'मद्रास कॅफे'चा दुर्लक्षित नवमार्ग - 'Madras Cafe' ignored new road
ऑल
द प्रेसिडेन्टस् मेन, साल्व्हादोर आयेंदे किंवा जेएफके या राजकीय
थरारपटांइतका 'मद्रास कॅफे' बांधेसूद नसेल. पण इतिहासाला हादरे देणारी
राजीव गांधींची हत्या व तिचे जागतिक धागेदोरे केंद्रस्थानी ठेवलेला चित्रपट
निघणे, हीच प्रगल्भतेची खूण मानावी लागेल. तिला दाद द्यायला हवी...
ज्या देशात 'आँधी' किंवा 'सरकारराज' असल्या चित्रपटांना 'राजकीय' चित्रपट
मानले जाते, तिथे कलावंत आणि रसिक या दोघांच्याही चित्रजाणिवेची इयत्ता
एकमेकांवर प्रभाव टाकत राहते. अंकुश ठेवत राहते. हा परस्परप्रभाव कथित
राज-पटांपुरते बोलायचे झाले तर निव्वळ कचकड्याची, कार्टूनरंगी आणि तद्दन
अविश्वासार्ह पात्रे निर्माण करत राहतो. खरेतर, देशात इतके भयंकर व प्रवाही
राजकीय नाट्य पदोपदी घडत असताना त्यातून सर्वच प्रकारच्या उत्तम व अस्सल
कलाकृती जन्म घेऊ नयेत, हे आपल्या लोकशाहीच्या 'लकव्या'चे उदाहरण आहे.
स्वातंत्र्यानंतर पंजाब, आसाम, काश्मीर, श्रीलंका हे प्रश्न व अनेक
आंदोलने; इंदिरा, राजीव, लोंगोवाल यांच्या हत्या; श्यामाप्रसाद मुखर्जी,
शास्त्री यांचे (संशयास्पद) मृत्यू; किमान चार युद्धे आणि असंख्य प्रकारचे
दहशतवाद यांनी विणलेले आधुनिक भारताचे आयुष्य म्हणजे सर्जनशील कलाकृतींसाठी
समृद्ध खाण आहे. मात्र, चित्रपट, नाटक, चित्रकला यांनी समग्र
'राष्ट्रजीवन' ताकदीने अंगावर घ्यायचे असते, हे भारतात अजून रुळलेले नाही.
त्यामुळे, 'मद्रास कॅफे' हा चाकोरी सोडून झालेला प्रयत्न दुर्लक्षित राहतो.
'मद्रास कॅफे' या चित्रपटाचे नावच आधी 'जाफना' असे होते. ही श्रीलंकेतील तामिळबहुल प्रांताची राजधानी. 'तामिळ ईलम' या स्वप्नातल्या देशाचीही भावी राजधानी. एलटीटीई व तिचा जन्मदाता प्रभाकरनचे मुख्य ठाणे. श्रीलंका सरकार व एलटीटीई यांच्या भीषण संघर्षात भारतीय शांतिसेनेचा प्रवेश आणि त्यातून पुढे झालेली राजीव गांधींची हत्या, हा या चित्रपटाचा विषय आहे. कलावंतांची अदाकारी, चित्रपटाचा वेग, तांत्रिक सफाई व प्रेक्षकांना खिळवणारा मसाला हे निकष लावून या चित्रपटाचे निराळे मूल्यमापन करता येईल. मात्र, इतिहासाशी प्रामाणिक राहून तो काळ जागतिक कॅनव्हासवर रेखाटण्याचा कथा-पटकथा लेखक व दिग्दर्शकाचा आवाका दाद देण्यासारखा आहे. राजीव गांधी यांची हत्या हे काही माथेफिरू कृत्य नव्हते. (कोणत्याही राजकीय व्यक्तीचा खून 'माथेफिरू' नसतो, अगदी भावाने केलातरी.) राजीवच्या हत्येमागे दलालांची टोळी होती. या टोळीत आध्यात्मिक स्वामी, शस्त्रांचे व्यापारी, दहशती नेते असे सारेच होते. त्यांनाही खेळवणारे अदृश्य हात होते. काही हात स्वदेशात असतील. काही महासत्तांच्या गंडस्थळात दडलेले. हे चित्रपटात कधी स्पष्ट तर कधी सूचकतेने दिसत राहते. ते सतत अस्वस्थ, अंतर्मुख करीत राहते.
सशस्त्र संघर्षाने श्रीलंका तुटून तामिळींचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले असते तर भारताची डोकेदुखी कायमची वाढली असती. हिंदी महासागर व लंकेची सामुद्रधुनी हे महासत्तांना खेळण्यासाठी एक अंगण झाले असते. दुसरीकडे, श्रीलंकेत तामिळींची सिंहली सत्तेने निर्घृण कत्तल चालविली होती. या दुहेरी आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी भारतीय शांतिसेनेचा पर्याय निघाला. त्यावर कित्येक महिने खल चालू होता. तो राजीवचा एकट्याचा हट्ट नव्हता. मात्र, या निर्णयाची किंमत त्यांनी शेवटी प्राणांनी चुकती केली. भारतात ढवळाढवळ करणाऱ्यांनी ही शांतिसेनेची खेळी कशी उलटवली व तिला घायाळ केले, हे 'मद्रास कॅफे'त नेमके दिसते. या चित्रपटाचे वैशिष्ट्य हे की, तो खराखुरा, अस्सल आहे. कथानकापासून तो नाचगाण्यांनी किंवा प्रेमप्रसंगांनी दूर जात नाही. उलट, ताण वाढवत राहतो. गुप्तचरांच्या चाली, त्यांना पडणारी फितुरीची भगदाडे, देश म्हणून आपल्याला येणारे अपयश व कारस्थानांचे धागेदोरे नेमके दाखवत राहतो. श्रीपेरुम्बुदूर इथल्या प्राणघाती सभेत राजीवना वाचविण्यासाठी 'रॉ'च्या विक्रमसिंग (जॉन अब्राहम) या अधिकाऱ्याने जिवाचा आटापिटा करणे व तो शेवटी क्षणभर उशिरा पोहोचणे, हे दिग्दर्शकाचे कलात्मक स्वातंत्र्य आहे. पण, मोठ्या नेत्याची हत्या होणार आहे, असे कित्येक गुप्त संदेश आधी गुप्तचरांनी टिपले होते, हे तर पुढच्या पोलिस तपासाने सिद्धच केले. हे गुप्त संदेश टिपण्याची घालमेल, ते उलगडण्याचे गुप्तचरांचे कौशल्य व शेवटी राजीवना रोखण्यात आलेले अपयश हे चित्रपटात फार प्रत्ययकारी उमटले आहे. या धोकादायक सभेत जाण्याचा राजीवचा आग्रह तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी वेळप्रसंगी त्यांना अटक करून मोडून काढायला हवा होता, असे चित्रपट पाहताना वाटत राहते. अशी समज पेरणे, हेच या चित्रपटाचे यश आहे.
या चित्रपटाला भारतात काही कडव्या तामिळ संघटनांनी विरोध केला आहे. तामिळी संघर्षाचे (म्हणजे एलटीटीईचे) प्रतिकूल चित्रण त्यांना खुपले. एकवेळ ते समजू शकते. मात्र, काही नेत्यांना 'ही एका पक्षाच्या प्रचाराची फिल्म' वाटली. त्यांच्या बालिश बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. काहींनी या चित्रपटाला श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी फायनान्स केले आहे, असा ठपका ठेवला. आपल्या कलात्मक अकलेचा लसावि दाखविणारी ही उदाहरणे आहे.
जगात आजवर अनेक उत्तम राजकीय थरारपट झाले. पॅट्रिसिओ गूझमनचा 'साल्व्हादोर आयेंदे', अॅलन पाकुलाचा 'ऑल द प्रेसिडेंट्स मेन' किंवा ऑलिव्हर स्टोनचा 'जेएफके' ही त्यातली मोजकी उदाहरणे. 'मद्रास कॅफे' त्यांच्याइतका बांधेसूद नसेल. पण इतिहासाला हादरे देणारी राजीव गांधींची हत्या व तिचे जागतिक धागेदोरे, यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट निघणे, ही बॉलिवूडच्या दुर्मिळ प्रगल्भतेची खूण मानावी लागेल. तिला मनापासून दाद द्यायला हवी...

No comments:
Post a Comment