Monday, September 2, 2013

नेतृत्वाची नशा

संतांनी कर्माचे दोन प्रकार सांगितले. १) ज्ञानपूर्व कर्म. २) ज्ञानोत्तर कर्म. ज्ञानोत्तर कर्म अत्यंत निदोर्ष असते. अशा कर्माने माणूस बंधनात सापडत नाही. ज्ञानपूर्व कर्म सदोष असू शकते. मात्र ज्ञानपूर्व कर्मदेखील दोन प्रकारचे असते. १) साधकाने कर्मयोगाची साधना म्हणून केलेले ज्ञानपूर्व कर्म. २) स्वाथीर् माणसाचे ज्ञानपूर्व कर्म. समर्थांना ज्ञानोत्तर कर्म जसे अपेक्षित आहे, तसेच साधकाचे ज्ञानपूर्व कर्मही अपेक्षित आहे. स्वार्थमूलक कर्माचे समर्थन कोणत्याही संताने केले नाही; पण ज्ञान झाल्याशिवाय कर्मच करायचे नाही, असे ठरविले तर समाजात निष्क्रियता बोकाळेल. आळशी माणसाला लपायला चांगली जागा सापडेल. ज्ञानपूर्व कर्मात साधकाच्या चुका होतील, त्याचा त्याला पश्चात्ताप होईल, हळूहळू त्याचे अंत:करण शुद्ध होत जाईल, कर्माचा दर्जा सुधारेल आणि एक दिवस अशा कर्माद्वारेच त्याला ज्ञान प्राप्त होईल. अशा साधकाच्या दृष्टीने ज्ञानपूर्व कर्म हा कर्मयोग ठरतो. भगवान श्ाीकृष्णाने अज्ञानी माणसाची कमेर् प्रारंभी निदोर्ष नसली तरी ज्ञानी माणसाने त्यांचा बुद्धिभेद करू नये, उलट त्यांना कर्म करण्यास प्रोत्साहन द्यावे असे म्हटले आहे. समर्थांनी आपल्या महंतांना कर्माचे प्रोत्साहन देताना श्ाीकृष्णाचेच धोरण स्वीकारले.

समर्थांचा महंत समाजाचे नेतृत्व करतो. ही त्याची साधना असते. प्रारंभी काही स्वाथीर् हेतू त्याच्या कर्मात आढळतील. पण असा महंत स्वत:मध्ये बदल घडवून आणतो आणि चांगली संघटना उभी करतो. काही माणसे नेतृत्वाचे गुण घेऊनच जन्माला येतात. त्यांना फक्त अनुकूल परिस्थिती निर्माण करून द्यावयाची असते. असा नेता महाविद्यालयीन शिक्षणाने तयार होणार नाही. ज्यांच्यामध्ये समर्थांना असे नेतेपणाचे सुप्त गुण आढळले त्यांच्यावर समर्थांनी संप्रदायाच्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. कल्याणस्वामी, दिवाकर गोसावी, आक्काबाई, वेण्णाबाई, उद्धवस्वामी, दिनकरस्वामी या महंतांनी नेतृत्वाचा आदर्श प्रस्थापित केला. त्या काळात छत्रपती शिवाजी हे तर नेतृत्वाचा मानदंडच ठरले होते. छत्रपतींमधील नेतृत्वगुण स्वयंभू होता. जिजाबाईंनी त्याला राष्ट्रनिष्ठेची बैठक प्राप्त करून दिली. शिवछत्रपतींसाठी प्राणार्पण करणारे अनेक मावळे त्याकाळी तयार झाले. यातच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाचे यश सामावले आहे. आज मृत्यूनंतर नेत्रदान करावे की नाही याचा माणूस अनेकदा विचार करतो. आपल्या आजारी असलेल्या सख्ख्या भावाला किडनी देताना आपण कां कू करतो; पण शिवा कासिद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर या मंडळींनी छत्रपतींसाठी प्राणांची बाजी लावली. शिवछत्रपतींच्या नंतर राजकीय क्षेत्रात एवढ्या अनंत गुणांनी मंडित नेता झाला नाही.

समर्थांनी आपल्या संप्रदायात अनेक महंत तयार केले. मात्र नेतृत्वाच्या नशेची समर्थांना चीड होती. काही लोकांना पुढारी होण्याची हौस असते; परंतु त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण नसतात. पैसा आणि प्रसिद्धी यांच्या प्रलोभनापायी काही माणसे पुढारीपण करतात, पण त्यांच्यामुळे समाजात नाना कटकटी निर्माण होतात. समर्थ म्हणतात-

संगीत चालीला तरी तो व्याप। नाहीतरी अवधाचि संताप।

क्षणक्षणा विक्षेप। किती म्हणोनि सांगावा।।

आपण येकायेकी येकला। सृष्टीमध्ये भांडत चालिला।

बहुतांमध्यें येकल्याला। यश कैचें।।

बहुंत दिवस श्ाम केला। सेवटी अवधाचि वेर्थ गेला।

आपणांस ठाकेंना गलबला। कोणे करावा।।

आपणास बरे पोहता न ये। लोक बुडवावयाचे कोण कार्य।

गोडी आवडी वाया जाये। विकल्पचि अवघा।।

कर्मयोगाचे आचरण करताना आपण नेताच झाले पाहिजे असे नाही. ज्या माणसांत नेतृत्वाचे गुण नाहीत, त्याने संघटनेत कटकटी निर्माण करण्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात छोटी छोटी कामे करावीत.

काही माणसे एखादे कार्य सुरू करतात. प्रारंभी ते निस्पृह असतात. त्यांना त्यांच्या कार्यात चांगले यश मिळते. त्यानंतर कामाचा व्याप वाढू लागतो. अशा वेळी वेगवेगळ्या लोकांवर कामाची जबाबदारी सोपवावी लागते. मात्र काही हेकट माणसे संघटनेवर आपला ताबा राहावा म्हणून सगळे अधिकार स्वत:कडेच ठेवतात. नेतृत्वाच्या नशेमुळे अशा कार्याचा शेवटी नाश होतो. समर्थांच्या मते अशा वेळी माणसाने नेतृत्वाचे गुण असलेल्या योग्य माणसाकडे कार्य सोपवावे आणि आपण शांतपणे भगवत्-चिंतन करावे. आपली मन:शांती गमावून समाजसेवा करण्याची गरज नाही. आपल्यावाचून या जगाचे काहीही अडणार नाही हे प्रत्येक कार्यर्कत्याने लक्षात ठेवावे. समर्थ म्हणतात-

उपाधी कांही राहात नाही। समाधाना येवढे थोर नाहीं।

नरदेहें प्राप्त होत नाही। क्षणक्षणा।।

- सुनील चिंचोलकर

लेखांक : ६०

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive