कणकेचे मोदक
* साहित्य - एक नारळाचा चव (किस), एक वाटी गूळ, एक चमचा खसखस भाजलेली, एक चमचा वेलदोडा पावडर, एक चमचा तेल, चिमूटभर मीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, काजूचे तुकडे.
* कृती - नारळाचा चव, गूळ एकत्र करून शिजवून घ्यावा. मिश्रण कोरडे झाल्यावर गॅस बंद करा. वेलदोडा पावडर व खसखस टाका. यात दोन मोठे चमचे साजूक तूप टाका. काजू, बदाम टाका. कणकेत मीठ, तेल, टाकून कणीक घट्ट मळून घ्या. तेलाचा हात लावून पातळ पु-यां लाटून त्यात वरील सारण भरून मोदकाचा आकार द्या व चाळणीमध्ये किंवा मोदकपात्र असल्यास त्यात वाफवून घ्या. विसर्जनाच्या वेळी हे मोदक नैवेद्य म्हणून दाखवतात.
तांदळाचे पारंपरिक उकडीचे मोदक
* साहित्य - तांदळाची बारीक पिठी दोन वाट्या, उकळते पाणी दोन वाट्या, मीठ अर्धा टी स्पून, साजूक तूप दोन चमचे, सारणासाठी दोन नारळांचा चव त्याच्यात अर्धा भाग गूळ किंवा साखर किंवा दोन्ही, अर्धी वाटी दूध, वेलदोडे जायफळ पूड अर्धा टी स्पून, काजू, खसखस बारीक कुटून.
* कृती - दूध, साखर, खोबरे, गूळ एकत्र करून शिजवून घ्या. फार घट्ट करू नका. गार झाल्यावर वेलदोडे व जायफळ पूड घाला. तांदूळ पिठी पाणी, मीठ, तूप घालून उकळा, हलवून झाकण ठेवून द्या. मंद गॅसवर वाफ आणा. उकड नेहमीच गरम राहायला पाहिजे. उकड मळून सारण भरून मोदकाचा आकार द्या. कुकरमध्ये चाळणी ठेवा. तुपाचा हात चाळणीला लावा. तयार मोदक पाण्यात बुडवून मग चाळणीवर ठेवा. शिटी काढून इडलीप्रमाणे वाफवा. तुपासोबत गरम गरम खायला द्या. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधीही करून बघा. म्हणजे नैवेद्य म्हणून चांगले जमतील.
फ्राय मोदक
* साहित्य - पाव किलो रवा व मैदा अर्धा अर्धा पाव एकत्र करून मळून घ्या. मळताना त्यात चिमूटभर मीठ व अर्धा चमचा तूप घाला, पीठ घट्ट मळा. सारण एक खोवलेला नारळ, एक वाटी साखर, एक टेबलस्पून खसखस भाजून, वेलदोडा पूड, काजू, बदाम, बारीक चिरून एकत्र करून घ्या.
* कृती - साखरेचा पाक करून घ्या. (पाणी घालून) त्यामध्ये खोबरे, खसखशीची पूड, चिरलेले काजू, बदाम सर्व घाला. पिठाची मोठी पोळी लाटून त्याला मध्यम आकाराच्या वाटीने गोल आकार द्या. म्हणजे सर्व मोदक एका आकाराचे दिसतील.
त्यामध्ये सारण भरून मोदक बनवा. ओले फडके १५ मिनिटांसाठी मोदकावर झाकून ठेवा. मंद गॅसवर बदामी रंग येईपर्यंत तळून घ्या.
उपवासाचे मोदक
* साहित्य (पाटीसाठी) - एक वाटी साबुदाणा व एक वाटी शिंगाडा पीठ घ्या. एक चमचा तूप, चिमूटभर मीठ, एक वाटी पाणी. सारणासाठी दोन नारळाचा चव, गूळ किंवा साखर निम्मे अर्धा कप दूध किंवा खवा, काजू चिरून.
* कृती - दूध, साखर, गूळ, खोबरे एकत्र शिजवा गार झाल्यावर त्यात काजू, वेलदोडे पूड घाला. पाणी, मीठ, साबुदाणा शिंगाडा पीठ एकत्र करून शिजवून घ्या. उकडीला मंद गॅसवर वाफ आणा. पाटीत सारण भरून मोदक बनवा व वाफवून घ्या.
रव्याचे मोदक
* साहित्य - एक वाटी रवा, एक वाटी दूध, अर्धी वाटी पाणी एकत्र करून चिमूटभर मीठ.
* कृती - रवा किंचित बदामी रंग होईपर्यंत तूप घालून भाजून घ्या. दूध, पाणी, चिमूटभर मीठ, दोन चमचे पिठीसाखर घालून शिरा बनवा. चांगले मळून सारण भरून मोदक वाफवून घ्या. (सारण उकडीच्या पारंपरिक मोदकांप्रमाणे.)
तिळाचे मोदक
* पाटीसाठी - पारंपरिक तांदळाची उकड वरीलप्रमाणे बनवा
* सारणासाठी - अर्धी वाटी सुक्या खोब-यांचा किस, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगादाण्याचा कूट, एक वाटी गूळ, जायफळ पूड.
* कृती- खोबरे, तीळ, एकत्र भाजून पूड करा. सारण एकत्र करा. पाटीत भरून मोदक बनवा, खूप चविष्ट लागतात.
No comments:
Post a Comment