इच्छामणी
इच्छामणी गणपती मंदिर Ichchhamai Ganapati Mandir, Nasik |
मंदिर स्थापनेचा इतिहास
इच्छामणी गणपती मंदिराची स्थापना १९८६च्या चैत्रपाडव्याला झाली. दादामहाराज जोशी यांनी विविध ठिकाणी २५ मंदिरे बांधण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार आजपर्यंत भारतातील बहुतेक ठिकाणी मंदिरे उभारण्याची संकल्पपूर्ती झाली आहे. नाशिकचे मंदिर बांधण्याअगोदर दादा महाराजांनी मध्य प्रदेशातील धार, महाराष्ट्रातील शिरपूर, नंदुरबार व धुळे येथील मंदिर पूर्णत्वास नेली आहेत. नाशिकचे मंदिर हे त्या श्रृंखलेतले आठवे मंदिर आहे. मंदिराचे हे २७वे वर्ष असून या वर्षात विविध धार्मिक उपक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम राबविण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस आहे.
भव्य सभामंडप
मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिरासमोर प्रशस्त असा ५० फूट बाय ४० फूट आकाराचा सभामंडप आहे. या मंडपात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. त्याचप्रमाणे प्रवचन, कीर्तन, भजन, व्याख्यान यांचे आयोजन केले जाते. मुळातच या मंदिरात स्वच्छतेवर अधिक भर असल्याने सभामंडपात ध्यानधारणा करण्यास प्रसन्नता लाभते. सभामंडपात कीर्तनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतात. महाराष्ट्रातील नावाजलेल्या कीर्तनकारांसोबत अनेक नामवंत कलाकारांनी कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे. आजही महाराष्ट्रातले कलाकार या ठिकाणी हजेरी लावण्यास उत्सुक असतात.
मंदिराचे स्थापत्य
मंदिराला भव्य आवार आहे. मंदिर अत्यंत सुटसुटीत बांधले असून कितीही गर्दी झाली तरी भाविकांना त्रास होत नाही. सभागृहासमोरच मंदिर आहे. दहा पायऱ्या चढून गेल्यावर पाढऱ्या संगमरवरातील कासवाचे दर्शन होते. पुरूष व महिलांसाठी वेगळी रांग करण्यात आली असून मंदिरात प्रवेश करताना मधोमध स्टीलचे बॅरिकेड्स बांधण्यात आले आहेत. त्यामुळे धक्काबुक्की होत नाही. सर्वांना शांततेत दर्शन घेता येते. मूळ मंदिर बाहेरून चौकोनी दिसत असले तरी गाभारा अष्टकोनी बांधण्यात आला आहे. आठ दिशांपैकी पूर्वेला देवाचे मुख असून गाभाऱ्यात नैसर्गिक उजेड येण्यासाठी आग्नेय व ईशान्य दिशेला जाड काचेच्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. मुख्य गणपतीची मूर्ती तीन फूट उंचीवर असून मंदिरात शेवटी उभ्या असलेल्या भाविकालाही गणपतीचे व्यवस्थित दर्शन घडते. गणपतीच्या मूर्तीमागे पूजेची भांडी ठेवण्याची जागा आहे. त्याच ठिकाणी देवाची वस्त्रेही ठेवली जातात. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूकडून मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा आहे. प्रदक्षिणेचा मार्ग मोठा असल्याने येथेही भाविकांना व्यवस्थित आराधना करता येते. त्याचप्रमाणे दर्शन झाल्यावर प्रदक्षिणा संपल्यानंतर हिरवळीवर बसता येते. तेथे बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली आहे. या मंदिरात नारळ फोडण्यासाठी व उदबत्ती लावण्यासाठी वेगळी जागा करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात घाण होत नाही व नारळाच्या पाण्यामुळे चिखलही होत नाही.
विलोभनीय
सुबक मूर्ती
संगमरवरातील सुबक अन् पांढरी शुभ्र अशी विलोभनीय मूर्ती भाविकांना आत्मिक शांती देते. मूर्तीच्या हातांत विविध आयुधे आहेत. एका हातात परशू असून दुसऱ्या हातात फास आहे. तिसऱ्या हातात मोदक तर चौथा हात अशीर्वाद देणारा आहे. ही मूर्ती खास राजस्थानहून बनवून आणली होती. मूर्ती संगमरवरी शुभ्र पाषाणात बनविण्यात आली आहे. या मूर्तीचे डोळे विलक्षण सुंदर आहेत. गणेशोत्सवात मंदिराला वेगळीच झळाळी प्राप्त होते. मूर्तीच्या बाजुला महिरप असून तिला फुलांनी सजविण्यात येते. गणपतीच्या आजुबाजूला संगमरवरी रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती असून गणपतीसमोर रिद्धी-सिद्धी असणारी उत्तर महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती असावी, असे जाणकारांचे मत आहे. समोर काळ्या पाषाणातला सुबक मूषक आहे. या मूषकाचे पुढचे दोन पाय वर असून गणपतीच्या सेवेसाठी सिद्ध असल्याचे दिसते.
मंदिरातील उत्सव
मंदिरात दरवर्षी पाडवा ते रामनवमी असा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात विविध वक्त्यांची व्याखानं आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंदिरात आजतागायत बाबामहाराज सातारकर, शिवाजीराव भोसले, शंकर अभ्यंकर अशा विभूतींची व्याख्याने झाली आहेत. तसेच दर तीन महिन्यांनी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातील कीर्तनकारांबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार या महोत्सवाला हजेरी लावतात. तसेच गोकुळ अष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बालगोपाळांसाठी दहीहंडी रचली जाते व काला वाटण्यात येतो. त्याच प्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे येणारे सर्वच सण साजरे होत असल्याने येथे नेहमी भक्तीचा मळा फुललेला असतो.
बालकांसाठी पाठांतर वर्ग
सध्याच्या पिढीमध्ये धार्मिक तत्त्वज्ञान वाढीस लागावे, श्लोकांचे पठण व्हावे यासाठी पाठांतर स्पर्धा घेण्यात येतात. यात गणपती अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा यांचे वर्ग घेण्यात येतात. त्याचप्रमाणे संस्कार वर्गाचेही आयोजन करण्यात येते.
मंदिराचे सामाजिक कार्य
इच्छामणी मंदिराचे प्रमुख वैशिष्ट असे की, येथे येणारा प्रत्येक पैसा सामाजिक कामासाठी वापरण्यात येतो. मंदिरातर्फे प्राथमिक विद्यालय चालवण्यात येत असून सध्या १ली ते १०वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या विद्यार्थीसंख्या १२०० असून विश्वस्तांचा ज्युनिअर कॉलेजचा प्रस्ताव आहे व त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षिणक सुविधा पुरविण्याकडे विश्वस्तांचा भर असतो. एखाद्या विद्यार्थ्याला शाळेची फी भरणे परवडणारे नसल्यास त्यांच्या शैक्षिणक खर्चाचा वाटा मंदिराकडून उचलण्यात येतो. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला खेळासाठी बाहेर गावी पाठवले जाते, त्यावेळी त्याचा सर्व खर्च संस्था करते. त्याचप्रमाणे यंदा भाविकांच्या मदतीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच अद्ययावत अशी कम्प्युटर लॅब तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचाही मानस आहे.
रक्तदान शिबीर
प्रत्येक चतुर्थीला येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. या दिवशी मंदिरात अडीचशे ते तीनशे रक्तपिशव्याचे संकलन होते. तसेच सर्वरोगनिदान शिबीर दर दोन ते तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येते. यावेळी गरजूंना मोफत औषधेही वाटली जातात. याबरोबर अनेक वेळा नेत्ररोग शिबिराचे आयोजन करण्यात येते.
हार्ट सर्जरी सहाय्य निधी
भाविकांच्या मदतीवर व मंदिर ट्रस्टच्या पुढाकाराने हार्ट सर्जरीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून ही योजना लवकरच कार्यन्वित होणार असल्याचा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सवात सध्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले आहे. काही भाविक तर शहरातल्या सिडको सातपूर, भगूर परिसरातून पायी चालत येतात. मंदिरात आर्कषक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून रात्रीच्या वेळेस विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात
राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असताना अशा परिस्थितीत आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात्त भावनेने इच्छामणी गणेश मंदिर ट्रस्टने सामाजिक बांधीलकी जपत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी दीड लाख रुपयांची मदत केली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे मंदिराच्या विश्वस्तांनी १ लाख ५१ हजारांचा चेक मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द केला. त्याचप्रमाणे उत्तराखंड येथे आलेल्या महाप्रलयाने मोठे नुकसान झाले होते. त्यांच्यासाठीही एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही
सातत्याने होत असलेल्या दहशतवादी कारवायांना आळा बसावा व चोरीच्या घटना घडत असल्यास त्या ताबडतोब लक्षात याव्यात यासाठी विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षेतून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. संपूर्ण मंदिर परिसरात प्रशासन व पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. अजूनही सुरक्षा यंत्रणा कडक करण्याचा मानस आहे.
No comments:
Post a Comment