साधारणपणे
माझ्याकडे आता नऊ-दहा हजार पुस्तके आहेत. पुस्तकांच्या एका रॅकमध्ये पाचशे
पुस्तकं राहतात असं म्हटलं तर ऑफिसात आठ रॅक्स आणि घरात अकरा-बारा रॅक्स.
यातील काही रॅक्स छोटे मानले तरी त्यातली पुस्तकं नऊ हजारांच्या वर असतील.
खरं तर सात-एक हजार पुस्तकं माझ्याकडे होती, पण डॉ. य. दि. फडके यांचा
मुलगा अनिरुद्ध याने हजार पुस्तकं दिली. कुमार केतकरांनी शंभर पुस्तकं
दिली. एका पारशी मित्राने काही पुस्तकं दिली. पुण्याजवळ लोहगावकडील
फार्महाऊस रिकामे करायचे होते. त्यांची छोटी लायब्ररीही मी विकत घेतली.
ब्रिटनिकाचा संच कोणी फुकट घ्यायला तयार नव्हते. सचिन कुंडलकरने तो घेतला.
मी लहानपणी फार लवकर वाचायला लागलो. माझ्या आजूबाजूची
जवळपास सगळी माणसं अशिक्षित होती. त्यात मोठय़ा प्रमाणावर गिरणी कामगार
होते. १९७२-७३ साली गिरणी कामगारांचा संप झाला, तेव्हा मी आमच्या
आजूबाजूच्या मंडळींना संपादकीय वाचून दाखवायचो. मी पाचवीपर्यंत
महानगरपालिकेच्या शाळेत होतो. तिथे काही पुस्तकं वर्गात वाटली जात. त्यात
माझ्या हाती लागलेले पुस्तकं म्हणजे टॉम सॉयरचा अनुवाद. टॉमच्या गोष्टी
अद्भुत होत्या. घरी असलेले पांडवकथा, इसापनीती वाचली. मी वर्षांनुवष्रे
अनेक वेळा ही पुस्तकं वाचली. घरात मोजकीच पुस्तकं होती. मी गीताईवरील
पुस्तक गोष्टीसाठी वाचे. अगदी कुठलेही पान उघडून वाचनाला सुरुवात करायचो.
आजूबाजूला टीव्ही तर सोडाच, पण रेडिओही नव्हता.
त्यामुळे वाचन हेच मनोरंजनाचे साधन. खारला राहणारे राणे मला पसे देत व
अर्नाळकरांच्या रहस्यमय कादंबऱ्या आणायला सांगत. एकजण रस्त्यावर पुस्तकांचे
दुकान मांडत असे व डिपॉझिट घेऊन तो पुस्तक देत असे. मी राणेंच्या हातात
पुस्तक सोपवण्याआधी वाचून काढायचो. चांदोबा, किशोर ही वाचनाची मोठी साधने
होती. मग मला खार स्टेशनजवळ असलेल्या नॅशनल लायब्ररीचा शोध लागला. प्रशस्त
जागेत चार-पाच कपाटे. फी भरून त्यातली दोन पुस्तकं घेता यायची. एक छोटय़ांचं
आणि एक मोठय़ांचं. संध्याकाळीसुद्धा ही लायब्ररी सुरू असायची. एक चष्मीस
तरुण माणूस संध्याकाळी सहा वाजता ती उघडून आठ वाजेपर्यंत चालू ठेवत असे. मी
दोन पुस्तकं वाचून सहाच्या आधीच वाचनालयाच्या दारापाशी हजर राहायचो.
बऱ्याचदा उभ्याउभ्याच एखादं छोटं पुस्तकं वाचून होई. वाचनालयाची ही चन
करायला फक्त सुट्टीतच परवानगी होती. माझा भाऊ सुधाकर हा जे. जे. स्कूल ऑफ
आर्ट्समध्ये होता. तो वांद्रय़ाला पश्चिमेकडील लायब्ररीतून पुस्तकं आणत असे.
विशेषत: अगाथा ख्रिस्तीच्या पुस्तकाची मुखपृष्ठ मला विशेष आवडत. ‘अॅण्ड
देअर वेअर नन’च्या मुखपृष्ठावर खडकाचं चित्र होतं, त्याला चेहऱ्याचा आकार
होता. माझ्यावर छापील शब्दांचा, चित्रांचा, मजकुरांचा तीव्र परिणाम होत
असे. शाळेच्या पुस्तकात बकासुराचे चित्र होते. त्या पानावर बकासुराच्या
तोंडावर हात ठेवूनच ते पुस्तक वाचे. फॅन्टम आणि मॅन्डिक्सच्या कॉमिकमधील
विश्व मला खरी वाटत असे. अल्लाउद्दीन गुहेत बंद झाल्यावर बाहेर कसा येणार,
हा विचार मनात येई. कागदावरच्या माणसांची दु:खं बघून डोळे भरून येतात.
रामायण संक्षिप्त रूपात वाचले होते, पण शेजारच्या नारीवरेकरांकडे बालकांड
वगरे भाग असलेले रामायण होते. तेही वाचायचो. या काळात जेम्स बॉण्डच्या
अनुवादाची पुस्तकं स्वस्तात मिळत. तीही वाचली होती. पॉकेटबुक स्वरूपात. मी
पाचवीनंतर खारदांडय़ाच्या बी.पी.एम. हायस्कूलमध्ये दाखल झालो. शाळेत प्रशस्त
वाचनालय होतं. आतुरचिकित्सा वगरे शब्द असलेली पुस्तकं तिथं पाहायला
मिळाली. विवेक परांजपेच्या ‘आपली सृष्टी, आपले धन’चे खंड इथे होते. शेरलॉक
होम्स होता. त्याचे मराठी अनुवाद होते. अजय गद्रे या माझ्या मित्राकडे
स्वत:ची अशी भरपूर पुस्तकं होती. एक-एक करून त्यांचा फडशा पाडला. ज्युल्स
वर्नचे ‘सूर्यावर स्वारी’, ‘संक्षिप्त डेव्हिड कॉपरफिल्ड’ अशा अनेक
कथा-कादंबऱ्या त्यांच्याकडे होत्या. अनिरुद्ध फडके वर्गात आला. त्याचं
वाचनही जोरदार होतं. त्याची आई आम्हाला भूगोल आणि संस्कृत शिकवत असे.
त्याने एक दिवस पन्नासएक पुस्तकं वाचून प्रत्येकाला एक-एक दिलं. मला दुर्गा
भागवतांचे ‘पस’ आलं. काळ्या मुखपृष्ठावर पांढऱ्या धबधब्याचं चित्र असलेलं
पुस्तक आणि त्यातील ‘निराशा आली की..’ हा लेख. यांनी पुढे बराच काळ सोबत
केली.
पुस्तकं अनेकदा आनंद देतात.
पुस्तकांशी झटापट करावी लागते. चांगले पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाही,
पण आयुष्य बदलू शकतं. होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’
नावाच्या या कथेत लेखकाला दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं
असतात.
मकरंद देशपांडे आमच्या
वर्गात होता. त्याची आई लायब्ररीत होती. कधीतरी सुट्टीत त्या लायब्ररीत
जायला मिळायचं. त्यात अगदी छतापर्यंत पुस्तकं होती. शाळेतून घरी येताना
वाटेवरच कमलाबाई निमकर वाचनालय होतं. गुहेतल्या अंधारागत काळोख आणि शांतता
असं तिथलं वातावरण असे. मी तिथे वाचन करायचो. शाळेतील अभय अवचट, अतुल
जिनसीवाले, अनिरुध्द
फडके, श्रीपाद ढेकणे, मिलिंद कुलकर्णी अशी कितीतरी मुलं पुस्तकं वाचत.
मिलिंद कुलकर्णी हा सुमती पाडगावकरांनी केलेल्या परिकथांची पुस्तकं वाचत
असे. या संग्रहात सुंदर चित्रंही असायची. मला त्या कथा फार भिडल्या नाहीत.
त्यांचा मोठेपणा कळायला वेळ जावा लागला. नववीच्या सुट्टीत इंग्रजी
वाचण्याचा प्रयत्न केला. अल्स्टेअर मॅकलीनचे ‘एचएमएस युलिसिस’, अगाथा
ख्रिस्तीचे ‘कॅट अमंग पिजन्स’, ‘वे टू डस्टी डेथ’ अशी पुस्तकं. एचएमएस
युलिसिस जमलं नाही. ‘कॅट अमंग पिजन्स’ संपवलं. गुडघ्याच्या आकारावरून बाईचं
वय कळतं, असं वर्णन त्यात होतं. आयुष्यात पहिल्यांदा मोठे पुस्तक विकत
घेतले. अजयच्या संग्रहातील एक, दोन, तीन.. अनंत म्हणजेच जॉर्ज गॅमाऊच्या
‘वन, टू, थ्री इन्फिनिटी’चा अनुवाद. त्यात स्वत: लेखकांनी काढलेली चित्रं
आहेत. ते कितीदा वाचलं त्याची गणतीच नाही. फक्त त्या वेळी त्यातला
सापेक्षता वादावरचा सिद्धांत समजणं कठीण गेलं. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास
करताना पडतो, तसा पुस्तकातला तो भाग ऑप्शनला पडला. पण, काय पुस्तक होतं!
आइस्टाइनचा अभिप्राय त्या पुस्तकाला आहे. या पुस्तकामुळं मी बरंच काही
शिकलो. जॉर्ज गॅमाव हा प्रसिद्ध शास्त्रज्ञही चित्रं काढायचा. त्याने स्वत:
म्हटलंय की, आधुनिक विज्ञानातल्या रंजक गोष्टी आणि सिद्धांत गोळा करून
त्या अशा प्रकारे सादर कराव्यात की, विश्वाची सूक्ष्म आणि सूक्ष्मतर रचना
कशी आहे याचं चित्र सामान्य वाचकांपुढे उभं राहावं. हे वाक्य जरा बोजड वाटत
असलं तरी प्रत्यक्षात मात्र पुस्तक कथा-कादंबऱ्यांपेक्षा रंजक आहे.
मी वाचनात गुरू न करता वाचन सुरू केलं. पण, चांगले
वाचक काही सूचना करत असतात. विश्वास पाटील (नवी क्षितिजकार) यांनी शिस्तीने
वाचन करावं, असं सांगितलं. अर्थात ते ऐकणं शक्य नव्हतं. पण, त्यांनी
ब्रायन मगीचं ‘कन्फेशन ऑफ फिलॉसॉफर’ हे पुस्तक वाचायला सुचवलं. हे मोठेच
उपकार! कारण हे पुस्तक गवसणं हा वाचनातला आनंदाचा क्षण होता. या पुस्तकाचा
लेखक ऑक्सफर्डमध्ये शिकला. त्यानंतर विद्यापीठात (अमेरिकेत) लहानपणी त्याला
एकदा वाटलं, जगाचे अस्तित्व हे एक प्रकारे आपल्यामुळेच असतं. त्याच्या हे
लक्षात आलं की, हा किंवा असा विचार म्हणजेच तात्त्विक विचार होय.
ऑक्सफर्डमधल्या शिक्षण पद्धतीबद्दल त्याने लिहिलं
आहे. एका प्राध्यापकानं शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी ते ऐकायचं.
त्याप्रमाणे तिथं शिकवलं जात नाही. शिकवण्याच्या पद्धतीला टय़ुटोरियल असं
म्हणतात. विद्यार्थ्यांला सर्वप्रथम एक निबंध लिहायला सांगितला जातो.
त्यानंतर प्राध्यापक त्या निबंधाबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. काही
प्रश्न विचारतात. या पद्धतीने प्रामुख्याने कला आणि तत्त्वज्ञान याविषयी
शिक्षण चालत. स्वत: लेखक कार्ल पॉपरसारख्या तत्त्वज्ञानाला ओळखत होता.
ब्रायन मॅगीनं पुस्तकात कार्ल पॉपरवर दीर्घलेखन केलंय. पॉपरने आपल्या लॉजिक
ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरीसारख्या पुस्तकाचं पुन:पुन्हा म्हणजे तब्बल पंचवीस
वेळा लेखन केलं, असा उल्लेख त्यात आहे. लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी आणि
मॅगीचं कन्फेशन ऑफ फिलॉसॉफर ही दोन्ही पुस्तकं लोट्स बुक शॉपमधून दहा
वर्षांपूर्वी विकत घेतली. तेव्हा आठशे रुपये संपले होते. त्या काळात एवढे
पसे कमवायला जवळपास आठवडाभर काम करावं लागे. लोट्स हे छोटंस दुकान म्हणजे
अक्षरश: नालंदा विद्यापीठ होतं. अनेक दुर्मीळ पुस्तकं तिथं मिळत, पण खिशाला
चटका लागल्यावरच! तिथे बसून पुस्तक वाचण्याची सोय होती. लोट्समध्ये विराट
चंडोक हा व्यवस्थापक होता. त्याचं स्वत:चं वाचन उत्तम होतं.
‘जेंटलमन’सारख्या मासिकात तो कवितेवर लिहीत असे. त्यांच्यामुळेच उत्तर
आधुनिकतेतील अनेक पुस्तकं, जॉर्ज ल्युई बोरहेसच्या समग्र कथांचा खंड,
ओरिएंटलिझम, डेरेक जार्मनची डायरी अशी पुस्तकं संग्रहात दाखल झाली. पॉपरचं
‘कन्सेप्ट अॅण्ड कॅटेगरीज’ हेही पुस्तक तिथे मिळालं.
पुस्तक विक्रेते आणि संग्राहक यातलं नातं उलगडणारं
ग्रेट पुस्तक म्हणजे ‘एटी फोर चेिरग क्रॉस रोड’. हेलन हॅम्फ ही अमेरिकन
लेखिका वर्षांनुवष्रे लंडनमधल्या एटी फोर चेिरग क्रॉस रोडवरच्या दुकानातून
पुस्तकं मागवत असे. तिने न्यूयॉर्कहून दुकानाला लिहिलेली पत्रं आणि तिला
आलेली उत्तरं यांचा हा संग्रह आहे. हे नातं पत्रागणिक दृढ होत गेलं. इतकं
की, इंग्लंडमध्ये मटणाचा तुटवडा पडल्यावर लेखिकेनं त्यांना पोस्टानं मटण
पाठवलं. पानोपानी या पत्रांमध्ये पुस्तकांची वर्णन आहेत. कधी हवं ते पुस्तक
न मिळाल्यानं लेखिका चिडते. ती म्हणते, ‘तुम्ही करता काय? तुमचं दुकान
चालतं तरी कसं?’ एकदा ती म्हणते, ‘मी सॅम्युअलच्या डायऱ्या मागवल्या
होत्या. तुम्ही पाठवलेलं पुस्तक म्हणजे कोण्या व्यस्त संपादकानं घाईघाईत
केलेलं तुकडय़ांचं संकलन आहे. मग उत्तरात पुस्तकवाले म्हणतात, ‘चूक झाली.
आम्हाला वाटलं तो सॅम्युअल पेपीडचा संग्रह आहे. तुमचा आवडता उतारा पुस्तकात
न सापडल्यानं झालेली निराशा आम्ही समजू शकतो.’ एकदा ती म्हणते, ‘न वाचलेलं
पुस्तक विकत घेणं माझ्या तत्त्वाच्या विरोधी आहे. हे म्हणजे कपडा अंगाला
येतोय की, नाही हे न बघता तो विकत घेणं आहे.’
लेखिका टीव्हीसाठी आणि एलरी क्वीन या रहस्यकथा
लेखिकेच्या मासिकासाठी रहस्यकथा लिहीत असे. त्यामुळे ती प्रेमानं म्हणते,
‘माझ्या रहस्यकथेच्या पात्रांना मी तुमची नावं देणार आहे.’ ती म्हणते, ‘मी
दुर्मीळ पुस्तकं विकणाऱ्यांवर रहस्यकथा लिहिणार आहे. तुम्हाला काय लिहायला
आवडेल- खुनी की, प्रेत..’ साधारणपणे दोन एप्रिल १९५० ते ऑक्टोबर १९६९
पर्यंत हा पत्रव्यवहार चालू होता. दुकानातले फ्रँक, सिसिली आणि शैला
यांच्याशी तिची चांगली मत्री झाली, पण त्यांनी कधीच एकमेकांना पाहिलं
नव्हतं. एक दिवस मात्र खरंच हेलन लंडनला जाऊन सर्वाना भेटली. तेव्हा फ्रँक
मात्र जिवंत नव्हता. त्यावर आधारित ‘द डचेस ऑफ ब्लुमबेरी स्ट्रीट’ हे
पुस्तक तिने लिहिलं.
वाचन म्हणजे केवळ पुस्तकाचं वाचन का? आपल्या वाचनाचा
मोठा भाग हा नियतकालिकातले लेख, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी व्यापलेला
असतोच. पण (पुस्तकात न आलेले) लेख परत-परत वाचणे हीसुद्धा एक सतत वाचनाची/
अनुभवण्याची गोष्ट असते. सत्यकथेतील दिलीप चित्रेंची लेखमाला आणि त्यांनी
केलेले ‘ऑक्टोवियो पाज’च्या ‘सनस्टोन’ या कवितेच्या रचनेचा अनुवाद, मे.
पुं. रेगे यांचा कुरुंदकरांच्या ‘रूपवेध’ची चिरफाड करणारा लेख, अशोक शहाणे
यांचा ‘मनोहर’मधील लेख. ‘ऋचा’च्या अरुण कोलटकर विशेषांकातले लेख, जेम्स
फ्रेझरच्या ‘गोल्डन बग’चे विट्गेनस्टाइनने केलेले परीक्षण, जोनाथन
फ्रेंझनचा ‘व्हाय बॉदर’ हा लेख, हेराल्ड ब्लुमचा ‘हाऊ टू रीड पोएम’, पॅरिस
रिह्यू मधील मार्क स्टड्रची मुलाखत आणि अॅलन गिन्जबर्ग या कवीचा
शिकवण्यावरचा लेख, माधव आचवल यांचा ‘ताजमहाल’वरचा लेख, न्यूयॉर्करमधला
‘व्हेन डॉक्टर्स मेक मिस्टेक’ हा अतुल गवांदेंचा लेख, ऑक्सफर्ड
डिक्शनरीच्या संपादकाने केलेले ‘वेबस्टर डिक्शनरी’चे परीक्षण, गोिवद
तळवलकरांचा ‘शुभास्ते पंथान:’, य. दि. फडके यांचा डबडा थिएटरमध्ये
बघितलेल्या सिनेमांवरचा लेख, ‘नवभारत’मधला मे. पुं.चा ‘वेदनदत्त
उपपत्ती’वरचा लेख, स्वित्र्झलडमध्ये अज्ञातवासी असलेल्या गोदार्दवरचा
न्यूयॉर्करमधला लेख, टाइम्स लिटररी सप्लिमेंट (टीएलएस)मधला जॉन बेलीचा
शेक्सपीयरच्या कवितांवरचा लेख, कार्ल पॉपर यांचा ‘हाऊ आय बीकम फिलॉसॉफर
विदाऊट ट्राइंग’ हा लेख, साहिर लुधायानवीवरचा हृदयनाथ मंगेशकर यांचा लेख,
हबरमासचा ‘मॉर्डनीझम, अॅन अनफिनिश्ड प्रोजेक्ट’ हा लेख, विनोबांचा
ज्ञानेश्वरीवरील ‘हारपले आपणची पावे’ हा लेख..
हे सारे लेख पुन:पुन्हा शोधणे आणि वाचणे म्हणजे निखळ
आनंद. ते शोधणे म्हणजे निव्वळ विरंगुळा. यातले अनेक लेख कधी वाचले तेही
आता आठवते. ‘वेदनदत्त उपपत्ती’वरचा ‘नवभारत’मधला लेख वाशी रेल्वे स्टेशनात
वाचत बसलो होतो. हा
लेख साधारणपणे सोळा पानांचा होता. मी दोन-तीन गाडय़ा सोडून दिल्या (साधारण
पंधरा-वीस मिनिटांनी गाडी येई). नंतर मी मे. पुं.ना हा अनुभव सांगितला. ते
म्हणाले, ‘तत्त्वज्ञानासारख्या विषयांवर मराठीत लिहिताना परिभाषा कळत नाही
असे वाचक म्हणतात, पण ती प्रयत्नपूर्वक वाचावी लागते.’
अतुल गवांदे हा न्यूयॉर्कमधला मराठी तरुण सर्जन.
आई-वडील दोघे डॉक्टर. त्यामुळे लहानपणापासून तो पेशंटचे फोन घेऊन त्यांना
इमर्जन्सी किंवा ओपीडीत पाठवत असे. त्याची न्यूयॉर्करच्या तरुण संपादकांशी
गाठ पडली. त्याने अतुल गवांदेला लेखन करायला लावले. डॉक्टरांकडून होणाऱ्या
चुकांवर त्याने लेखन केले. संपादकाने त्या लेखाचे सात वेळा पुनल्रेखन
करायला लावले. सुरुवातीला त्याने आपल्या हातून झालेल्या चुकीमुळे एक पेशंट
कशी मरणार होती, ते सांगितलं. नंतर अशा चुका का होतात, त्यांची साप्ताहिक
बठकीत चर्चा होते, इत्यादी वर्णनं केली. अमेरिकेत अॅनेस्थेशिया देताना
होणाऱ्या चुकांमुळे शरीरातले कार्बन वाढल्याने हजारो लोक मरतात, इत्यादी
माहिती त्या लेखात दिली. ‘न्यूयॉर्कर’ची अठरा पाने भरतील एवढा मोठा तो लेख
होता. ‘लँसेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय जर्नलने त्यावर संपादकीय लिहिले. थोर
लेख पुस्तकात आला. न्यूयॉर्कमधला जाँ लुक गोदार्दवरचा लेख मला आवडतो.
अंकाच्या लेखकाने गोदार्दला कॅफेत भेटून मुलाखत घ्यायचा प्रयत्न केला. एका
कॅफेत गोदार्द येत असे. दोन-तीन दिवस तो आला, पण नंतर त्याने टांग मारली.
‘न्यूयॉर्कर’चे अंक शोधताना त्याच्या मुखपृष्ठांचा उपयोग होतो. गोदार्दची
मुलाखत असलेल्या अंकावर प्राण्यांच्या शर्यतीचे आणि सोंड लांब करून
िहडणाऱ्या हत्तीचे चित्र आहे.
पुस्तकांच्या संग्रहामध्ये काही वेळा मित्रांचा
सल्ला उपयोगी पडतो. कधी आपल्याच मनाचे ऐकणे सोयीस्कर पडते. माझे असे अनेक
मित्र आहेत. उदाहरणार्थ, जयराज साळगावकर किंवा दीपक लोखंडे हे केवळ फिक्शन
वाचणारे आहेत. राजीव श्रीखंडेसारखा मित्र केवळ फिक्शन वाचणारा आहे.
मित्रांना ग्रेट वाटणारे पुस्तक आपल्याला ग्रेट वाटेल असे नाही.
चांगले पुस्तक दिसले की, ते असेल त्या किमतीला
घ्यावे लागते. प्रसंगी पसे नसतील तर घडय़ाळ वगरे गहाण ठेवावे. थोडी रक्कम
अॅडव्हान्स म्हणून द्यावी. मला स्वत:ला नोकरी वगरे करण्यात रस नसल्याने मी
पुस्तकं विकत घ्यावीत, ती वाचावीत आणि त्याच वेळेस मित्रांसाठी पुस्तकं
घ्यावीत आणि त्यांना विकावीत याप्रमाणे काम सुरू केलं. सुरुवातीला जवळच्या
मित्रांना मी चार-पाच पुस्तके एकत्र देत असे. ही गोष्ट साधारणपणे ९०-९५
सालादरम्यानची आहे. पत्रकारितेतली नोकरी सोडल्यावर मी पूर्ण वेळ वाचन
करायला मोकळा झालो. पण, अशानं चरितार्थ चालवायचा कसा? मग मी थोडे-थोडे करत
वर्तुळ वाढवले. अनेक संपादक, चित्रकार, लेखक यांना पुस्तके विकू लागलो.
शिवाय वाचणाऱ्या माणसाच्या इतरही गरजा कमी होत जातात. उदाहरणार्थ, लौकिक यश
वगरे.
१९९५ ते २०१२ या काळात हळूहळू माझा संग्रह समृद्ध
होत गेला. सुरुवातीला पॉकेट बुक्स, हार्डबाऊंड बुक्स, दुर्मीळ पुस्तकं असं
करता-करता नंतर ब्रिटनिकाचे संच किंवा कलेवरची जाड पुस्तकं मी जमवली. मायकल
अँजेलो या चित्रकाराच्या सर्व चित्रांचे फोटो असलेलं पुस्तक मी विकत
घेतलं. सात किलो वजनाचं हे पुस्तक २००० साली मी पाच हजारांना विकलं.
त्यातून माझा महिन्याचा खर्च भागला. तो अख्खा महिना त्या एका पुस्तकामुळे
मी फक्त वाचनाला देऊ शकलो.
‘गूढयात्री’ हे जीएंचं पुस्तक किंवा ‘परफ्यूम’ हे
पुस्तक मी एक चार-पाच तासांच्या बठकीत संपवले. रात्री अकरा-साडेअकराला सुरू
केलेलं त्या पुस्तकाचं वाचन पहाटे संपवलं. चांगली पुस्तकं शक्यतो एका
बठकीत संपवावी. अलीकडेच ‘िहदू’ ही भालचंद्र नेमाडेंची कादंबरी मी तीन
दिवसांत वाचली. त्यातील शेवटची ४५० पाने सलग सात-आठ तास बसून वाचली. चहा
पिण्यासाठी उठलो तेवढंच. ‘पहिली जाग’ ही सुनील गंगोपाध्यांची कादंबरी
सुमारे १७७३ पानांची आहे. ही कादंबरी संपवायला पाच दिवस लागले. एखाद्या
महाकाव्यासारखी ही कादंबरी १८८० ते १९१० या तीस वर्षांच्या काळातील
बंगालमधील घडामोडी रंगवते. त्यात रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण आणि विवेकानंद
या बंगालमधील क्रांतिकारक, समाजसुधारक, बंकीमचंद्रांसारखा लेखक इतकेच काय
अगदी गांधीजी व चाफेकर बंधूंचीही चित्रणं आहे. बंगाली रंगभूमीचे व त्यातील
लिजंडरी नट-नटय़ांचे दर्शन यात घडते. हे सारे गंगोपाध्याय यांनी कसे लिहिले
तर प्रचंड अभ्यास, जुनी वर्तमानपत्रं व कागदपत्रं, अनेक संदर्भग्रंथ चाळून
त्यांनी ही कादंबरी सिद्ध केली. हे पुस्तक मराठीत आणण्याचे श्रेय रंजना
पाठक यांना जाते.
पुस्तकं अनेकदा आनंद देतात. पुस्तकांशी झटापट करावी
लागते. चांगले पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाही, पण आयुष्य बदलू शकतं.
होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’ नावाच्या या कथेत लेखकाला
दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्याचं शेवटचं पान
कधीच येत नाही. मला वाटतं, ‘रामायण’, ‘महाभारत’ ही महाकाव्यं ‘इलियड’,
‘श्यामची आई’, ‘चिमणरावांचे चऱ्हाट’, ‘कोसला’, ‘काजळमाया’, ‘विनोबांची गीता
प्रवचने’, सोनोपंत दांडेकरांची ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ची प्रत, पीटर वॅटसनचे
‘टेरीबल ब्युटी’, कम्प्लीट शेक्सपीअर, पीटर अॅन्रेसनचं ‘हिस्टरी ऑफ आर्ट’,
फ्रेडरीक कोपलस्टनच्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचे नऊ खंड, ‘कान्टची
सौंदर्यमीमांसा’ हे रा. वा. पाटणकरांचे पुस्तक, ‘अरेबियन नाईट्स’,
ब्रिटनिकाचे खंड, संकलित पी. जी. वुडहाऊस, मास्रेल क्रुढस्टचे आत्मचरित्र,
इसापच्या गोष्टी आणि ‘िहदू’, तेंडुलकरांची नाटके, बोऱ्हासचा समग्र कथांचा
संग्रह, मार्क स्ट्रन्ड, सिल्विया प्लाथ, रॉबर्ट लॉवेल, रिल्के, पाब्लो
नेरुदा यांच्या समग्र कवितांचे संग्रह, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘गणगोत’, ‘तुकाराम
गाथा’, व्ही. शांताराम यांचे ‘शांताराम’, म. वा. धोंड यांचे ‘रापण’, हेन्स
अॅन्डरसन आणि ग्रीम्सच्या परिकथा, जे. कृष्णमूर्तीचे ‘कॉमेंट्रीज ऑफ
लिव्हिंग’ ही सारी पुस्तकं म्हणजे ‘बुक ऑफ सॅन्ड’ आहेत. ती मी पुन:पुन्हा
वाचत असतो. त्यांचे शेवटचे पान कधी येतच नाही. |
No comments:
Post a Comment