Monday, September 16, 2013

मातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers this book


मातृत्वं उलगडणारं पुस्तक


Matrutva


गरोदरपण आणि बाळंतपण ह्या स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना. अतिशय नैसर्गिक आणि तरीही नित्यनूतन असणाऱ्या. शरीर-मनात घडणारे बदल सगळंच बदलून टाकतात. अनेक प्रश्न मनात येतात. त्याची उत्तरं कशी शोधायची हाही एक प्रश्नच असतो. आजची, बऱ्यापैकी सुशिक्षित स्त्रीदेखील ह्या सगळ्या प्रश्नांना अतिशय गोंधळलेल्या मन:स्थितीत सामोरी जात आहे. बऱ्यापैकी माहिती आहे, एका क्लिकवर संगणकावर भांडार खुलं होत आहे, मैत्रिणी काही सांगत आहेत, पारंपरिक शहाणपणा वेगळंच काही सुचवत आहे... ह्या सगळ्यांचा मेळ घालून कुणीतरी अधिकारवाणीनं, पण प्रेमळपणे 'मी काय करावं' हे सांगावं अशी तिची इच्छा असते. तसंच त्या सांगण्याला तिला विज्ञानाचाही आधार हवा असतो. आजच्या गर्भवती स्त्रीच्या या साऱ्या अपेक्षा डॉ. अरुण गद्रे यांचं 'गुड न्यूज आहे, अर्थात मातृत्व उपनिषद' हे पुस्तक पूर्ण करतं. डॉ. अरुण गद्रे अनुभवी स्त्रीस्वास्थ्य तज्ज्ञ आहेत. हजारो गरोदरमहिला, बाळंतपणं त्यांनी कौशल्याने हाताळली आहेत. ह्या नैसर्गिकप्रक्रियेमागचं विज्ञान, त्यात येणाऱ्या अडचणी, त्यातून मार्ग काढण्याच्या पद्धती, गर्भवती स्त्रीला पडणारे प्रश्न ह्या सगळ्याची त्यांना जाणीव आहे. त्या जाणिवेतूनच हे सुंदर पुस्तक तयार झालं आहे.

हे 'मातृत्व उपनिषद' वाचणाऱ्या तरुणीला आपल्या जवळचे डॉक्टरकाका सगळं समजावून सांगत आहेत, असंच वाटेल. काही गोष्टी सांगायला संकोच वाटतो. पण डॉक्टरकाकांनी त्या आधीच ओळखल्यात आणि त्याचीही उत्तरं त्यांनी पुस्तकात ‌दिली आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व सांगताना त्यांचं म्हणणं आहे- 'हे मी तुला प्रसूतीशास्त्राचं शिक्षण देत नाहीय, तर तू एक सजग पेशंट बनावंस आणि डॉक्टरांना योग्य प्रश्न विचारावेस यासाठी सांगतोय.'

गर्भधारणा होऊ देण्याचा निर्णय दोघांचा असतो. तो कसा विचार करून घ्यावा, लग्नानंतर लगेच गर्भधारणा नको असेल तर, गर्भनिरोधनाच्या कुठल्या पद्धतींसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पहिल्यांदा दिवस राहिले असताना शक्यतो गर्भपात करवून घेण्याची वेळ येऊ देऊ नये, गर्भधारणा होऊ देण्यापूर्वी शरीराची, मनाची काय तयारी असायला हवी - ह्या मुद्द्यांपासून सुरू झालेलं हे पुस्तक गर्भधारणा झाल्यानंतरच्या नऊ महिन्यांच्या प्रवासातही गर्भवतीची सोबत करतं.

केवळ शास्त्रीय माहिती देऊन हा पुस्तकसंवाद थांबत नाही. त्याच्याबरोबर कितीतरी इतर गोष्टी तो सांगून जातो. कुठल्या प्रकारच्या लक्षणांना घाबरून दवाखान्यात जायलाच हवं, कुठल्या प्रकारचे बदल, किरकोळ त्रास गरोदरपणात सहसा काळजी करण्यासारखे नसतात, ही माहिती इथे मिळते. काही समजुती-गैरसमजुतींवर उदा. पपई खाणे, दिवसा झोपणे - वगैरे गोष्टींवरही प्रकाश टाकला आहे. कसं रहावं, कसं बसावं, कसं झोपावं, कपडे, चपला, कशा वापराव्यात, लैंगिक संबंध कसे असावेत हेही डॉक्टर अगदी सहज जाता जाता सांगून जातात. डॉक्टर कसे निवडावेत, दवाखान्यात कुठल्या सोयी असायला हव्यात, रात्री-अपरात्री जायच्या सोयीचा विचार, दवाखान्याजवळ रक्तपेढीची सोय... गर्भधारणा झाल्यानंतर बाळंतपणापर्यंत कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला हवा, त्याची हे पुस्तक आठवण करून देतं.

'माहिती-तंत्रज्ञानाचा स्फोट' असं आजच्या काळाचं वर्णन केलं जातं. त्यातून योग्य अचूक माहितीची निवड करणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे जे नेहमीपेक्षा वेगळं तेच आपल्या बाबतीत घडणार अशी काहीशी भीती आजकाल मुलींच्या मनात असते. नॉर्मल डिलिव्हरी होणार का? हा प्रश्न तर जवळजवळ प्रत्येक गर्भवती स्त्री विचारते. म्हणूनच नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन ह्या दोन्हीबद्दल आवश्यक ती माहिती पुस्तकात आली आहे. सिझेरियनचा निर्णय का घ्यावा लागतो ह्याचीही थोडी चर्चा आहे. पण मुख्य सांगितलं आहे-'डॉक्टरांची निवड योग्य कर, त्यांच्याशी सजगपणे चर्चा कर आणि त्यानंतर त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेव.'

डॉक्टरांच्या बाबतीतही सहसा सांगितल्या जात नाहीत, अशा दोन प्रकारच्या गोष्टी पुस्तकात डॉ. गद्रे यांनी सांगितल्या आहेत. शक्यतो प्रसूतीशास्त्रामध्ये पदवी घेतलेला, सिझेरियन शस्त्रक्रिया हाताळू शकणारा डॉक्टर असावा, तोही काय काय तपासेल, सांगेल, तपासण्या करून घेईल ह्याचाही उल्लेख आहे. पण हे सगळं डॉ. गद्रे यांच्याच शब्दांत सांगायचं तर 'सजगपणे प्रश्न विचारता यावेत' म्हणून. हा मुद्दा मांडताना कुठेही आयुर्वेद अथवा होमिओपॅथी तज्ज्ञांना कमी लेखण्याचा हेतू नाही. फॅमिली डॉक्टरांचंही महत्त्व अधोरेखित केलं आहे. दुसरी डॉक्टरांबद्दल सांगितलेली गोष्ट म्हणजे- जबाबदारी डॉक्टरांनी घेतली आहे. तेही तेवढेच सचिंत आहेत. काळजी घेतात आणि 'वैद्यकीय क्षेत्रामध्ये '२ + २ = २' च होतील असं नाही. ८०% वेळा ते ४ असतात, पण कधी ३, कधी ३ अन् कधी १०३ ही असू शकतात. तेव्हा डॉक्टरांना सतत अविश्वासाने, साशंकतेने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नये. डॉक्टरांवर अभ्यासपूर्ण विश्वास ठेवून, परिस्थितीला सामोरं जावं.

'नेहमीपेक्षा वेगळी परिस्थिती' ह्या प्रकरणात गरोदरपण-बाळंतपणात येणाऱ्या अनेक अडचणींची थोडक्यात माहिती आहे. अडचणींचा क्रम थोडा पुढे-मागे असला तरी बहुतेक सर्व गोष्टींची 'प्रश्न विचारण्यासाठी पुरेशी' अशी माहिती ह्या प्रकरणात आली आहे.

शेवटची दोन प्रकरणं गरोदरपणामधील दोन वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करतात. एक आहे, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात चर्चेत आणलेलं 'स्टेमसेल- कॉर्डब्लड बँकिंग - वस्तुस्थिती'. भविष्यकाळात कदाचित उपचारपद्धती उपलब्ध होऊ शकतील, तेव्हा 'स्टेम सेल्सबद्दल वैज्ञानिक वास्तवाचं योग्य आकलन करून घेऊन, पैशाची उपलब्धता असेल तर विचार करून पालकांनी निर्णय घ्यावा' असं डॉ. गद्रे सुचवतात.

शेवटचं प्रकरण आहे डॉ. चंद्रकान्त संकलेचा यांचं गर्भसंस्काराबद्दलचं. ते त्याला थोतांडच म्हणतात. गरोदरपणात चर्चा, समुपदेशन, व्यायाम, आहार, मानसिक स्वास्थ्य, कुटुंबाचा सहभाग, हे सर्व कुणालाच अमान्य नाही. त्यासाठी गर्भसंस्कार हा मुखवटा घ्यायला नको. खरं खोट्याचा व्यापार मांडून गर्भसंस्कार विकणारे विकतात. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं लेखक सांगतात. आपल्या प्रतिपादनाच्या समर्थनार्थ शास्त्रीय निकषही लावून दाखवतात.गर्भधारणेपूर्वीच्या काळापासून ते बाळाच्या लसीकरणापर्यंत सर्व माहिती शास्त्रोक्त, पण सहजपणे देणारं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं बाह्यस्वरूपही देखणं आहे. वाचताना प्रसन्न वाटेल अशी डॉक्टरांची लेखनशैली आहे. प्रत्येक टप्प्यांच्या शेवटी दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी - थोडक्यात पण योग्य आहेत. डॉक्टरांनी म्हटलं आहे- ''हे पुस्तक लिहायचा उद्देश गर्भारपणासाठी व बाळंतपणासंबंधीचे विज्ञान सुविद्य आणि सुजाण मातेकडे आणि तिच्या कुटुंबाकडे पोहोचवणे हा आहे.'' त्यांचा हा हेतू सफल होतो ह्यात शंका नाही. अनेक तरुण मुलामुलींना निसर्गचक्राच्या सहवासात चालताना ह्याचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही.
'गुड न्यूज आहे, अर्थात मातृत्व उपनिषद'

डॉ. अरुण गद्रे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे

पृष्ठं : १६०, किंमत : २९५

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive