थरारक, रहस्यमय नाटक
तिसरी घंटा
'वैशाली कॉटेज'
राजा कारळे तिसरी घंटा 'नाट्यमंदार' या ख्यातनाम नाट्यसंस्थेने 'वैशाली कॉटेज' हे रहस्यमय नाटक रंगभूमीवर आणले असून ते प्रेक्षकांना अखेरपर्यंत गुंतवून ठेवते. सुरेश जयराम यांनी या नाटकाचे लेखन केले असून मंगेश कदम यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवानी ही तरुण मुलगी. तिचे समीरवर प्रेम आहे. ती दोघे एका मॉलमध्ये बसले असताना एक वयस्कर जोडपे तिथे येते. ते तिला म्हणतात, तू वैशालीसारखी दिसतेस. ती कॅन्सरने गेली, पण तिची बहीण अंथरुणाला खिळलेली असून तिला वाटते की आपली बहीण वैशाली आपल्यावर रागावलीय म्हणून ती तिला भेटत नाही. तू वैशाली बनून तिच्या समोर जा, तिला बरे वाटेल आणि वैशालीचा रागही गेला असे वाटेल.
शिवानी या गोष्टीला पहिल्यांदा तयार होत नाही. पण नंतर आव्हान म्हणून ती वैशालीची भूमिका वटवायला तयार होते. तिची खात्री झाली की ही आपली बहीण आहे, मग त्या भूमिकेतून बाहेर पडता येईल, असे तिला वाटते. शिवानी वैशालीच्या केशभूषेपासून ते वेशभूषेपर्यंत सारे आत्मसात करते. ज्या खोलीत शिवानी आलेली असते ती वास्तू, ती खोली भारावलेली असून त्या गूढ गहन वातावरणाचा शिवानीच्या संवेदनशील मनावर परिणाम होतो. त्यातच तेथील वयस्कर दाम्पत्याचे गूढ वागणे, नाहीसे होणे, त्यामुळे आपण एका संकटात अडकल्यासारखे वाटते.
सुरेश जयराम हे मराठीतील रहस्यमय नाटके लिहिणारे ख्यातनाम नाटककार आहेत. धक्कातंत्राने प्रेक्षकांच्या प्रतिमांना छेद देत रहस्य गडद करण्याचा मंत्र याही नाटकात आहे. दिग्दर्शक मंगेश कदम यांनी नाट्यांतर्गत असलेली गूढता, रहस्यरंजकता क्रमाक्रमाने या तंत्राने वाढवत नेली आहे.
'वैशाली कॉटेज'चे दोन अंक वेगवेगळ्या बाजाचे आहेत. पहिल्या अंकात विशेष काही घडत नाही. दुसरा अंक मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. त्यातील प्रसंग, घटना-शिवानीची वैशाली झाल्यावरची संभ्रमावस्था दिग्दर्शकाने गडदपणे साकारली आहे. त्यामुळे तो अंक घटनाप्रधान आणि रहस्यप्रधान झाल्यामुळे वेगवानही झाला आहे. त्यात दिग्दर्शकाचे कौशल्य जाणवते. त्यांनी त्यासाठी तांत्रिक अंगाचीही यथायोग साथ घेतली आहे.
नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी त्यांना यथार्थपणे साथ दिली आहे. ७0 आणि त्यापूर्वीचा कालसंदर्भ दाखविणारे पलंग, ग्रामोफोन, टेबल इत्यादी साहित्यावरून प्रेक्षकांच्या डोळ्यापुढे त्या काळचे वातावरण निर्माण होते. राजेश परब यांची रंगभूषा आणि शैलजा शिंदे यांची वेशभूषा विशेष उल्लेखनीय आहे. राहुल रानडे यांचे पार्श्वसंगीत नाटकातील धक्कातंत्राला योग्य असेच आहे. ते नाटकातील गूढ वातावरण अधिकच गडद करते.
No comments:
Post a Comment