वासुदेव कामत , चित्रकार
गणेशाचे रूप हे अबालवृद्धांना भावणारे. देवत्वाइतकेच मित्रत्वही वाटावे , असे काहीतरी त्या रूपात आहे. वर्षानुवर्षे कलाकारांना हे रूप साद घालत आले आहे. अॅबस्ट्रॅक्ट शैलीत कलानिर्मिती करणाऱ्या जागतिक स्तरावरच्या चित्रकारांपासून ते पारंपारिक शैलीत गणेशमूर्ती साकारणाऱ्या चित्रशाळेतल्या कलाकारापर्यंत सर्वांनाच या रूपाची मोहिनी पडते. गणेशाचे रूप साकारतानाच्या आपल्या भावना शब्दांमधून चितारल्या आहेत , गणेशरूपांना चित्ररूप देणारे प्रसिद्ध् चित्रकार वासुदेव कामत यांनी.
भारतात समाज हा मुळातच उत्सवप्रिय आहे. सामाजिक , राजकीय , धार्मिक किंवा कौटुंबिक अशा विविध कारणांनी वार्षिक किंवा प्रासंगिक उत्सवाची मालिका आपल्या देशात जितकी आहे , तितकी अन्य कुठल्याही देशात नसावी. त्यातही धार्मिक उत्सवाच्या मागे श्रद्धा आणि कर्तव्याची जोड असल्याने सीमापार असलेला भारतीय नागरिक देखील आपले उत्सव घेऊनच जात असतो. या उत्सवांच्या यादीत महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि बंगालमधील दुर्गापूजा ही मूर्तिपूजेने साजरी होत असते. महाराष्ट्राला लाभलेले दोन आराध्य देव म्हणजे गणपती आणि छत्रपती शिवराय. या दोन्ही दैवतांच्या जयंतीची आणि त्यांच्या आगमनाची होणारी जय्यत तयारी अन्य कोणत्याही देवतेच्या वाट्याला आलेली नाही. फार तर गाणपत्य संप्रदायाच्या इष्टपूजेत असलेले गणपती हे दैवत हिंदू धर्माच्या दैवतांमध्ये अग्रपूजेच्या स्थानी विराजमान झाले आणि घराघरातून शुभकार्याचा आरंभ गणेशपूजेने होऊ लागला.
जनमानसात गणेशाबद्दलची असलेली भक्ती जमेस धरून आणखी एक वैशिष्ट्य जाणून घेता येईल की हे इष्ट दैवत सकल विद्या आणि कलांची अधिष्ठात्री आहे. गणेश जन्माची कथा अभ्यासून गणेशाचे रूप निश्चित झाले की कुणा एका आदिम कलाकाराच्या सृजनशक्तीतून ही मूर्ती साकार झाली , हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. परंतु ज्या अनामिक कलाकाराने सर्वप्रथम गणेशमूर्ती साकार केली त्याला आम्ही सर्व कलाकारांनी आदरपूर्वक नमस्कार करायला हवा. गजमुख , तुंदीलतनु , लंबोदर , आखुड मांड्या आणि लहानगे मूषक वाहन या सर्व आकारांनी आणि रंगाने भिन्न दिसणाऱ्या गोष्टी एकत्र करून गणेश प्रतिमा साकार होते. ही विलक्षण एकात्मता आहे. प्राण्याचे शीर्ष आणि मानवी शरीर अशा स्वरूपाच्या अनेक देवता आपल्याकडे आहेत. परंतु गजाननाचा गोडवा आणि गोंडस रूप त्यातून प्रतीत होत नाही. म्हणून सर्व कलाकारांना गणेशमूर्तीचे आकर्षण आहे. महाराष्ट्रात (किंबहुना भारतात) जितके शिल्पकार आणि चित्रकार झाले त्या प्रत्येकाने गणेशाचे रूप आपापल्या विचारांनी साकार केले आहे. अगदी केवलाकारी ( नॉन ऑब्जेक्टिव्ह अँड अॅब्स्ट्रॅक्ट) शैलीतून कलानिर्मिती करणारे कलाकारदेखील गणेशरूपाने मोहित झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी आपल्या कलेचा श्रीगणेशा गणेशाकृती काढूनच केला. ' काढायला गेलो गणपती पण झाला मारुती ' अशी मराठीतली म्हण एखाद्याच्या चित्रकलेची अक्षमता दर्शविणारी असली तरी ते एकमेव दैवत असे आहे की कोणत्याही वयात , कुणी कसेही काढले तरी या गणपतीचे चित्र सौंदर्य घेऊन प्रकट होत असते. सर्व शृंगार , अलंकारांनी नटलेल्या मूर्तीप्रमाणे सहजसुलभ आकाराचा गणेशदेखील तितकाच सुंदर दिसतो. म्हणूनच काष्ठी , पाषाणी , फळाफुलांत किंवा ढगांत ' ग ' कारी वक्राकार दिसला तरी शेंदूर न लावताही गणेशाचे दर्शन घडते , असा या सुलभ आकृतीचा महिमा आहे. संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या गणेश स्तवनात
' अ कार चरण युगुल
उकार उदर विशाल
मकार महामंडळ मस्तकाकारे '
अशा प्रकारे अक्षरातून आदिबीज गणेशाचे रूप एकवटलेले दिसते. आज कॅलिग्राफीच्या अक्षरलेखनात गणेशाकृतीचा समावेश केला जातो , याचे आद्यजनक संत ज्ञानेश्वर होते , असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
शाळेत असताना आकड्यांच्या सहाय्याने मानवी चेहरा काढण्याची सोपी पद्ध्त कोणीतरी दाखवली होती , तसेच भौमितिक आकारांना घेऊन गणपतीचे चित्र काढण्यापेक्षा मातीची मूर्ती घडवण्यात अधिक आनंद वाटे. बालपणी मी राहत असलेल्या बोरीवलीतील काजूपाडा या गावात मातीचेच कच्चे रस्ते होते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या अगोदर पावसाळ्यात ट्रक आणि बैलगाड्यांच्या चाकांनी रस्त्यात चिकणमातीचा लगदा झालेला असायचा. त्यातली चांगली मळली गेलेली माती आणून त्याची गणेशमूर्ती बनवणे हा माझा छंद होता. साधारण १९६२ चा तो काळ होता. एखाद्या बांधकामासाठी रेती येऊन पडली की त्यात खाडीतल्या चिकणमातीचे गोळे सापडायचे , तेही मला मूर्ती करायला चालत. त्यावेळी कुणी गणपतीचे कारखानदार शाडूची माती देण्यास तयार नसत. घरातल्या पाटावर मूर्ती करायची आणि चाळीतल्या घराघरात दाखवायला न्यायची हा परिपाठ. कारण पाठीवर कौतुकाचे आशीर्वाद मिळायचे.
पुढे काजूपाड्यातील गणपती बनविणारे जनार्दन बिर्जेभाऊ आणि श्रीकृष्णनगरचे नाना अभ्यंकर या दोन गुरूंचे मिळालेले मार्गदर्शन फार मोलाचे होते. केवळ हौसेखातर गणपतीची मूर्ती घडविताना एखादी आपली मूर्ती गणेशचतुर्थीला पूजली जावी , असे वाटे आणि ही माझी इच्छा माझ्या मावशीने प्रोत्साहन देऊन पूर्ण केली. मी माझ्या धाकट्या भावंडासह राहत असलेल्या दहा बाय बाराच्या पोटमाळा असलेल्या खोलीत एकूण बारा गणपती केल्याचे आठवते.
शालेय जीवनात केवळ कॅलेंडरवर आणि भेटकार्डावर छापलेली गणपतीची चित्रे पाहिली होती आणि त्यांचा संग्रह देखील केला होता. त्यावेळी गणेशोत्सवातल्या अनेक चित्रांप्रसंगांनी सुशोभित गणेश मूर्ती पहाणे हा आम्हा मित्रमंडळींचा नित्यक्रम असे. सर ज. जी. कलामहाविद्यालयात कला शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींतून गणेशाची नानाविध रूपे पाहिली. कलाकाराच्या मनातून निरपेक्षपणे साकार झालेल्या त्या गणेशाकृती मला ' स्वयंभू ' गणपतीसारख्या जाणवल्या. त्यांच्या रचनेत मुक्त आविष्कार होता. देव्हाऱ्यातल्या पूजेच्या मूर्तीपेक्षा कलाकाराच्या स्टुडिओतले गणेशाचे चित्र किंवा मूर्ती कलाकाराशी अधिक जवळीक साधून असते. त्या मूर्तीची निर्मिती हीच एकप्रकारे त्याची पूजा असते. फार पूर्वी गणेशचतुर्थीच्या पूजेसाठी घरातल्या यजमानाने स्वतः नदीतल्या मातीची मूर्ती घडवून किंवा कागदावर गणेशाचे चित्र काढून पूजा करण्याची प्रथा होती. ती प्रथा आज जवळ जवळ नाहीशी झाली असली तरी कलाकाराच्या स्टुडिओत इझलवर किंवा शिल्पकाराच्या स्टँडवर साकार होणारी गणेशमूर्ती या परंपरेला धरून आहे , असे म्हणता येईल. आजही अनेक कलाकार चतुर्थीला आपली मूर्ती आपण स्वतः बनवित असतात. प्रसिद्ध शिल्पकार कै. सोनावडेकर सरांच्या घरात चतुर्थीच्या आदल्या दिवशी शाडूच्या मातीची मूर्ती पूजेकरिता ते स्वतः घडवित असत.
मावशीने प्रोत्साहन म्हणून बालपणी मूर्ती घडवायला दिली तेव्हापासून प्रतिवर्षी मावशी हयात होती , तोपर्यंत घडवित आलो. आता माझ्या कन्येच्या घरचा गणपती तीनचार वर्षे मी परत घडवू लागलो , तसा तो जुना आनंद परत चालून आला.
१९८९पासून सलगपणे काही वर्षे अंबुजा सिमेंट कंपनीच्या कॅलेंडरसाठी गणपतीची नानाविध रूपे मी रंगवली. तत्कालीन कंपनीचे डायरेक्टर नरोत्तमभाई सक्सेरिया यांनी माझ्याशी चर्चा करताना एक दोन गोष्टी सुचवल्या. गणेशाचा सिंदूर वर्ण आणि केवळ दोन हात कायम ठेवून बाकी सर्व मुक्तपणे साकार करण्यास त्यांनी परवानगी दिली. मोदकाचा नैवेद्य घेणे आणि प्रासादिक आशीर्वाद देणे हा मूळभाव प्रेमाच्या देवाणघेवाणी सारखा आहे. त्यामुळे मानवीय सलगी अशा मूर्तीतून प्रकट होईल , असे त्यांचे म्हणणे मला पूर्णतया पटले. अशा दोन हातांच्या गणपतीची अनेक चित्रे त्यांनी काढून घेतली. त्यात उभे , बसलेले , पहुडलेले , नृत्य करणारे , बालवयातले आणि प्रौढ असे गजानन साकार केले. ही चित्रे इतकी प्रसिद्ध झाली की , त्यातली काही चित्रे त्या वर्षीच्या गणेशोत्सावात मूर्ती रूपाने दिसू लागली. अनेकांनी ही चित्रे आजतगायत संग्रह करून ठेवली आहेत.
आज इतक्या वर्षांनी देखील गणेशभक्तीचा उत्साह जनमानसात जागरूक आहे. प्लास्टरच्या मूर्तींनी आणि थर्माकोलच्या सजावटींनी पर्यावणरण दूषित होत आहे. मूर्ती घडविणे हे केवळ शिल्पकाराचेच काम नव्हे , तर कुणीही गणेशमूर्ती घडवू शकतो , अशी भावना जागविणारे काही कलाकारांच्या कार्यशाळा आयोजित करीत आहेत. अशा उपक्रमातून पुन्हा घरोघरीचा यजमान आपली गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने घडवून पूजा बांधेल तो दिवस फार लांब नाही. कारण प्रत्येक व्यक्तीत कलाकार आणि कलारसिक दडलेला असतो. गणपती हे कला सृजनाची प्रेरणा देणारे दैवत आहे. ही प्रेरणा सर्वांना प्राप्त झाली तर खरोखरीच गजानन पावला , असे मी म्हणेन आणि एक दिवस ' करायला गेलो आणि गणपती आणि गणपती साकार झाला , ' असे आपण म्हणू.
No comments:
Post a Comment