Sunday, August 12, 2012

How to get time for excercise?

प्रश्न : मी जाड आहे. सुखवस्तूही आहे. पण तुम्हाला खरं सांगतो, मला व्यायामाचा प्रचंड कंटाळा येतो. आपण बारीक व्हावं असं सतत मनातून वाटतं, पण सकाळ झाली की मात्र व्यायाम नकोसा होतो आणि मग ‘उद्यापासून नक्की करू’ असं मनाशी म्हणून मी तो टाळतो. एक मात्र खरं की, हा कॉलम वाचायला लागल्यापासून फिटनेससाठी कोणतेही इन्स्टन्ट शॉर्टकट्स घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही. मला प्लीज काहीतरी असा सल्ला द्या की, रोज व्यायाम करावासा वाटेल.

उत्तर - तुम्हाला जाडी कमी करावीशी वाटते आणि त्यासाठी कुठलेही इन्स्टन्ट उपाय करायचे नाहीत, या दोन्हींबद्दल मी तुमचं कौतुक करते. ‘व्यायामाला वेळच मिळत नाही’ असं तुम्ही लिहिलं असतं तर मात्र मी तुमची कीव करण्यापलीकडे काहीही केलं नसतं. हे कारण मला कधीही पटत नाही. तुम्हाला जेवायला, आंघोळीला आणि झोपायला वेळ मिळत असेल तर व्यायामालाही वेळ मिळू शकतो. प्रश्न इच्छेचा आहे!
ध्येय माहीत आहे, तिथं जाणारा रस्ताही माहीत आहे, फक्त त्यावरून चालायचा कंटाळा येतो, अशी तुमचीच काय बहुतेक जाड लोकांची अवस्था असते. अशा लोकांना कोलेस्टेरॉल, बी.पी. किंवा डायबेटीससारखे दणके बसले की खडबडून जागे होतात आणि व्यायामाला लागतात. तुम्हालाही असा एखादा दणका बसण्याची वाट पाहत थांबायचंय का?
तरुण वयात वजनाची शंभरी गाठलेली बरीच बेफिकीर तरुण मंडळी माझ्याकडे अ‍ॅडमिशन घेतात. त्या वेळी पहिले आठ-पंधरा दिवस त्यांना आम्ही सतत कौन्सिलिंग करतो, माझ्या इतर मेम्बर्सचे रिझल्ट दाखवतो, जेणेकरून त्यांना रोज व्यायाम केला पाहिजे, ही भावना प्रबळ होते. पहिल्या आठ-पंधरा दिवसांत त्यांचा तीन-चार किलो वेटलॉस झाला की तोपर्यंत त्यांना रोज घाम गाळण्यातली गंमत समजायला लागते आणि मग मात्र हीच लोकं झपाटल्यासारखा व्यायाम करतात. अर्थात त्याचा फायदाही त्यांनाच होतो. तात्पर्य म्हणजे फक्त पहिले एक-दोन आठवडे तुम्हाला व्यायाम करण्यासाठी स्वत:ला अक्षरश: ढकलावं लागेल.
बारीक व्हायची तुमची मनापासून इच्छा असेल तर एक सोपा प्रयोग करा. सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहा. ‘मी आजपासून नक्की व्यायाम करीन, असं काल तुला प्रॉमिस केलं होतं. पण मी काल तुझ्याशी खोटं बोललो आणि म्हणून आज व्यायाम केला नाही. उद्यापासून मात्र मी नक्की व्यायाम करीन,’ असं आरशातल्या स्वत:ला कन्फेशन द्या. पहिल्या दोन-चार दिवसांतच तुम्हाला गिल्टी वाटायला लागेल, आरशासमोर उभं राहून स्वत:कडे पाहायचीही तुम्हाला भीती वाटेल आणि तुम्ही आपोआप व्यायाम सुरू कराल आणि हो, ज्या दिवशी खरोखर व्यवस्थित व्यायाम कराल त्या दिवशी त्याच आरशासमोर उभं राहून स्वत:चं कौतुकही करायला विसरू नका. सेल्फ कन्फेशन ही एक फार प्रभावी पद्धत आहे आणि ते करायला मनाची फार मोठी ताकद लागते. जाणूनबुजून किंवा नकळत आपण जगाशी खोटं बोलू शकतो, स्वत:शी नाही! ‘मला व्यायामाला वेळ मिळत नाही’ हे कारण म्हणजे स्वत:शी निव्वळ खोटं बोलण्याचाच एक प्रकार आहे. आरशासमोर उभं राहून हेच कारण स्वत:ला सांगून पाहा, मला खात्री आहे की, दोन-तीन दिवसांत तुम्ही तुमचं शेडय़ुल आपोआप अ‍ॅडजेस्ट कराल आणि व्यायामासाठी वेळ काढाल.
अजून एक सांगू का? जे रोज भरपूर व्यायाम करतात त्यांना विचारा, व्यायाम हा एक असा छंद आहे की, त्याची अक्षरश: चटक लागते! व्यायाम करून नखशिखांत घाम गळल्यावर जे एक अभूतपूर्व फ्रेश फीलिंग येतं ते जगातले कुठलेही डिओ वापरून किंवा स्किन ट्रीटमेन्ट्स घेऊन मिळत नाही!


प्रश्न - घरी व्यायाम करायची इच्छा तर खूप आहे, पण एकटय़ानं व्यायाम करायचा कंटाळा येतो आणि घरापासून जिम लांब असल्यामुळे जाण्या-येण्यात फार वेळ जातो. काय करू?

alt उत्तर : पुण्यात बऱ्याच महिलांना ‘व्यायामाच्या भिशीचा’ मी जो उपाय सांगितला तो सांगते. तुमच्या सोसायटीतल्या किंवा तुमच्या भिशी मंडळातल्या मैत्रिणी जमा करा. एकेक आठवडा एकेका मैत्रिणीकडे जाऊन एकत्रितपणे व्यायाम करायचं ठरवा किंवा ज्या मैत्रिणीला व्यायामाचा सगळ्यात जास्त कंटाळा असेल तिच्याच घरी व्यायामासाठी एकत्र या. घरी कुठले व्यायाम किती आणि कसे करायचे ते या सदरातून तुम्हाला माहीत झालेलंच आहे. हे सगळे लेख तुम्हाला माझ्या फेसबुकवर सापडतील.
बाजारातून एक साधा वजनकाटा आणा. रोज व्यायामाच्या आधी आणि नंतर प्रत्येकीची वजनं घेऊन त्याच्या नोंदी ठेवा. आठवडय़ाकाठी कुणाचा किती वेटलॉस झाला त्याप्रमाणे भिशीच्या वर्गणीतून तिला फक्त ११ रुपयांचं बक्षीस ठेवा आणि त्याउलट विनाकारण व्यायाम चुकविणाऱ्या मैत्रिणीला रोज फक्त एक रुपया दंडसुद्धा करा. यातली रक्कम ही प्रातिनिधिक आहे, पण भावना फार परिणामकारक आहे. या सगळ्यामुळे प्रत्येक मैत्रीण रोज झडझडून व्यायाम तर करेलच शिवाय आपसात एक प्रकारची चांगली स्पर्धा निर्माण होईल. शिवाय जिचा वेटलॉस होत नाही त्यावर आपोआप चर्चा घडेल, तिला सगळ्यांकडून प्रोत्साहनही मिळेल.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive