परवा
कार्यालयात, एच आर ची "सॅड डिमाईस" ची मेल आली. ' कंपनीतल्या एका तरुण
सॉफ्टवेअर इंजिनियरचा हृदयविकाराने अकाली मृत्यू, पाठीमागे आई, पत्नी आणि ३
वर्षांचा मुलगा. त्याच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून सर्वांनी २
मिनिटे शांतता पाळण्याचे आवाहन'.
मेल वाचून 'नेहमी' प्रमाणे धक्का
बसला. गेल्या काही महिन्यातली ही सहावी मेल. वेड्यासारखा आधीच्या सगळ्या
"सॅड डिमाइस" च्या मेल्स काढून बघितल्या. थोड्या-फार फरकाने माहिती
तीच..... ३०-३५ वय, पाठीमागे आई-वडील, बायको, एखादं- दुसरे नकळत्या वयातले
मूल. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका किंवा अपघात.... दोन मिनिटे शांतता
पाळण्याचे आवाहन...
अशी मेल बघितली की क्षणभर हळहळ
वाटते. बायका-मुलांचे न बघितलेले चेहरे डोळ्यांसमोर येतात. कसं होणार
त्यांचे? कंपनीकडून किती मदत मिळणार? बायको नोकरी करत असेल का? मुलांचे
शिक्षण, आई-वडिलांची जबाबदारी,....... एक ना दोन प्रश्न....
हळूहळू प्रश्नांचा रोख स्वतःकडे
वळतो, उद्या आपल्यापैकी कोणावर अशी वेळ आली तर? छे! असं कसं होईल. असा
विचार सुद्धा मनात नको म्हणून पटकन झटकला जातो. पण कुठंतरी आत जाणवत असतं,
चुकतंय काहीतरी, आपलं सुद्धा,.....
दोन मिनिटं शांतता पाळताना हे
विचार डोक्यात मुंगा घालायला लागतात. खरंच कुठे चाललो आहोत आपण? काय
मिळवणार आहोत या 'रॅट-रेस' मधून?
दोन मिनिटं अशी शांतता पाळण्यापेक्षा, कधीतरी काही क्षण निवांतपणे घालवले
तर? ऊर फुटेस्तोवर धावण्यापेक्षा, थोडं थांबत, मागे - पुढे बघत चालत राहिलो
तर? इतरांपेक्षा मागे पडायची भीती वाटते का ठरवलेल्या गोष्टी मिळवताना
आयुष्य कमी पडेल अशी धास्ती. का सगळे धावतात म्हणून आपणही धावत सुटायचं?
खरंच वेळ आली आहे शांतपणे
स्वतःमध्ये डोकावून बघण्याची.... आपल्याला नक्की काय हवं आहे ते ठरवण्याची.
अजून मोठा फ्लॅट, मर्सिडिज कार, एखादं फार्म हाउस, दरवर्षी सुट्टीत
परदेशवारी, रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल,.... का दोन वेळा आनंदात जेवण,
रात्री सुखाची झोप, घरच्यांबरोबर गप्पांमध्ये घालवलेले चार निवांत क्षण,
मित्र-मैत्रिणींबरोबर एखाद्या संध्याकाळी केलेला टाईमपास किंवा
कट्ट्यावरच्या गप्पांचा अड्डा...
रोज थोडावेळ काढून बघितलं तर
सापडतील किती तरी गोष्टी, आपलं जगणं 'समृद्ध' करणाऱ्या.... किती वर्ष झाली
आजीला भेटून? कितीदा तरी ती आठवण काढतेय. पण आपण जाणं पुढे ढकलतोय, 'वेळ
नाही' म्हणून... मुलीला सायकल शिकवायची आहे. रोज संध्याकाळी ती विचारते
लवकर येणार का? पण आपलं उत्तर एकंच, 'वेळ नाही' उद्या बघू.
किती दिवसात एकटेच सकाळी उठून रमत
गमत भटकायला गेलो नाही, येताना टपरीवरचा चहा आणि क्रिमरोल खाण्याची मजा
विसरलो की काय? रोज घड्याळ लावून ४० मिनिटे चालायचे. पण तेव्हा सुद्धा
इकडे तिकडे बघायला 'वेळ नाही'. सवाई गंधर्वांची जाहिरात दरवर्षी वाचायची
आणि मनाशी ठरवायचं, पुढच्या वर्षी नक्की जायचं, सध्या 'वेळ नाही'.
आज अंगात मस्ती आहे. मला काही होत
नाही. हेच तर दिवस आहेत नवीन नवीन चॅलेंजेस घ्यायचे, कामाला वाहून घ्यायचे,
टेन्शन घ्यायचे, पुढे जायचे..... पुढे जात राहायचे...... आता थांबायला
'वेळ नाही'.
पण हे करताना एक गोष्ट विसरतोय.....
निसर्गनियमांपासून किती दूर जाणार?
शरीराचे चक्र किती गतीने फिरवणार?
एखादं चाक जोरात फिरल्यावर अचानक थांबलं, तर उलटं फिरायला लागतं... तसं व्हायचं आणि मग
वेळ यायची दोन मिनिटे शांतता पाळण्याची.
त्यापेक्षा वेग आताच कमी करू या.
मस्त जगू या..... मजेत जगू या.
No comments:
Post a Comment