बाजारपेठेही खूप पुढे निघून गेलेली असते. मग हाती उरते केवळ खंत करणे. गेली अनेक वर्षे मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा असलेले बिल गेटस् मोबाईल आणि इंटरनेटच्या क्षेत्राबद्दल अशीच खंत व्यक्त करत आहेत.  आता त्यांना मोबाईलची बाजारपेठही काबीज करायची आहे. मोबाईलचे भवितव्य अ‍ॅप्स ठरवणार आहे. म्हणूनच आता येऊ घातलेल्या ‘विंडोज आठ’मध्ये ‘अ‍ॅप्स’  स्टोअर वर भर देण्यात आला आहे.
विंडोजची लोकप्रियता
alt सध्या या क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना प्रतीक्षा आहे ती ‘विंडोज ८’ची ! येणाऱ्या काळात या क्षेत्रातील अनेकांचे भवितव्य हे या ‘विंडोज ८’वर अवलंबून असणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लिनक्स ही ओपन सोर्समधील ऑपरेटिंग सिस्टिम लोकप्रिय होत असली आणि तिची लोकप्रियता वाढत असली तरीही आजही जगभरात विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अनेकांच्या आयुष्यातील संगणकाचा श्रीगणेशा हा विंडोजच्याच माध्यमातून झाला आहे. किंबहुना म्हणूनच तर आजही मायक्रोसॉफ्टचा या क्षेत्रातील दबदबा कायम आहे. मोबाईलच्या क्षेत्रामध्ये मायक्रोसॉफ्ट खूपच मागे आहे. पण डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या बाबतीत त्यांची असलेली आघाडी कायम आहे. लिनोवो, सोनी, पॅनासोनिक, तोशिबा, एचपी या सर्व कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक कंपन्या आहेत. पण या साऱ्यांची मदार ही मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवर आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्टच्या येऊ घातलेल्या ‘विंडोज ८’कडे सर्व कंपन्यांचे बारिक लक्ष आहे.
मंदीने हैराण
सध्याचा जमाना हा अल्ट्राबुकचा आहे. या आधी उल्लेख केलेल्या सर्व कंपन्या आपापली अल्ट्राबुक नव्या मॉडेल्ससह बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. जागतिक बाजारपेठेवर मंदीचे सावट असल्याने ही सारी मंडळी हैराण आहेत. त्यात अनेकांची पहिल्या तिमाहीची कामगिरी जाहीर झाली असून ती फारशी उत्साहवर्धक नाही. दुसरी तिमाही सप्टेंबरमध्ये संपले आणि त्यातही फारसे काही चांगले होण्याची अपेक्षा नाही. दोन तिमाही म्हणजे त्यावेळेस अर्धे आर्थिक वर्ष संपलेले असेल. चांगली कामगिरी करायची तर फक्त अर्धे वर्षच शिल्लक राहील. याच अध्र्या वर्षांच्या सुरुवातीला म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात मायक्रोसॉफ्टची नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ‘विंडोज ८’ जागतिक बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. आता या ‘विंडोज ८’वर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
 विंडोज ९८  
आतापर्यंतचा मायक्रोसॉफ्टच्या कामगिरीचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, कंपनीची विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली ती ‘िवडोज ९८’ बाजारात आल्यानंतर. विंडोज बाजारात येण्यापूर्वी सारे काम हे एमएसडॉस या सिस्टिमवर सुरू होते. सामान्यांच्या बाबतीत बोलायचे तर डॉसपेक्षा ही नवीन सिस्टिम वापरण्यास खूपच सोयीची होती. त्यामुळेच विंडोज जगभरात लोकप्रिय झाले. त्यातही ‘विंडोज ९८’ने तर त्याच्या आगमनानंतर सुमारे दशकभर  जगावर राज्य केले.
विंडोज एक्सपी
alt  त्यानंतर सामान्य माणसे येऊन स्थिरावली ती थेट विंडोज एक्सपीवर. सध्या तरी विंडोज एक्सपी हे व्हर्जन जगभरात लोकप्रिय आहे. आजही अनेक डेस्कटॉप्सवर ‘विंडोज एक्सपी’च विराजमान आहे. खरेतर त्यानंतर विंडोज विस्टा हे नवे व्हर्जन आले होते. मात्र त्याच्या आगमनापासूनच त्याच्याबाबतीत खूप वाद सुरू होते. विंडोज विस्टामुळे कॉम्प्युटर खूपच कमी वेगात काम करू लागतो इथपासून ते तो वारंवार हँग होतो इथपर्यंत अनेक प्रकारची चर्चा झाली आणि विंडोज विस्टा असलेले लॅपटॉप्स नंतर कमी संख्येने विकले गेले. किंवा अनेकदा सोबत लायसन्स व्हर्जन घेताना ग्राहक मागणी करायची की, लेटेस्ट व्हर्जन असले तरी विस्टा नको तर जुने व्हर्जन असलेले एक्सपी द्या.
टांगती तलवार
एकूणच यामुळे आता जेव्हा नवीन ‘विंडोज ८’ येऊ घातले आहे तेव्हा लोकांना आणि खास करून कॉम्प्युर कंपन्यांना त्या इतिहासाची आठवण झाली आहे. आणि त्यामुळेच त्यांनी धीम्या गतीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नवीन अल्ट्राबुक्स ‘विंडोज ८’ सोबत आणली आणि बाजारपेठेने ती स्वीकारली नाहीत तर ? तर मग पुन्हा जुन्या व्हर्जनकडे म्हणजेच विंडोज सेव्हनकडे वळावे लागेल. बाजारपेठेचा आपला अंदाज चुकू नये, असे सध्या प्रत्येक कंपनीला वाटते आहे. आणि समजा जुने व्हर्जन असलेले पीसी किंवा लॅपटॉप्स आणले आणि लोक नवीन व्हर्जनकडे वळले तर? नवीन व्हर्जनची क्रेझ आली तर? मग काय करणार. त्यामुळे सध्या तरी ‘विंडोज ८’ची टांगती तलवार या कंपन्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या लॅपटॉप्सच्या दोन मॉडेल्समध्ये नवीन व्हर्जन आणि काही मॉडेल्समध्ये स्थिरावलेले विंडोज सेव्हन असा घाट अनेकांनी घातला आहे.
ओएसमध्ये एकसूत्रता
दुसरीकडे मायक्रोसॉफ्टने टॅबसाठीही हे व्हर्जन आणलेले असल्याने आता मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम्समध्ये एकसूत्रता येते आहे. कारण मोबाईलसाठीही आता ‘विंडोज मोबाईल’ हे व्हर्जन असेल. जगभरातील बहुतांश लोकांचा विंडोजवर भरवसा असल्याने मायक्रोसॉफ्टला पुन्हा एकदा आता विस्तारलेल्या जागतिक बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारण्याची संधी प्राप्त झाली आहे. पण नेमके काय होते, जागतिक बाजारपेठेत ग्राहक ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम किती आणि कशी स्वीकारतात यावर मायक्रोसॉफ्ट आणि त्याचबरोबर इतर अनेक कंपन्यांचेही भवितव्य अवलंबून असणार आहे.
यापूर्वीच मायक्रोसॉफ्टने विंडोज ८चे टेस्ट व्हर्जन रिलीज केले होते. त्याच्या संदर्भातील तज्ज्ञांचे रिव्ह्य़ूज चांगले आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्टला आता टॅब, मोबाईल आणि डेस्कटॉप या नव्या विस्तारलेल्या जागतिक बाजारपेठेत पाय रोवता येतील, असा कयास आहे !

विंडोज ८ अ‍ॅप्स वापरा आणि निर्णय घ्या !
alt मोबाईलच्या क्षेत्रात आपण खूपच पिछाडीवर आहोत, याची जाणीव असलेल्या मायक्रोसॉफ्टने आता या क्षेत्रात पाय रोवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आधीच पाय रोवून उभ्या असलेल्या अँड्रॉइड आणि इतर सिस्टिम्सना स्पर्धा देणे तेवढे सोपे नाही. ‘विंडोज आठ’ ही मात्र मायक्रोसॉफ्टसाठी मोठीच संधी असल्याची जाणीव कंपनीला आहे. त्यामुळेच त्यांनी लोकप्रियतेसाठी एक अनोखा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा, वापरा आणि निर्णय घ्या हा तो अनोखा मार्ग आहे. म्हणजेच विंडोज अ‍ॅप्स स्टोअरमध्ये जायचे. आणि आपल्याला हवे असलेले अ‍ॅप्स डाऊनलोड करायचे. पहिले सात दिवस ते आपल्याला मोफत वापरता येईल. त्यानंतरही आपल्याला ते वापरायचे असेल किंवा आवडलेले असेल तर मात्र त्यासाठी आपल्याला त्याची ठरलेली किंमत मोजावी लागेल. या अभिनव मार्गामुळे लोक खूप मोठय़ा प्रमाणावर अ‍ॅप्स वापरून पाहातील आणि त्याची खरेदीही होईल, अशी मायक्रोसॉफ्टला अपेक्षा आहे !

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive