World Prayer -Mantrapushpanjali - Om Yadnen Yadnyamayjant
विश्वप्रार्थना मंत्रपुष्पांजली
'मंत्रपुष्पांजली' हा माझ्याकरिता बालपणी अत्यंत कुतुहलाचा विषय होता. सार्वजनिक गणेशोत्सवांमधून आरतीनंतर सामुहिकपणे मोठ्या आवाजात म्हटल्या जाणारा हा मंत्र. विशिष्ट स्वर अधिक लांबवून म्हणण्याचा प्रघात आणि मंत्राचा शेवटचा शब्द 'सभासदयती' म्हटल्यानंतर संपूर्ण कल्लोळ अचानक बंद होऊन पसरलेली शांतता आश्चर्यचकित करणारी असे. मात्र या मंत्राचा अर्थबोध मला कित्येक वर्षे झाला नव्हता.
पूजा व्यक्तिगत स्वरुपाची असो की सार्वजनिक, गणपतीची असो वा दुर्गेची, जन्माष्टमीची असो वा रामनवमीची, आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याचा प्रघात भारतात सर्वदूर आहे. संप्रदाय, मतपंथ इत्यादिंच्या सीमा ओलांडून मंत्रपुष्पांजलीचे सामूहिक गायन होते. प्रांत, भाषांच्या अडचणी पार करून हा मंत्र, अर्थबोध होवो की न होवो, सर्वत्र म्हंटल्या जातो.
तरुणपणी कुठल्याही कार्यक्रमात प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकरांच्या व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्यांच्या भाषणातून या मंत्राच्या अर्थाविषयीचा उल्लेख झाल्याचे आठवते. परंतु विस्तृत अर्थबोध जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र मी स्वतः कधीच केला नव्हता. काही वर्षांपुर्वी 'लुप्त सरस्वती नदीचा शोध' या विषयाचा अभ्यास करताना टी.पी. मोलनर, मॅक्समुलर आदि पाश्चात्य विद्वानांचे लेखन साहित्य वाचण्याची संधी मिळाली. या पाश्चात्या विद्वांनांनी त्यांच्या परीने संस्कृत वचनांचा अर्थ लावल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. माझेही संस्कृतचे ज्ञान अल्प असल्याने मंत्रपुष्पांजलीविषयीची उत्सुकता मात्र कायमच होती.
काही वर्षांपूर्वी माझे वडील बंधू श्री तात्या कुंटे यांनी कर्पुर आरतीचा अर्थ सांगितला. कापूर प्रज्वलीत करून आरतीच्या शेवटी म्हटल्याजाणारी कर्पूर आरती म्हणजे शिव पार्वतीचा अतिशय सुंदर श्लोक आहे. 'पार्वती कर्पूर गौर आहे तर शिव करुणावतार आहे. शिवाने भुजगेंद्राचा हार धारण केला आहे तर पार्वतीने ह्यदयाला आनंद देणारी फुलें धारण केली आहेत. पार्वतीने मंदार फुलांची माला धारण केली आहे, तर शिवाने कपालकुंडाची माला घातली आहे. गिरीजेचे अंबर (वस्त्र) दिव्य आहे, तर शंकर दिगंबर आहे. अशा भवाचे (शंकराचे) भवानी सह (गिरिजेसह) मी नमन करतो' असा या कर्पुर आरतीचा अर्थ आहे.
केवळ औपचारिकेतेने म्हटलेल्या स्त्रोत्रमंत्राविषयी सामान्यजनात खूप अज्ञान आहे. परिणामी शुष्क कर्मकांडावरील अंधश्रद्धांचे महात्म्य वाढलेले दिसते. मत, पंथ, संप्रदाय, भाषा व प्रांत यांच्या सीमाओलांडून मंत्रपुष्पांजली सामुहिकपणे म्हणण्याचा प्रघात का पडला? हे या मंत्राचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच कळते. खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या ह्यदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणेः
ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। १।।
(मूळ स्त्रोतः ऋग्वेद मंडल १, ऋचा १६४)
ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने। नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु। कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः।।२।।
(मूळ स्त्रोतः तैत्तरीय अरण्यक, अनुवाक ३१, मंत्र ६ )
ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टयं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषं आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।३।।
(मूळ स्त्रोतः ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड १९)
ओम तदप्येषः श्लोकोsभिगीतो मरूतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति।।४।
(मूळ स्त्रोतः ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड २९)
या मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी काही शब्दांचे विग्रह व अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकांतील काही शब्दांचे अन्वयार्थ व श्लोकांचे अर्थ येणेप्रमाणेः
विग्रह व शब्दार्थ
श्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्
यज्ञं - यज्ञरुप प्रजापती अयजन्त - यजन केले, पुजन केले प्रथमानि धर्माणि आसन् - प्रारंभीचे धर्मविधी होते. तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः नाकं - स्वर्ग महिमानः गौरव, धन्यता सचन्त - संधान बांधणे, प्राप्त करणे साध्याः साधकदेव- देवता निवास, स्वर्गलोक
श्लोकाचा अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
श्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्म हे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः
प्रसह्य- अनुकुल राजाधीराज वैश्रवण, कामेश्वर वैश्रवण, कुबेर वैश्रवण इ. वैश्रवणाची विशेषणे.
श्लोकाचा अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.
श्लोक ३ (प्रथमार्थ) ओम स्वस्ति। सामाज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमधिपत्यमयं।
स्वस्ति - सर्व कल्याणकारी भौज्यं- उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण स्वाराज्यं- लोकराज्य वैराज्यं- आसक्ति विहित, निर्मोहि राज्य पारमेष्टयं महाराज्यं - परमश्रेष्ठ राज्य अधिपत्यमयं- अधिपत्य (सत्ता) अयम् (आमची)
श्लोकाचा अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.
श्लोक ३ (द्वितियार्थ)
समन्तपर्यायीस्तात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति। समन्तपर्या- सर्व बाजूंनी, क्षितिजापर्यंत ईस्यात् - रज्ञण करो, सुरक्षित करो सार्वायुषः- दीर्घ आयु असलेला अन्तातपरार्थात - परार्धवर्षापर्यंत (अंतापर्यंत) एकराळ - एक राष्ट्र
श्लोकाचा अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.
श्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगोतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।। तत् अपि एषः श्लोकः अभिगीतो अभिगीतः किर्तीस्तवन, स्तुतीगीत अविक्षितस्य मरुत्यावसनगृहे- अविक्षित पुत्र मरुताच्या घरी मरुतः मरुतगण, मरुतराजाच्या राज्यसभेचे समादस
श्लोकाचा अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.
संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.
प्रत्येक मानवजाती-समुहाच्या विशेषतांच्या आरक्षण- संरक्षणाची हमी देणारी शासन व्यवस्था असेल. परस्पर समादर सहिष्णु समाज व्यवस्थाच संपूर्ण विश्वसमुदायाच्या आकांक्षापूर्तीची हमी देवूं शकतो. या वैश्विक कल्याणाच्या विचारधरेतून कधी 'कृष्णंतो विश्वमार्यम्'चा जाहिरनामा निघाला, तर ज्ञानदेवा नी, 'हे विश्वची माझे घर म्हटले' रामदासांनी 'चिंता करितो विश्वाची' अशी ललकारी दिली. भेद वरवरचे, परंतु आंतरिक भाव एकात्म राष्ट्रीयतेचा एवढा विशल अर्थ मंत्र पुष्पांजलीचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार सतत करणाऱ्या या मंत्राने प्रत्येक कार्यक्रमाची सांगता व्हावी म्हणून जाणीवपूर्वक पडलेला हा प्रघात आहे.
No comments:
Post a Comment