आरंभदेवता गणेश
ओम नमो अनादि आद्या ।
वेदवेदांतवेद्या ।
वंद्यांही परमवंद्या ।
स्वसंवेद्या श्रीगणेशा ।।
तुझें निर्धारतां रूप ।
केवळ अरुपाचें स्वरूप ।
तेथें अवयव कल्पितां अमूप ।
तंव कल्पनेचा लोप ।
स्वरूपीं तुझ्या ।।
यालागी जैसा अससी तैसियासी ।
नमन साकार निराकारासी ।
तंव अंगत्व मुकलें अंगासी ।
भज्यभजकासी अद्वैत।।
... श्री एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाची सुरुवात या गणेशवंदनेनं झाली आहे. ज्याची उत्त्पत्ती कुठे झाली , कधी झाली , आरंभ कधी झाला हे शोधता येत नाही अशा अनादि आद्या , वेदवेदांतांनाही परमवंदनीय असलेल्या आणि जो केवळ स्वत:सच जाणू शकतो , अशा श्रीगणेशा तुला नमन असो. तू म्हणजे अरुपाचे रूप आहेस. तुझे अवयव कल्पना करावी तेवढे आहेत. शेवटी कल्पनेचाच लोप होतो. त्यामुळे जसा असशील , साकार वा निराकार रूपांत असशील तशा तुला नमन असो. तुझ्या भक्तीने भक्त आणि तुझ्यातलं द्वैतच संपत... ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
'' ओम नमो जी आद्या ।
वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या ।
आत्मरूपा।।
देवा तूंचि गणेशु ।
सकलमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तीदासु ।
अवधारिजो जी ।। ''
जी आद्य आहे , वेदांनी प्रतिपादिलेली आहे , स्वसंवेद्य आहे ती आत्मरुपात रमलेली बुध्दी हीच गणेश आहे. तिला माझे नमन असो. सर्वांच्या मनोबुध्दीला प्रकाश देणाऱ्या श्रीगणेशाला वंदन असो. समर्थ रामदास म्हणतात ,
'' ओम नमो जी गणनायेका ।
सर्वसिध्दिफळदायेका ।
अज्ञानभ्रांति छेदका ।
बोधरूपा ।। ''
... सर्व सिध्दींची फळे देणाऱ्या , अज्ञान आणि भ्रमाचे निवारण करणाऱ्या बोधरूप गणेशा तुला वंदन असो. श्रीगणेश पुराणातही भक्त वरेण्याला श्रीगणेशाने आपल्या स्वरूपाची ओळख करून देताना म्हटले आहे की ,
'' अज्ञानान्मां न जानन्ति जगत्कारणकारणम् । ''
या जगाचे कारण , या जगाच्या उत्पत्तीचे कारण मीच आहे पण अज्ञानामुळे माझे हे रूप लोकांना माहित नाही.
' अविकारोह्यप्रमेयोह्यहमव्यक्तो विश्वगोह्यव्यय:।। '
मी निविर्कार आहे , अप्रमेय आहे , अव्यक्त आहे , विश्वव्यापी आहे आणि अविनाशी आहे. मुद्गलपुराणात देवांनी गणेशाची स्तुती करताना म्हंटले आहे ,
'' गजाननाय पूर्णाय सांख्यरूपमयाय ते ।
विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नम: । ''
हे गजानना तू पूर्ण आहेस , परमात्मा आहेस. ज्ञानस्वरूप आहेस. निराकार रूपाने सर्वत्र भरून राहिला आहेस. इतकेच नाही तर ' अमेयाय च हेरम्ब ,' हे गणराया तू अमेय आहेस. तुला कोणत्याही प्रमाणांनी मोजता येत नाही , आकलन करता येत नाही... थोडक्यात श्रीगजानन हा आद्य आहे , आद्यकारण आहे , निराकार आहे , बुध्दीला प्रकाश देणारा आहे , हे पुराणांनी आणि बहुतेक सर्वच संतांनी नमूद केलं आहे. ' ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: श्रृण्वन्नूतिभि: सीद सादनम् । ' ही ऋग्वेदातील ऋचा प्रसिध्द आहे. ' गणांचा अधिपति असलेल्या , ज्येष्ठ अणि श्रेष्ठ अशा ब्ाह्माणस्पते आम्ही तुझे स्तवन करतो. आमच्या आवाहनाने व स्तोत्राने प्रसन्न होऊन आमच्या साह्यार्थ तू यज्ञस्थान ग्रहण कर!
'ऋग्वेदातील या ऋचेत गणपतिचा उल्लेख सर्वप्रथम आला असला तरी तो ब्ाह्माणस्पती या देवतेला उद्देशून होता. ब्रह्म म्हणजे मंत्र आणि पति म्हणजे अधिपती. मंत्रांचा अधिपति तो ब्रह्मणस्पति. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पति आणि उपनिषदातील ओंकार यांच्या एकत्रीकरणातून गणपति ही ज्ञान , विद्या व ऐश्वर्याची देवता झाली. गणपतीचे सध्याचे बाह्यरूप हे देखिल ब्ाह्माणस्पतीचेच विकसित रूप आहे , असे काही तज्ज्ञांचे प्रतिपादन आहे (संदर्भ : डॉ. श्रीराम महादेव भातखंडे)
श्रीगणेशाच्या प्रचलित सगुण रूपाचा सुरेख मागोवाही संतांनी घेतला आहे. एकनाथ महाराजांना गणेशाच्या हातातला परशु म्हणजे लखलखत्या ज्ञानाचं प्रतीक वाटला. हा परशु भेद-भ्रम-भ्रांति तोडून टाकत होता. अंकुश हा नित्यस्मरणाची जाणीव करून देणारा होता. मोदक म्हणजे आनंदमोदक होता. ज्ञानेश्वरांनी गणरायाचे वर्णन करताना असंख्य उपमा वापरल्या आहेत. सहा शास्त्रे म्हणजे त्याचे सहा हात , अनुमानरूपी परशु , प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थांचा तत्त्वभेदरूपी अंकुश , ब्ाह्मारसाने भरलेला ब्ाह्माज्ञानरूपी मोदक त्या हातात आहेत... वगैरे वगैरे. श्रीगणेशाच्या ओंकाररूपाचे वर्णन करणारी
' अकार चरणयुगुल ।
उकार उदर विशाल ।
मकार महामंडल ।
मस्तकाकारें।। '
ही त्यांची उपमा विख्यातच आहे. जगाचे आद्यकारण किंवा जगाच्या आरंभी असलेला ओंकार म्हणजेच श्रीगणेश या मताचा प्रत्यय त्यात आहे. पंतमहाराज बाळेकुंदीकर यांनी श्रीगणेशाबद्दल वेगळे विचार मांडले आहेत. साक्षात आत्मा हाच गणपति , असं त्यांनी नमूद केलं आहे. ते म्हणतात , '' येथे गण कोण तर , इंदिये हेच गण , तेच इंदादि देवगण. त्यांचा अधिपति तो गणपति. त्यांचा नायक तोच विनायक. अष्टधा प्रकृति म्हणजेच अष्टमहासिध्दी. अनंतवृत्ती या त्याच्या दासी. हा देहच त्याचे वाहन , म्हणजे मूषक. '' पुढे गणपति म्हणजे ' अहंकार ' ( इथे ' अहंकार ' हा शब्द नकारात्मक अर्थाने नसावा तर ' अहं ब्रह्मास्मि ' मधील ' अहं ' म्हणजेच आत्मस्वरूप , स्वस्वरूप , असा असावा) असे नमूद करून पुराणातील एका कथेचा आध्यात्मिक अर्थ पंतमहाराजांनी उलगडून दाखविला आहे.
यातील संकल्पना आणि सूचक अर्थ अध्यात्मार्गाची थोडी ओळख असलेल्यांनाही नेमकेपणाने उमगतील. मूळ कथा अशी आहे की , गणपति हा शिवदर्शनासाठी कैलासावर जाण्यास निघाला. छोट्याशा उंदरावर बसून तो निघाला होता. मोठे पोट , पर्वताची चढण आणि इवलासा उंदीर ; त्यामुळे तो उंदरावरून पडला. त्यावेळी फक्त साक्षी होता चंद. गणपतिला असं पडलेलं पाहून चंदाला हसू आलं. तेव्हा चिडून गणपतीने शाप दिला की , तुझं तोंड यापुढे कुणी पाहणार नाही. पुढे देवदेवतांनी विनवणी केली की , सूर्य-चंदावाचून चालणार नाही तेव्हा गणरायाने उ:शाप दिला आणि सांगितले की , चतुर्थीला तुझे तोंड कुणी पाहणार नाही. या कथेचा आध्यात्मिक अर्थ काय ? इथे पंतांनी शिवाला कल्याणकारी आत्मा म्हणजेच परमात्मा मानलं आहे , गणेश हा ' अहं ' म्हणजे आत्मा आहे तर ' चंद ' म्हणजे ' मन ' आहे. गणपती म्हणजे ' अहं ' हा फार दिवस प्रयत्न करून सर्व इंदियवृत्तींना बांधून , त्यांचे नियमन करून शिवाच्या म्हणजेच परमात्म्याच्या भेटीसाठी निघाला. त्याचे वाहन होते हा देह आणि त्यावर स्वार झालेल्या आत्म्याच्या पोटी अनेक संकल्प-विकल्प आणि वासना दडलेल्या होत्या. परमात्म्याच्या दर्शनाकडे जाताना त्या काही आवरेनात. त्यामुळे ' आत्मा ' पुन्हा देहावर घसरला. ' अहं ' च्या नेहमीच जवळ असणारा त्याचा सखा म्हणजेच ' मन'.
या मनालाच तर मारून परमात्मदर्शनाचा प्रयत्न अहंने चालविला होता. त्यामुळे या फजितीने मनाला हसू आले. अर्थात ' अहं ' च्या प्रत्येक क्रियेत साक्षी असणारे मन त्याला या मार्गावरही साथ द्यायला नाराज नव्हतेच. पण परमात्म्याच्या भेटीला निघण्यापूवीर् आपली , चित्तशुध्दी त्याला हवी होती. तेव्हा ' अहं ' चिडला आणि ' मना ' चे तोंड कधीच पहायचे नाही असा त्याने आदेशच दिला. पण सर्व देवदेवतांनी , म्हणजेच गणांनी , म्हणजेच इंदियांनी विनविले की , मनाचा आधार घेऊनच बरंच काही साधू शकेल तेव्हा मन र्वज्य करू नका! अखेर गणपतिने चतुथीर्ला चंदाचे मुख पहायचे नाही , असा निश्चय केला. चतुर्थी म्हणजे तुर्या. तीन देहापलिकडील अवस्था. तिच्या पलीकडे उन्मनी ; तेथे मन नाही. तिथेच शिवयोग घडतो. उन्मनी व तूर्या सोडून आत्मा पुन्हा देहावर आला म्हणजे मनाकडे आला. मनाकडे लक्ष लागले की , तो देहात गुंतला आणि ' शिवा ' ला दुरावला!
संत आणि सत्पुरुषांनी केलेल्या व्याख्यांवरून आणि वर्णनांवरून श्रीगणेशाचे आद्यत्व , निराकारत्व , निर्गुणत्व आणि त्यामागचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट होतो. इतका वेध घेऊनही त्याचे रूप खऱ्या अर्थाने स्पष्ट मात्र होत नाही , त्याचे आकलन पूर्ण होत नाही , हेच त्याचे वैशिष्ट्य. आध्यात्मिक क्षेत्रात तर श्रीगणेशाचे स्थान सर्वप्रथम आणि सर्वसमावेशक आहे. कोणत्याही दैवताची उपासना करणारा कोणत्याही पंथाचा साधक आपल्या उपासनेची सुरुवात ' श्रीगणेशाय नम: ' या मंत्राने करतो. संतांनी लिहिलेल्या ग्रंथाची सुरूवातही ' श्री गणेशाय नम: ' या मंत्राने आणि गणेशवंदनेने होते. तो विघ्नहर्ता आहे आणि साधनेचा मार्ग त्याच्या कृपेने निष्कंटक व्हावा , हा त्यामागचा हेतू असतो का ? बहुधा नाही. कारण साधकाला मार्ग खडतर असो वा निष्कंटक , त्याची तमा नसते. निदान नसली पाहिजे. त्याचा संपूर्ण विश्वास , संपूर्ण निष्ठा ही त्याच्या उपास्य दैवतावर असते. आधी एकाशी चित्त जडलं की , मग तोच सर्वत्र आहे , हे जाणवतं. म्हणून आधी एकावर लक्ष केंदित करायला अध्यात्म सांगतं. मग तरीही वेगवेगळ्या पंथाच्या , मार्गाच्या साधकांच्या दैनंदिन उपासनेची सुरुवातही ' श्रीगणेशाय नम: ' ने का होते ?
याचं कारण गणपतीचं सर्वात्मक स्वरूप हेच आहे. जन्मापासून आपली पहिली ओळख होते ती ' बाप्पा मोरया ' शीच! लौकीक जीवनातील विद्याभ्यासाची सुरुवातही ' श्रीगणेशा ' नेच होते. हा गणेश आहे शिव आणि पार्वतीचा पुत्र. शिव म्हणजे सौंदर्य , मांगल्य , पावित्र्य आणि पार्वती म्हणजे शक्ती. शक्तीने उत्पन्न केलेल्या या तत्त्वाने शिवाला म्हणजे मांगल्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मांगल्याने त्याचा ' शिरच्छेद ' केला , त्याचा भ्रम नष्ट केला आणि त्याला बुध्दिचे दान दिले. तेव्हा नुसती शक्ती कामाची नाही. तिला मांगल्याचा आणि बुध्दीचा स्पर्श हवा आणि नुसती बुध्दी आणि मांगल्यही कामाचे नाही तिच्यामागे शक्तीही हवी. गणपती या मिलाफाचे प्रतीक आहे , असं मला तरी वाटतं. आपल्या उपासनेने जी शक्ती साधली जाते तिच्यामागे बुध्दी आणि मांगल्यही हवे , या भावनेतूनच साधक म्हणत असावा , ' श्रीगणेशाय नम: '!
No comments:
Post a Comment