गणेश उपासनेचे अर्धेपीठ -Ganesh Upasaneche Ardhepeeth
Shree Padmalaya Ganesha Mandir |
पद्मालय नुसतं नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येते ते लाल, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या, जांभळ्या रंगातील असंख्य कमळे फुललेले सरोवर. देशात गणपतीची जी अडीच पीठे आहेत त्यापैकी पद्मालय हे अर्धं पीठ. डाव्या व उजव्या सोंडेच्या स्वयंभू गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध. प्रवाळक्षेत्र अशी त्याची अजून एक ओळख. जळगावपासून शिरसोली-म्हसावद मार्गे ३५ किमी अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.
प्रवाळातील स्वयंभू गणेश मूर्ती
पद्मालयाचे मंदिर एका डोंगरावर विस्तीर्ण जलाशयाकाठी आहे. येथील गणपती 'स्वयंभू' आहे. जगात पद्मालय असे एकमेव ठिकाण आहे की, जिथे उजव्या व डाव्या सोंडेचे दोन गणपती प्रवाळ स्वरूपात प्रगट झाले. एकाच सिंहासनावर हे गणपती आरूढ झालेले आहेत.
गणेश पुराणात उल्लेख
पद्मालय क्षेत्राचा उल्लेख मुद्गल गणेश पुराणातील उपासना खंडात अध्याय ७३, ७४ व ९०, ९१ मध्ये आला आहे. कृतवीर्य राजाच्या मुलाला हातपाय नव्हते. प्रभू दत्तात्रेयांनी त्याला एकाक्षरी मंत्र देऊन त्याचे पद्मालयाच्या वनात अनुष्ठान करण्यास सांगितले. गणेशाच्या कृपाप्रसादाने राजाच्या मुलाला हातपाय फुटले व सहस्त्रबाहूंचे बळ लाभले. त्यावरून त्याचे नाव सहस्त्रार्जुन असे पडले. पुढे त्याने प्रवाळरत्नाची मूर्ती स्थापून मंदिर बांधले. पृथ्वीचा भार सहन करता यावा म्हणून शेषानेही या गणपतीचे अनुष्ठान करून दुसरी गणेश मूर्ती स्थापन केली. त्यामुळे या स्थानाला 'धरणीधर क्षेत्र' म्हणूनही ओळखतात.
पेशव्यांनी दिली सनद
स्वयंभू देवस्थान असल्याने छत्रपती शाहू महाराजांचे पंतप्रधान माधवराव बल्लाळ पेशवे यांनी शके १९६० मध्ये (सन १७६८ मध्ये) या देवस्थानास पूजाअर्चा करण्यासाठी व देवळाचे संरक्षणासाठी खान्देशातील ३७ परगण्यांचा निम्मा वसूल करण्याची सनद दिली होती. इंग्रजांनीदेखील ही सनद कायम ठेवून पूजाअर्चा करण्यासाठी खजिन्यातून वार्षिक ६६८ रुपयांची तरतूद केली. केंद्र सरकारने देवस्थानास ६६८ रु. वर्षासन चालू ठेवले आहे.
गॅझेटीअरमध्ये उल्लेख
ब्रिटीश गॅझेटियरमध्ये तसेच महाराष्ट्र राज्य खान्देश गॅझेटीअरमध्ये पद्मालयाचा उल्लेख आहे.
श्रींचे अर्चक
गेल्या आठ पिढ्यांपासून म्हणजे बाबा भटांपासून ते गणेश लंबोदर वैद्यांपर्यंत, वैद्य घराणे हे गणेश मंदिराचे पुजारी (अर्चक) म्हणून काम पाहत आहेत. पेशव्यांच्या सनदेद्वारा त्यांना तसा अधिकार मिळाला आहे. हा अधिकार सरकारनेही कायम ठेवला आहे. आठव्या पिढीतील गणेश लंबोदर वैद्य यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांनी मान्यता दिली आहे. अर्चकांची वंशावळी अशी- बाबा भट (वैद्य), चिंतामण बाबाभट, मधुसूदन चिंतामण, रामचंद्र मधुसूदन, भालचंद्र रामचंद्र, गणेश भालचंद्र, लंबोदर मोरेश्वर, गणेश लंबोदर (१९८१ पासून).
मंदिर
डोंगरमाथ्याथ्यावरील चढण चढून गेल्यावर मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. मंदिर परिसरात मुख्य महाराज गोविंदशास्त्री बर्वे यांच्या पादुका आहेत. १९१५ ते १९३४ पर्यंत सिध्दपुरूषाचे या ठिकाणी वास्तव्य होते. त्यांनीच जुन्या देवळाचा जीर्णोध्दार करून नवीन सुंदर, भव्य देवालय बांधले. मंदिराला लागूनच मोठा सभामंडप आहे. आत शिरताच १.२ मीटर उंचीचा दगडी मूषक दिसतो.
आमोद व प्रमोद
सभामंडपानंतर गाभारा आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर आमोद व प्रमोद द्वारपाल आहेत. आमोद डाव्या सोंडेचा तर प्रमोद उजव्या सोंडेचा आहे. या उलट गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती आहेत. आमोदच्या बाजूची गणपती मूर्ती उजव्या सोंडेची तर प्रमोदच्या बाजूची डाव्या सोंडेची आहे. या प्रवेशद्वारावर उंबरठ्याखाली अनलासूराचे शीर स्थापिलेले आहे. गर्भगृहातील स्वयंभू गणेश मूर्तींना चांदीचे मुकूट आहेत. संपूर्ण दगडी बांधणीचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. दर्शनी भिंतीच्या छतावर प्रचंड दगडी हत्ती उभे आहेत. समोरच्या तलावाचे काठ चिरेबंदी दगडांनी बांधून त्याला घाटाचा आकार दिला आहे.
पंचधातूची घंटा
पुष्करिणीच्या (तलाव) काठावर महाद्वाराच्या अगदी समोर पंचधातूची घंटा बांधलेली असून ती ४.५ क्विंवटल वजनाची आहे. या घंटेच्या लोलकाचे वजन २० किलो असून, घंटेचा आवाज १५ ते १६ कि.मी. परिसरात ऐकू येतो.
अखंड दगडात बांधकामाचा भास
गाभाऱ्यात दगडांत पिळलेल्या खुंट्या मोठ्या खुबीने बसविल्या आहेत. खुंट्यांच्या सभोवती दगडांत फुलांची नक्षी कोरलेली आहे. त्यामुळे दगड कोठून सुरू होतो आणि कोठे संपतो ते कळत नाही. त्यामुळे एकसंघ बांधणी दिसते.मंदिराच्या भिंती सोडून मुख्य घुमटाची उंची ५० फूट आहे. कळसाची उंची ६ फूट आहे. मंदिरावर एकूण नऊ घुमट आहेत. कळस सोन्याच्या पत्र्याने मढविलेले आहेत. या सर्व मूर्तींच्या मागे दगडात कमळांच्या पाकळ्या कोरलेल्या आहेत. कमळपुष्पांच्या पाकळ्यांत देवळाचा घुमट ठेवल्याची संकल्पना आहे. या कमळ पाकळ्यांना संरक्षण म्हणून चार ते पाच इंच जाडीची साखळी दगडातच कोरलेली आहे. मंदिरातील सभा मंडपावर सहा फूट उंचीचे दोन हत्ती दोन्ही बाजूंच्या भिंतीवर उभे आहेत. हे हत्ती चुना, कात, डिंक व गूळ यांचे मिश्रणापासून बनविलेले आहे आणि याच मिश्रणात दगडांमधील फटी इतक्या बेमालूमपणे बुजविल्या आहेत की, संपूर्ण मंदिर अखंड दगडातच आहे असे वाटते.
धान्य दळणाचे जाते
मंदिराचे कामावर असलेले ५६ कुशल कारागीर, त्यांचे सहाय्यक, व्यवस्थापक मिळून दररोज १५० जणांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागत असे. मंदिर बांधकामास नऊ वर्षे लागली होती. या सर्वांचे धान्य दळण्यासाठी सर्व प्रथम मोठे दगडी जाते तयार करण्यात आले होते. ते फिरवण्यासाठी दोन खुंट असून, त्यांना बैल जुंपण्याची व्यवस्था होती. हे भले मोठे जाते बाहेरील प्रवेशद्वाराजवळ ठेवलेले आहे.
दीपमाळ
मंदिरासमोर आखीव-रेखीव दगडाची २५ फूट उंचीची दीपमाळ बांधलेली असून, पूर्वी १०८ दिवे त्यात लावले जात. रात्रीच्या वेळी या दिव्यांचे व त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंदिराचे प्रतिबिंब तलावाचे पाण्यात दिसे.
कार्तिक पौर्णिमेला यात्रा
गणेशचतुर्थी व्यतिरिक्त कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते. या दिवशी कार्तिक स्वामी आपल्या धाकट्या भावाला भेटायला येतात अशी समजूत आहे. माघ शुध्द चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही थाटात साजरा होतो.
भीमकुंड
मुख्य मंदिरापासून दक्षिणेस दीड किमी अंतरावर उंच टेकड्यांच्या मध्यभागी दरीत भीमकुंड आहे. त्याबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की, भीम-बकासूर यांचे तुंबळ युध्द झाले ते इथेच. नदीत असलेला खड्डा म्हणजे भीमाचे पाऊल असल्याचेही दाखविले जाते. कुंडाच्या काठावर महादेवाची पिंड असून परिसरात प्राचीन अवशेष आढळतात.
विद्यमान विश्वस्त मंडळ
विद्यमान विश्वस्त मंडळात अध्यक्ष सुभाष बिर्ला, माजी अध्यक्ष अॅड. आनंद पाटील, ए. एल. पाटील, जिर्णोधार व तीर्थक्षेत्र विकास चेअरमन अशोक जैन, अर्चक गणेश वैद्य, अमृत कोळी, गोकुळ देशमुख, डॉ. पी. जी. पिंगळे, भिका महाजन, अशोक महाजन, राजेश तिवारी यांचा समावेश आहे.
-प्रवीण चैाधरी
(संदर्भ - श्री क्षेत्र गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय, यांचे श्री क्षेत्र पद्मालय , पुस्तक)
No comments:
Post a Comment